मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुरेख दिसतंय ताट खरंच! चांदीच्या वाटीत मोदक. दुसऱ्या वाटीत काय आहे? मटार-बटाटा रस्सा? अळूवडीही काय छान दिसतेय.

वाढलेलं ताट आवडलं , सर्वांना धन्यवाद.

ममो, तुम्ही 'नातू' न म्हणता स्पेसिफिकली 'मुलाचा मुलगा' असं लिहिता त्याचं मला नेहमी जरा नवल / गंमत वाटते. स्वाती , कमाल निरीक्षण आहे हे तुझं. काही स्पेसिफिक कारण नाही पण तेच येतं तोंडात आपलं लिहिताना. जावयांना ही बरेच वेळा मुलीचा नवरा असंच लिहिलं जातं माझ्याकडून. असो.

अळू वड्या मस्तच दिसत होत्या आणि लागत ही छान होत्या आणि त्याच मुख्य कारण अळू कोकणातल /घरचं होतं. ह्या वेळी देठी ही पाठवली होती , तिचं ही भरीत / देठी केली होती. असो.
आम्ही ही खूप उशीर झाला म्हणून उकड ठेवून दिली ह्या वर्षी आणि पुन्हा मोदक केले संध्याकाळी पण ते ही छान झाले होते.

वावे धन्यवाद होय दुसऱ्या वाटीत मटार बटाटा रस्सा च आहे.

साधना छान होऊ देत मोदक तुझे.

ममो, यंदा दोन वेळा या पद्धतीने उकड काढून मोदक केले. खरंच सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. खूप धन्यवाद Happy

ओके, ममो. Happy

बाकी मोदक आणि नैवेद्य नेहमीप्रमाणेच सुबक आणि सुंदर आहेतच. Happy

काही लोकांचं स्वयंपाक करणं, ओटा आवरणं, वाढणं पण तितकंच देखणं असतं... ताट खरंच किती छान निगुतीने सजवलंय, कुठेही ओघळ ठिपके न दिसता जिथल्या तिथे सगळं! फार कौतुक वाटतं ममोताई तुमचं..

Pages