शाकाहारी

करवंदाची चटणी

Submitted by सायु on 17 August, 2017 - 07:47
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करवंद : १२ ते १५ ( ईकडे हिरवी, किंवा गुलाबी मिळतात)
लसुण : १ गट्टा
जिरं : १ चहाचा चमचा
तिखट : २ चहाचे चमचे
गुळ : दोन लिंबा एवढा
मिठ : अंदाजे

क्रमवार पाककृती: 

साधारण श्रावण महिन्यात हिरवी, किंवा पांढरी गुलाबी करवंद बाजारात येतात आणि मग आमच्या कडे आवर्जुन ही चटणी केल्या जाते.
करवंदाचे लोणचे पण छान होते तसेच तिखट चटणी पण छान लागते, मी आज ईथे देतेय ती गोड चटणीची पा कृ.

तर सगळ्यात आधी, करवंदे धुवुन पुसुन कोरडी करवीत. मग सुरीने मधुन चिरुन दोन भाग करुन बिया काढुन घ्याव्यात.
लसणाच्या पाकळ्या, जिरं, मिठ, करवंदाचे काप आणि खिसलेला गुळ सगळे एकत्रच मिक्सरला फिरवुन घ्यावे.
चटपटीत आंबट- गोड, तिखट चटणी जेवणाची लज्जत वाढवायला तय्यर आहे.

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु चटणी आहे ती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
सासु बाई

कढाई छोले

Submitted by योकु on 10 August, 2017 - 10:32
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दीड वाटी काबुली चणे
- २ कांदे बारीक चिरून
- १ टोमॅटो + एक टेबलस्पून टोमॅटो सॉस
- १० लसणीच्या पाकळ्या ठेचून
- इंचभरापेक्षा जरा जास्त आलं किसून किंवा ठेचून
- चमचाभर कसूरी मेथी
- दीड चमचा छोले मसाला
- एक चमचा धणे पूड
- एक चमचा जिरेपूड (भाजक्या जिर्‍याची असेल तर जास्त चांगलं)
- अर्धा चमचा आमचूर
- अर्धा चमचा गरम मसाला
- पाव चमचा हळद
- हवं असेल तर लाल तिखट पाव चमचा
- चवीपुरतं मीठ
- चिमूटभर साखर
- कोथिंबीर
- लोखंडी मोठी कढई असेल तर उत्तम. त्यात करावे.

क्रमवार पाककृती: 

- काबुली चणे ८/१० तास किंवा रात्रभर भरपूर पाण्यात भिजवावे. (हा वेळ कृतीत धरलेला नाहीय)
- भिजवलेले चणे पुन्हा एकदा धुवून कुकरमध्ये शिजवावे. मऊ शिजायला हवेत. (हवं असेल तर चहा + सुक्या आवळ्यासोबत शिजवता येतील)
- एका मोठ्या लोखंडी कढईमध्ये / नसेल तर नेहेमीच्या भांड्यात; पळीभर तेल तापवून त्यात चिमूटभर जिरं आणि चिमूटभर हिंग घालून फोडणी करावी. यात आलं-लसणाचा पेंड टाकून मिनिटभर परतून मग कांदा घालावा. चांगला लालसर झाला की शिजवलेले चणे घालावे. मीठ घालावं आणि ग्रेव्ही होईल इतपत पाणी घालून मंद आचेवर उकळू द्यावे. यात आता बारीक चिरलेला टोमॅटो + गोडसर चव आवडत असल्यास सॉस घालावा.
- कसूरी मेथी सोडून बाकी सगळे कोरडे मसाले एका वाटीत/बोल मध्ये सुकेच एकत्र करून ठेवावे.
- दुसर्‍या एका जरा मोठ्या कढल्यात ३-४ टेबलस्पून तेल तापत घालावं. बर्‍यापैकी तापलं की बोलमध्ये कोरडे एकत्र केलेले मसाले घालावे. जरा जपून सगळ मिश्रण फसफसतं. आधीच जरा मोठं पॅन/ कढलं घ्यायचं.
- मसाले तेलात जरा होऊ द्यायचे आणि मग कसूरी मेथी घालावी.
- आता हे सगळं तळलेलं प्रकरण उकळत्या छोल्यांत घालावं.
- चव पाहून मीठ अ‍ॅडजस्ट करावं आणि मस्त उकळू द्यावं १० मिनिटं तरी; मंद आचेवर, झाकण घालून.
- शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम खायला घ्यावं. भात/ पोळी/ पुरी/ पराठा/ पुलाव/ कुलचे/ नान/ भटूरे कश्यासोबतही मस्त लागतात.
- सोबत एखादी दह्यातली कोशिंबीर आणि तळलेली हिरवी मिरची असेल तर स्वर्ग Happy

हा फोटो.

1.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन व्यक्तिंकरता पोटभर
अधिक टिपा: 

- लोखंडी कढईमध्ये केल्यानी मस्त रंग येतो आणि चवही जास्त चांगली येते
- मसाले तेलात नीट तळणं महत्त्वाचं. तेल आधीच खूप तापू न देणे हा सोपा उपाय.
- मी छोले नुसतेच शिजवले होते आणि टोमॅटो प्युरी + सॉस असं वापरलं आहे.
- आमचूर, छोले मसाला, टोमॅटो, सॉस असल्यानी आधी वाटलं की फार आंबट होतील म्हणून चिमूटभर साखर घातली मी पण नाही घातली तरी चालेलच.
- आमचूरीच्या ऐवजी चाट मसालाही वापरता येइल.
- फोटोमध्ये कोथिंबीर मिसिंग आहे याची नम्र जाणीव आहे.

- स्रोतः संजीव कपूर चा खाना खजाना शो. इथे पाहायला मिळेल. काही मॉड्स मी केलेय Wink

प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
वर दिलेला आहे

तांदूळादूधाची खीर (कोकणी पद्धत)

Submitted by देवीका on 30 July, 2017 - 02:30
लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

श्रावण सुरु असल्याने काही पारंपारीक असे पदार्थ लिहित आहे. आता कोकणी गोड पदार्थ म्हटले की ह्या पदार्थांचा कणा तांदूळ, खोबरं आणि गूळ असे असणारच त्यामुळे वाटेल की त्या मध्ये काय वेगळं असणार पण करण्याची पद्धत वेगळी असली की चव वेगळीच असतए.
उदाहरण म्हणजे, उकडीचे मोदक आणि पातोळी जिन्नस अगदी तेच पण पातोळी उकडवताना एका हळदीच्या पानाने चम्तकार केला असतो. असो, वेळ ज्यास्त बघून घाबरू नका.

प्रमाण दहा माणसांसाठी आहे.

तीनच चमचे( चहा पूडीचा चमचा) हातसडीचा आंबेमोहोर किंवा कुठलाही सुवासिक तांदूळ,
दोन मध्यम नारळाचा चव, त्याचा दोन वाट्या घट्ट दूध आधी काढावे मग पातळ दूध
वाटीभर गूळ( चवीप्रमाणे गूळ घ्या; काहींना गोड आवडतं , काहींना अगोड),
ताजे काजू किंवा सुकवलेले सालीचे काजू आवडी नुसार गरम पाण्यात भिजवून,
वेलची, केशर पूड, बेदाणे
साजूक तूप लागेल तसे
एखादेच हळदीचे पान धूवून गाठ मारून,

क्रमवार पाककृती: 

१) तांदूळ धुवून सावलीत थोडा वेळ वाळवून मग कुटून घ्यावा. झीरो नंबरचा बारीक रवा असतो ना तशी कणी काढावी.
२) जाड बुडाचा टोपात, दोन चमचा साजूक तूप घेवून जरासे तापले की, केशराच्या काड्या टाकाव्य मग काजू आणि बेदाणे परतावे, तीन चार मिनिटात काढावे व बाजूल ताटलीत काढून घ्यावे. लपवून ठेवले की बरे नाहितर खीरीला उरत नाही. Happy
३) आता कणी टाकून मंद आचेवर परतायला घ्यावी, गुलाबी रंग येइपर्यंत परतून घ्या.
४) पातळ दूध अलगद ओतून पटकन सतत ढवळत गुठळी न होउ देता दहा मिनिटे परता. नारळाचे पातळ दूध हे इतके असावे की कणीच्या चार पट असावे. आच मंद करून कणी शिजु ध्यावी.
५) गूळ जरासे पाणी टाकून वितळवून गाळोन घ्यावा.
६) मधून मधून , कणी चिकटू नये आणि गुठळी होउ नये म्हणून घोटावी.
७)कणी शिजली की, गूळ घोटावा त्यातच. गूळ एकजीव झाला की घट्ट दूध घालावे, पाचेक मिनीटात आच बंद करावे. वेलची पूड, काजू, बेदाणे आणि गाठ मारलेले हळदीचे पान वरच राहिल असे ठीवून झाकण ठेवावे. त्या वाफेवर हळदीचा पानाचा हलका सुगंध खीरीत शोषला जातो. पानाची गाठ वरच राहिल बघावे. ढवळत राहु नये.
वाढताना, पान देवु नये.
थंदगार खीर अप्रतिम लागते.
ह्याचे वेरीअशन म्हणजे, २:१ प्रमाणात तांदूळ आणि मूगाची डाळ घ्यावी. डाळ तशीच धुवून वाळवून कणी करावी व आधे तूपात परतावी मग तांदूळाची कणी घालावी.

अधिक टिपा: 

आधुनिक पद्धतीने मिक्सर वापराव कणी काढायल, अगदी जात्यावर बसायची गरज नाही. Happy

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
पारंपारीक

चिबुड रसायना(नागपंचमी / जन्माष्टमी खास)

Submitted by देवीका on 27 July, 2017 - 16:59
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हा खास कोकणातला प्रकार आहे. घरीच उगवलेले चिबुड घेवून बनवतात. ह्याची तुलना त्या बाजारी मेलन किंवा कँटालप बरोबर न केलेलीच बरी. पण अगदीच मिळाला नाही तर टस्कन कँटालप बरा त्यातल्या त्यात.
चिबुड अतिशय चविष्ट, खास केशरी रंग आणि गोड रसाळ असा हा प्रकार असतो.

एक मोठे आकाराचे पिकलेले चिबुड,
१ वाटी घट्ट नारळाचे दूध,
पाव वाटी घरीच कुटलेले जाडे लाल पोहे( बाजारी घेवु शकता पण ती चव नाही),
चवीनुसार गूळ( चिबुड खूप गोड असतो पण पोह्याला बरोबरी म्हणून गूळ टाकायचा.)
वेलची पूड, केशराच्या चार पाच काड्या, एखादंच लवंग असे एकत्रित करून चिमटीभर,

क्रमवार पाककृती: 

१) नारळाच्य घट्ट दूधात वेलची केशर लवंग पूड टाकून घ्यावे. मग त्यातच आवडीनुसार्/गोडीनुसार गूळ विरघळून बाजूला ठेवावे
२) जाडे पोहे जरासेच पाण्याखाली निथळून घ्यावे, भिजत ठेवू नये. किंचितसेच मीठ शिवरावे.
३) हे पोहे आता नारळाच्या दूधात भिजवावे.
४) चिबुडाच्या मध्यम आकाराच्या एकसारख्या फोडी करून वरील मिश्रणात टाकावे. आणि थंडगार करून नैवेद्य दाखवावा आणि खावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

कधी कधी आम्ही उरलेले वाटून पॉप्सीकल बनवतो. मस्त लागते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ

बाजरीच्या पीठाचे गोड दिवे

Submitted by मनीमोहोर on 27 July, 2017 - 15:37
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आषाढ अमावस्या ही हल्ली जास्त करून श्रावण महिन्याची पूर्व संध्या म्हणून 'गटारी' या नावाने ओळखली जाते पण हीला खरं तर 'दिव्यांची अमावस्या' असं म्हटलं जातं . ह्या दिवशी दिव्यांची पूजा करतात . आषाढातला धुवाधार पाऊस, भर दिवसा भरून आलेली काळोखी, अपुरा प्रकाश अशा वातावरणात दीप पूजन करण्याची , दिव्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा खरोखरच कौतुकास्पद आहे . ह्या दिवशीचा नैवेद्य ही 'दिवे' हाच असतो . दरवर्षी मी कणकेचे दिवे करते पण ह्या वर्षी घरच्या बाजरीचं ताजं पीठ घरात होतं म्हणून बाजरीचे केले . ते चवीला खूपच सुंदर झाले होते म्हणून कृती लिहीत आहे . कृती खूपच सोपी आहे .

साहित्य : बाजरीचं पीठ एक वाटी , गूळ बारीक चिरून एक वाटी पेक्षा थोडा कमी , तेल एक चमचा, चिमूटभर मीठ, आणि दूध

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका बोल मध्ये दूध सोडून इतर सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यावेत . नंतर त्यात दूध मिसळून आपण पोळ्याना भिजवतो तसे पीठ भिजवावे . नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्यांना फोटोत दाखवल्या प्रमाणे दिव्याचा आकार द्यावा . चाळणीला तेलाचा हात लावून त्यात हे सर्व दिवे ठेवावेत आणि कुकर ची शिट्टी काढून दहा ते पंधरा मिनिटं वाफवावेत . बाजरीचे गोड दिवे तयार आहेत.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार प्रत्येकी
अधिक टिपा: 

१ ) पीठ भिजवायला दूधच वापरावे. पाणी नको. दुधाने खुसखुशीत आणि हलके होतात. पीठ जुनं असेल, विरी गेलेली असेल तर दूध थोडं गरम करुन घ्यावे .
2) दिवे करताना पिठाची गोळी अंगठ्याने दाबुन तिला उभट खोलगट आकार द्यावा आणि मग त्याच आकारात मोठी करावी म्हणजे दिवे सुंदर आकाराचे होतात . पसरट होत नाहीत .
3) हे अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट होतात . गूळ आणि बाजरीची एकत्रित चव फारच छान लागते .
4) खाताना ह्यावर तूप घेतले तर चव अजून खुलते .
5) मुलांना डब्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी हा एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे .
6) कोणी पाव्हणे येणार असतील तर गोड म्हणून ही हे करता येतील .
7) मी कडेला घातलेली मुरड ऐच्छिक आहे , जमत नसेल तर नाही घातली तरी चालेल .
8) ग्लूटेन फ्री डाएट साठी हे नक्कीच चालतील .

हा फोटो
IMG_20170723_125213.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

शेंगदाणे कुटातली मिरची

Submitted by पिन्कि ८० on 19 July, 2017 - 04:28
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:-
१०-१२हिरवी मिरची,
लसून -७ ते ८ पाकळ्या,
भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल,
तेल फोडणीसाठी जरा जास्तच,
हळद,
जिर,
मोहरी,
धने जिरे पूड एक चमचा,
पाणी - १ ग्लास,
मीठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात.
कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात. आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा. मीठ, कोथंबीर घालून पाच मिनिटं मिरची शिजू द्यावी.
आमच्या खान्देशात गोडाच जेवण असेल तर आमच्या सारख्या गोड न आवडणाऱ्या लोकांसाठी हमखास केली जाते ही मिरची तोंडी लावायला.

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4 जण
अधिक टिपा: 

मिरचीचा तिखटपणा बघून कुटाचे प्रमाण वाढवावे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
आई,आजी

ओट्स बार - ओट्स वडी

Submitted by बाबू on 11 July, 2017 - 13:59
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रमाण स्पेसिफिक नाही.
१. एक वाटी रोल्ड ओट्स
२. ड्राय फ्रुट्स् तुकडे अर्धी वाटी
३ गूळ चिरून अर्धी वाटी
४. पीनट बटर सुपारीएवढा गोळा

क्रमवार पाककृती: 

१. ड्राय फ्रूट थोडे भाजून बाजूला ठेवावेत
२. रोल्ड ओट्स मंद आचेवर भाजावेत . रंग बदलून वास सुटतो
३. मग ड्राय फ्रूट् तुकडे , गूळ , पीनट बटर घालून मंद आचेवर हलवत भाजावे
४. गूळ व बटर वितळून लगदा होइल.
५. ताटाला तूप / तेल लावून लगदा थापून घट्ट दाबावे - प्लॅस्टिक पिश वीने
६. फ्रीज करावे किंवा तशाच वड्या पाडाव्यात
७. वडी नाही झाली तरी चमच्याने खाता येते.
८. गूळ मी जास्त गरम करत नाही , अन्यथा ती चिक्की होईल , पण हवे असेल तर करून बघा.

वाढणी/प्रमाण: 
*
अधिक टिपा: 

ओट्स उपमा , खिचडी पॅलेटेबल वाटले नाहीत.

दुधा ताकात सोकावलेले ओट्सही आवडले नाहीत.

म्हणून हे.

फोटो अपलोड होईना.

माहितीचा स्रोत: 
यु ट्युब , प्रयोग

गट्टे पुलाव / गट्टे का चावल

Submitted by सोन्याबापू on 8 July, 2017 - 08:55
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. बासमती तांदूळ – १ वाटी
२. बेसन – १ वाटी
३. तेल – ४ टेबलस्पुन
४. दही – २ टेबलस्पुन
५. हळद – १/२ टी-स्पुन
६. तिखट – २ टी-स्पुन
७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता
८. लवंग – ३-४
९. काळीमिरी- ३-४
१०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता)
११. तमालपत्र- १
१२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची)
१३. मीठ – चवीनुसार.

2016-11-14_01-52-26

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.

IMG_20161114_132248947

IMG_20161114_132541525

IMG_20161114_132703415

आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.

IMG_20161114_133138512

IMG_20161114_133605377

IMG_20161114_133637472

2016-11-14_03-10-28

आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.

IMG_20161114_134023859

IMG_20161114_134051448

IMG_20161114_134258749

IMG_20161114_134401516

दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.

2016-11-14_03-10-44

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी माफक भूक असल्यास
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती सिद्धीकरती सौ सोन्याबापू उर्फ आमची

फ्लॉवर, स्वीट कॉर्न - रस भाजी

Submitted by योकु on 6 July, 2017 - 15:47
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक फ्लॉवर चा मध्यम आकाराचा, घट्ट बांधणीचा आणि पांढराशुभ्र असा गड्डा
एक ते दीड वाटी स्वीटकॉर्न चे दाणे
एक मध्यम बटाटा
एक मोठा टोमॅटो
चवीनुसार मीठ
सढळ हातानी तेल
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
थोडं जिरं
एक चमचा पावभाजी मसाला (माझ्याकडे एवरेस्ट चा होता तो वापरला)

क्रमवार पाककृती: 

- फ्लॉवरचे तुरे काढून घ्यावेत लहान लहान (किडीची शंका असेल तर मिठाच्या पाण्यात ठेवावे जरावेळ, नंतर निथळून पुन्हा एकदा धुवून घ्यावेत)
- बटाटाही सिमिलर साईजमध्ये चिरून घ्यावा
- टोमॅटो बारीक चिरावा
- सढळ हातानं तेल ओतून गरम होऊ द्यावं
- यात जिरं घालून छान तडतडलं की हिंग घालावा
- यात आता निथळलेला बटाटा आणि कॉर्न घालावा
- तेलात कॉर्नचे दाणे उडतात तेव्हा जपून... झाकण घालून द्यावं
- एखाद मिनिटानंतर फ्लॉवर, टोमॅटो घालून नीट हलवून घ्यावं, परतत बसण्याची गरज नाही; हे सगळं नंतर पाण्यात शिजणार आहेच
- यात आता कोरडे मसाले, मीठ आणि चव घातलेली आवडत असल्यास चिमटीभर साखर घालावी
- पेलाभर पाणी घालून शिजत ठेवावी भाजी
- चांगली शिजली की वरून जराशी कोथिंबीर शिवरून गरमगरमच खायला घ्यावी
- घडीची पोळी, गरम फुलके, साधं तुरीच्या डाळीचं वरण-भात, यांसोबत मस्त लागते ही भाजी (हवंच असेल तर एखादी लोणच्याची फोड ही मस्त जाते याबरोबर...)

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होते
अधिक टिपा: 

- भरपूर रस आवडत नसेल तर शिजल्यावर, मोठ्या आचेवर जरा पाणी आटू द्यावं (मीही करतांना अंगासरशीच रस ठेवला होता)
- तिखट आणि मक्यामुळे जराशी गोड अशी भाजी मस्त लागते
- टोमॅटो आंबटपणा साठी आणि बटाटा जरा रस मिळून येण्याकरता म्हणून घातला आहे
- पाभा मसाल्याची मस्त चव येते
- पाभा मसाल्यात तिखट असतं, त्यामुळे वेगळं असं घालायची तशी गरज नाही; मी आधी तिखट घातलं आणि मग पाभा मसाला समोर दिसला तर तोही ढकलला चमचाभरून. पण नंतर प्रकरण भारीच टेस्टी झालं होतं...
- बाकी कुठले वाटणं, आलं, लसूण, मिरची, खोबरं नसल्यानी तेल जरा भक्कम घालावं

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
सासूबै

दही-मिरची (झटपट तोंडीलावणं)

Submitted by योकु on 20 June, 2017 - 12:44
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी थंड्गार आणि जरासं आंबट, साधं दही
७/८ हिरव्या मिरच्या (तिखट वाली व्हेरायटी घ्यावी)
मीठ
साखर
चमचाभर तेल
अगदी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

एका लहान कढल्यात चमचाभर तेल आणि बारीक चिरलेली मिरची असं घालून अगदी मंद आचेवर तापत ठेवावं. मिरच्या मस्त कुरकुरीत व्हायला हव्या.
तोवर दही चमच्यानीच थोडं फेटून घ्यावं
यात चवीनुसार मीठ, साखर घालून तयार ठेवावं
आता कुरकुरीत केलेल्या मिरच्या यात घालाव्या आणि थोडी कोथिंबीर घालावी
फार घट्ट असेल तर अगदी थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करावी. पळीवाढी टाईप्स.
जरा आंबट, गोड्सर, खारट आणि तिखट अशी दही मिरची तयार आहे. पोळी-भाजी सोबत तोंडीलावणं म्हणून मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसं.
अधिक टिपा: 

दही गार असेल तर मस्त लागतं
मिरच्या जरी जास्त वाटल्या तरी तिखट होत नाहीत. सॉर्ट ऑफ तिखटपणा जातो कुरकुरीत तळल्यामुळे.

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
बायडी

Pages

Subscribe to RSS - शाकाहारी