मिरची २-३ दिवस चांगली कडक उन्हात तापवा.

१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.
ज्या दिवशी मसाला करायचा असेल त्या दिवशी मसाल्यासे सगळे सामान कडकडीत उन्हात वाळवा. आधीपासुन वाळवले तर मसाल्यांचा वास काही प्रमाणात उडतो असे आईचे मत आहे.
प्रचि १) मध्ये हळद व बाजुला दालचिनी, तमालपत्र,जायपत्री, मिरी व बाद्यान किंवा चक्रिफुल

प्रचि २) मध्ये जिर बाजुला डाविकडुन दगडफुल, शहाजिर, लवंग, मसाले वेलची, हिंग, नाकेश्वर, जायफळ, तिरफला,

प्रचि ३) ह्यामध्ये मधल्या डिशमध्ये खसखस, दोन परातीत राई व धणे. पाठचे दोन थाळे प्रचि १ व प्रचि २ आहेत.

आता मसाला करण्यासाठी सज्ज व्हा.
हळद, हिंग खडा आणि जायफळ वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.
मोठ्या कढईत किंवा टोपात मिरच्या भाजुन घ्या. जास्त भाजु नका नाहीतर रंग काळा पडेल. तापतील इथपत ठिक आहे. (काही जणं मिरच्या भाजत नाहीत त्या गिरणीत भाजल्या जातात असे त्यांचे मत आहे) हे जरा सहनशिलतेचे काम आहे. कारण मिरच्यांचा तिखट ठसका लागत राहतो मिरची भाजताना. तोंडाला फडके बांधुन भाजलेत तर ठसक्याचे प्रमाण कमी होईल.
मोकळ्या जागी खाली पेपर रचुन ठेवा. त्यावर भाजलेल्या मिरच्या गार करण्यासाठी ठेवा.
मिरच्या भाजून झाल्यावर राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करुन भाजा, करपवु नका. जिर, शहाजिर एकत्र भाजलत तरी चालेल, मिरी, तिरफला, नाकेश्वर असे जे एकाच आकाराचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजलेत तरी चालतील. मिरचिच्या बियाही भाजुन घ्या. बाकीचे सगळे जिन्नस भाजुन झाले की मिरच्यांवर टाकुन गार करण्यासाठी ठेउन द्या.

आता राई करपेपर्यंत भाजा. करपली कि थंड करुन ती मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरुन ठेवा. राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिकटते. म्हणुन घरीच मिक्सरमध्ये काढून सोबत घेउन जायची.
आता मिश्रण गार झाले की ते स्वच्छ जाड पिशवीत भरा आणि दळायला घेउन जा. सोबर दळलेली राई न्यायला विसरू नका. मसाल्या दळणाच्या वेळा ठरलेल्या असतात. एक दिवस आधीच विचारुन या गिरणवाल्याला की मसाला कधी आणु ? (अपॉइंटमेंट घ्यावी लागते दळणासाठी )
आता गिरण वाल्याकडे मिश्रण आणि राईची पुड सोपवा आणि लक्ष ठेवा तो आपलेच दळण आपल्याला देतो का ? (हे ऑप्शनल आहे, विश्वासावर अवलंबुन आहे
) आपली मिरची दळली की गिरणवाल्याकडे हल्ली चाळण्यासाठी बायका असतातच. मग ह्या बायका मसाला चाळतात आणि त्यात राई मिक्स करुन देतात. पुर्वी आपल्यालाच बायका मॅनेज कराव्या लागत. किंवा मग घरातलच कोणितरी चाळावी लागे. आता जर तुम्ही डबा नेला असेल तर डब्यात किंवा पिशवीत मसाला भरुन आणा.
(स्टिलच्या डब्याचा फ्लॅश मसाल्यावर पडलाय म्हणुन फोटो तिखट मानुन घ्या.)


मसाला थंड झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन वरुन १-२ हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही. तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्था कोलो च्या पिशव्या भरुन मेणबत्तीने पॅक करुन ठेवलात की डब्याच्या उघडझाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही.
इति मसाला पुराण संपुर्णम.