मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्याना थँक्यू मोदक आवडल्याच सांगितलंत म्हणून.

देवकी मला ही फिरत्या कळ्या आवडतात , वेगळंच सौंदर्य प्राप्त होत अश्या कळ्या पाडल्या की.

अदिती , का बरं झालं असेल असं , पाणी मी लिहिल्या प्रमाणे च घातलं होत ना ?

सॉरी सॉरी आदु , नेहमीचा कोलम आणि जुना बासमती अर्धे अर्धे मिक्स करून कर , छान होतील.

देवकी मला ही फिरत्या कळ्या आवडतात , वेगळंच सौंदर्य प्राप्त होत अश्या कळ्या पाडल्या की. >>> ममोताई , कशा केल्यात या ?
मला साध्या बारीक कळ्याचे मोदक जमतात बर्यापैकी .

मला ही फिरत्या कळ्या आवडतात , वेगळंच सौंदर्य प्राप्त होत अश्या कळ्या पाडल्या की>>>>>> मला आपल्या पहायलाच आवडतात कारण करायला येत नाहीत.साध्या कळ्या येतात.

ममोताई , कशा केल्यात या ? >> मोदक करून झाल्यावर हलक्या हाताने प्रत्येक कळी अगदी थोडी ट्विस्ट केली म्हणजे वळवली थोडी एका साईडला .

वा वा सोप्पी पद्धत,करून पहाणार. आमच्याकडे आता गिरण्याच 1,2 असल्यामुळे कोणी तांदूळ दळायला तयार नसत.आता घरीच करून पहाणार.

ममो, आजच केले तुमच्या पद्धतीने. मस्त झाले, खुप मजा आली ,इतकी छान उकड झाली. मोदक करतच राहावेत असं वाटत होतं
फोटोच अपलोड होत नाहीये

>>अदिती , का बरं झालं असेल असं , पाणी मी लिहिल्या प्रमाणे च घातलं होत ना ?
ममो, होय. बासमती तांदूळ घेतले. १.५ पट पाणि घातले. काय चुकले ते कळले नाही मला.
असो. पण पिठी नस्ताना मोदक करता आणि खाता आले हे महत्वाचे. तुम्ही मोदकांचे क्लासेस घ्या म्हणजे मला कळेल की माझे काय चुकते Happy

ये मी आणली आहे पिठी. सारण येत नाही मला ते पण लिहा रेसीपी. म्हण्जे त्यानुसार शॉपिन्ग करेन. गूळ का साखर. एक का अर्धा नारळ दूध घालायचे की नाही सारणात.

तांदूळ भिजत घातलेत मी ममो, आज करणारे >>> वा ग माज्या मर्दाने !

अमा, सारण करताना एक वाटी नारळाचा चव थोड्या तुपावर दोन मिनिटं परतून घ्यायचा मग त्यात अर्धी वाटी गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत परतायचं . नंतर थोडी वेलची पूड, बेदाणे वगैरे जे हवं ते घालायचं.
नारळाचं दूध वैगेरे नाही घालायचं सारणात

धन्यवाद ममो. करून बघेन नेक्स्ट वीकेंड. ह्या वीकेंडला एक नारळ घरात होता त्याच्या वड्या केल्या.

केले गं मोदक, पण मिक्सर ने थोडा घात केला, ते गंधासारखं वाटलं नाही गेलं पण मोदक झाले बेस्टम बेस्ट

धनुडी खूप सुंदर दिसताहेत मोदक. मस्त आल्यात पाकळ्या.

मीपण परवा करून बघणार आहे या पद्धतीने. आजच होम मिनिस्टरकडून परवानगी घेतली. Wink

कोणी स्पर्धेसाठी ह्या पद्धतीने उकड काढून केले मोदक तर इथे ही दाखवा फोटो म्हणजे सुन्दर सुंदर मोदक इथे संग्रहित होतील

मनीमोहोर ,तुमचे खूप खूप खूsssssss प आभार.. माझा विश्वास च बसत नाही की मी उकडीचे मोदक करू शकले.. फक्त तुमच्या या रेसिपी मुळे.. ☺️☺️IMG-20200823-WA0082.jpgIMG-20200823-WA0080.jpgIMG-20200823-WA0079.jpgIMG-20200823-WA0086.jpgIMG-20200823-WA0083.jpgIMG-20200823-WA0081.jpgIMG-20200822-WA0088.jpg

Sonalisl मस्त झालेत मोदक.

सय , पारी खूपच पात्तळ झालीय आणि मोदक ही छान झालेत.

सर्वच मोदक आणि पाककृती सुरेख.

तुमची ही पाककृती इथे दिसते आहे मनिमोहर.
https://marathikatta.santronixapps.com/?p=296

हा प्रकार कालच कळला आहे , वेमांकडे तक्रार केली आहे.

Pages