मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> 'ग्रीव, बट डु नॉट ड्राऊन' ही कविता'
बॅकग्राऊंड कळल्याने आवडली ही कविता आणि स्वतंत्र रीत्याही प्रभावीच आहे. यात कवयत्रीने केलेला शोक/दु: खाशी संवाद आहे. यावरुन मला पुढील प्रेम आणि कविचा संवाद असलेली कविता आठवली.
प्रेम

रॉय, मला फार आठवण आली काल तुमची आणि तुम्ही आलात. एकटीच खिंड लढवत होते. भरतनी ऐनवेळी पलटी मारली. Lol बुंदी आणि बिझनेस दोन्ही पाहिजे. सबको गले लगाना अपने कल्चर की है आदत, स्वॅगसे करेंगे हबका स्वागत टुटूटुटूटुटू ऊ- हा जीवनाचा मंत्र आहे. दोन्ही रेको नोंदवले व पोस्ट नीट वाचली. शुक्ल यांची डॉक्युमेंटरी बघेन.

ललिता प्रीती, भरत, स्वाती - Lol
भिंतीवर स्पोर्ट्स इल्युस्ट्रेटेड किंवा किंगफिशर सुद्धा असू शकते, जरा ग्लॅमरस विचार करा.

>>> भिंतीवर स्पोर्ट्स इल्युस्ट्रेटेड किंवा किंगफिशर सुद्धा असू शकते
ललिताच्या भिंतीवर? आय सीरियसली डाउट! Lol

'लगान' प्रदर्शित झाल्याला २५ वर्षं पूर्ण झाली यंदा. त्या निमित्ताने आलेली, या चित्रपटातल्या गाण्यांच्या मेकिंगबद्दलची ही मुलाखत बघाच बघा!

लगान गप्पा आवडल्या. ८१ वर्षांचा तरुण फार आवडला.

https://www.youtube.com/watch?v=vKAubjkLjWU

The Actor At Work Ep. 1 | Ratna Pathak Shah in Conversation with Geetanjali Kulkarni

तिथल्याच प्रतिमा कुलकर्णींसोबतच्या गप्पा
https://www.youtube.com/watch?v=4We3AD4tIkc

लगानचा कार्यक्रम बघितला. आवडला! ही गाणी सगळीच जबरदस्त होती.
आता 'दिल चाहता है'ला सुद्धा पंचवीस वर्षं होतच आली की म्हणजे! Looking forward to दिल चाहता है ची पंचवीस वर्षे Happy

लगान वरचा कार्यक्रम बघितला. स्पॉटिफायचे ब्रॅंड प्रमोशन होते ते अगदी स्पष्टपणे. तरीही आवडला. मागे एकदा जावेद अख्तर आणि आमिर या दोघांच्या गप्पा पाहिल्या होत्या, त्यात जावेद लगान मधे एक चित्रपट म्हणून अपयशी होण्याचे सगळे एलेमेंट्स होते असे म्हणाला होता.

खूप सखोल नव्हती ही चर्चा पण प्रसन्न आणि सहज होती. रहेमानचे संगीत melancholy आणि solitude देणारे आहे हे जावेदचे निरीक्षण फार पटले. त्याचं गाणं ऐकताना तुम्ही आपोआपच एकटे होता. शिवाय लगानची गाणी कथेच्या जुन्या काळाप्रमाणे आणि नवीन श्रोत्यांना आवडणारी अशी दोन्ही जमून आली आहेत. घनन घनन मधे आभाळ येताना गडगडाट नको होता तर तोच शब्द sonically वेगळ्या लयीत पुन्हा पुन्हा रिपीट करून आभास, निर्माण केला. रहेमान त्याच्या स्टुडिओत मेणबत्ती तेवत ठेवतो कारण बाकी सगळ्या निर्जीव, मेकॅनिकल गोष्टींत काही तरी खरं, तेजस्वी असावं. हे आवडलेले काही.

"राधा कैसे ना जले" हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. रसरशीत एनर्जी आहे त्यात. गोडवा, खट्याळपणा, निरागस असूया आणि रोमान्स एकदम जमून आला आहे. आणि अजूनही गोपीया आनीजानी है राधा तो मनकी रानी है हे रिलेशनशिपमधे रिलेटेबल आहे हे जावेदचे निरीक्षण. रहेमान फारच कमी बोलला, नेहमीप्रमाणे. जावेद नेमकं बोलला नेहमीप्रमाणे. त्यांनी एकमेकांचे केलेलं कौतुक आणि एकुणच camaraderie जेन्युईन वाटली.

दुःखावरची चर्चा मागील चर्चा अद्याप शिळी झाली नसावी असे समजून त्यात भर.
अमितवच्या पोस्ट वरून (लोकांना दुःखही हवं असतं वाली पोस्ट) आम्हाला हिंदीत 'दुःख का ताज' नावाचा धडा होता तो आठवला. शीर्षक स्पष्ट आहेच तसं.
आठवून लिहिताना तपशीलात काही चूका असु शकतात पण सार मात्र स्पष्ट आहे.
दोन मित्र असतात. एक काही क्षेत्रात दुसऱ्यापेक्षा उजवा असतो, पण असुयेविना मैत्री टिकुन असते, कारण दुसऱ्याकडे असं काहीतरी असतं.

एकदा दुसरा पाहिल्याला बोलावतो आणि मला तुझ्याशी बोलायचंय मन मोकळे करायचेय म्हणुन. दोघे भेटतात आणि मग दुसरा हळुहळु करत सिगरेट, मद्याच्या साथीने आपली एक मोठी व्यथा आणि दुःख पहिल्याला सांगतो. पहिला त्याच्या बद्दल योग्य ती सहानुभूती वगैरे व्यक्त करतो. पण त्याला वाटत असते की आपले हे मोठे दुःख मित्र केवढा स्तंभित होईल, धक्का बसेल त्याला तसे काही होत नाही. थोड्या वेळाने पहिला मग त्याची व्यथा सांगायला लागतो. आणि मग लक्षात येते की पहिल्यावर तर जास्त मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असतो. दुसरा अवाक होतो मग चिडतो आणि पहिल्याला शिव्या द्यायला लागलो लाथ हाणतो. लेका तुझ्याकडे सगळं होतं मी तुझं कौतुक केलं नेहमी. माझ्याकडे दुःख का ताज होता त्याचा सहारा होता, तू तर तो पण माझ्याकडून हिरावून घेतलास.

मला त्या कथेचा अर्थ दु:ख हवं असतं लागत नाही. पण माझ्याइतकं कोणी सोसलं नाही याचाच एक अभिमान वाटतोय आणि माझ्याकडे तोच दु:खाचा एक मुकुट होता, तोही तू हिरावून घेतलास याचा राग. अर्थात हे इतकं साधंसोपंसरळ नाही. त्यात अनेक भावनांचं मिश्रण असेल.
--
गाण्यांवरच्या चर्चेसाठी वेगळा धागा हवा. अमितने काढावा.

मी सलीलची कारकीर्द लक्ष देऊन पाहिलेली नाही. पण त्याच्या काळात गाण्यांचे कार्यक्रम अधिक होऊ लागले किंवा त्यांनी तो मार्ग निवडला. आता स्टेजवरून सादर करायच्या गाण्यांना वाद्यवृंद मोजकाच असेल. त्यामुळे मंगेशकर, खळे ( यांचं चित्रपटसंगीतापेक्षा भावसंगीत अधिक आहे किंवा अधिक लक्षात आहे , म्हणून ही दोन नावं घेतली) यांच्या सारखं लक्षात राहणारं संगीत नाही.
शिवाय तो स्वतः गाणार. त्याच्या गाण्याला मर्यादा.
हा मुद्दा पहिला असायला हवा का? त्याची गाणी शब्दप्रधान आहेत. यशवंत देवांच्या बाबत हा शब्द ऐकला आहे.
हे लिहिताना मला गजानन वाटवे, जी एन जोशी , पु ल यांची आठवण झाली.

हो भरत , दुःख हवं असा अर्थ कथेत नाही. दुःखाचा अभिमानच, त्याचा मुकुट आपला आहे अशी भावना. ती पोस्ट एकंदरीत वाचून ही आठवली, दुःखाची आस नव्हे पण जे आलंय त्याला जपणे. कुठली पोस्ट या करता ते वाक्य कंसात दिलं, त्यात ती वाली पोस्ट असा बदल करतो वर.

हिंदीत 'दुःख का ताज' नावाचा धडा होता तो आठवला.>> आठवतो तो धडा. फक्त तपशील वेगळे आठवतात. त्यात मद्य किंवा सिगारेट नव्हती तर रात्री झोपतांना पडल्या पाडल्या केलेल्या गप्पा होत्या.

बरेचदा बायका एकमेकांशी बोलतांना असे दुसऱ्यांचे सुखाचे / दुःखाचे ताज हिरावत असतात.

स्वाती, लगानच्या लिंकबद्दल आभार.
असं काहीतरी सांगा, नक्की बघण्यात येईल याठिकाणी

भिंतीवरी किंगफिशर कॅलेंडर Rofl घरात कल्पना करून बघितली.

दु:खाचा ताज/मुकुट ही कल्पना रोचक आहे. दु:खाचाही अभिमान आणि अहंकार असतो तर लोकांना. कचर्‍यातून कला म्हणतात ती अशी.

>>>>>>>>>>दु:ख हवे असं म्हणणारी एक मीनाकुमारी तेवढी माहीत आहे.
आणि कुंती Happy

भरत, सलील कुलकर्णीच्या कारकिर्दीची सुरुवात तरीही वसंत फुलतो या कॅसेटने झाली असावी. गारवा (मिलिंद इंगळे), दिवस असे की (संदीप खरे) , कॉफी हाऊस (प्रशांत दामले) या कॅसेट्स या त्या काही वर्षांमधल्या असाव्यात. Late 90's . स्टेजवरचा कार्यक्रम म्हणजे 'आयुष्यावर बोलू काही' म्हणत असाल तर तो २००२/०३ चा असणार. म्हणजे तसा नंतरचा. तेव्हा स्टेजवरचे कार्यक्रम खूप व्हायचे ही गोष्ट खरी असली तरी पण त्यात ताज्या, नवीन गाण्यांचे कार्यक्रम फारसे नसावेत.

दुःख हवे असते मध्ये आणखी एकदोन पदर आहेत. आपण गप्पा मारताना सुखाच्या गप्पा मारतोच पण दुःखाच्या संवेदना आणि सहवेदना आणि संवाद माणसाला मनापासून आवडतो. इथली कुठली गप्पांची पानं किंवा आपण कुणाशी साधलेला संवाद आठवा. सेल्फ डेप्रिकेशन, फजिती वर मला स्वतःला बोलायला फार आवडतं. आनंदाच्या गप्पा थोड्याच वेळात कंटाळवाण्या होतात. रिपीटेटिव्ह, गोलगोल वाटतात. इतर गप्पांत मजा येते का? जरा जास्तच?
दुसरं मानवी मेंदूत सुख आणि दुःख या संवेदना जाणवणारी केंद्र जवळजवळ आहेत, एक झालं की डोपामाईन स्त्रवते आणि ते प्रमाणात ठेवायला दुसरे काही विरुद्ध स्त्रवते ज्याने दुःख जागृत होते. ही थोडं वरवरचं लिहिलंय कारण नेमकं आठवत नाही, (यावर हिडन ब्रेन मध्ये एक मस्त पॉडकास्ट होता... कुणाला रस असेल तर शोधेन.) थोडक्यात आपल्याला दुःख हवे असते.
आता पिळवटून टाकणारी परिस्थिती असेल वि. सासूने आजच्या भाजी वरून टोमणे मारले असतील मानवी मेंदू दोघांचा एकसारखाच काम करेल ना?

हिंदीत 'दुःख का ताज' नावाचा धडा होता तो आठवला.>>

मलाही "दुःख का ताज" म्हणजे कुठेतरी त्यातच आपली ओळख जपणं असं तात्पर्य वाटलं. त्यामुळे शेवटी आयडेंटिटी क्रायसिस आले गोष्टीत. दुःख कुणालाच हवं नसतं, काही तरी मानसिक आजार असल्यास माहिती नाही असे होत असेल. त्यामुळे फार मोठ्या आणि अनरिलेटेबल दुःखाला "ये, बस, तूच माझा खरा मित्र, तुलाही एकटेपणा आला असेल" वगैरे झेपत नाही. हा सगळा उहापोह जोवर दुःख रिलेटेबल आहे, चार लोक आहेत अश्या त्रासातून गेलेली हे माहित असताना चालू शकतो. खूपच मोठं (अनरिलेटेबल) दुःख माणसाला शांत करून टाकतं, कारण त्या विषयी बोलण्याने सुद्धा पुनः प्रत्ययाच्या यातना होतात. त्यामुळे वाचा खुंटते. एकटेपणा सुद्धा दुःखाने न येता आपले तीव्र अनुभव कुणाला समजत नसतील तर येतो, पण लोक त्यांच्या त्यांच्या अनुभवाइतकाच सखोल विचार करू शकतात, म्हणजे एखाद्याचं पर्सेप्शन तेवढंच सखोल जेवढे तीव्र त्याचे अनुभव. एकाची तीव्रता दुसऱ्या पर्यंत जशीच्या तशी पोचत नाही. अनुभवामुळे दृष्टीकोन बदलतो, प्रगल्भता येते. अनुभव नसेल आणि फक्त वय वाढले असेल तरीही येत नाही. दुसऱ्याचा अनुभव पर्सिव्ह करता येणं म्हणजे एंपथी. फारच कमी लोक "एंपथेटिक" असतात, सिंपथीचा मात्र सुळसुळाट असतो.

वावे खरं आहे!! . दिवस असे की १९९९ चा आहे.
मी ती कॅसेट २००३/०४ वगैरे मध्ये घेतली असेल. आयुष्यावर बोलू काही ऐकल्यावर मग मला 'दिवस असे की' समजलेला बहुतेक. शैलेश रानडे आणि संदीप च्या कविता, ते फार बेल्स आणि व्हिसल नसलेले सादरीकरण हे सगळे तेव्हा फारच आवडलेले आठवते.

>>>>>शोक हवा
शोक आणि वाल्मिकी आहाहा! काय उंचीचे समीकरण बा भं नी ओळखलय. शेवटी ते जात्याचे/हाडाचे कवि. एक कविच दुसर्‍या कविचे मन जाणो.
.
वाल्मिकी नामक कोकिळा सतत रामनाम गाते. .................... या वाक्याचा वरील थ्रेडशी काहीही संबंध नाही. ही रामरक्षेतील कल्पना मला आवडते, म्हणुन मांडली.

दुःख माझे माझियापाशी असू दे !
ते बिचारे एकटे जाईल कोठे?
माझियावाचून त्याला
आसरा आहे कुणाचा ?
ते किती आहे इमानी
जन्मले तेव्हापुनी श्वानापरी
माझ्याच मागे राहिले ते !
दुःख माझे माझियापाशी असू दे !

सुरेश भट

दु:खाला ये, माझ्याजवळच रहा असं सांगण्यात एक उपरोध आहे.
म्हणजे मला दु:ख हवज, असं नाहघ ; तर दु:खाने इतका पिच्छा पुरवलग की वाटावं, याला आपल्याशिवाय कोणी नाही का? याला आपल्याकडेच बरं वाटतं का?

यापेक्षा अधिक उलगडून दाखवणं कठीण आहे आणि त्यात कवितेची मजा निघून जाते.

आलं लक्षात. पिच्छा पुरवण्यामुळे ते एकाकी तर नाही असे वाटून म्हंटले आहे. सुखी असताना कोणी आमंत्रण देणार नाही, पण ह्या ओळी म्हणजे एक प्रकारचा स्विकार वाटल्या. आलाच आहेस तर, सोडून जात नाहीचेयस तर - या आशयाने.

भरत बरोबर. संदीप खरेची कविता मला पण नाही भावली, ती जमली नाही असे मला वाटते. त्यातही उपरोधिक आशय असूनही. ठरवून लिहिल्यासारखी वाटली.
वरील कविता, मुबारक हो गैर को खुशीया, मुझे गम से मोहब्बत है वगैरे काही गाणी यात तो उपरोध नीट जाणवतो.

अस्मिता एकाची तीव्रता कुणा पर्यँत पोचत नाही हे बरोबर, त्यात एवढे कंगोरे असतात की सगळं नीट कसं पोचवायचे हा प्रश्न असतो, सगळ्यांनाच नीट मांडता येईलच असे नाही आणि शिवाय काही गोष्टी सांगता येतच नाही मर्यादा असतात.
एंपथीचेही तसे होऊ शकते, सगळ्यांना ती व्यक्त/नीट व्यक्त करता येते असे नाही. मला अनेकदा काय यावर बोलावं कळत नाही असं वाटतं कुणाचं ऐकल्यावर, आपणही त्यातूनच गेलो असलो तरी, नाही तरी. पण कुठल्या स्थितीतून जात असेल याची बरेचदा नीट कल्पना येते. म्हणजे आपल्याला वाटतं की ही व्यक्ती एम्पथेटिक नाही पण प्रत्यक्षात तसं नसू शकतं.

हो तेही आहे. शब्दात मांडता येणं मग ते दुःख असो वा एंपथी तीही एक कला आहे. खूपच गुंतागुंतीचे लेयर्स असतात.

संदीप खरेची कविता आवडली नाही वाचून मला बरं वाटलं. Lol दुःख दूर झाले.

>>>>>एंपथीचेही तसे होऊ शकते, सगळ्यांना ती व्यक्त/नीट व्यक्त करता येते असे नाही.
+१
आईला डिमेन्शिआ होणे ही माझी दु:खाबरोबरची पहीली ओळख आहे. आणि आईचा डिमेन्शिआ डायग्नोस झाल्यानंतर दर म्हणजे दर रात्री मला दु:स्वप्न पडत राहीले. आई गेल्या गेल्या ती स्वप्ने बंद झाली. दु:ख कोणालाही नको असते.
--------------
स्वतःकरता काय आपल्या शत्रूकरताही दु:ख नको असे वाटते. कारण तशी इच्छा करणे इज फ्युएलिंग इव्हिल. संपूर्ण घॄणा/तिरस्कार आणि किळस यामुळे कोणालातरी वाईट चिंतण्यापासून, ते नो आय विल नॉट बी अ पार्ट ऑफ इव्हिल बाय सीकींग अ रिव्हेन्ज - पर्यंतचा माझा प्रवास कॉम्लेक्स आहे. आणि तो कोणालाही करावा लागू नये.

पाहिली लगानबद्दलची मुलाखत बरीचशी. आवडली. जावेद आणि रहमान जी माहिती देतात ती अफाट आहे. तेव्हा (माझ्याकडून) दुर्लक्षिली गेलेली गाणी, त्यातले काही पीस परत ऐकावेसे वाटत आहेत. मला हे ही आवडले की हे गाण्यांबद्दल असल्याने बहुतांश चर्चा जावेद व रहमानबद्दल आणि गायक गायिकांबद्दल होती. आमिर व आशुतोष तेथे असूनही त्यांनी स्वतःबद्दल जास बडबड केली नाही. विशेषतः आमिरने.

लगान जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी पाहिला होता. मला तेव्हाही त्यातली सगळी गाणी काही फार भारी वाटली नव्हती. "मितवा" मला नेहमीच प्रचंड आवडते. पण तेवढे एकच. अनेकदा मला असेही वाटले की उत्तर भारतात घडणार्‍या या कथेतील गाण्यांत रहमानने दाक्षिणात्य स्वर आणले. "बार बार हाँ" मधे त्याची ती ९०ज मधल्या इतर अनेक गाण्यांत जाणवलेली रहमानगिरी जास्त जाणवते. मला मीटर, स्वर, राग वगैरे काहीही कळत नाही पण ही गाणी ऐकताना हे नक्कीच वाटले की रहमान जसे गायला ("...सबको दिखा देंगे, राजा क्या परजा क्या/हम लोगोंका दर्जा क्या" वगैरे) तसे एखादा उत्तर भारतीय गायला असता तर ते बेसुरे वाटले असते. इन फॅक्ट कोणी मराठी गायक जर तिथे मराठी हेलात गायला असता तर आपणच त्याची "दाल भात की बू" वर यथेच्छ खिल्ली उडवली असती. मला इव्हन जावेदचे यातले ("बार बार हाँ" मधले) लेखन काही खास वाटले नाही.

घनन घनन घन, बार बा हाँ, ओ री छोरी, राधा कैसे ने जले, ओ पालनहारे ही सगळी गाणी नि:संशय चांगली आहेत. पण पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटलेली नाहीत. ओ पालनहारे जर लताने तिच्या प्राइम मधे म्हंटले असते तर कदाचित अल्ला तेरो नाम च्या तोडीचे झाले असते. पण यात तितके वाटले नाही.

Pages