मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातीच्या रेकोवरून कवितेचे गाणे होताना ही मालिका पाहिली. आवडली.
सलील कुलकर्णी आपण काही ग्यान देतोय असा आव न आणता कवितेसोबत त्यांच्या इंटरअ‍ॅक्शनचा (त्याचाच शब्द) प्रवास आपल्यासोबतीने करतो .
त्या सूत्रसंचालक बाईंना सहन करावं लागेल मात्र.

काल इम्तियाज अलीच्या दोन मुलाखती बघितल्या. खरेतर तीन चार दिवस तुकड्यात पाहिल्या. त्यात एक सम्दिशची व दुसरी राज शमानी सोबतची. इम्तियाज फारच आवडतो म्हणून पाहिल्या. सम्दिश नीट बोलू देत नाही, पचपचा आहे. वर जो भी मैं कहेना चाहूं, बरबाद करे अल्फाज मेरे - म्हणतो. गप्प बस मग.

उगाचच कॉफी विथ करण लेव्हल वर सतत घसरतो, खळबळजनक प्रश्न विचारणे - राजकारणाबाबत किंवा सेक्स लाईफ बद्दल किंवा ज्याच्या सोबत काम करताना वाईट अनुभव आले तो माणूस कसा होता याच्या चिकित्सा. ज्याचा कामाशी, कलेशी अजिबात संबंध नाही. इम्तियाज अली एकदा पेन्विंग वर माहितीपट करायला अलास्काला गेला होता तर ह्याने उकरून पेंग्विन थ्रीसम करतात, तुला अनुभव आहे का टाईप मूर्ख प्रश्न उकरून काढून विचारला. अर्थात इम्तियाजने दर्जाची सरासरी मेंटेन केली. ही मुलाखत नाही पाहिली तरी चालेल !

राज शमानी सोबतची मात्र फारच सुंदर झाली आहे. हा प्रश्न फार नेमके विचारतो, त्यामुळे एका वेगळ्या उंचीवर गेली आहे. सगळा अभ्यास करून मैदानात उतरतो त्यामुळे उगाचच वेळ घालवणे नाही, बावळटपणा अजिबात नाही. खळबळजनक वगैरे काही नसते. आतापर्यंत इम्तियाज अलीचे जवळजवळ सगळे काम आवडलं आहे. जब वी मेट, हाय वे, रॉकस्टार, तमाशा वगैरे तर फार आवडते आहे. त्याचं वाचन आणि हिंदी दोन्ही सुरेख आहे. जमशेदपूर सारख्या छोट्या शहरातील नववीत एकदा चक्क नापास झालेला सैरभैर मुलगा ते फिल्ममेकर असा प्रवास. बुद्धिमान माणूस आहे. सगळे कॅरेक्टर्स तुटकेफुटके करताना बरेचदा ते रिलेटेबल होऊन जाते. अपूर्णतेची गोडी !

शिवाय अप्राप्य मिळवण्यासाठी जी तगमग किंवा डिझायर असते ती असलेली पात्र. पात्र आणि चरित्र मधला फरक - पात्र एकदम तयार बनलेले असते तेच चरित्र सतत घडत बिघडत असते. ग्रोथ ईज अ क्रूएल प्रोसेस. कशिश हवी, आस हवी.

रॉकस्टार मधल्या जॉर्डन मधे मेंदू नाही, अतिशय विक्षिप्त कलाकार सतत तडप शोधूनच काही तरी निर्माण करता येणार. धरसोड वृत्ती. पण हीर बाबत मात्र कायम ओढ. हायवे मधली वीरा - घर सोडल्यावर स्वातंत्र्याची किंमत कळाली, किडनॅप होईपर्यंत कळाली नाही. मग ती परत जाऊ शकली नाही. कारण तिच्यातले काही तरी साफ बदलून गेले होते. जब वी मेट मधली गीत घर सोडून पळून जाण्याचे स्वप्न बघणारी, पण कुठेतरी हळूवार स्वप्नात चुका करणारी. सगळ्याच नायिका कशा सळसळत्या, जिवंत, सदोष. बऱ्याच वेळा नायकाला नायिकेमुळे आयुष्य कसं जगावं कळत जातं, तिला रस्ता दाखवताना तो स्वतःला सापडतो. प्रेमाची व्याख्या.

अपयश यशापेक्षा का महत्त्वाचे आहे - तर कबीराने सांगितले तसं आता माझी घागर फुटली ते बरेच झाले, मैं पनिया भरनसे छुटी ! स्वतःचीच प्रतिमा पुन्हा पुन्हा तोडून टाकणं का महत्त्वाचे आहे ! आणि हेही - “The awful daring of a moment’s surrender which an age of prudence can never retract. By this, and this only, we have existed.”
From the poem The Wasteland by T. S. Eliot
Essence: A single courageous action is often more meaningful than a lifetime of cautious thinking.

हे मला फार आवडलं. दोन बहुश्रुत आणि प्रगल्भ व्यक्तिंच्या गप्पा आपल्यालाही समृद्ध करून जातात. आता मी त्या "वेस्टलॅंड"च्या मागे लागले आहे.

अस्मिता तुझं इम्तियाझ अलीच्या थॉट प्रोसेसबद्दलचं लिखाण आवडलं. त्याच्या जब वी मेट पेक्षा हायवे आणि रॉकस्टार जास्त आवडतात. तू जर त्याचा सोचा न था बघितला नसशील तर बघ.

थॅंक्यू. Happy हो, तोही पाहिलेला आहे. मला त्याचं बहुतेक काम आवडलं आहे. फक्त चमकिला बघायचा राहिला आहे. सध्या त्याचा "मैं वापस आऊंगा" येत आहे. त्यामुळे तो मुलाखती देत आहे. मी बहुतेक हाही पाहेन.

"कवितेचे गाणे होताना" पाहिले आहे, आवडले होते. तरीही कवितेची आणि माझी अंतरीची खूण वगैरे पटतच नाही. दरवेळी खूप आवडूनही, ते विरून जात राहतं. सतत धुगधुगी अवस्थेत. पेटत का नाही, काय माहीत!

इडलीचं तेल ... वगैरे म्हण उमलंत होती तर तुम्ही त्याची भृणहत्या करुन टाका! कसं व्हायचं! Proud
इम्तिआझ अली आवडतोच. ही मुलाखत बघतो.

अस्मिता, इम्तियाज अली बद्दलची पोस्ट मस्त! बघायला हवी ती मुलाखत. "इम्तियाजने सरासरी मेण्टेन केली" हे भारी Happy

जमशेदपूर सारख्या छोट्या शहरातील नववीत एकदा चक्क नापास झालेला सैरभैर मुलगा ते फिल्ममेकर असा प्रवास >>> हे त्याच्याच एखाद्या कॅरेक्टरसारखे वाटते.

मला ते पात्र आणि चरित्र समजले नाही. वाड्यात किंवा दुसरीकडे विचारतो Happy म्हणजे त्या दोन्हीतला फरक क्लिअर आहे पण त्याकरता पात्र व चरित्र ही स्पेसिफिक शब्दरचना समजली नाही.

इथेच सांगते. Happy इम्तियाज अलीने सांगितल्या नुसार -
पात्र म्हणजे ज्यात ग्रोथला वाव नाही, दृष्टिकोन बदलाला वाव नाही. कथानकात ते वाढत, बदलत नाही. त्यामुळे भरही घालत नाही. ते फक्त स्थिर राहते, त्यामुळे तडप- कशीश नाही.
चरित्र - म्हणजे सतत बदलणारे, मोठं होणं जाणारं, दृष्टिकोन बदलल्याने मत बदलणारे, आत सतत वाढत राहणारे. धुमसणारं, माणसासारखे. त्याच्यामते त्याचे कॅरेक्टर्स ह्या गटात येतात. मुलाखत पाहा सरळ Happy डीपर ॲस्पेक्टसाठी किंवा त्याचे सगळे सिनेमे. तो लेखक आहे, गोष्टीवेल्हाळ आहे. तो ह्यात रमतो, फिल्ममेकर पेक्षा जास्त तो एक कलाकार आहे. त्यामुळेच मला तो इंटरेस्टिंग वाटला.

ओह्ह.. म्हणजे एनपीसी म्हणा की! नॉनप्लेअरकॅरेक्टर. म्हणजे जेनझीला समजेल.
रायन रेनॉल्डला फ्री गाय आठवला. हल्ली फार अवांतर आठवतं.

नाही, एनपीसी (non playable character)नाही. ते मनात आले होते. पण साच्यातून काढलेले पर्फेक्शन अस्तित्वात नसते, म्हणून "चरित्र" जास्त चपखल म्हणता येईल. जनरली विकण्यासाठी केलेली पर्फेक्टेड पात्रं आणि मानवी अभिव्यक्तीसाठी रेखलेली तुटकीफुटकी चरित्रं असे सिनेमात बरेचदा पाहायला मिळते. Perfection is either impossible or fake हे मलाही वाटते. अगदी अशीच टर्मिनॉलजी आहे का नाही माहीत नाही पण हे त्याचं सार आहे.

नाही. पात्राला एनपीसी म्हणत होतो.
चरित्र म्हणजे प्लेअर कॅरेक्टर. जो चुका करेल, धडपडेल, स्खलनशील असेल इ. इ.

सलील कुलकर्णीची मुलाखत जवळजवळ सव्वा तास ऐकली. उरलेली ऐकायची आहे. आत्तापर्यंत तरी माझा अजिबात अपेक्षाभंग झालेला नाही Proud
उरलेली ऐकली की सविस्तर प्रतिसाद लिहिण्याची इच्छा (खुमखुमी?) आहे!

केली ऐकून पूर्ण मुलाखत सलील कुलकर्णीची.
मला तो ज्या कारणाने आवडेनासा झाला आहे, तेच कारण या मुलाखतीत भरभरून आहे. आवडेनासा झाला आहे म्हणजे आधी काही खास आवडायचा असं नाही, पण निदान 'आवडत नाही' असं नव्हतं.
सतत मोठ्या माणसांची नावं घेणं - या मुलाखतीत त्याने किती तरी दिग्गजांची नावं घेतली आहेत. कशासाठी? श्रीराम लागूंनी माझी अमुक कॅसेट रिलीज केली होती किंवा रोहिणी भाटेंच्या हस्ते अमुक गोष्टीचं उद्घाटन झालं होतं किंवा बोरकरांची अमुक ओळ ऐकून सुधीर मोघ्यांच्या डोळ्यात पाणी आलं या माहितीचा त्या विशिष्ट प्रश्नाच्या उत्तराशी काडीमात्र संबंध नसतो आणि ही माहिती खरं तर महत्त्वाची नाहीच. एखाददुसरा, लक्षात राहणारा अनुभव सांगणं वेगळं आणि सतत मोठ्या लोकांचं नामस्मरण करणं वेगळं.
तीनचार वर्षांपूर्वी बंगळुरात एक कार्यक्रम बघायला आम्ही गेलो होतो. हृषीकेश रानडे, प्राजक्ता जोशी (रानडे), समीरा गुजर आणि सलील कुलकर्णी. संतकाव्य ते आधुनिक काव्य अशा स्वरूपाचा विषय होता. गाणी + निवेदन. अशा कार्यक्रमाची संहिता चांगली असणं आवश्यक असतं आणि ती तशी असावीही. पण सलील कुलकर्णीने आपले असेच सगळे दिग्गजांबरोबरचे किस्से सांगून सांगून त्या कार्यक्रमाचा पूर्ण फ्लो घालवून टाकला! अमुक ओळ ऐकल्यावर लतादीदी काय म्हणाल्या आणि बाबूजी अमुक ठिकाणी काय म्हणाले होते, अशा प्रकारच्या त्या किश्श्यांमधे फार अर्थ नसतो. इथे प्रेक्षक (तिकीट काढून Wink ) एक विशिष्ट कार्यक्रम बघायला आलेले आहेत, रँडम किस्से ऐकायला आलेले नाहीत, हे भानच नाही.
तसाच अनुभव कोविडच्या काळात एकदा 'आयुष्यावर बोलू काही' ऑनलाइन बघितला होता तेव्हा आला. दोन्ही वेळा इतका वैताग आला की आता सलील कुलकर्णी सहभागी असलेला लाईव्ह कार्यक्रम बघायला जायचं की नाही याचा विचार करावा लागतो. बहुतेक यानंतर कुठला कार्यक्रम बघितला नसावा.
मी वीसेक वर्षांपूर्वी पुण्यात 'आयुष्यावर बोलू काही' चे कार्यक्रम दोन तीन वेळा बघितले आहेत. तेव्हा तो असा नव्हता Happy
आता ही सरळसरळ मुलाखतच असल्यामुळे आपले अनुभव, किस्से सांगणे साहजिकच आहे. पण नीट ऐकलं तर लक्षात येईल की कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरात 'मियाँ मूठभर दाढी हातभर' असा प्रकार आहे. फाफटपसारा केला नाही तर तेच उत्तर खूप कमी शब्दांत मांडता येईल. बरं, हे सखोल चिंतन म्हणावं तर तसंही नाही. फिरून फिरून परत कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या कलाकाराचं नाव घेणं.
संदीप खरेच्या कविता वगळता मी सलील कुलकर्णीची गाणी फारशी ऐकलेली नाहीत. 'तरीही वसंत फुलतो' कॅसेट एकदोन वेळा ऐकली आहे. त्यामुळे 'ज्येष्ठ संगीतकार' म्हणून त्याची थोरवी मला फारशी माहिती नाही.

वावे, प्रतिसाद पटला.

वरचं “ आत्तापर्यंत तरी माझा अजिबात अपेक्षाभंग झालेला नाही” ह्याचा अर्थ आत्ता नीट कळला. Rofl

तुझा बंगळुरातला कार्यक्रम तुला पुन्हा पाहावा लागला असं दिसतंय. Lol माझ्यासाठी हे नवीन होतं पण अजून एक दोनदा जर असं दिसलं तर मलाही असंच वाटलं असतं.

मला संदीप खरे उगाच विव्हळतो असं वाटतं म्हणजे तितके दुःख अनुभवलेले नाही पण आर्त- व्याकूळ वगैरे लिहून लक्ष वेधून घ्यायचे. मला फेक व्याकूळ सोसवत नाही. दोन चार क्लिप्स पाहिल्या, कवितेचे गाणे होताना हेही पाहिले. सगळीकडे विव्हळत होता. त्यामुळे अख्खी मुलाखत बघणार नाही.

पण इनजनरल मी हे काल लिहिणार होते ते आज लिहितेय - मराठी मुलाखती अतिच ममव असतात, जसं की त्यांच्या विश्वात अमराठी कलाकृती, अमराठी माणसं, अनुभव अस्तित्वात नसतात. मराठी थोर लेखक कवीही सगळीकडे तेच रिपीट होतात, सगळे त्याच ठराविक चौकटीत अडकलेले असतात. इतकं मर्यादित विश्व असतं. तेच हिंदी मुलाखती पाहिल्या तर वैचारिक बैठक जास्त खुली असते. त्यात रूमी, कबीर, गालिब, शेक्सपिअर सहज येतात. आपण मात्र बोरकर, पुलं यातून निघतच नाही साठ सत्तर वर्षे. तेवढंच नाही तर सगळेच पांढरपेशे आणि शुद्धजीवी उच्चभ्रू तेच रिपीट करतात.
इंग्रजी मुलाखती मात्र "विश्वची माझे घर" असतात. ते त्या माणसांवर अवलंबून आहेच पण मराठी मुलाखतींचा बाजच वैश्विक नसतो. जीव गुदमरल्या सारखे होते, दोन तीन सलग बघू शकत नाही. इंग्रजी बघायची वळवळ होते. एवढी मर्यादित चौकट वर्षानुवर्षे झाले मोडता आलेली नाही हे मराठीचे वैशिष्ट्य.

अगदीच असं नाही म्हणणार मी अस्मिता. मी खूप मुलाखती बघत नाही, पण मृदुला दाढे, मंगला गोडबोले, सई परांजपे, राहुल देशपांडे यांच्या मुलाखती ऐकून चांगला, सकस अनुभव मिळाल्याचं समाधान वाटल्याचं नक्कीच आठवतं.
संदीप खरेची मुलाखत पाहिल्याचं/ऐकल्याचं आठवत तरी नाही इतक्यात. मधुराणी गोखलेने संदीप खरेची घेतलेली मुलाखत कधीतरी ऐकली आहे. ती आवडली होती. पीळ वगैरे वाटली नव्हती. एक जुना कार्यक्रम, ज्यात गुरू ठाकूर, सौमित्र आणि संदीप खरे या तिघांबरोबर गप्पा होत्या. बहुतेक सुधीर गाडगीळ. तेही आवडलं होतं. हल्लीचं माहिती नाही.

हल्ली ह्या पॉडकास्ट्सचा प्रॉब्लेम एक आहे की एक कलाकार एका चॅनलवर आला की इतर सगळ्या पॉडकास्टर्सनांही त्याला बोलवावंच लागतं. मग तेच तेच ऐकणं/बघणं नशिबी येतं. तेव्हा वावे, सलील कुलकर्णीला अजून किमान चार वेळा ऐकायची तयारी ठेव. Wink

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे दोघेही आवडत नाहीत. अस्मिता म्हणते तसं संदीप खरेच्या कविता उगाच व्हिव्हळणार्‍या वाटतात. 'आयुष्यावर बोलू काही' तर पीळ कार्यक्रम वाटला होता. दोघेही हाईप्ड आहेत असं माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे Proud
सलील कुलकर्णी आमच्या गावात कार्यक्रमासाठी आला होता तेव्हा त्यानं होस्टसना दिलेल्या त्रासाचे किस्से होस्टांकडूनच ऐकले आहेत.

Lol मला चांगले आधी काहीही मत नव्हते बरं सलील बद्दल, उगाच नादाला लागले ह्या करण अर्जुन जोडीच्या. ही पाहा सापडली दुःख उगाळणारी कविता. ह्यांना खरं दुःख माहिती नाही, ते नळातून वगैरे येत नाही. ते तुम्हाला गिळून टाकते. त्यामुळे अशा फेक व्याकूळ लोकांना खरोखर दुःख देऊन त्यांच्या कलाकृतीत प्राण फुंकण्याची तीव्र इच्छा होते. त्यात अशेच फेक लोक मैफिलीत "वाह वाह" करायला आणलेत, चक्क हसू आले होते हे पाहून.

इम्तियाज अलीचीच पोस्ट माझी समजा. Proud

हम्म!
ते उल्लेख आणि संदर्भ येतात पण मला बघताना दर्प जाणवला न्हवता. तुला जाणवला होता का?
मी २००५--०८ या काळात आबोका चे ५-६ कार्यक्रम फारच आवडला, पुण्यात होतो, दुसरं काही काम न्हवतं, याने बघितलेला नाही तर जाऊ अशा खात्यात बघितले होते. त्यात ते दोघे मी-पणा, फारच कॅज्युएल प्रकार करत असं नंतर नंतर वाटलेलं लक्षात आहे. पण रोज तेच तेच कार्यक्रम करायला, तेच तेच नाटक करायला कंटाळा येत नाही का असं वाटतं. आणि त्यामुळे ते माफ केलं असेल. पण मध्यमवर्गीय, पुणेरी, घरगुती विनोदांचा कंटाळा येतोच..

त्याची गाणी, चाली सहज गुणगुणाव्या अशा आहेत. चाल म्हणून फार भारी नाही वाटल्या. पण शब्द पोहोचवतात हे ही आहेच. त्यातल्या गंमती त्याने उलगडल्यावर काही समजले. पण हो... खळे, आनंद मोडक, यशवंत देव, फडके... आणि अजयअतुल यांची नावं घेतली की त्यांची गाणी मनात येतात तेव्हा जी एक भावना होते, ती सलील ला होते का? माहीत नाही. संधिप्रकाशात मधली, संदीप ची अनेक... ( संदीप म्हटलं की मला कसे सरतील सये, माझ्या विना दिस तुझे आणि दिवस असे की हेच पाहिलं आठवतं. सालीलची नाहीच आठवत ), आरती प्रभूंची गाणी पाठ आहेत, पारायणे केली आहेत. तो कवितेचे शब्द पोहोचविण्यात वाकबगार आहे. ही पोस्ट लिहिताना जाणवलं की त्याच्या माहीत असलेल्या प्रत्येक गाण्याची सगळेच्या सगळे शब्द मला पाठ आहेत. इतरांचे ही आहेतच.. :p त्याचे ते शब्द माझ्यापर्यंत पोहोचतात, त्याची कवितेची निवड ही आवडते. सांगीतिक दृष्ट्या ते प्लीजिंग इतरांन इतकं खचितच नाही हे ही खरंच.
आता यापुढे मात्र वावे मुळे इकडे लक्ष जाणार आहे. Happy

खळे, आनंद मोडक, यशवंत देव, फडके... आणि अजयअतुल यांची नावं घेतली की त्यांची गाणी मनात येतात तेव्हा जी एक भावना होते, ती सलील ला होते का? >> हुश्श! हा प्रश्न (आणि याचं उत्तर Wink ) लिहायचं मी टाळलं होतं! कारण मला संगीतातलं तितकं कळत नाही. तू लिहिलंस ते बरं झालं Lol
तो कवितेचे शब्द पोहोचविण्यात वाकबगार आहे. >> येस! ते श्रेय नक्कीच त्याला द्यायला हवं.
संदीप खरेचं 'ये ये ना' गाणं अलीकडे आलं तेव्हा मला एकदम जुना संदीप खरे आठवला. आणि नंतर कळलं की ती कविता आणि त्याने स्वतः दिलेली चाल, हे दोन्ही जुनंच आहे Happy सलीलचा 'सांग सख्या रे' अल्बम चांगलाच आहे. अग्गोबाई ढग्गोबाईसुद्धा. पण संदीपच्या स्वतःच्या चालीही छानच असायच्या.
अगदी दर्प जाणवला असं नाही म्हणणार. पण कुठेतरी हा आत्मप्रौढीचाच प्रकार वाटतो.
@अस्मिता, बघितली कविता. मला आवडली. Happy
मला संदीप खरेच्या कविता आवडतात इन जनरल. मला यावरून कुणी हसल्यास मला त्याचं दुःख वाटणार नाही Lol

मला संदीप खरेच्या कविता पर्फॉर्मन्ससाठीच्या वाटतात. नाट्यमयता, शब्दांचे खेळ, संवाद केल्यासारख्या.
एकट्याने बसून पुस्तकातून वाचल्या तर त्या भिडतील का असा प्रश्न पडतो.

ती दु:खाची कविता ऐकताना असेच शब्द असलेलं कोणाचं तरी काहीतरी वाचलं आहे असं वाटत राहिलं.

मी कविता पुस्तकातून फार क्वचित वाचते. सुट्या कविता जास्त वाचल्या जातात. संदीप खरेच्या बऱ्याचशा कविता सादर केलेल्या स्वरूपातच ऐकल्या आहेत हे खरं आहे. त्याचं 'मौनाची भाषांतरे' आणल्या आणल्या वाचलं होतं. आवडल्या होत्या कविता. पण भरत, तुम्ही म्हणताय ते खरं असेलही.

सामजिक जाणीवा जागृत असणारे तेलंगणाचे पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महेश भागवत यांची एबीपी माझा कट्टयावर झालेली मुलाखत अतिशय प्रेरणादायी आहे.
त्यांचा पाथर्डी, अहिल्यानगर पासून झालेला प्रवास थक्क करणारा आहे. चुकवू नये असे काही अशी ही मुलाखत आहे.
https://youtu.be/lDOqbYtDtQU?si=IB4ISOtG0z5xdFV8

युट्युबवर आरपार चॅनलवर मुग्धा गोडबोलेंनी तेजस्वी सेवेकरी यांची वेश्याव्यवसायातील स्त्रियांवर घेतलेली मुलाखत आहे. दोन भागांमध्ये आहे आणि नक्की ऐकण्या/बघण्यासारखी आहे.>>>>> भाग 1) वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता असावी का ? हा प्रश्न सातत्याने डोकावत असतो. परंतु कायदेशीर करणे म्हणजे याचे नेमके परिणाम काय होतील? असं होणं खरचं गरजेचं आहे का? या प्रश्नांची उत्तरे मोघम देऊन जमणार नाही. तर ज्या व्यक्तीला वेश्या वस्तीतील वास्तवाची जाण आहे, या विषयवार त्यांनी काम केलं आहे. महिलांना समजून घेऊन त्यांच्या आयुष्यात थोडाफार का होईना बदल घडवला, तीच व्यक्ती या प्रश्नाचे अधिक तर्कशुद्ध उत्तर देऊ शकेल. तेजस्वी सेवेकरी गेल्या ३० वर्षांपासून वेश्यावस्तीत जगणाऱ्या महिलांसाठी काम करत आहेत. त्यामुळे या पॉडकास्ट मध्ये त्यांनी व्यक्त केलेलं प्रत्येक मत हे अनुभवलेलं परखड वास्तव आहे.

https://youtu.be/B4-KI--gHkc?si=Dx6GBB60iqsqqAi8

भाग 2 )वेश्यावस्ती आहे म्हणून बलात्कार कमी होतात, अशा काही कॉमेंट्स आधीच्या व्हिडिओवर आल्या होत्या. साधारणपणे खूप लोक या मताचे आहेत. पण वास्तव तसं नाही. वेश्यावस्ती नसती तरीही बलात्कार घडलेच असते. तेजस्वी सेवेकरी असं का म्हणतात? यासाठी हा दुसरा भाग समजून घेतला पाहिजे.

वेश्याव्यवसायात असणाऱ्या महिलांचे पुनर्वसन झाले पाहिजे, त्यांनी यातून बाहेर पडले पाहिजे, हे बोलणं सोपं आहे. पण हे साध्य करत असताना कायद्यातील त्रुटी किंवा अस्पष्टता आणि सुरक्षित पर्यायांचा अभाव असल्याने, इच्छा असूनही अनेक महिलांना यातून बाहेर पडता येत नाही. तरीही काही सकारात्मक गोष्टी इथे घडल्या आहेत, ज्यामुळे काही महिलांचे आयुष्य सावरले आहे. अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू या पॉडकास्टमध्ये तेजस्वी सेवेकरी यांनी मांडल्या आहेत.
https://youtu.be/fuxmEhupN4k?si=UIUtXhRa06vf7rc1

दु:ख वरची अस्मिताची पोस्ट वाचुन आता त्यातली पण मजा जाणार. Lol
पण... खरं दु:ख, पिळवटून टाकणारे दु:ख, गिळुन टाकणारे दु:ख ... आणि नळातून, सांदिकोपर्‍यातून येणारे दु:ख यात तेरा दु:ख मेरे दु:खसे ज्यादा मैला कैसे असं वाटतं का?
माणसाला जसा आनंद हवा असतो तशी त्याला दु:खाची गरज वगैरे ही असते का? काही लोकांना दु:खाची आस असते. रडगाणी गायला आवडत असल्याने असेल. त्यांच्यासाठी कविता असेल की! मी ही कविता पूर्वी ऐकली आहे, आत्ता फक्त कोणती आहे बघायला क्लिक केलं सगळी ऐकली नाही त्यामुळे डीटेल्स लक्षात नाहीत.

सलील कुलकर्णीची ती मुलाखत त्याच्या कारकीर्दीला तीस(?) वर्षं पूर्ण झाल्याबद्दल होती ना? त्या सिंहावलोकनात त्याने त्याची प्रेरणास्थानं, थोरामोठ्यांकडून मिळालेले आशीर्वाद, कौतुक वगैरेंबद्दल बोलणं मला स्वाभाविक वाटलं.
तो एरवीही असं 'नेम ड्रॉपिंग' करतो का याबद्दल मला माहिती नाही, आणि वारंवार केलं गेलं तर ते अनॉयिंग वाटणारच. सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख... Happy

त्याची 'कवितेचं गाणं होताना' मालिका मला फार आवडली होती आणि मी अनेकांना आग्रहाने बघायला लावली होती.

संदीपच्या कविता मी योग्य वयात ( Proud ) वाचल्या-ऐकल्यामुळे मला आवडल्या होत्या. इतकी बहुप्रसवा कारकीर्द आहे, की काही आवडणं आणि काही साफ नावडणं दोन्ही स्वाभाविक आहे.
कवी आणि कवितांच्या बाबतीत इतक्या सहजी 'हॅ! कै अर्थ नै' असं' माझ्याच्याने म्हणवत नाही. त्या क्षणी नाही भिडली तर माझी आणि त्या कवितेची वेळ अजून आलेली नाही इतकं म्हणून सोडून देते.

दु:खाबद्दलही साधारणपणे तेच म्हणता येईल. 'ह्यांना कसलं आलंय डोमलाचं दु:ख!' असं म्हणायला सह्सा माझी जीभ धजावत नाही. कोणाला कधी, काय आणि किती दुखलं याचं मोजमाप आपल्या मोजपट्टीने कसं करणार?

Pages