मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाताई , सोनु, UVSat अणि सुपरमॉम धन्यवाद.
झंपी, आज तुम्ही दिलेली लिंक बघितली. ग्रेट आहात. करेक्ट दिलीत लिंक . सेम टु सेम तसच करायच आहे फक्त करंज्यांऐवजी मोदक.
सुपरमॉम, हो ते नेहमीप्रमाणेच नंतर परत वाफवायचे आहेत.
प्रभाताई, क्रोशे हा माझा छंद आहे. फार नाही , मन रमविण्यापुरता.

मोदक खुपच सुरेख दिसतायत. ह्याप्रकारे करून बघेन उकड.
मला उकड जमते पण कळ्या करायला अजिब्बात जमत नाहीत.

सई, कुठलाही पदार्थ जमत नसेल तर आपण 'लहानसर' करून बघतो पण मोदकाच्या बाबतीत उलटं आहे Wink
उकडीचा उंडा लिंबापेक्षा मोठा घे, पारी मोठी कर आणि थोडी जाडच ठेव, पूरण थोडंच भर, कळ्या भरपूर येतील. तसंही आपण पुरणाच्या मानानेच मोदक बंद करतो, त्यामुळे करंजीसारखा खुळखुळा होण्याची शक्यता उरत नाही.
:न मागता सल्ला मोडॉफ:

थोडं अवांतर..

मोदक करुन झाल्यावर थोडी उकड उरतेच. तिच्या निवर्ग्या करतात. त्याचं च अजून एक version करते मी.

उकडीत हळद न घालता आईस्क्रीम च्या कोन च्या आकारात छोट्या टोप्या करून वाफवते आणि नंतर खाताना ओलं खोबरं + चिरलेली कोथिम्बिर + हिरवी मीरची आणि जीरं कुटून + लिंबू रस + चविप्रमाणे साखर आणि मीठ असं सगळं मिश्रण करून स्टफ करते त्यात.

घरी सॉलिड हीट प्रकार झालाय हा Happy

आनंदिता, छान आहे आयडिया. मी हेच सारण ( नारळाचा चव, कोथींबीर, मिरची चुरडून, जिरं, लिंबाच रस मीठ, आणि चवीपुरती साखर हे नुसतच मिक्स करुन ) वापरुन तिखट मीठाचे मोदक करते. डायबेटिस असलेल्याना गोड खाता येत नाही ना त्यांच्यासाठी खास. मोदक तर खाल्ले आणि पथ्य ही पाळल दोन्ही साध्य!!!

हेमा ताई, काल तुम्ही सांगीतल्या प्रमाणे उकड करुन पाहिली.. आणि छान जमली सुद्धा.. Happy
अजुन चुण्या खुप छान नाही येत आहे, सरावानी येईल.. पण खुप चविष्ट मोदक झाले होते...
खुप खुप धन्यवाद.. लाख मोलाची भेट दिलीत तुम्ही मला... खरच.. Happy
modak.jpg

(फोटो खुप लांबुन घेतल्या गेला, पुढच्या वेळेस जवळुन घेईल..)

आमच्या सिंगापूरच्या दुकानात मोदकाची पिठी आउट ऑफ स्टॉक आहे ऐकल्यावर उकडीच्या मोदकांचा बेत रद्दच केला होता.या पद्धतीने एका वाटीचे करुन पाहिलेत. झक्कास झालेत. आज बिगरीतुन डिग्री मध्ये पोहचल्यासारखे वाटते आहे. खूप्प्प धन्यवाद!
पूर्वी कधीच मी हे मोदक केलेले नाही त्यामुळे पारी थोडी जाड झाली. पण न तुट्ता न फुटता अगदी सुबक मोदक झालेत,

मी प्रथमच अश्या पद्धतीने उकड केली. आधी इथील ह्या पद्धतीने करणार होते कारण तांदूळ पाणी टाकून वाटून घेण्यापेक्षा आमरस टाकावा विचार आला. पण एका वेळी एकच प्रयोग बरा म्हणून आमरस वगळला.

मनीमोहोर, लोण्याच्या गोळ्यासारखी उकड झाली. धन्यवाद. मला वाटले तांदूळ वाटून केलयाने शुभ्र दिसते उकड.

मनीमोहर, फोटो फारच पॅथेटिक आलेत म्हणुन टाकले नाहीत. पुढच्या वेळी नक्की. आयफोनवरुन काढलेत आणि ते किचनमधल्या कमी प्रकाशात काळपट आलेत. खरेतर मोदक पांढरेशुभ्र झालेले.

या पद्धतीने मोदक प्रथमच केले. करायला फार सोपे वाटले. छान झाले. फक्त नेहमी करते त्यापेक्षा जड वाटले. कदाचित मी पाणी पूर्ण दिडवाटी वापरलं नाही म्हणूनही असेल.

मोहना, बरोबर आहे पूर्ण दीड वाटी पाणी वापरायचे आहे आणि तरीही उकड घट्ट वाटली तर पाण्याचा हात लावून मळायची आहे .उकड बरोबर झाली तर तेलाचा हात लावून मळून घ्यावी. कारण थोडस तांदुळा तांदुळावर पण अवलंबून असत .

मनीमोहर, ह्या पद्धतीने आज उकड करून मोदक केले. माझ्याकडून उकड जरा कमी मळली गेली असावी कारण पारी पातळ करायला गेल की मोदक फुटायचे पण मोदक करायला मज्जा आली.

उकडीचे मोदक करण्याची ही पहिलीच वेळ.

ukadicheModak.jpg

नलिनी, मस्तच झाले आहेत मोदक पहिल्यांदाच करुन सुद्धा. पहिल्याच इनिंगला सिक्सर मारली आहेस तू.
उकड थोडी सैल करायला हवी होतीस असं मला वाटतय. घट्ट वाटली तर पाण्याचा हात लावून मळून घ्यावी. म्हणजे पारी नीट करता येईल. थोडसं तांदूळावर पण अवलंबून असतं. दोनदा केलेस म्हणजे तुझा तुलाच अंदाज येईल. पुढच्या वेळेस नक्की अधिक सुंदर होतील

आज केले छान झाले . पण फोटोजेविक झाले नाही ... चवीला मस्त ... घरातला चिनोर तांदूल वापरले... परत एकदा करीन ... फोटोजेनिक...

सुपर रेसिपी, मी आंबेमोहोर तांदुळाचे केले. पहिल्यांदाच असे झाले की, मोदक फुटले नाहीत. मला सुबक येत नाहीत पण चव फारच मस्त झाली होती. खुप खुप धन्यवाद मनीमोहोर Happy
Ukdiche Modak.JPG

प्रीति , मंजू दोघीना धन्यवाद.
तुम्ही मी लिहील्याप्रमाणे उकड केलीत आणि तुम्हाला ती पद्धत आवडली म्हणून मला खरोखरच खूप छान वाटत आहे. प्रीति फोटो बद्दल धन्यवाद. पुढच्या वेळेस मोदकाचा आकार द्यायचा प्रयत्न करावा. नक्की जमेल अशी मला खात्री आहे.

अशी तांदूळाची उकड करून बघायला मुहुर्त मिळाला नाही अजून Sad
यंदासाठी बासमतीचं पीठ आणून झालंय. त्या पीठाची ट्रायल घेऊन बघावी का? कोणी प्रयोग करून पाहिला आहे का?

हि पोस्ट धागा वर काढण्यासाठी.
पुन्हा एकदा धन्यवाद मनीमोहोर

Pages