मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वस्ति, अप्रतिम झाले आहेत मोदक.

Happy teachers day . I want to meet you personally and give one tight hug >> हे फारच आवडलंय ,कोरोना कमी झाला की नक्की भेटू या .

खरं तर सेपरेट धागा काढला आहे ह्या वर्षी स्पर्धेमुळे पण इथे ही असावेत म्हणून ...

IMG_20200831_120452.jpg

मनीमोहोर, तुमची ही उकड एकदम हिट झाली आहे. Happy माझ्या एका बहिणीनेही करून बघितली. तिलाही प्रचंड आवडली. तिने तुम्हाला धन्यवाद दिले आहेत Happy आता मोदकांच्या उकडीचा प्रश्न मिटला.

स्वस्तिक कसले भारी झालेत मोदक! सुरेख.
ममोच्या मोदकांबद्दल बोलायलाच नको. ममो=सुरेख मोदक! आणि उकडीची पद्धत खरंच हिट आहे. मी माझ्या बहिणी मैत्रिणींना लिंक दिलीये.

अरे वा , आला का धागा वर !! शोधायचे कष्ट वाचले . गेल्या वर्षभरात प्रत्येक चतुर्थी ला उकडीचे मोदक करून बऱ्यापैकी सफाईने जमायला लागले मोदक . पण एक शंका विचारायची होती , उभट मोदक व्हावे म्हणून काही वेगळे वळायचे असतात का ? कारण उकडण्याआधी उभे असलेले मोदक नंतर बसके होतात . माझा ऑर्डर घेण्याचा विचार आहे . त्यामुळे अजून perfection हवे असे वाटते. मी उकडीची पारी पोळपाटावर लाटून करते .

मोदकाच्या आकाराचे सारण करून पारीमध्ये ठेवा. सारण पोकळ रहात नसल्याने मोदक अजिबात खाली बसत नाही आणि आजारही सुबक येतो.

धन्यवाद सर्वांना.

हे माझे ह्या वर्षीचे. ह्या वर्षी सूनबाई होती मदतीला त्यामुळे पटकन झाले. तिचे ही खूप छान होतात. मला काही सांगावच लागलं नाही. मस्त केलेन तिने मोदक जे माझ्यासाठी एक sweet surprise होतं. फोटो ही तिनेच काढला आहे.
20210911_110448.jpg

तुमच्या मोदकांचे ही दाखवा फोटो इथे.

सुंदर सूनबाईंचे आणि वावे चे मोदक.
मी हा धागा भक्तिभावाने दर वर्षी वाचते.(आणि तांदूळ भिजवून ठेवायला विसरते Happy )

मस्त मोदक वावे आणि ममोताई.
यावर्षी माझी पीठाची उकड फसली. मग मोदक करायचा मूड गेला , उशीर झाला, भूका लागल्या , फोटो काढायचा धीर नव्हता.
IMG_20210911_175917.jpgIMG_20210911_175959.jpg

मोदक सूनबाईला करू द्या पण फोटो तुम्ही काढा ही नम्र विनंती Wink Happy .... तिचा फोटो सुरेख आहे पण तसे पाहायचे असतील तर ते शेफ्सच्या ब्लॉग वर जाऊन बघू. तुमचे अ‍ॅल्यूमिनीयमच्या रोळीतले, पंचासहित इ इ घरगुती टच असलेले फोटो बघायला छान वाटतं... नुसतं फोटो बघताना उकडीचा सुगंध जाणवतो...

मानीमोहर, वा मस्तं मोदक केलेत सूनबाईंनी !
वावे, स्वस्ति
खूप सुंदर एकदम मोगर्‍याच्या फुलांसारखे दिसतायेत मोदक !

धन्यवाद सर्वांना. सूनबाईना ही सांगते .

वावे स्वस्ति मस्त झालेत दोघींचे मोदक.अगदी कळीदार स्वस्ति , डबल डेकर करंजी, फुलांचा सगळेच छान झालेत.

अश्विनी , घेतल्यास का ऑर्डर , असल्यास काय अनुभव , झेपलं का करायला ?

मोदक सूनबाईला करू द्या पण फोटो तुम्ही काढा ही नम्र विनंती Wink Happy .... तिचा फोटो सुरेख आहे पण तसे पाहायचे असतील तर ते शेफ्सच्या ब्लॉग वर जाऊन बघू. तुमचे अ‍ॅल्यूमिनीयमच्या रोळीतले, पंचासहित इ इ घरगुती टच असलेले फोटो बघायला छान वाटतं... नुसतं फोटो बघताना उकडीचा सुगंध जाणवतो >> सि, Happy

धन्यवाद.
माझी मावशी मोदक , निवरी आणि 3-4 प्रकार करते .मला एक दोन येतात. त्यातली एक गोल करंजी (डबल डेकरच्या मागे, आकार थोडा वाकडा झालाय ) . बाकी काही बनवायला धीर नव्हता मग 2 प्रकारचे फुलाचे मोदक बनवले आणि एक फिरत्या कळ्यांचा. (ममोताई करतात तसा)
सगळे प्रकार एकत्र ठेवून फोटो काढायला धीरच नव्हता, लेक नुसता भूक भूक करत होता आणि त्याला तो डबल डेकर मोदक बाकी कोणाला द्यायचा नव्हता , म्हणून घाई करत होता.

ह्या वर्षी पहिल्यांदा (स्वहस्ते गणपतीसाठी पहिल्यांदा ) तुमच्या पद्धतीने मोदक केले. उत्तम जमले.उकड छान जमल्याने पटापट मोदक होत होते आणि करायला देखील मजा आली.धन्यवाद.
प्रश्न : मी सराव म्हणून आधी एकदा करून पाहायचे म्हणून बासमती तांदूळ भिजवून केले होते.
पण मोदक करताना उकड फाटत होती. असे का झाले असावे?
गणपतीसाठी करताना कोलम तांदुळाचेच केले.उत्तम झाले.

स्वस्ति, घाई घाईत करून ही मस्तच झालेत. डबल डेकर फारच छान झालाय खरंच. वरचा मोदक ही किती मोठा आणि काळीदार झालाय , तो लेकाचाच Happy

नीतिका , बासमती तांदळात चिकटपणा कमी असतो म्हणून झालं असेल का , पण बाजारात बासमतीच पीठ विकतात मोदक पीठ म्हणून , किंवा त्यात थोडे नेहमीचे तांदूळ घालत असतील चिकटपणा यावा म्हणून. असो। पुढच्या वेळी थोडे आंबेमोहोर आणि थोडे नेहमीचे भाताचे अस करून बघा , त्याने वास छान येईल.
बाकी गणपतीच्या दिवशी उकड फसली नाही हे बेस्ट वाटलं।

आम्ही घरी फक्त बासमती तांदळाचे पीठ तयार करून उकड काढतो. आतापर्यंत कधीच उकड फाटली नाही. फक्त मोदकाचा रंग थोडा मळकट पांढरा येतो.

धन्यवाद ममोताई Happy .
मीही नेहमीचे वाडा कोलमच वापरते उकड करायला . छान होते उकड . पटापट वळून होतात मोदक .

अरे वा...हा धागा आला वर. आता बरेच वेळा तुमच्याच पद्धतीने मोदकाची उकड करून आता रेसिपी बघावीच लागत नाही. छानच होतात मोदक. इतक्या कळ्या वगैरे करत बसण्याचा पेशन्स टिकत नाही, पण तरी चांगले होतात. पुढच्या वेळी फोटो काढेन.

आज या पद्धतीने उकड काढून केले मोदक,खूप छान जमले,मुख्य म्हणजे फाटले नाहीत आणि खाताना सुद्धा वरच आवरण मऊसूत लागलं, thnku ममो
पण वरचे सगळे अत्त्युत्तम ,कळीदार ,शुभ्र मोदक बघून माझे सारणाचा हात लागून पिवळट झालेले,गाठूडं बांधल्यासारखे दिसणाऱ्या मोदकांचा फोटो टाकायचा धीर होत नाही Happy

Pages