मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरी थॅंक्यु.
Kahi nahi ग, आदू keshar घातलय ukadit बोलायचे. हाकानाका.
जमतील हळुहळू. >> तेच , आणि मोदकांच्या चवीत काही फरक पडत नाही. वरच आवरण मऊ आणि सारण गोड , आणि मोकळं झालं की छानच लागतात चवीला मोदक. मोदक करण्यात practice चा खूप मोठा रोल आहे. तिथे कमो पडतो आपण. वर्षातून एकदा कधीतरी करणार , कुठे होते प्रॅक्टिस ? तुम्ही मुली उत्साहात इतर व्यवधान समभाळून घरी करता हेच विशेष वाटत मला.

आज ललिता पंचमी ...आज काही तरी पांढऱ्या रंगाचा पदार्थ गोड म्हणून करतात. मी आज मोदक केले होते. सारण संपलं आणि उकड उरली. नेहमी निवगऱ्या करते. पण आज ओलं खोबर, मीठ, कोथिंबीर, आलं मिरची जिऱ्याचा ठेचा अस एकत्र करून कोरड सारण केलं. (लिंबू रस घातला नव्हता सारण ओलं ओलं होईल म्हणून हवं असेल तर आमचूर पावडर घालू शकता )उकडीत थोडी हळद घातली आणि हे सारण भरून त्याचे हलक्या पिवळसर रंगाचे तिखट मीठाचे मोदक वळले. टेस्ट ला फार सुंदर लागत होते. एक नमकीन डिश म्हणून एरवी ही करायला छान option आहे हा. फोटो मात्र नाहीये.

धागा वर काढून ठेवतेय. किती तांदुळाला किती पाणी वगैरे बघायला लागेल उद्या.
मस्त होऊ देत सगळयांचे मोदक...

जामच आवडली रेसिपी. आधी बघितली नव्हती. तांदळाची उकड जमत नाही म्हणून रव्याच्या उकडीचे मोदक करतो आम्ही. पण हे छान आहे. रेसिपी वाचून चित्र डोळ्यासमोर येईना म्हणून यूट्युबवारी केली. खूप शोधल्यावर ही रेसिपी मिळालेय. सिमिलर आहे. लिंक चिकटते का ते बघते.
https://youtu.be/oyC4YqqHtTY

मी सुद्धा या पद्धतीने पीठ बनवून भाकऱ्या केल्या होत्या, खूप छान झाल्या, विकतच पीठ आणलच नाही त्यानंतर. मोदक तर सुरेखच होतात
धन्यवाद.
इथे माझ्याकडे नॉन स्टिक कढई/ pan नाही त्यामुळे थोड पीठ चिकटते, त्यावर काही उपाय आहे का?

माझ्याकडेही पीठ भांड्याला चिकटते . मी नंतर त्यात पाणी घालून ठेवते आणि मग पीठाचे पाणी भाजी , आमटी , चपाती चे पीठ मळायला वापरते.

पीठ भांड्याला चिकटतेच आणि खूप वाया ही जाते भांडे निर्लेप नसेल तर . माझ्या कडे एकुलते एक निर्लेप भांडे आहे जे मी फक्त ही उकड काढण्यासाठी वापरते. लाकडी कालथ्याच्या उलट बाजूने ढवळते उकड.

साधं भांड असेल तर आधी तेलाचा हात लावून घ्यायचा भांड्याला आणि मग पेस्ट घालायची ही एक आयडिया सुचते आहे पीठ न चिकटण्यासाठी. बघा करून कोणीतरी. मला करून बघता येणार नाहीये सध्या.

Btw व्हिडीओ बघितला असच करायचं आहे , पण तिने पाण्याचं माप दिलेलं नाहीये , तिथे झोल होऊ शकतो. एक वाटी तांदूळ असतील तर टोटल दीड वाटी पाणी हे माझ्यामते perfect माप आहे , पाणी जास्त झालं तर खिमट होईल उकडीचं.

आज या पद्धतीने भाकऱ्या करून बघितल्या. सुंदर झालेल्या. मऊसूत अगदी. स्वतःवरच खुश आहे मी. >> जाई , भारी च वाटलं ग वाचून,

काल या पद्धतीने उकड काढून मोदक केले.
नेहमीच्यापेक्षा अतिशय सोपे आहे हे.
आणि उकड काढून 4 तासांनी ती मळून घेतली तरी अतिशय लुसलुशीत झाली होती.
नेहमीप्रमाणे हात भाजत किंवा वाटीच्या तळाने कसरत करत नाही मळावी लागली.
इतकी परफेक्ट उकड झालेली की मजा आली मोदक करायला.

धन्यवाद मनीमोहोर...

मला जमली तर कोणालाही जमू शकेल... Happy

मी चक्क रेशनचे तांदूळ वापरले. आणि 1 वाटी तांदळात 1 चमचा साबुदाणा भिजवला होता.
आता नेहमी याच पद्धतीने उकड काढणार.

नेहमीच्यापेक्षा अतिशय सोपे आहे हे.
आणि उकड काढून 4 तासांनी ती मळून घेतली तरी अतिशय लुसलुशीत झाली होती.
नेहमीप्रमाणे हात भाजत किंवा वाटीच्या तळाने कसरत करत नाही मळावी लागली.
इतकी परफेक्ट उकड झालेली की मजा आली मोदक करायला.>>>>

धनवंती , प्रत्येक शब्दाला अनुमोदन. मोदकपीठापेक्षा ही उकड छान होते. उद्या संकष्टी ला करायचा विचार आहे.
मी एक वाटी तांदूळ एक वाटी पाण्यात भिजत घालते , आणि अर्धी वाटी पाणी मिक्सरच भांडं विसळायला वापरते , प्रमाण बिघडू नये म्हणून.

Screenshot_20231001-092448_Gallery~2.jpg

नेहमीप्रमाणेच उकड काढली कारण मिक्सरमधून इतकं गंधगाळ होईल अशी खात्री नाहिये. पण तरी माझे मलाच आवडले म्हणून शेअर करतेय. यावेळेस गणेशचतुर्थीच्या दिवशी 39 मोदक घडले. सकाळी 21 आणि संध्याकाळी उरलेले नुसते वळून ठेवले. ते पहाटेच उकडले आणि हापिसात नेले. फोटोत आहेत ते दुसर्‍याच दिवशी असेच करून नवर्‍याला त्याच्या हापिसात दिले.
आमचे दोघांचेही कलिग्स मराठवाडा, विदर्भ इथले किंवा अमराठी आहेत त्यामुळे त्यांना फार अप्रूप!

छान जमलेत प्रज्ञा..

मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी पाणी घालून गंधगाळ बारीक होते पीठ. अजून अर्धी वाटी पाण्याने ते भांडं विसळून ते पाणी पिठात मिसळायचे- ही टीप नेटवरून Priya's kitchen साभार.

धनवंती, स्वस्ति धन्यवाद.

धनवंती, साबुदाण्याची आयडिया भारी आहे, मस्त चिकटपणा येईल उकडीला. करून बघणार.

Priyas किचन चा तो व्हिडिओ मी ही बघितला होता. तिने डबल बॉयलर पद्धतीने उकड काढली त्यामुळे कढईच्या तळाला उकड लागणार नाही. पाण्याचं प्रमाण वगैरे डिटेल्स साठी व्हिडिओ बघा.

प्रज्ञा किती सुंदर केले आहेस मोदक. कळीदार पांढरे शुभ्र. दिसतायतच लुसलुशीत झालेत अस. ३९ म्हणजे खूपच केलेस. ते वळून रात्री फ्रिज मध्ये ठेवलेस की फ्रिजर मध्ये ? मोदक खाऊन नॉन मराठी कलिग्ज खूष झाले असतील जाम.

आदल्या दिवशी नुसते वळून फ्रिज मध्ये ठेवण्याची मस्त आहे.

तुम्ही कौतुक केलं की भारी वाटतं Happy >> Happy अग, केलेस छानच होतेस कौतुक तर करायलाच हवं.

या पद्धतीने मी ज्वारीच्या भाकऱ्या केल्या होत्या . साबांकडून एकदम लुसलुशीत भाकऱ्या झालेल्या आहेत अशी पावती मिळवली . Happy

त्याचबरोबर भांड्यात किती पीठ चिकटवले आहेस . त्यात एक भाकरी झाली असती अशी एक कानपिचकी पण Lol
सो आता भांड्याला चिकटून राहिलेले पीठ अशी एकच समस्या ह्या रेसिपीत आहे . त्यासाठी आता स्पेशल नॉन स्टिक भांडे आणले पाहिजे

मी पण पहिल्यांदाच या पद्धतीनं उकड केली. मोदक वळणं फारच सोपं काम झालं. ममो, धन्यवाद तुम्हाला. आईला पण सांगितली आहे पद्धत.

सिंडरेला, धन्यवाद.
जाई, मस्तच.
sonalisl, पीठ गरम पाण्यात घालून , चांगल वाफवून मग भाकरी केल्या असतील.

Pages