मासे व इतर जलचर

मासे ३९) इंग्लिश मासा

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

इंग्लिश मासे
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
आल, लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

माश्यांची खवले काढून, पोटाला चिर पाडून त्यातील घाण काढून स्वच्छ धुवुन घ्यावेत. जर मासे मोठे असतील तर त्याच्या तुकड्या पाडाव्यात.

नंतर त्याला मिठ, हळद, मसाला, हवे असल्यास वाटण चोळून ठेवावे.

गॅसवर पॅन चांगला गरम करावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर पाच पाच मिनीटांनी उलथापालथ करून खरपूस तळून घ्याव्यात.

हे आहेत खरपूस तळलेले इंग्लिश मासे.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
अधिक टिपा: 

ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असा गैरसमज करून घेउ नये. हाहा हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे.
हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.
कोणाला ह्या माश्याचे खरे नाव माहीत असल्यास नक्की कळवा ह्या माश्यांच्या जमाती मार्फत त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल स्मित
रस्सा करायचा असल्यास इतर रश्या प्रमाणे खोबर्‍याच्या वाटण घालून करता येतो.
माशाला चव चांगली असते.

माहितीचा स्रोत: 
भेट आलेले मासे व माहीती.

मासे ३८) भाकस

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाकस मासा
मिठ
आले,लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)
मसाला
हळद
तेल

क्रमवार पाककृती: 

भाकस मासा एका बाजुने चपटा असतो. चपटी बाजू पांढरी असते तर वरची बाजू फुगीर व खवलांनी भरलेली काळी असते. साधारण हलव्यासारखी. ह्याची खवले काढावीत व तुकड्या करून घ्याव्यात. जर रस्सा आणि तळायचेही असतील तर मधल्या चांगल्या तुकड्या तळण्यासाठी घ्यावात व डोके आणि शेपटाकडील तुकड्या रश्यासाठी वापराव्यात. रस्सा इतर रश्यांसारखाच ओल्या खोबर्‍याच्या वाटणाने करतात.

तळण्यासाठी तुकड्यांना मिठ, मसाला, हळद हवे असल्यास वाटण लावावे. जर धिर किंवा वेळ असेल तर थोडा वेळ मुरवावे. नाही मुरवले तरी हरकत नाही (माश्यांचीही आणि माझीही स्मित).

मग तवा चांगला गरम करावा व गॅस मध्यम ठेवून तेल सोडून तुकड्या शॅलोफ्राय करायला ठेवाव्यात. एक बाजू ४- ते ५ मिनिटे शिजवून झाली की परववावी व दुसरी बाजूही तितकीच शिजवावी. पलटल्यावर पुन्हा थोडे तेल कडेने सोडावे. जर तुकड्या जाड्या असतील तर पुन्हा अलटी पलटी कराव्यात २-३ मिनीटे व नंतर गॅस बंद करावा.

ह्या आहेत तयार तुकड्या. फिज मध्ये मासे असल्याने कापताना त्यांना व्यवस्थित शेप नाही आला.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ तुकड्या.
अधिक टिपा: 

हे मासे समुद्रात मिळतात.
वाटणाबरोबरच लिंबूही पिळला तरी चांगली चव लागते.
लिंबू किंवा वाटण ताज्या माश्यांना लावण्याची तशी आवश्यकता नसते. जर मासे बर्फातील असतील तर त्यांचा वईसपणा घालवण्यासाठी वापरतात.

माहितीचा स्रोत: 
आई

सॅमन (Salmon) उडद-मेथी

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सॅमन मासा: १/२ पौंड
किसलेला ताजा नारळ किंवा खोबरे: १/३ कप
लाल मिरच्या: १२-१५
काळे मीरे: ८-१०
चिंच: साधारण छोट्या लिंबाच्या आकारा एवढी
उडद दाळ: २ चमचे
मेथी: १/४ चमचा
धणे: १ चमचा
कोकम: ३
मोहरी: १/४ चमचा
हळद पूड: १/४ चमचा
कडी-पत्ता: ३-४ पाने
तेल: २-३ चमचे
गरम पाणी: १/२ कप, लागेल तसे.
मीठ: चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. सॅमनचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याना ह्ळद आणि मिठ लावून २०-२५ मिनिटे बाजूला शोषणासाठी ठेवणे .
२. मासा, कोकम, कडी-पत्ता, मोहरी, आणि चिंच वगळुन, बाकीचे जिन्नस भाजून घेणे. पाहीजे असल्यास, जरासे, तेल वापरणे. भाजतांना विस्तव कमीच ठेवावा, करपता कामा नये. सोनेरी-तपकिरी रांग होईतोपर्यन्त परतावे.
३. गरम पाणी वापरुन भाजलेले जिन्नसाची बारीक पेस्ट करावी.
४. एका पसरट भांड्यात तेल घेऊन त्यात शोषणास ठेवलेले सॅमनचे तुकडे तळुन घेणे. मासा जरा अर्धवटच तळावा जेणेकरून त्याचे तुकडे कढी मध्ये कडक राहतील. सॅमन जरासा फ्लेकी असल्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे लवकर पडतात.
५. भांड्यामधून माश्याचे तुकडे बाजूला काढून घ्या, आणि त्याच भांड्यात, गरज असल्यास अधिक तेल घालून, मोहरी, तडतडुन घ्या, कडी-पत्ता पण घाला.
६. वर तयार केलेली पेस्ट (३) सावाकाश ओता, उकळी येऊ द्या.
७. भाजलेला माश्याचे तुकडे घाला. विस्तव कमी करून, आणखी ४ मिनिटे शिजू द्या.
८. मासा नीट शिजवून घ्यावा. चवीपुरत मीठ घाला. विस्तव बंद करा.

https://lh3.googleusercontent.com/-uRZH_rCbxxk/TulXCwXncnI/AAAAAAAAAAo/k...

https://lh3.googleusercontent.com/-fUi2sS7je_s/TulXC9RMkRI/AAAAAAAAAAs/p...

वाढणी/प्रमाण: 
४-५
अधिक टिपा: 

ही पाककृती करण्यासाठी सहसा बांगडा वापरतात. बांगडा वापरला तर धणे वापरु नये. तसेच मासा नरम भाजण्याची ही गरज नाही. जर शाहाकारी उडद-मेथी करायची असल्यास माश्या एवजी कच्चा आंबा वापरु शकता. फक्त चिंच जरा कमी घ्यावी. शेवटी थोडासा गुळ टाकावा.

माहितीचा स्रोत: 
आई; [पूर्व-प्रकाशित: माझा ब्लॉग http://www.goan-cook.blogspot.com/]

बांगड्यांचे तिखले

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ ते ५ ताजे मध्यम आकाराचे घट्ट बांगडे. (शिळे बांगडे निस्तेज असतात आणि मऊ पडलेले असतात. )
अर्धा नारळ खवून
१५ सुक्या बेडगी मिरच्या
सुपारीइतकी चिंच
लहान चमचा धणे
५-६ मिरीचे दाणे
एक कांदा - मध्यम आकारात
पाव चमचा हळद
८-१० तिरफळे (बिया काढून)
फोडणीसाठी खोबरेल तेल
बांगड्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी तिखट आणि हळद - २ ते ३ चमचे प्रत्येकी. (आवडीनुसार - कसे कमी, जास्त तिखट हवे त्यानुसार)

क्रमवार पाककृती: 

१. बांगडे विकत घेतानाच कोळिणीला साफ करुन देण्यास सांगावे, त्या बांगड्यांचा डोळ्यांचा भाग, पोटातली घाण, कल्ले, शेपटी वगैरे साफ करुन देतील. घरी आणून साफ केल्यास हे सर्व भाग काढून टाकावे.

२. बांगड्यांचे आकारानुसार २ वा ३ तुकडे करुन थोडा वेळ बांगड्यांना मीठ किंवा चिंचेचा कोळ लावून ठेवावा, अंदाजे १५ ते २० मिनिटे, नंतर हे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. धुवून झाल्यावर तुकड्यांना तिखट, हळद लावून ठेवावे.

३. कांदा चिरावा, चिरलेला कांदा वाटणात वापरायचा आहे. त्यातलाच थोडासा फोडणीसाठी.

४. वाटणासाठी खवलेला नारळ, बेडगी मिरच्या, कांदा, चिंच, हळद, मिरी आणि धणे हे एकत्र करुन मिक्सरमधून काढून घ्यावे. अगदी गंधगोळी असे वाटायचे नाही आणि वाटणात खूप पाणीही वापरायचे नाही.

५. गॅसवर लंगडी तापत ठेवून त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून, ते तापले की बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यावर बांगड्याचे तुकडे घालून, त्यावर वाटण घालावे. किंचित पाणी घालावे - सगळे ढवळता येईल इतपत. खूप पाणी नको.

६. ह्यातच आता तिरफळे ठेचून घालावी व चवीपुरते मीठ.

७. १० एक मिनिटे वा उकळी येईपर्यंत शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

मासे ३७) घोळ

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घोळ माश्याच्या ५-६ तुकड्या
ओल खोबर, आल, लसुण, मिरची, कोथींबीर वाटण
हिंग चिमुटभर
हळद पाव चमचा
मसाला २ चमचे
लींबाएवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
१ किंवा २ छोटी पळी तेल

क्रमवार पाककृती: 

१) घोळीच्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मी वरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या आहेत.

२) भांड्यात तेल गरम करून त्यावर लसुणाची फोडणी द्यायची.
३) त्यातच लगेच हिंग, हळद, मसाला घालून पटकन ढवळून लगेच वाटण घालायचे. जर पटापट जमत नसेल तर वाटण घातल्यावर मसाला घाला त्यामुळे मसाला करपणार नाही. पण जर तेलातच घातलात तर कालवणाला चांगला लाल रंग येतो.
४) आता त्यात चिंचेचा कोळ, घोळिच्या तुकड्या, मिठ, गरज असेल तेवढेच पाणी घालून ढवळून उकळवत ठेवा
५) उकळी आल्यावर साधारण ७-८ मिनीटांत गॅस बंद करा.
झाले घोळीचे कालवण.हाकानाका?

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ ते २ तुकड्या.
अधिक टिपा: 

घोळात घोळ नव्हे घोळ म्हणजे मासा स्मित
घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात.
मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात.
ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात.
घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात. (माझा फेव्हरेट लहानपणापासुन) हा काटा उखळीप्रमाणे असतो. ह्याच्या मधले जॉइंट काढले की त्यात रस मिळतो तो प्यायचा हा पुर्वीपासूनचा छंद. काट्याच्या म्हणजे मणक्याच्या बाजूला थोडे मांस असते.
घोळीचा पिसारा म्हणजे प्रराकडचा मांसल भाग. ह्याचे कालवण करतात.
घोळीच्या मधल्या भागाच्या तुकड्या तळण्यासाठी व कालवणासाठीही वापरतात.
चविला हा मासा मध्यम, म्हणजे कोणालाही आवडेल असाच. अती चविष्ट नाही व मुळमुळीतही नाही.

घोळीच्या कालवणात शेवग्याच्या शेंगा, टोमॅटोही चांगला लाग्तो. शेंगा घालायच्या असतील तर चिंचेचा कोळ व तुकड्या घालण्याआधी शिजवून घ्याव्यात.
हे कालवण जास्त दाट न करता पातळच करावे म्हणजे वाटणाची चव न येता खरी माश्याची चव त्यात उतरते. काहीजण वाटण न घालताही हे कालवण करतात.
तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात.

माहितीचा स्रोत: 
आई

सुकी मच्छी पाककृती- सुकट तिकले - १ (फोटोसहीत)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो सुकट स्वच्छ करुन भिजवलेली(५ मिनिटे)
(चिकनचे)वाटण- १ १/२ मोठा डाव
आलंलसुण पेस्ट - १/२ मोठा डाव
१ डाव तेल
१ कांदा बारिक चिरलेला
१ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट मसाला
१-२ चमचा मालवणि मसाला(तिखट हवे असेल तर)
१ चमचा हळद
मीठ चवी नुसार
कोथिंबीर बारिक चिरलेली (गार्निशसाठी)

क्रमवार पाककृती: 

सुक्या मच्छीच्या वासामुळे खुपशे लोक मांसाहारी असुन देखील सुक्या मच्छीपासुन लांब रहतात. फक्त जरा वास सहन केला तर खरच खुप चवीचे आणि झटपट मांसाहारी जेवण बनु शकते. यासाठी हा सगळा खटाटोप..

आवडला तर जरुर कळवा.. स्मित
-------------------------------------------------------------------------

कढईत तेल तापवुन त्यात प्रथम कांदा खमंग भाजावा. त्यात आलंलसुण पेस्ट, वाटण, मसाले, हळद सगळे चांगले तेल सुटेपर्यंत भाजुन घ्यावे. त्यात भिजवलेली सुकट, मीठ, पाणि टाकुन मंद आचेवर एक वाफ काढावी(रस्साच पण थोडं घट्ट ठेवा). गॅसवरुन खाली उतरले की त्यावर कोथिंबिर पेरावी.

गरमागरमच भाकरी किंवा भातावर वाढावे.

झटपट एकदम चवीचे सुकट तिकले तयार.. स्मित

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

१) ह्यात कोकम(१-२) पण टाकतात पण आंबटपणामुळे तिखट कमी होते.

मासे ३६) घोये

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घोये मासे७-८ किंवा त्याचापेक्षा जास्त.
हळद पाव चमचा
मसाला ७ चमचा
मिठ गरजे पुरते
तेल तळण्यासाठी
थोडा लिंबू रस (ऑप्शनल)
आले-लसुण वाटण (ऑप्शनल)

पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ? हाहा

क्रमवार पाककृती: 

माश्यांचे शेपुट, पर, खवले काढावीत.
पोटाच्या जागेवर चिर पाडून आतली घाण काढून मासे ३ पाण्यांमधून स्वच्छ धुवुन घ्यावेत.
धुतलेल्या माश्यांना मिठ, हळद, मसाला आणि हवा असल्यास थोडा लिंबाचा रस किंवा आले, लसूण चे वाटण चोळून थोडा वेळ ठेवावे.

गॅसवर तवा गरम करून त्यात तेल सोडून मासे तव्यावर अलटी- पलटी करून खरपूस तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

घोये मासे हे खाडीत जास्त प्रमाणात मिळतात.
तसे चविला चांगले असतात पण थोडे काटेरी असतात.
हे मासे शक्यतो तळूनच चांगले लागतात.
रस्सा करायचा झाल्यास इतर माश्यांच्या रश्याप्रमाणे करावा.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण

भरल पापलेट

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल

क्रमवार पाककृती: 

) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.

२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.

३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.

४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.

५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.

६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट

७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
अधिक टिपा: 

(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)

वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.

माहितीचा स्रोत: 
कोळीण बाय.

कोलंबीच सार

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप साफ केलेली कोलंबी
वाटण्याकरता:
१ १/२ कप टॉमेटोचे तुकडे
१/२ कप नारळ
२ लसणाच्या पाकळ्या (अमेरिकन साईझचा लसूण)
१/३ कप कापलेला कांदा
१ टेबस्पू धणे
४ लाल मिरच्या
१ टिस्पून काश्मिरी मिरची पावडर (रंगा करता)
फोडणीकरता:
१ १/२ टेबल्स्पून तेल, मोहरी, मेथी, हळद, हिंग, ४-५ कढिपत्त्याची पान
चविपुरत मीठ
२ कोकमं

क्रमवार पाककृती: 

वाटण्याकरता दिलेले सर्व जिन्नस थोडस पाणी घालून मिक्सरमधे गंध वाटून घ्या. तेल तापवून अनुक्रमे मेथी, मोहरी, हळद, हिंग फोडणीत घाला. वाटलेला मसाला फोडणीत टाकून १ मिनीट परतून घ्या. १ कप पाणी, चवीपुरत मीठ, कोकम, आणि कढीपत्ता टाकून साराला उकळी येउ द्यात. उकळत्या सारात कोलंबी सोडा. १० मिनिटानी गॅस बंद करा-सार तयार!

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना पुरत
अधिक टिपा: 

हे सार खूप पातळ नसत. तेव्हा पाणी बेतान घाला. मस्त लाल रंगाच सार गरम गरम भाताबरोबर छान लागत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण

मासे ३५) सुरमई

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुरमईच्या ४-५ तुकड्या
चिमुटभर हिंग
हळद अर्धा चमचा चमचा
मसाला १ ते २ चमचे (तिखटाच्या आवडीवर)
मिठ अंदाजे

ही आहे सुरमई

क्रमवार पाककृती: 

१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.

२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.

३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.

४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते स्मित

महत्वाची सुचना : हा फोटो पाहुन कोणी जळू नये आणि जळल्यास मी जबाबदार नाही. हाहा

वाढणी/प्रमाण: 
मोठा गहन प्रश्न आहे हा सुरमईच्या बाबतीत तो तुम्हीच सोडवावा.
अधिक टिपा: 

सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते.

सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे.

सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.

तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.

माहितीचा स्रोत: 
मस्तप्रेमिंना मला वाटत सुरमई बालपणापासूनच माहित असते.