उपाहार

ओनियन रिंग्ज

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कप लो फॅट दही
१/२ कप ब्रेड क्रंब्ज
१/२ कप कॉर्न मिल
२ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम)
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा तिखट
थोडे तेल
तेलाचा स्प्रे

क्रमवार पाककृती: 

ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा.
कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात.एका बोल मधे १/२ कप दही काट्याने फेटून घ्यावे. दुसर्‍या बोलमधे कॉर्नमिल, ब्रेडक्रंब्ज, तिखट, मीठ एकत्र करावे. यातील निम्मे मिश्रण बाजूला ठेवावे.
कांद्याची रिंग दह्यात बुडवावी. सगळ्या बाजूने दही लागले की काट्याने उचलून ब्रेडक्रंब्जच्या मिश्रणात टाकावी. बोल हलवून मिश्रण रिंगला लावून घ्यावे. दुसर्‍या कोरड्या काट्याने रिंग उचलून तयार ट्रेवर ठेवावी.
अशा सगळ्या रिंग्ज ट्रेवर लावाव्या. साधारण एका कांद्यानंतर मिश्रणात गुठळ्या होतात. असे गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे आणि बाजूला ठेवलेले मिश्रण वापरायला घ्यावे. रिंग्जवर तेलाचा स्प्रे मारून ट्रे तापलेल्या ओवनमधे १५-१७ मिनिटे ठेवावा. गरम गरम रिंग्ज सर्व कराव्या.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग

डुबकीवाले आलु आणि कचोडी...

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१/२ किलो बटाटे..
अर्धी वाटी सायीचे घटट दही..
१ लहान चमचा अमचुर पावडर..
३ ते ४ मिरच्या बारीक चिरुन..
१ ईंच आले किसलेले..
मीठ चवीनुसार..
लाल काश्मिरी ति़खट १ लहान चमचा [भाजी ला रंग येण्यासाठी]
[लाल भडक रंग येण्यासाठी रोगनजोश ही वापरतात..ही दालचीनी सारखी कांडी[मूळ] असते..तयार भाजीच्या रसात डुबवतात ..त्याने रंग लालभडक येतो ..]
फोडणीसाठी अर्धी वाटी साजुक तुप..
पंच फोडण १ १/२ चमचा..
१/२ चमचा हळद..
कचोडी--
२ वाट्या कणीक १चमचा तेल व पाव चमचा मीठ घालुन पुरीसारखी भिजवुन घ्यावी..
अर्धी वाटी मुग डाळ अर्धा तास पाण्यात भिजवुन २ मिरच्या ,पाव चमचा जिरे घालुन पाणी न घालता जाडसर वाटुन घ्यावी.
त्यात घालायला १ चमचा धने-जिरे पुड..'
कचोडी तळायला तेल..यातलेच चमचाभर तेल मुगडाळ परतायला घ्यायचे आहे..
चिरलेली कोथिंबीर..
काकडी,गाजर,टोमॅटो व हिरवी मिरचीचे सलाद..

क्रमवार पाककृती: 

१ चमचा तेलाच्या फोडणीत जिरे घालुन वाटलेली मुगडाळ मंद आचेवर परतुन घ्यावी..झाकण ठेवुन एक वाफ आणावी मीठ,धने-जिरे पुड घालावे..परतुन घ्यावे..थोडीशी कोथिंबीर घालावी..थंड करण्यासाठी दुसर्‍या भांड्यात काढुन ठेवावी..
बटाटे उकडुन त्याची साले काढुन ते तळहातावर दाबुन,कुस्करुन घ्यावे..
दही ,अमचुरव एक चमचा तुप एका वाटीत चमच्याने कालवुन घ्यावे..
फोडणी साठी तुप गरम करायला ठेवावे
अर्धे तुप एका वाटीत काढुन ठेवावे..या गरम तुपात काश्मिरी तिखट घालुन एकदा छान ढवळावे..
फोडणी मधे पंचफोडण ,हळद घालुन गॅस बारीक करुन मिरच्याचे तुकडे ,किसलेले आले घालावे..एकदा परतुन त्यात दही मिश्रण घालुन परतावे..
कोथिंबीर घालावी लगेच कुस्करलेले बटाटे घालुन मिश्रण छान परतावे..
रसदार भाजी करण्यासाठी पाणी घालावे..
एक उकळी आली कि त्यात काश्मिरी तिखट घातलेले तुप टाकावे.व एकदा भाजी ढवळावी..
वरुन कोथिंबीर घालावी..
आता कचोडी बनवायची..
नेहमीच्या साध्या /तिखट/ओवा/मेथी/पालक ,अशा कोणत्याही पुर्‍या चालतील पण ही कचोडी वाली पुरी असली तर तोपासु..यात विशेष मेहनत नाहीये व फार चिकित्सा /कलाकुसर पण नाहीये.
पुरीपेक्षा मोठी लाटी घेवुन त्यात पाव चमचा मुग डाळीचे मिश्रण भरायचे..थोडीशी पिठी लावुन पुरीसारख्या आकारात लाटायचे..गरम तेलात या कचोडया तळायच्या..
डुबकीवाल्या आलु बरोबर गरम कचोडी सोबत भरपुर सलाद..बनारसच्या थंडीतला हा एक खास मेनु आहे..
अजुन एक याच्या बरोबर तिखट शेव तोंडी लावायला असली तर स्वाद जास्तच वाढतो..
.

.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ३ जणांचे "जेवण" होते..
अधिक टिपा: 

बनारस च्या गजमल गलीत मिळणारी" डुबकेवालली आलु-कचोडी "खुपच झन्नाट असते..फोडणीत लाल तिखट ही घालतात..त्यामुळे तिखट प्रेमी तिखट-पुड घालु शकतात..
कांदा-लसुण विरहीत पंच फोडण ची ही भाजी , वेगळेपण जाणवणारी"विशेष चवीची भाजी" आहे..

माहितीचा स्रोत: 
बनारस गजमल गली...

मेथी भाजीचा [तिखट] केक...

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

केक म्हणजे गोडाचाच प्रकार म्हटला जातो..पण हा मेथीचा केक काहीसा "हांडवा" प्रकारात मोडतो असे मला वाटते..उसगावातल्या माझ्या पंजाबी मैत्रीणीने हा केक शिकवला..पार्टी ला केलेल्या 'स्टार्टर 'पदार्थ प्रकारात हा होता..मोजके च जिन्नस वापरुन ,कमी मेहनतीत उत्तम पदार्थ तयार होतो..गरम्,थंड कसाही खा ..स्वाद फर्मास..
१ मेथीच्या जुडीची पाने,कोवळ्या दांड्या असल्या तर चालतील..धुवुन जाडसर चिरुन घ्यावी..
१ कप जाड रवा..
३/४ कप बेसन..
१ कप तेल..
१ कप दुध..
१ कांदा बारीक चिरलेला..
१ टिन क्रीम स्टाईलअमेरिकन कॉर्न..[
[अमेरिकन कॉर्न थोडया दुधात वाफवुन घेतले तरी चालेल ..]
हिरवी मिरची+आले वाटुन केलेली पेस्ट ३ चमचे..[मिरचीचा तिखटपणा व आपली आवड त्याप्रमाणे]
मीठ चवीनुसार..
हळद १ टी स्पुन.
१ टी स्पुन बेकिंग पावडर..
२ टी स्पुन साखर...
१ कप काजु+बदाम तुकडे..[भरपुर हवे]
किसलेले सुके/ओले खोबरे अर्धी वाटी....[ केक बेक करण्याआधी वरुन पेरायला..]

क्रमवार पाककृती: 

एका मोठया बाऊल मधे तेल,दुध,मिरची-आले पेस्ट,मीठ, साखर ,हळद घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे..
आता कांदा,रवा,बेसन व बेकिंग पावडर घालुन मिक्स करा..
काजु-बदाम व मेथीची भाजी,कॉर्न घालुन मिक्स करा..
बेकिंग ट्रे ला [मोठा ]केक टिन चालेल] तेलाने कोटींग करुन घ्या..त्यात केक मिश्रण टाकुन चमच्याने नीट एकसारखे पसरवुन घ्या..वरुन खोबरे किस पेरा..अगदी हलक्या हाताने किस चिकटेल इतपत दाबा ..
ओव्हन मधे ३५० फॅ.वर सधारण ४५ मिनिटे ते एक तास पर्यंत बेक करा..
थंड झाल्यावर वडयांच्या आकारात कापा..

अधिक टिपा: 

बटरी सेल डिस्चार्ज झाल्याने फोटो नीट आला नाही..पुन्हा चार्ज होइपर्यंत केक उरला नाही..म्हणुन फोटो नाही..

माहितीचा स्रोत: 
माझी उसगावातील पंजाबी मैत्रीण शशी दी..

झटपट ढोकळा : फक्त बेसनाचा .

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन : १ वाटी
पाणी

हिरव्या मिरच्या : २ ते ३
आले : पाव इंचाचा तुकडा

हळद
मीठ
साखर : १ टी स्पून
मिरी : ३-४ दाणे
तेल : १ टेस्पून

१ ईनो सॅशे

फोडणीसाठी :
हिंग
मोहरी
तेल

कोथिंबीर
ओलं खोबरं

क्रमवार पाककृती: 

मिरच्या व आले एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.

एका पातेल्यात बेसन घेउन त्यात हळद ,मीठ,साखर ,वाटलेल्या मिरच्या-आलं ,मिरीचे दाणे-जाड्सर ठेचून घाला.हळूहळू पाणी घालून मिश्रण भजी-पीठापेक्शा थोडे पातळ करा.चमचाभर तेल घालुन चन्गले ढवळून घ्या.

कूकरमध्ये थोडे पाणी घेउन त्यात एक पाण्याने भरलेला वाडगा ठेवा.
कूकरच्या ड्ब्याला , आतुन तेलाचा हात लावून घ्या.
कूकर मोठया आचेवर गरम करायला ठेवा.

बेसनाच्या मिश्रणात ईनो घालुन मिश्रण चमच्याने चांगले फेटुन घ्या(१).
लगेचच कूकरच्या डब्यात ओतुन , डबा कूकरमध्ये ठेवा(२).कूकरवर मोठे ताट झाकण म्हणून ठेवा.

गरम तेलात हिन्ग , मोहरी घालून फोडणी करून घ्या.

२० मिनिटांनंतर कूकरखालचा गॅस बन्द करून झाकणी बाजूला काढून ठेवा(३).

थोड्या वेळाने कूकरचा डबा बाहेर काढून थंड करायला ठेवा.
त्यावर थंड फोडणी ओता.

ढोकळा थंड झाल्यावर, ओलं खोबरं आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन तुकडे पाडा (४)

अगदी लुसलुशित होतो असं नाही पण बर्यापैकी हलका होतो .

घरात ईनो आणि बेसन असलं तर पाहुणे कधीही येउदेत...... स्मित

वाढणी/प्रमाण: 
खाणार्याच्या कपॅसिटीवर आणी बेसनाच्या वाटीच्या आकारावर अवलंबून :) .पण साधारणपणे ४ लोकांना पूरेसा होतो
अधिक टिपा: 

(१)मिश्रण किंचित फुगुन येत.
(२)ईनो घातल्यावर , मिश्रण कूकरमध्ये ठेवायला जितका जास्त वेळ लावाल तितका ढोकळा खप्पड बनेल.
(३)झाकणी तशीच राहीली तर शिजलेल्या ढोकळ्यात परत पाणि पडून ढोकळा ओलसर बनेल. ( मी २-३ वेळा केलं आहे म्हणून .... स्मित )
(४)गरम ढोकळ्याचे तुकडे पाडता येत नाहित. "गरम असताना खोबरं घातलं आणि मग ढोकळा शिल्लक राहिला तर खराब होइल " ( ईति सा.बा.)

माहितीचा स्रोत: 
माझ्या सासुबाई

गुजराथी हांडवा

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाटी तांदूळ,१ वाटी उडीद डाळ,१/२ वाटी चणा डाळ,२चमचे मेथी दाणे, १/४वाटी दही
१ वाटी किसलीली दुधी,१/४वाटी चिरलेली कोथिंबीर, २ चमचे आले-लसूण्-मिरची पेस्ट,कडीपत्ता,मीठ,३ चमचे साखर,१/४ चमचा हळद,१/२ चमचा मीरपूड,१/२ चमचा तीखट,३ चमचे तीळ, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, १/४ चमच हिंग,१ चिमूट सोडा.

क्रमवार पाककृती: 

तांदूळ-डाळी-मेथी दाणे ५ते६ तास भिजवून, धुवून वाटून घेणे.त्यात दही टाकून किमान ८ते१० तास मिश्रण फरमेंट करणे.त्यानंतर त्यात दुधि, कोथिंबीर, मीठ, साखर, मीरपूड, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घेणे.१चमचा तेल गरम करून मोहरी,जीरे, कडिपत्ता, हळद, हिंग,दीड चमचा तीळ,ति़खट टाकुन फोडणी करणे व ती तयार मिश्रणात घालणे.चिमूटभर सोडा टाकून हलवणे. हे मिश्रण आता हांडवा करण्यास तयार.
नॉनस्टिक कढई मधे १ चमचा तेल गरम करून त्यात थोडे तीळ घालावेत व त्यावर लगेच ३ डाव मिश्रण ओतुन कढईवर झाकण ठेवावे.कढई छोट्या गॅसवर एकदम सिम वर ठेवावी व ८ते १० मिनीटाने हांडव्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी भाजून घ्यावी. नंतर हळूवारपणे चमच्याने हांडवा उलटवून दुसरी बाजू परत ७/८ मिनीटे भाजून घ्यावी. थोडेसे गार झाल्यावर त्याचे स्क्वेअर तुकडे करणे.
ह्याच पद्धतीने अजून हांडवे करून घेणे.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हांडवा गरम गरम जास्त छान लागतो. त्यात गाजर, मटार ई. पण घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
सासर

घरच्या घरी सिझलर्स-फोटोसह

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

आपण कुठे हॉटेलमधे जेवत असलो आणि इतर कुणाची सिझलर्सची ऑर्डर आली,
कि आपले लक्ष तिथे जातेच. हा प्रकार घरी करायचा एक प्रयत्न.
(करणारा आणि खाणारा मी एकटाच असल्याने तो टिपीकल धुराचा फोटो नाही
काढता आला.)

१) कोबी, बटाटा, गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली, हिरवे वाटाणे, सिमला मिरची, चेरी टोमॅटो वगैरे आवडीच्या भाज्या.
२) आवडता पास्ता आणि तो शिजवण्यासाठी आवडता टोमॅटो बेसचा सॉस. (कृतीमधे एक आयडीया देतोय)
(नूडल्सही चालतील)
३) आवडत असल्यास समोसा, कटलेट सारखा एक प्रकार (तयार चालेल)
४) थोडेसे तेल, बटर, मीठ,
५) वरुन घेण्यासाठी वेगवेगळे सॉस (उदा. केचप, चिली सॉस, मस्टर्ड सॉस, बार्बेक्यू सॉस, मिंट सॉस वगैरे)
खरे तर प्रमाण असे नाही, कोबी आवश्यक बाकीच्या भाज्या हव्या तेवढ्या, समोसा, कटलेट वगैरे
माणशी एक, या प्रमाणात.
६) एका लिंबाचा रस व त्यात थोडे मीठ मिसळून.

बाजारात सिझलर्स साठी एक खास लोखंडी लंबगोल तवा व तो बसेल असा एक लाकडाचा साचा मिळतो.
तो असेल तर प्रश्नच नाही, पण मी वापरलात तसा एक लोखंडी जाड तवादेखील वापरता येतो.

क्रमवार पाककृती: 

१) समोसा, कटलेट वापरायचे असेल तर ते वेगळे करुन घ्यायचे.
२) बटाट्याच्या आवडत असतील तर चिप्स तळून घ्यायच्या, किंवा लंबगोल काप करायचे.
३) गाजर, बटाटा, फ्लॉवर यांचे बेताच्या आकाराचे तूकडे करुन उकळत्या पाण्यात २ मिनिटे वाफवून घ्या.

४) ब्रोकोलीचे तुरे मात्र अगदी अर्धा मिनिटच वाफवा, म्हणजे रंग चांगला राहतो.

५) पाकिटावरील सुचनेप्रमाणे पास्ता वा नूडल्स शिजवून घ्या.

६) मग टोमॅटो बेसचा पास्ता सॉस करुन त्यात पास्ता वा नुडल्स मिसळा.
हा पास्ता सॉस तयार मिळतो. घरी करायचा असेल तर थोड्या तेलात वा बटरमधे बारीक चिरलेला लसूण
व कांदा परता, मग त्यात टोमॅटोचे बारीक तूकडे मिसळा व शिजवा. आवडीप्रमाणे मीठ, मिरपूड,
हर्ब्ज मिसळा. आवडत असेल तर तो ब्लेंड करुन एकजीव करुन घ्या.

७) सिमला मिरचीचे मोठे तूकडे करुन, थेट विस्तवावर भाजून घ्या.

८) कोबीची पाने सुटी करुन तिचे हाताने तुकडे करा.

आता आपल्याला झटपट काही कृती करायच्या आहेत. त्यासाठी काही तयारी करावी लागेल.
तवा ज्यावर ठेवायचा आहे, तो आधार व त्याखाली एखादा टॉवेल ठेवा. सिझलर्सची चव
सॉसेस घालून वाढवायची असते, त्यामूळे ते सर्व टेबलावर तयार ठेवा. गरम तवा पकडायला
पक्कड (सांडशी) किंवा अवन ग्लोव्ज तयार ठेवा.
किचन आणि डायनींग टेबल यामधे कुठलाही अडथळा राहू देऊ नका, फोटो काढायचा असेल
तर कॅमेरा आणि फोटोग्राफर तयार ठेवा.

८) लोखंडी तव्याला तेलाचा पुसट हात लावून त्यावर आधी कोबीच्या पानाचे तूकडे गोलाकार
रचा, त्यावर भाज्या रचा.

९) तवा मध्यम आचेवर गरम करत ठेवा, पास्ता पण गरमच असू द्या.
१०) पास्त्याचे भांडे टेबलावर न्या, समोसे वगैरे पण तयार ठेवा.
११) तव्याच्या मधली जागा मोकळी ठेवा, तिथली कोबीची पाने करपू लागली, की
पटकन तवा टेवलवर न्या आणि मधोमध पास्ता ओता. यावेळी चरचर आवाज येऊन
धूर होईल. (पटकन फोटो काढा)

१२) मग भाज्यांवर लिंबाचा रस सभोवार ओता. परत आवाज येईल व धूर येईल.
१३) प्रत्येकाने आपल्या डिशमधे भाज्या घेऊन, त्यावर आवडीप्रमाणे सॉसेस घालून खा.

अधिक टिपा: 

(चला आता महिनाभर माझा पाककृती संन्यास, मधून मधून इथे डोकावेनच.)

माहितीचा स्रोत: 
रिकामपणाचे_उद्योग!!

Lasagna लसान्ये देसी स्टाईल - फोटोसह

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

Lasagna हा एक इतालियन पास्ताचा प्रकार आहे. हा प्रकार पास्तापैकी सर्वात जुना मानतात
कारण याचा शेप अगदी साधाच असतो.

मूळ प्रकारात खिमा, टोमॅटो आणि चीज वापरतात. हॉटेलमधे याचे शाकाहारी व्हर्जन क्वचितच मिळते.
मला एकदाच ते मिळाले होते, आणि ते भयानक मसालेदार होते.
याच्या तयार शीट्स मिळतात, त्यात उकळत्या पाण्यात बुडवून त्यामधे खिम्याचे थर देत त्या रचून
मग बेक करायच्या असतात.
हे माझे आपले साधे घरगुति व्हर्जन. (ज्या दिवशी भरपूर वेळ असेल किंवा शिळ्या चपात्या खपवायच्या असतील त्या दिवशी करायचा प्रकार.)

१) एक कप कणीक, तेल, मीठ, तांदळाचे पीठ
२) आवडत्या भाज्या (सिमला मिरच्या, गाजर, बटाटा - साधारण शिजून गर होतील अशा भाज्या )
३) टोमॅटो + थोडासा केचप

४) लोणी, दूध, मिरी पावडर, चिमूटभर जायफळ पूड (व्हाईट सॉससाठी, प्रमाण कृतीत आहे.)
५) आवडते चीज

क्रमवार पाककृती: 

१) नेहमीप्रमाणे चपातीसाठी कणीक भिजवून ठेवा.
२) आवडत्या भाज्या कूकरमधे उकडून घ्या.

३) चपातीसाठी भिजवलेल्या कणकेचे सुपारीएवढे गोळे करुन त्यांना लांबट आकार द्या.

४) ते गोळे थोडे चपटे करुन, त्यावर तेल आणि तांदळाचे पिठ लावून, एकावर एक चार गोळे
ठेवून दाबा आणि मग अलगद हाताने लंबगोल लाटा.

५) मग तव्यावर थोडे तेल सोडत ते भाजून घ्या. सर्व पदर सुटले पाहिजेत. (याऐवजी तयार चपात्या वापरु शकता)

६) साधारण १० सेमी बाय २० सेमी अशा आयताकृती आकारात चपात्या कापा, आणि त्याचे पदर वेगळे करुन ठेवा.

७) उकडलेल्या भाज्यांपैकी एकेक भाजी कुस्करुन पॅनमधे टाका, त्यात थोडे मीठ, व थोडा कुस्करलेला बटाटा टाकून मिश्रण आटवा, पण पूर्ण कोरडे करु नका. असे सर्व सारणाचे प्रकार, वेगवेगळे काढून घ्या.

८) पॅनमधे अर्धा टिस्पून बटर टाकून त्यात एक टेबलस्पून कणीक भाजून घ्या, त्यात एक कप कोमट दूध टाकून सतत ढवळत गुठळ्या मोडून घ्या, त्यात मिरपुड, मीठ व जायफळपूड टाका, पूर्ण शिजवायची गरज नाही.

९) एका बोलमधे काढून त्यात किसलेले चीज मिसळून घ्या.

१०) पॅनमधे बारिक चिरलेले टोमॅटो, थोडासा केचप, व थोडे तेल टाकून जरा आटवून घ्या. (यात हवे तर लसूण, पार्सले,ऑलिव्ह ऑईल वगैरे घालून मसालेदार करू शकता, आवडत असतील तर इतालियन हर्ब्ज घाला, किंवा ओवा टाका.)

११) पॅन स्वच्छ करुन त्याला पुसटसा बटरचा हात लावा, त्यावर कापलेल्या चपातीचा एक तुकडा ठेवा, त्यावर व्हाईट सॉस लावून सारणाचा एक प्रकार पसरून लावा, त्यावर थोडी मिरपूड टाका.

१२) त्यावरही थोडे व्हाईट सॉस पसरुन लावा आणि दुसरे सारण व व्हाईट सॉस पसरुन लावा.

१३) असे करत चळत रचा, प्रत्येकवेळी व्हाईट सॉस लावा म्हणजे थर चिकटून राहतील. (यासाठीच व्हाईट सॉस पूर्ण शिजवायचा नाही.)

१४) पाच मिनिटे ही चळत तशीच ठेवा म्हणजे सारणातील पाण्यात चपातीचे तूकडे भिजतील.

१५) वर उरलेला व्हाईट सॉस लावा आणि मंद आचेवर पॅनवर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवा.

१६) डिशमधे काढून वर टोमॅटो सॉस घालून खा.

अधिक टिपा: 

हा प्रकार लुसलुशीतच खायचा असतो, त्यामूळे सारणाचा पोत मऊसरच हवा. सारणासाठी अर्थातच बरेच पर्याय
आहेत. लाल भोपळा, शिजवलेले कडधान्य, कोहळा, दुधी वगैरे वापरु शकता, हाताशी असतील त्या सर्व भाज्या घ्या.
हा प्रकार पोटभरीचा तर आहेच, पण मसाले नसल्याने घश्याशी येत नाही.

ब्रेड बेसन टोस्ट

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन (डाळीचे पीठ) - अर्धा कप
ब्रेड स्लाईस - ५ ते ६ (आकारावर अवलंबून)
कोथिंबीर, कढीपत्ता पाने (अंदाजे)

लसूण पाकळ्या - २
मिरची ठेचा - चवीप्रमाणे, किंवा बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या
मीठ, तिखट, हळद चवीप्रमाणे
दही - १ डाव
तेल - मोहनासाठी १ चमचा व टोस्ट तव्यावर भाजण्यासाठी
पीठ भिजवण्यासाठी पाणी

besan bread toast1 copy (1).jpg

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण पाकळ्या व मिरची ठेचा / मिरच्या मिक्सरमधून बारीक होईस्तोवर फिरवून घ्याव्यात. एका रुंद तोंडाच्या पसरट भांड्यात बेसन घेऊन त्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हळद व १ डाव दही घालावे व नीट मिसळून घ्यावे. पाणी घालून भजीच्या पिठापेक्षा जरा किंचित जास्त सैलसर भिजवून घ्यावे व थोडा वेळ तसेच ठेवावे. (मी १५ मिनिटे ठेवले.) तेल कडकडीत तापवून या मिश्रणात एक चमचा तेलाचे मोहन घालावे व मिसळून घ्यावे.

तवा तापत ठेवून त्यावर तेल घालावे व नीट पसरवून घ्यावे. ब्रेडचे स्लाईस दोन्ही बाजूंनी पिठात बुडवून दोन्ही बाजूंना मिश्रण नीट लागल्याची खात्री करून ते तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर भाजावेत. भाजताना अधून मधून स्लाईस दाबाव्यात. त्या नीट भाजल्या जात आहेत ना हे पाहावे. एका वेळी रुंद तव्यावर दोन स्लाईसेस आरामात भाजता येतात. तयार टोस्टचे हव्या त्या आकारात तुकडे (त्रिकोणी, चौकोनी इ.) करून लोणी / चटणी / केचप सोबत गरमागरम खायला द्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून :-)
अधिक टिपा: 

हा पदार्थ धिरड्याच्या किंवा भजीच्या जवळपास आहे - फक्त तेलात भाजलेला आहे. नाश्त्याला पोटभरीचा होतो. फ्रेंच टोस्टचे हे देशी रूप म्हणता येईल!!

१. ह्यात इतर भाज्या (पालक, मेथी, कांदा पात, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, ढब्बू मिरची किंवा अन्य आवडीच्या भाज्या बारीक चिरून अथवा किसून) घालता येऊ शकतात. वरची कृती ही बेसिक कृती आहे. त्यात आपापल्या आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे फेरफार करू शकता.
२. बेसन थोडे कमी घेऊन इतर पिठेही ह्या पदार्थात वापरू शकता. (तांदूळ पीठ, मूग डाळ पीठ इ.) पण पदार्थाची मुख्यत्वे चव बेसनाची आहे.
३. लसणाचा स्वाद नको असेल तर ओवा / तीळ / ओव्याची चुरडलेली पाने इ. स्वादासाठी घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई

ऑरेंज शिरा

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराची सोललेली संत्री, १ वाटी रवा, १ वाटी दूध, १ वाटी पाणी, १ वाटी साखर,२ लवंग,
बेदाणे-काजू तूकड १ चमचा, कणभर मीठ, २ ते ३ चमचे तूप, १ चमचा केशर सीरप

क्रमवार पाककृती: 

तूप गरम करून त्यात लवंग, काजू , बेदाणे तळून काढून ठेवणे. त्याच तूपात बारीक गॅसवर रवा गुलाबी रंगावर भाजून घेणे.रवा भाजल्याचा सुगंध दरवळसपर्यंत भाजणे. नंतर त्यात संत्र्याचे तुकडे टाकुन मस्त हलवून घेणे.दुध, पाणी एकत्र उकळवून घेणे, त्यात केशर सिरप घालावे आणी हे पाणी गरम रव्यावर ओतुन दोन वाफा काढाव्यात. मग साखर व कणभर मीठ घालुन एक वाफ काढावी. साखर विरघळल्यावर लवंग, काजु, बेदाणे टाकुन व्यवस्थित हलवून घेणे. ऑरेंज शीरा तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
माहितीचा स्रोत: 
माझाच प्रयोग.

धोका (रुचिरामधला एक खमंग प्रकार) फोटोसह

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

धोका अश्या नावाचा एक प्रकार रुचिरामधे आहे, गल्फमधे मिळणाऱ्या फलाफलशी त्याचे
साम्य वाटले तरी तो जास्त खमंग आहे. ओगलेआज्जींच्या कृतीमधे मी काही बदल केलेत,
ते शेवटी लिहितोच.

१) एक वाटी चण्याची डाळ
२) दोन मोठे कांदे
३) १ कप चिरलेली कोथिंबीर
४) पाव कप ओले खोबरे
५) आवडीप्रमाणे लाल वा हिरव्या मिरच्या
६) अर्धा इंच आले
७) ३/४ लसूण पाकळ्या
८) एक टिस्पून (किंवा आवडीप्रमाणे) चिंचेचा कोळ
९) एक टिस्पून साखर
१०) दोन टिस्पून धणेजिरे पावडर
११) चवीप्रमाणे मीठ
१२) एक ते दोन टेबलस्पून तेल
१३) फ़ोडणीसाठी जिरे, हिंग, हळद
१४) एक टेबलस्पून कणीक

क्रमवार पाककृती: 

१) चण्याची डाळ कोरडीच मिक्सरमधून भरड वाटून घ्या व त्यात कणीक मिसळून घ्या.

२) कांदे, आले, कोथिंबीर, लसूण सगळे चिरून घ्या.
३) कांदे, आले, कोथिंबीर, लसूण व ओले खोबरे असे सगळे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
४) वरील वाटणापैकी अर्धे वाटण डाळीच्या भरड्यात घाला, व त्यात मीठ घालूण मिसळून घ्या.
५) थोडा वेळ थांबून हे मिश्रण मळून घ्या, लागलेच तर थोडे पाणी वापरा आणि चपातीच्या पिठापेक्षा
थोडे घट्ट भिजवा.
६) त्याचे लिंबाएवढे गोळे करुन, त्यांना पेढ्यासारखा आकार द्या. (जाडी एक सेमीपेक्षा थोडी कमी ठेवा.)

७) नॉन स्टीक पॅनवर अगदी थोडेसे तेल टाकून हे पेढे दोन्ही बाजूने मंद आचेवर शेका. शेकताना झाकण
ठेवा, म्हणजे आतपर्यंत शिजतील.

८) मग ते बाजूला काढून त्याच पॅनमधे हिंग जिरे टाकून फोडणी करा.
९) त्यावर उरलेले वाटण टाकून परतून घ्या.

१०) मग त्यात कोळ, मीठ.धणेजिरे पूड व साखर घाला, दोन कप पाणी टाका.
११) बाहेर काढलेल्या पेढ्यांना सुरीने दोन चिरा (फुल्ली) द्या, पण तूकडे करु नका.
१२) आता उकळत्या गेव्हीत ते पेढे सोडा आणि थोडा वेळ उकळू द्या.
१३) जरा मुरल्यावर खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणाचे ८/१० गोळे होतील.
अधिक टिपा: 

सजावटीसाठी मी कोथिंबीर आणि बेरीज वापरल्या आहेत. त्या अर्थातच हौस म्हणून. त्या चवीला
छान लागल्या, तरी कच्चा कांदा पण सोबत घेता येईल असे वाटते.
ओगलेआज्जींनी लिहिल्याप्रमाणे हा प्रकार खुपच चवदार लागतो. आणि घटकही नेहमी हाताशी
असणारेच आहेत.( त्यांनी गरम मसाला सूचवला आहे, मी धणेजिरेपूड वापरलीय.)
ओल्या खोबऱ्याच्या जागी मी कोकोनट क्रीम वापरलेय, कारण ते नेहमीच माझ्याकडे असते.
तसेच त्यांनी हे पेढे आधी उकळत्या पाण्यात शिजवून, मग तळून, मग त्याचे चार तूकडे
करुन ग्रेव्हीत शिजवायला सूचवले आहेत. मी मात्र वरीलप्रमाणे बदल केले आहेत.

माहितीचा स्रोत: 
रुचिरा