मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही मुलाखत डॉ. नाडकर्णी यांची अमुक तमुक ने घेतलेली नसून, त्या दोघांची आहे होय... तरी म्हटलं आवाहनने अमुक तमुकने घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ कसा काय एडिट केला...

अमितने सुचवलेली ही सलील कुलकर्णी यांची थिंक बॅंक वरची ही मुलाखत फारच आवडली. त्यांच्या आठवणींमधल्या इतक्या जणांविषयी बोलले आहेत की त्यांचा तीस वर्षांचा गाण्याचा प्रवास खरोखरच ऐकणाऱ्याला सुद्धा समृद्ध करतो. आशा, लता, हृदयनाथ, श्रीनिवास खळे, सुधीर मोघे, आरती प्रभू, पुलं, नवे गायक गायिका, बालकविता, त्याची झालेली गाणी, चाली लावतानाचे किस्से. अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. काहीही हातचं राखून न ठेवता सहज सांगितलेल्या शांतवणाऱ्या बऱ्याच आठवणींचा पदर उलगडत जातो. ह्यांचं समृद्ध आयुष्य पाहून आपण तुकड्यात जगतोय असं वाटलं. उगाचच वैयक्तिक पाल्हाळ नाही, पण सांगितिक प्रवासानिमित्त आधी केलेले MBBS , MD आणि नंतर निवडलेले हे क्षेत्र - यामुळे घरातून नाराजी. तो संघर्ष. तेच वडिलांनी पेटी शिकवली तेव्हा साडेतीन वर्षे वय असतात गायलेलं "जयोस्तुते" हे अवघड गाणं. खूपच कौतुक वाटले.

पालकत्व कसं असावं हेही सहज सांगितले आहे. मुलांमधे कलेची आवड कशी जोपासावी हेही. हल्ली झटपट फॉलोअर्स मिळणं म्हणजे प्रतिभा असेल असे नाही. मास आणि क्लास नसून टिकणारी किंवा न टिकणारी कला. "नवीन पोपट हा" पासून "भय इथले संपत नाही" पर्यंत सगळेच कसे वैविध्यपूर्ण आणि तरीही संगीत म्हणून टिकलेय यावर सुद्धा निरूपण आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवासातही "दाद द्या आणि शुद्ध व्हा" ह्या आरती प्रभूंच्या ओळीची आठवण करून दिली आहे. पुलंनी त्यांच्याच चालीबद्दल सांगताना नवं, नवखं आणि ताजं यातला फरक. अशा अनेक आठवणी.

मला फारच आवडले हे. अतिशय शांत आणि मृदू व्यक्तिमत्त्व. कुणाला ऐकावं वाटलं तर मैफिल झाल्यावर सुद्धा चार ओळी पार्किंग लॉट मधे थांबून गाऊन दाखवतो. आढ्यता ठेवीत नाही म्हणाले. कलेपेक्षा पुढे पोचलेले प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आहे. नक्की पहा. मुलाखत घेणारा बोलू देतोय नीट. पेटी, गाणी आणि कविता ह्यांची मैफल रंगली असं वाटलं पाहताना. एकदम शांतवणारे काहीतरी पाहिल्यासारखे वाटले.

आरपारमध्ये शेफाली वैद्य. त्यांचं लिखाण मी fb वर वाचते कधी कधी. कधी आवडतं, कधी भाषा फार असभ्य वाटते. नो बिंदी नो बिझनेस मुळे त्या गेल्या काही काळात फार प्रसिद्ध झाल्या असे वाटले. लेन्सकार्टविरुद्ध त्यानंतर जवळजवळ एक चळवळ उभी राहिली आणि त्यांना त्यांची पॉलिसी बदलावी लागली. मुलाखत चांगली आहे. शेफाली प्रगल्भ आणि समृद्ध व्यक्तिमत्व वाटल्या. त्यांचं लिखाण, इतर समाजपयोगी कामे, त्यांची तिळी मुले यावर विस्तृत चर्चा आहे.

मला आवडलेल्या लल्लनटॉप मधील मुलाखती म्हणजे परेश रावल (कुठेतरी त्याने केलेले मराठी रंगमंचाचे कौतुक सुखावून गेले, प्राजक्त देशमुखांच्या देवबाभळी बद्दल कसला भरभरून बोलला आहे तो!) , पंकज त्रिपाठी आणि अर्थातच झाकीर खान.

मला ते नील द ग्रास टायसन नावाच्या भौतिकशास्त्राचे संशोधकाने दिलेले इंटरव्ह्यू पण आवडले होते, कन्सेप्शुअल फिजिक्स/अंतरीक्ष विज्ञान पार ब्लॅक होल्स आणि क्वांटम मस्त सुलभपणे समजावून सांगतो तो माणूस.

अजून आठवतील तसे मांडत जाईन

>>>>शेफाली वैद्य यांची मुलाखत
नक्की ऐकेन. एकंदर लोकांनी फार ट्रोल केले त्यांना आणि तरीही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जपले त्यांनी - हा एसेन्स मला महत्वाचा वाटतो. मग त्या राजकिय आहेत नाहीत दुय्यम.

मी पण बघितली ती शेफाली वैद्य मुलाखत. मला मध्येच बोअर होऊन बंद करावी लागली नाही म्हणजे चांगली वाटली. त्यांची साड्यांची आवड आणि नो बिंदी नो बिझनेस, मोदी सपोर्टर वगैरे इतकंच माहित होतं त्यांच्याबद्दल.

इथे वाचुन शेफाली वैद्य माहित आहेत. ट्रोल करणारे आणि काही आक्रस्ताळे प्रतिसाद वाचले आहेत. मला त्या व्यक्तीबद्दल जाणुन घेण्यात रस नाही इतकं समजलं आहे. वैयक्तिक पातळीवर तर मुळीच नाही. त्यामुळे पास.

शेफाली वैद्याची मुलाखत आवडली, फार लान्बली अस वाटल जरा शॉर्ट करता आली असती.
त्याना फोनवर, एफबी वर बलात्कारापासुन ते अ‍ॅसिड फेकेल, मारुन टाकेल या धमक्या आलेल्या आहेत..त्यावर त्यानी केस फाइल करुन तडीस लावल्या आहेत.
ब्राम्हण वर्गावर अतिव प्रेम असलेला वर्ग त्याना आपल साडेतिन टक्के प्रेम दाखववायला उत्सुक असतो अशाना ठकासी असावे महाठक असाच पवित्रा घ्यावा लागतो.
त्या ती हिम्मत ठेवतात त्याबद्दल कौतुक आहे.

वेफाली शैद्य या बेताल बाईची मुलाखत? नो वे. आधुनिक पुरोगामी चळवळींनी दिलेली सगळी स्वातंत्र्ये भोगून त्यांच्यावरच टीका करणाऱ्या मूर्ख बाईपैकी ती एक आहे. सोशल कॅपिटल आणि स्वकर्तुत्व यांच्यात कायम गल्लत करून, भारताच्या सहिष्णू लोकांच्या जीवावर प्रवास करून त्यांच्या सहिष्णुतेविषयीच विखार ओकणारी दुसरी बाई मी पाहिली नाही. म्हणजे इतके फिरणारा माणूस असा द्वेषाने शिगोशिग कसा भरलेला असतो? यावरून या बाई सगळे केवळ दाखवण्यासाठीच करत असतात असे दिसते. जातीय द्वेषाच्या विषाने रसरसून भरलेले तिचे विचार ऐकून घेणाऱ्या आणि सहमत होणाऱ्या लोकांबरोबर आयुष्यात कधीही भेट होऊ नये अशी इच्छा आहे.

अस्मिता, सलील कुलकर्णीची मुलाखत ऐकली.
विनायक पाचलग या गुणी मुलाने (जो माझा दोन वर्षे ज्युनिअर) खूप चांगल्या मुलाखती घेतल्या आहेत आणि तो अतिशय नेमके प्रश्न विचारतो. तो कॉलेज मधेही असाच टॉपर वगैरे असायचा आणि टेक्नॉलॉजी मधे उत्तम करियर करता येऊनही त्याने हे क्षेत्र आवर्जून निवडले.

(विनायक हा पूर्वी आपल्या सारख्या संस्थळांवर active असायचा पण त्याची इथे लोकांनी पाचलगदादा म्हणून भरपूर चेष्टा केली तेव्हा तो या संकुचित विश्वातून बाहेर पडला)

आता सलीलबद्दल.

एक काळ होता.
म्हणजे मराठी मिलेनियल्स लोकांचा. हे बहुतेक मराठी माध्यमातून शिकलले त्यामुळे यांची संस्ख्या प्रचंड म्हणजे प्रचंड.
या सगळ्यांना मराठी गाणी वगैरे ऐकू वाटायची पण मराठी पॉप नावाचा प्रकारच अस्तित्वात नव्हता (तो अजून ही नाही)

गारवा या गाण्याची अफाट लोकप्रियता याच कारणाने आहे. अशा मराठी गाण्यांचा भुकेला वर्ग क्लास आणि मास अशा दोन्ही गटांना आपली वाटतील, ती वल्गर असणार नाहीत (कारण त्यांची कॅटेगरिच वेगळी होती), कॉलेज च्या gathering आणि नाटका एकांकिकात वापरता येतील अशा मराठी समकालीन गाण्यांना एवढा आसुसलेला होता की विचारू नका. त्यामुळे राधा ही बावरी आणि गालावर खळी ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली कारण त्यांचे लिरिक्स चांगले होते आणि ती पॉप होती. नाहीतर एकतर ती तसली सत्तरीपासून तीच तीच सतत गायली जाणारी मेंदीच्या पानावर छाप भावगीते नाहीतर ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय असे चॉईसेस. नाहीतर थेट बाबा महाराज सातारकर नाहीतर माझे माहेर पंढरी वगैरे. मराठीत ना सिंगर songwriter ना बँड असे अधले मधले काहीच नाही. त्यात मराठी चित्रपट एवढे क्षीण झाले होते की त्यांच्यात आलेली गाणी धुमाकूळ घालत नव्हती ( आ आंटे अमलापुरे अशी तेलुगू गाणी मात्र तुफान चालली महाराष्ट्रात). तो प्रांत अजय अतुल यांनी बरोबर काबीज केला. केदार शिंदेच्या सुमार चित्रपटात काही गाणी अतिशय चांगली गेली त्यांची. मल्हारवारी, मन उधाण वाऱ्याचे इत्यादी.
याच काळात संदीप सलील यांचा उदय झाला. मराठी भावगीते + ममव तरुणांना थोडीफार झेपेल एवढीच (म्हणजे पापलेट सुरमई लेव्हलची, बांगडे सौंदाळे किंवा सुकट लेवलची नाही) माफक क्रांती + बालगीते असे एक विचित्र पण सगळ्यांना पॅलेटेबल कॉम्बो काढून संदीप सलील या विश्वात आले.
अनेक ममव मिलेनियल्स ना त्यांनी कवितेकडे देखील गंभीरपणे खेचून आणले हे संदीपचे आणि सलील चे चांगले यश आहे.

रॉय, तुम्ही प्रतिसाद अस्मिताला उद्देशून लिहिला असला, तरी मी वाचला. आवडला. माफक क्रांतीसाठी वापरलेली उपमा आवडली. अस्मिताला कदाचित कळायची नाही ती Wink

>> अस्मिताला कदाचित कळायची नाही ती <<
का बरं कळायची नाही ? ती काय फळातली केळी आणि भाजीतली भेंडी झालेली आहे की काय Lol Lol ?

त्या व्यक्तीबद्दल जाणुन घेण्यात रस नाही इतकं समजलं आहे. वैयक्तिक पातळीवर तर मुळीच नाही. त्यामुळे पास.
>>> +१

+१.
असे खूप व्हिडिओ बघतो. पण इंजिनिअरिंग माईंडला म्हणजे नक्की काय? लिबरल आर्ट म्हणजे नक्की काय आणि कसं चालवेल हे अजून नीटसे समजलेले नाही. पण हे असेच होईल याची कारणमीमांसा पटते.

सलील कुलकर्णीच्या गाण्यांपेक्षा त्याचे कविता आणि गाण्यांबद्दलचे विचार, लहान मुलांशी मारलेल्या गप्पा इत्यादी ऐकायला जास्त मजा येते. माणूस विचारी आहे, गप्पिष्ट आहे, संवेदनशील आहे. संगीत काही गाण्यांचे खूप छान, पण अगदी भावणारे असे वाटले नाही.

युट्युबवर आरपार चॅनलवर मुग्धा गोडबोलेंनी तेजस्वी सेवेकरी यांची वेश्याव्यवसायातील स्त्रियांवर घेतलेली मुलाखत आहे. दोन भागांमध्ये आहे आणि नक्की ऐकण्या/बघण्यासारखी आहे.

वावे, Lol
वर शेफाली वैद्य मुलाखत आरपारवर आहे वाचल्यावर माझं अगदी असंच झालेलं. केवळ मुग्धा गोडबोलेने घेतली असेल तर बघावी का काय! पण ती आरपार वर असली तरी तिने घेतलेली नाही त्यामुळे आता बघण्याचा प्रश्नच येत नाही. Happy

आरपारवर ती एकटीच मुलाखत घेत नाही. एक विनोद सातव म्हणूनही आहे ज्याने शेफाली वैद्यची मुलाखत घेतली आहे नीट आठवत असेल तर.

Where is India's Economy Heading Amid West Asia Crisis? | Economist Neelkanth Mishra | EP-421 : https://www.youtube.com/watch?v=96Fp9S_OsVM

अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे चर्चिले गेले आहेत. छान चर्चावजा मुलाखत.

मुग्धा गोडबोले रानडेंनी चित्रा वाघ यांची मुलाखत घेतली होती. फेसबुकवर क्लिप्स दिसायच्या. यांचं असं काय झालं की असंच होतं असं वाटलं तेव्हा.
त्यांचं ( म्हणजे मुग्धा यांचं) स्वतःचं चॅनेल होतं ना? मी चिन्मयी सुमीतची मुलाखत पाहिली होती, त्यावर. ते बंद पडलं का?

ऐकणं आणि बघणं , दोन्ही एकदम करता येईल की.
नवीन Submitted by भरत. >> Lol
मी जनरली स्वैपाक करताना एकीकडे ऐकते !
मुग्धा गोडबोलेने घेतलेल्या दोन मुलाखती ऐकल्या आहेत. मंगला गोडबोल्यांची आणि डॉ. मृदुला दाढे-जोशी यांची. दोन्ही आवडल्या होत्या. बहुतेक 'वुमन की बात' असं नाव होतं (चॅनलचं की त्या विशिष्ट मुलाखतीच्या प्रकाराचं ते आठवत नाही).

मला स्वतःला सुद्धा सलील कुळकर्णी आवडत, नावडत नव्हते. मी काही मतच बनवले नव्हते. पण मुलाखती मुळे, वेगळे पैलू कळल्यावर आता आवडायला लागले आहेत. एखाद्याचे सगळेच्या सगळे काम आवडणं अशक्य आहे. पण अप्रोच, कामातली रेंज, एकुण वर्षानुवर्षाचे बॉडी ऑफ वर्क, वर्क एथिक्स, वावर बघून मात्र कौतुक वाटतं.

रॉय पोस्ट आवडली. Happy एकदम विस्तृत लिहिली आहे, बरीच निरीक्षणं पटली. विनायक पाचलग बद्दल वाचून चांगले वाटले. तो समोरच्याला व्यवस्थित स्पेस देतो आणि स्वतः मागे राहतो त्यामुळे सलग आणि भरीव ऐकल्यासारखे वाटते. प्रश्न नेमके विचारतो हेही मी आधीच्या पोस्टीत लिहिणार होते. गाण्यांच्या रेंज बद्दलही अनुमोदन. मला कविता फारशा ओढत नाहीत किंवा जिंदगी की जद्दोजहदमें टणक शेंगदाणा होऊन बसल्याने असेल, तो प्रांत विहारायचे राहून गेले. पण असे काही बघितले की अजून धुगधुगी आहे असे वाटते. कविता वाचाव्यात, अनुभव्यात असं वाटतं.

मला कळाली "माफक क्रांती" उपमा, शाकाहारी आहे- मंद नाही. Proud

शेफाली वैद्य - इथल्या नो बिंदी नो बिझनेस वादंगामुळे माहिती होती फक्त. भारताबाहेर किंवा मी शोधत नसल्याने अशा पीडा कळत नाहीत बरेचदा ते बरेच आहे. तरीही फेसबुकवर आलं होतं, पण "आगळे कर्तृत्व ते काय" असे वाटल्याने क्लिक केले नाही, इडल्या तळायची क्लिप पाहात बसले - "यापेक्षा वडेच करायचे ना मग" असं मनात आलं.

Pages