कोंकणी

बांगड्यांचे तिखले

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ ते ५ ताजे मध्यम आकाराचे घट्ट बांगडे. (शिळे बांगडे निस्तेज असतात आणि मऊ पडलेले असतात. )
अर्धा नारळ खवून
१५ सुक्या बेडगी मिरच्या
सुपारीइतकी चिंच
लहान चमचा धणे
५-६ मिरीचे दाणे
एक कांदा - मध्यम आकारात
पाव चमचा हळद
८-१० तिरफळे (बिया काढून)
फोडणीसाठी खोबरेल तेल
बांगड्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी तिखट आणि हळद - २ ते ३ चमचे प्रत्येकी. (आवडीनुसार - कसे कमी, जास्त तिखट हवे त्यानुसार)

क्रमवार पाककृती: 

१. बांगडे विकत घेतानाच कोळिणीला साफ करुन देण्यास सांगावे, त्या बांगड्यांचा डोळ्यांचा भाग, पोटातली घाण, कल्ले, शेपटी वगैरे साफ करुन देतील. घरी आणून साफ केल्यास हे सर्व भाग काढून टाकावे.

२. बांगड्यांचे आकारानुसार २ वा ३ तुकडे करुन थोडा वेळ बांगड्यांना मीठ किंवा चिंचेचा कोळ लावून ठेवावा, अंदाजे १५ ते २० मिनिटे, नंतर हे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. धुवून झाल्यावर तुकड्यांना तिखट, हळद लावून ठेवावे.

३. कांदा चिरावा, चिरलेला कांदा वाटणात वापरायचा आहे. त्यातलाच थोडासा फोडणीसाठी.

४. वाटणासाठी खवलेला नारळ, बेडगी मिरच्या, कांदा, चिंच, हळद, मिरी आणि धणे हे एकत्र करुन मिक्सरमधून काढून घ्यावे. अगदी गंधगोळी असे वाटायचे नाही आणि वाटणात खूप पाणीही वापरायचे नाही.

५. गॅसवर लंगडी तापत ठेवून त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून, ते तापले की बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यावर बांगड्याचे तुकडे घालून, त्यावर वाटण घालावे. किंचित पाणी घालावे - सगळे ढवळता येईल इतपत. खूप पाणी नको.

६. ह्यातच आता तिरफळे ठेचून घालावी व चवीपुरते मीठ.

७. १० एक मिनिटे वा उकळी येईपर्यंत शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

दुधिची घशी (भाजी)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप दुधिभोपळ्याच्या मध्यम चौकोनी फोडी सालकाढून(Cubes)
(सापशिडिच्या खेळातले फासे असतात त्या साईझचे)
१/२ ते ३/४ कप खवलेला नारळ (आपल्या आवडीनुसार प्रमाण घ्या)
३ लाल मिरच्या
१ १/२ टेबल्स्पून धणे
१ चमचा काश्मिरी मिरची पावडर (असेल तर)
२ टेबलस्पून चिंचेचा कोळ*
(विकतच्या कोळाचा आंबटपणा वेगवेगळा असतो त्यानुसार गुळाच प्रमाण घ्याव)
२ टेबलस्पून किसलेला गूळ
५-६ कढिपत्याची पान
तेल, हळद, हिंग, मोहरी (फोडणिकरता)
मिठ चविनुसार, पाणी आवश्यकतेनुसार

क्रमवार पाककृती: 

दुधीच्या फोडी चाळणीवर ठेऊन १० मिनिट वाफवून घ्या. मी मोदकपात्रात वाफवून घेतल्या.
नारळ, धने, मिरच्या मिक्सर मधे गंध वाटून घ्या. त्याच वाटणात चिंचेचा कोळ, गूळ, काश्मिरी मिरची पावडर टाका आणि मिक्स करून घ्या.
२ चमचे तेल तापवून, मोहरी-हिंग, हळदिची फोडणि करून घ्या. त्यात दुधीच्या फोडी टाकून परतून घ्या. नारळाच वाटण टाकून फोडी नीट मिक्स करून घ्या. कढिपत्याची पाने आणि १ वाटी पाणी टाकून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. चविपुरते मिठ टाका.
ही रस भाजी नाही पण ओलसरच असते.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरते
अधिक टिपा: 

तांदूळ, बटाटा वगैरे पदार्थ खूप खाउ शकत नाही म्हणून नाचणीचे डोसे आणि ही भाजी हा एक स्टँडर्ड मेन्यू झाला आहे. छान साऊथ इंडियन फ्लेवर येतो.

माहितीचा स्रोत: 
आई (तिची कोंकणी मैत्रिण)

शिवल्या (तिसऱ्या)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिवल्या,
आल,
लसूण,
कडीपत्ता,
कोथिंबीर,
हिंग अर्धा चमचा
कोकम ४ ते ५ ,
१ मध्यम आकाराचा बटाटा,
४ ते ५ तुकडे शेवग्याच्या शेंगा,
१ वांग,
१ टोमाटो,
२ मध्यम आकाराचे कादे,
१ कवड सुख खोबर,
मालवणी आहे तोच मसाला टाकतोय
तेल
चाविपुरात मीठ
पानि

क्रमवार पाककृती: 

थोडाशी तुमच्यासाठी माहिती शिवल्या या खाडीत खोल पाण्यात किंवा कडेला सुधा मिळतात या शिवल्या मातीत असल्यामुळे पायाने माती चाळवून किंवा मातीत खणून काढाव्या लागतात याला जाळ वैगैरे असा इतर खर्च नसतो.

प्रथम शिवल्या कर्लून घ्यायच्या म्हणजे त्याची १ शिपि टेवावी. हि १ शिपि हॉटेल मध्ये भरपूर लोक आवडीनि खातात. मी त्याची प्रती तुम्हाला दाखवण्यासाठी खाली टाकली आहे.

आदी तुम्ही सुक खोबर खर्चून घ्या आणि त्याच बरोबर कांदा या दोन्ही गोष्टी चांगल्या रीतीने भाजून घ्याव्यात. नंतर mixer किंवा आपल्या वाट्यावर वाटून घ्याव्यात.

आपण साहित्यात सांगितल्या प्रमाणे १ मध्यम आकाराचा बटाटा, ४ ते ५ तुकडे, शेवग्याच्या शेंगा, १ वांग, १ टोमाटो याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.

एका पातेल्यात तेल घ्याव त्यात कडीपत्ता, हिंग, आले - लसूण पेस्ट टाकावी. अशा प्रकारे आपली फोडणी तयार झाली सुंदर झणझणीत. आता त्यात टोमाटो त्यात टाकावा मग तो चांगला शिजला कि त्या फोडणीत तो एक जीव होतो. त्यात मग आपल्या १ शिपि शिवल्या टाकाव्यात मग त्याला १ वाफ आली कि त्यात बटाटा, शेंगा आणि वांग टाकावं. हे सर्व जिन्नस २ ते ३ मिनिटे पाणी टाकून शिजवाव पातेल्याला झाकण लावून. मग त्यात मसाला टाकावा आणि शेवटी आपल वाटप नंतर चाविपुरात मीठ आणि ३ ते कोकम आणि पुन्हा ते झाकण लावून ५ मिनिटे शिजू द्याव.आणि मग सुंदर तयार झाली आपली तिसऱ्या पाककृती....................

आपल्या मा. बो. करांसाठी काही शुभेछा----

मालवणचो वारो नि
समुद्राचा पाणी
मैत्रीचो सहवास नि
माश्याचो वास
विसृक कधी होव्चो नाय
नि आठवण तुमची इल्या शिवाय दिवस कधी जायचो नाय.

वाढणी/प्रमाण: 
वाटप वाढवाव लागेल. पण जेवढ्या शिवल्या जास्त तेवढी खायला मजा येते.
अधिक टिपा: 

आजून सोपा १ उपाय हे सर्व जिनासाला फोडणी दिली कि ते कुकरात ठेवून २ शिट्या कराव्यात.

माहितीचा स्रोत: 
आई

सुकी कर्दी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुकी कर्दी, टोमाटो,कांदा,बटाटे, कोकम, कोथिंबीर,चाविपुरात मीठ, तेल,आल लसून पेस्ट, हिंग, कढीपत्ता,मालवणी मसाला

क्रमवार पाककृती: 

सुकी कद्री हा प्रकार भरपूर लोक करतात कारण हा प्रकार सामान्य माणसांसाठी, किंवा हा प्रकार चिपळूणी वगैरे लोक जास्त करतात कारण पटकन करता येतो. लोक मला वाटत सुक्की मच्ची सुद्धा खूप आवडीन खातात. पावसाळ्यात सुद्धा हीच मच्ची उपयोगी पडते.

प्रथम हि सुक्की कर्दी साफ करून घ्यावी त्यानंतर ती पाण्यात भिजत ठेवावी १ ते २ तास ती भिजत ठेवावी त्यानंतर त्यात पाणी चांगले मुरते.

दुसरीकडे मध्यम आकाराचे कांदे,बटाटे, आणि टोमाटो कापून घ्यावा.
एका पातेल्यात तेल तापत ठेवून त्यात हिंग, आले लसून पेस्ट, आणि त्यात चिरलेले कांदे , बटाटे आणि टोमाटो टाकावा ते चांगल झाकण लावून शिजू द्याव. या सर्व गोष्टी चांगल्या शिजल्या ना कि मग त्यात ती सुकी कर्दी टाकावी आणि तिला पण थोडी शिजवू द्यावी त्यात थोड योग्यते नुसार पाणी टाकावं म्हणजे शिजण्यास मदत होईल. आणि हे सर्व झाल कि यात चाविपुरात मीठ आणि मालवणी मसाला (नसेल तर आपल्या रोजच्या वापरातला) आणि हे सर्व टाकून झाल्यावर पातेल्याला झाकण लावून पाणी चांगल मुरेपर्यंत शिजू द्याव नंतर सुंदर रंग येईल आणि वासही पसरेल.........................आणि नंतर कोकम आणि कोथिंबीर टाकावी.झाली आपली सुकी कर्दी तयार.................

वाढणी/प्रमाण: 
बटाटे, आणि टोमाटो हे टाकल आहे म्हणजे आजून काही सांगायची गरज नसावी कदाचित.
अधिक टिपा: 

पावसात मच्चीमार मासेमारी करायला जात नाहीत तेव्हा अश्या पक्राराचे पदार्थ केले जातात.

टोमॅटोची आमटी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो, लहान सुपारीएवढा गूळ. चवीपुरते मीठ.

वाटणासाठी: एक ते दीड वाटी खोबरे ( आमटी किती जाडसर ठेवायची ह्यावर अवलंबून), ३-४ लाल मिरच्या, १ लहान चमचा धणे, १ लहान चमचा हळद.

फोडणीसाठी : हिंग, मोहरी.

क्रमवार पाककृती: 

१. टोमॅटोंचे प्रत्येकी ४ तुकडे करुन ते शिजवून घ्यावेत. साल काढून टाकावी.
२. खोबरे, धणे, मिरच्या हलके भाजून घेऊन हळदीसकट मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. वाटतानाच हळद घालावी.
३. हिंग - मोहरीची फोडणी करुन ह्यात टोमॅटोच्या शिजलेल्या फोडी टाकाव्यात व वरुन वाटण घालावे.
४. आमटी कितपत जाड/ पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालावे.
५. उकळी येताना गूळ व चवीपुरते मीठ टाकून, उकळी येताच गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

१.फोडणी करताना कढीपत्ता घालायला हरकत नाही. कढीपत्ता घालताना तो हाताने चुरडून घालावा, म्हणजे मस्त वास येतो स्मित

२. हे टोमॅटोचे सार नव्हे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक.

मनगणं

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी चण्याची डाळ
३ ते ४ वाट्या नारळाचा रस वा दूध
अर्धा वाटी बारीक चिरुन गूळ
वेलची
काजू
नारळाच्या खोबर्‍याचे बारीक काप
चवीला किंचित मीठ

क्रमवार पाककृती: 

१. चण्याची डाळ कूकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी.
२. शिजल्यावर चांगली घोटावी व त्यात गूळ घालून थोडा वेळ पुन्हा गॅसवर शिजू द्यावी. शिजताना गूळ व डाळ एकत्र होण्यासाठी ढवळावी.
३. एकत्र झाल्यावर गॅस बंद करुन त्यात नारळाचे दूध घालावे.
४. ओल्या खोबर्‍याचे काप, काजू घालावे. स्वादासाठी वेलची पूड घालावी.
५. चवीपुरते किंचित मीठ घालावे.

मनगणं तयार. देवीच्या नैवैद्यात मनगणं हवंच. स्मित

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

नारळाच्या दूधाऐवजी नेहमीचे दूध घालता येईल. तसे घतल्यास दूध घालूनही शिजवता/ उकळता येईल. नारळाचे दूध घालून मात्र उकळू नये.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक. आई, आजी.

कोळंबो

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तूरडाळ : १ वाटी
कांदे : २
हिरव्या मिरच्या : ६-७
आले : १ इंच
कोहळ्याच्या फोडी : कपभरून (किंवा वांग्याच्या फोडीही वापरता येतात)
नारळाचे दूध : १ ते २ वाट्या
चिंच कोळ : अंदाजानुसार
मीठ : चवीनुसार
टोमॅटो फोडी : ऐच्छिक

वरून फोडणीसाठी :

तेल
मोहरी
हळद
हिंग
कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

तूरडाळ अगोदर किमान तासभर भिजवून मग किंचित तेल, हळद, हिंग घालून प्रेशरकुकर मध्ये शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ घोटून त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या उभी चीर देऊन चिरून, आल्याची साल काढून त्याचा तुकडा व कोहळ्याच्या फोडी घालून पुन्हा शिजवत ठेवावी. हवे असल्यास टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. भाज्या शिजत आल्यावर चिंचेचा कोळ घालावा. नारळाचे दूध घालावे. उकळी येऊ द्यावी. चवीनुसार मीठ घालावे. वरून तेल-मोहरी-हिंग-हळद-कढीपत्त्याची फोडणी द्यावी.

डोसा/ इडली/ भात/ पोळी बरोबर खावे.

वाढणी/प्रमाण: 
खाण्या/ ओरपण्यानुसार
अधिक टिपा: 

तूरडाळीसारखेच मुगाच्या किंवा मसुराच्या डाळीचे कोळंबोही करतात. त्यात सांबाराप्रमाणे शेवग्याच्या शेंगा, वांगी, टोमॅटो घालतात. कोळंबो हा खरे तर सांबाराचाच एक प्रकार असावा, फक्त त्यात नारळाचे दूध घालतात त्यामुळे चव वेगळी येते. कोहळ्याचे कोळंबो अप्रतिम लागते.
आम्ही (बहीण + मी) उडीद डाळ + मुगाच्या डाळींना समप्रमाणात चार तास वेगवेगळे भिजवून त्यांचे पीठ करून त्यांचे डोसे केले व त्याबरोबर हे कोळंबो हादडले. ही खास मंगलोरच्या बाजूची पाकृ आहे. बहिणीच्या सासूबाई साऊथ कॅनरा स्टाईलने जरा वेगळ्या प्रकारे करतात. पण चव जवळपास अशीच लागते.

माहितीचा स्रोत: 
बहीण + आधाराला लक्ष्मीबाई धुरंधरांचे पुस्तक

माझे इम्प्रॉव्ह खतखते

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

खतखत्याच्या विविध रेसिपी आहेत. सिंधुदुर्ग आणि गोवा, भट आणि सारस्वत आणि मराठा अश्या प्रमाणे फरक होतात. मी आपला माझ्यापुरता सुवर्णमध्य इम्प्रॉव्ह केलाय.

साहित्य
सर्व प्रकारचे कंद - सुरण, रताळी, अर्वी, करांद (वेलावरची आणि जमिनीतली दोन्ही),
चिना आणि माडी (हे दोन्ही कंद मी गोव्यात आणि वाडीत पाह्यलेत. त्याला मराठी नाव आहे का माहित नाही.)
अजून आठवतील ते कंद.
मक्याचं कणीस तुकडे करून (दाणे काढायचे नाहीत), कच्ची पपई, कच्चं केळं, दुधीभोपळा, थोडा कच्चट तांबडा भोपळा, नीर / विलायती फणस (याचे अक्षरशः बटाट्यासारखे तुकडे होतात.)
भरपूर ओला नारळ.
थोडासा गुळ.
आमसुल
मसाल्याचे पदार्थ - हळद, धणे, तिरफळं, हिरवी मिरची नसल्यास. लाल सुकी मिरची.
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. सर्व कंद पाण्यात घालून माती काढण्यासाठी ठेवावेत. वेलीवरची करांदं छोटी असतील तर अजिबात चिरू नयेत. तशीच राहू द्यावीत. बाकी वस्तूंचे तुकडे करावेत. आपण कुकरमधून शिजवून काढणार असल्याने अगदी बारीक चिरू नये. कच्ची पपई, कच्चं केळं आणि कच्चट भोपळ्याची साले काढून तुकडे करावे. मक्याच्या कणसाचे एक-दीड इंच जाडीच्या चकत्या करायच्या. दाणे काढत बसायचे नाही. बेबी कॉर्न वापरणार असलो तर आख्खेच.

२. तिरफळं घ्यायची आणि एका वाटीत भिजवत ठेवायची,

३. ओला नारळ, हळद, धणे आणि लाल सुकी मिरची वापरणार असल्यास ती असं सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हिरवी मिरची वापरणार असाल तर ती या वाटणात घालायची नाही.
कोरडं खोबरं जे वापरतात ते हे सगळं मिक्सरमधून काढून मग किंचित परतून घेतात. त्याने एक वेगळा खमंगपणा येतो. कोरडं खोबरं वापरायचं असेल तर लाल सुकी मिरचीच बरी.

४. हे वाटण प्रेशर पॅनमधे ओतायचं. थोडं पाणी, गूळ, आमसुल आणि हिरव्या मिरच्या आख्ख्या टाकून जरा उकळी येऊ द्यायची. मग सगळे चिरलेले कंद बिंद, भाज्या बिज्या सोडायच्या त्यात. पाणी घालायचं. पॅन बंद

५. एक शिट्टी-गॅस लहान-दोन शिट्ट्या-गॅस बंद- वाफ गेली की उघडून त्यावर तिरफळाचं पाणी ओतायचं. मीठ घालायचं आणि सारखं करत एक उकळी आणायची. (कुकर कंपनीप्रमाणे शिट्या बदलतील पण बेसिक डाळ-तांदूळ-बटाटा शिजायला जे सेटिंग लागतं ते वापरावे.)

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

वाढणी/प्रमाण: 
हा प्रकार १-२ लोकांसाठी होतच नाही कधी.
अधिक टिपा: 

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

भाताबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरही मस्त लागतं.
तांदळाच्या भाकरीबरोबरही चांगलं लागत असावं असा अंदाज आहे.

माहितीचा स्रोत: 
ओळखीपाळखीचे लोक

कैरीची उडदमेथी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ कोवळ्या कैर्‍या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.

क्रमवार पाककृती: 

१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्‍यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्‍यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक.

.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.