मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ गया जी आ गया....
उशिरा का होईना पण व्हिडिओ मिळाला. आमच्या सारख्या जड लोकांना नुसतं वाचून कळणं कठीणंच. आता बघून तरी होतात का बघू. यात पण 'गंधासारखे बारीक ' म्हटलंय.
https://youtu.be/Zzmn31PI0b8?si=z8M98M_dlFraPDuM

सिंडरेला, वीस कळ्या मोदक इथे दाखव फोटो असेल तर, आणि सगळं श्रेय तुलाच त्याच ...
गंधगाळच एवढं कठीण नाही चिन्मयी, होता होई तो बारीक वाटून नंतर ते गाळून घ्यायचं शंका असेल तर म्हंजे कणी असेल तर वर राहिलं.

<इथे कुणी तरी वाटताना पाणी कमी घालून नंतर उरलेलं पाणी घालायची टिप दिली आहे,> मला का नाही दिसली /लक्षात राहिली ही टीप? Sad
इडली डोशाचं पीठ वाटताना तांदूळ अगदी कमी पाणी घालून वाटावे लागतात हा धडा अनुभवाने पक्का झाला आहे. तरी इथे दिल्याप्रमाणे करायचं म्हणून तेवढ्याच पाण्यात वाटले आणि गंधगाळ झाले नाही. पेशन्स तसाही कमीच. त्यामुळे तशीच उकड काढली. ती मऊसूद होती. पारी पातळ करता आली नाही, तरी एकही मोदक वळताना की वाफवताना फुटला नाही ही प्रगती.

आज तांदूळ भिजवून वाटून उकड काढून मोदक केले. भारी झालेत. चमचाभर सुद्धा उकड चिकटून वाया गेली नाही. नाहीतर मोदक परवडले पण ते चिकटमिकट निस्तरपट्टीचं काम नको अशी गत असते कधीकधी. नॉनस्टिक वापरूनपण.

Screenshot_20250201-194331_Gallery.jpgScreenshot_20250201-194316_WhatsApp.jpg

आज माघी गणेश चतुर्थीसाठी नैवेद्याला केले होते. खूप मस्त झाले. चक्क १२ तास भिजले तांदूळ आणि आता वाटताना प्रकरण फसफसतंय की काय अशी काळजीपण वाटली होती, पण नो टेंशन पद्धत आहे ही! खूप थँक्यू!

थँक्यू सगळ्यांना __/\__
या उकडीमुळे काम इतकं सुटसुटीत झालं ना... :रेसिपीसाठी डोळ्यात बदाम:

अरे, गणपती येऊन दोन दिवस झाले, अजून हा धागा वर कसा नाही आला ?
मी काल या पद्धतीने केले.
एक वाटी तांदूळ आणि एक वाटी पाणी असे प्रमाण घेतले, छान झाले. खास इंद्रायणी तांदूळ आणले होते मोदक साठी.

मोदक छान झाले ह्या रेसिपी ने हे वाचून छान वाटत.
आम्ही अजून केले नाहीत, सूनबाईना आवडतात खूप आणि तिला करायला ही आवडतात. तिचे ही छान होतात खूप. तिला ह्या वीक एंड ला वेळ आहे त्यामुळे तेव्हा करायचं ठरवलं आहे.

या वर्षी या पद्धतीने मोदक केलेले .
साबानी पीठ शिजवलं पण कच्चं लागत होतं म्हणून त्यानी कूकरमध्ये ५-१० मि. वाफवलं .
मोदक करायला सोपे वाटले पण पीठ फार कोरडं पडत होतं , सारखं पाण्याचा हबका मारून मळून घ्याव लागत होतं
उकडलेले मोडक थोडे चिवट झाले .
आता जमलं तर परत पुढच्या आठवड्यात संकष्टीला करू.

#लेट पोस्ट#

या वर्षी या पद्दतीने उकड करू म्हटलं... आदल्या दिवशीच उकड करून ठेवली होती. फ्रीजमधे नाही ठेवली. बाहेरच्या गारव्यातच राहू दिली.
फार सुबक वगैरे जमले नाहीयेत मला. अजून चांगले होऊ शकले असते कदाचित...
पण निदान पिठी नाही मिळाली तर काय करायचं यातून तुम्ही सोडवलं, त्याबद्दल धन्यवाद! इथे मिळणार्‍या राईस फ्लोअर ची उकड नेहेमी जमेल असं नाही आणि एक टिपिकल ब्रँड आहे तोही मिळेल कायम याची शाश्वती नाही.

Modak.jpg

अंजली तुमची आणि पीनट बटरचे लाडू केलेल्या कोण (मंजूताई का?) त्यांची प्लेट एकदम सेम आहे. तुम्ही एकाच घरात आहात का? सासू-सून वगैरे टाइप्स Happy आवडल्यास उत्तर द्या. नाही दिले तरी हरकत नाही.

थँक्यू ममोताई! Happy

सामो भारी निरिक्षण! पण नाही काही नातं नाहीये! Happy योगायोग असेल.

सामो खरच भारी निरीक्षण.
आम्ही शनिवारी केले होते, मुलाचा साडे तीन वर्षाचा मुलगा खूप मदत (?) करत होता. मी वाती ( वाटी ) कलतो, मी सालन भलतो ह्यात खूप उशीर झाला आम्हाला.
IMG-20250906-WA0040.jpg

ममो, तुम्ही 'नातू' न म्हणता स्पेसिफिकली 'मुलाचा मुलगा' असं लिहिता त्याचं मला नेहमी जरा नवल / गंमत वाटते.
हे भलतंच अवांतर आहे, पण कधीपासून सांगायचं होतंं. Happy

मी रविवारी मोदक केले होते आणि त्यानंतरच्या शनिवारी फ्रिजमध्ये ठेवलेली उरलेली उकड वापरून आणखी मोदक आणि तांदळाच्या भाकरी केल्या. २-३ मोदकांची किंवा एका भाकरीची उकड १५-२० सेकंद मावेमध्ये गरम करून घेत गेले. सांगायचा उद्देश हा की उकडीची पद्धत फार भारी, फुल प्रूफ आहे.

सुरेख पान वाढलंय! ती अळूवडी तर कमालीची सुबक, एकसारखी गोल, पर्फेक्टली लेअर्ड वगैरे.... आणि उचलून खावीशी वाटतेय!
(मी हेमाताईंच्या सुबकपणाचं कौतुक करणं म्हणजे जरा... Lol )

हेमाला मुलीकडुन नात आणि मुलाकडुन नातु आहे असे आठवतेय. कारण काहीतरी असणार, मलाही मुलाचा मुलगा वाचले की डोक्यात प्रश्न येतो.

आज मी तांदुळ भिजत घातलेत. Happy बघुया. चांगले झाले तर फोटो देईन.

Pages