मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

क्रमवार पाककृती: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
८-९ मोदक
अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह ! मायबोलीवर आमच्या घरचे उकडीचे मोदक

मोदक करायचा कंटाळा आला किंवा हा आकार जमवायचा वैताग आला तर गणपतीला सॉरी बोलत सरळ करंज्या करायच्या.
पण मोदक तोंडात टाकायची मजा काही औरच Happy

सर्वाना धन्यवाद.
अदिती, नॉर्मल मिक्सर मध्येच अगदी बारीक वाटायचे आहे. जराही कणी राहु न देता.

wow..

खुप धन्यवाद Happy .. पिठी अशीही बनवता येते हे माहित नव्हतं.
मोदक मस्त दिसत आहेत. या प्रमाणात किती मोदक बनतील? पाककृतीतचं लिहिलत तर सगळ्यांनाच कळेल.

मस्तच !
>>>सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात>>>+१
ह्या रविवारी रंगीत तालीम नक्की. Happy

मस्त आणि फारच उपयुक्त कृती.
मोदक पिठीचा व्यवसाय करणारे रागवणार आहेत हो तुम्च्यावर..:) आमच्या घराच्या जवळच्या अगदीच फ दर्जाच्या दुकानात पण ९०० किलो मोदक पिठी खपते गणेशचतुर्थीच्या दिवशी. हे इतके आरामात मोदकाचे काम होऊ लागले तर पिठी कोण विकत घेईल ?

उकडीची रेसिपी मस्त आहे. मोदकाचा साचा वापरला का? मला गरम उकडीला आकार देताना जबरी त्रास होतो. साचा कसा वापरायचा?

खूपच सुंदर दिसत आहेत मोदक.
एक वाटीचं प्रमाण दिलंत तेही फार छान झालं. मी नक्कीच करून पाहीन.
त्या एक वाटी तांदुळाच्या मोदकांसाठी अर्ध्या नारळाचं पुरण पुरेल ना?

सर्वाना धन्यवाद.

विनीता, उकड करून झाली की साधारण दहा मिनीटानी ती तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून मळून घ्यायची आहे. हाताला गरम लागत असेल तर हे काम तुम्ही वाटीच्या सहाय्याने ही करु शकता.
हे करताना ती आपोआपच नॉर्मल टेंपरेचरला येते.
हे मोदक साच्यातून केलेले नाहीत. साच्याची गरज पडणार नाही. सहज जमेल तुम्हाला हाताने वळायला.

सुप्रिया, तु सुचवल्याप्रमाणे लिहीते कृतीतच किती होतील ते .

म़ंजूडी, एक वाटीला अर्ध्या नारळाच पुरण पुरेल.

आणि अगदी वेळेत हे पोस्ट केल्यबद्द्ल मनापासुन आभार>> ट्राय करायला हातात वेळ हवा म्हणुनच गणपतीच्या जरा आधी दिली आहे ही रेसीपी.

नेहमीचा चालेल. पण खूप जुना नको.

मी आंबेमोहोर वापरते. त्याचा सुवास मला जास्त आवडतो मोदकांसाठी.

हो खरच! आई, मावश्या, माम्या ह्यान्च्या देखरेखीखाली जमत होती मला. मागच्या वर्षी यु के मधे एकदम गणपती च्या दिवशी करायला गेले आणि उकड फसली. मग तळलेले केले. आता आधी प्रयत्न करेन. Happy

अरे वा असे पिठ तयार केलेले मी पहिल्यांदाच ऐकतेय. मस्तच.

मी आजच दळलेल्या पिठापासून नागपंचमीच्या निमित्तने नागोबाला नैवेद्य म्हणून मोदक केले. आमच्याइथे मोदक दाखवण्याची प्रथा आहे. मोदकांबरोबर दोन तरी करंज्याही करण्याची पद्धत आहे.

Pages