करी

कडधान्याच्या गोळ्यांची आमटी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गोळे:
१ वाटी भिजवलेली कडधान्ये, [याचे बाजारात पाकीट मिळते, नाहीच मिळाले तर आपल्या आवडीप्रमाणे सम प्रमाणात एकत्र करून भिजवावी]
१/२ वाटी तांदळाचे पीठ,
२ चमचे तेल,
१/२ इंच आले,
१ हिरवी मिरची,
चवीप्रमाणे मीठ.

आमटी:
३ मोठ्या पाकळ्या लसूण,
४ चमचे दाण्याचा कुट [जाडसर असावा],
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ चमचा लाल तिखट,
१ चमचा गोडा मसाला,
१/२ चमचा साखर,
२ पाने कडीपत्ता,
३-४ वाट्या पाणी,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग,
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

आमटी:
कढईत तेल घेऊन फोडणी करावी. अगदी पातळ चकत्या करून लसूण मंद आचेवर चांगला लाल होऊ द्यावा. आता फोडणीत कडीपत्ता,हळद,हिंग,लाल तिखट, गोडा मसाला घालावा. थोडेसे डावाने हलवून घ्यावे, म्हणजे तिखटा-मसाल्याचा 'रॉ' वास निघून जातो. ३-४ वाट्या पाणी घालावे. साखर,कोथिंबीर, दाण्याचा कुट घालावा. आमटीला मंद आचेवर उकळू द्यावे, गोळे करायला घ्यावे.
A1.jpg

गोळे:
४ ते ५ तसा भिजवलेली कडधान्ये, मिरच्या, मीठ, आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्यावे. वाटताना वरून पाणी घालू नये. एका भांड्यात वाटलेले मिश्रण, २ चमचे तेल आणि त्यात मावेल इतके तांदळाचे पीठ असे सगळे एकत्र करावे. साधारण थालापिठाच्या पीठ सारखा गोळा तयार होतो. याचे छोटे-छोटे गोल-गोल गोळे करून आमटीत सोडावे.
A2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

हे गोळे वाफेवर शिजून आपोआप आमटीत तरंगू लागतात. सगळे गोळे वर येईपर्यंत डावाने हलवू नये. एखादा गोळा फुटून आमटी घट्ट झालीच तर शेवटी वरून थोडे गरम पाणी घालावे.
गोळ्यांची गर्दी झाल्यास, वर आलेले गोळे हलकेच डावाने डिशमध्ये काढून घ्यावे आणि जेवणाच्यावेळी परत आमटीत मिक्स करावे. असे केल्याने खालच्या गोळ्यांना डोके वर काढणे सोप्पे जाते.
बेताचेच तिखट असेल तर पोळीबरोबर न खाता, नुसते खायला पण छान लागते. नुसते खाणार असाल तर, उकळलेल्या आमटीत थोडी काकडी किसून घातल्याने अजून खमंग लागते.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग

कोलंबीच सार

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप साफ केलेली कोलंबी
वाटण्याकरता:
१ १/२ कप टॉमेटोचे तुकडे
१/२ कप नारळ
२ लसणाच्या पाकळ्या (अमेरिकन साईझचा लसूण)
१/३ कप कापलेला कांदा
१ टेबस्पू धणे
४ लाल मिरच्या
१ टिस्पून काश्मिरी मिरची पावडर (रंगा करता)
फोडणीकरता:
१ १/२ टेबल्स्पून तेल, मोहरी, मेथी, हळद, हिंग, ४-५ कढिपत्त्याची पान
चविपुरत मीठ
२ कोकमं

क्रमवार पाककृती: 

वाटण्याकरता दिलेले सर्व जिन्नस थोडस पाणी घालून मिक्सरमधे गंध वाटून घ्या. तेल तापवून अनुक्रमे मेथी, मोहरी, हळद, हिंग फोडणीत घाला. वाटलेला मसाला फोडणीत टाकून १ मिनीट परतून घ्या. १ कप पाणी, चवीपुरत मीठ, कोकम, आणि कढीपत्ता टाकून साराला उकळी येउ द्यात. उकळत्या सारात कोलंबी सोडा. १० मिनिटानी गॅस बंद करा-सार तयार!

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना पुरत
अधिक टिपा: 

हे सार खूप पातळ नसत. तेव्हा पाणी बेतान घाला. मस्त लाल रंगाच सार गरम गरम भाताबरोबर छान लागत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण

दोडक्याची रस्सा भाजी

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम दोडकी, १ चमचा तिखट, १ चमचा गोडा/काळा मसाला, मीठ, १ टे स्पू तेल, २-३ चहाचे कप गरम पाणी, कोथिंबीर

वाटणासाठी: १ लहान कांदा, २ टे स्पू सुकं खोबरं, १ टे स्पू भाजलेले तीळ, ५-६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं

फोडणीसाठी: हळद, हिंग, मोहरी

क्रमवार पाककृती: 

दोडक्याची नाकं कापून, शिरा काढून बोटभर लांबीचे तुकडे करावेत. एका तुकड्याचे प्रत्येकी चार तुकडे करावेत. थोड्याशा तेलावर दोडकी जराशी वाफवून घ्यावीत. एकीकडे वाटणासाठी दिलेलं साहित्य मिक्सरमध्ये अथवा पाट्यावर वाटून घ्यावं. तेलात हिंग-हळद-मोहरीची फोडणी करुन त्यात वाटण घालावे. तेल सुटायला लागले की त्यात वाफवलेली दोडकी, तिखट, मीठ आणि मसाला घालून नीट मिसळून घ्यावं. गरम पाणी घालून १-२ उकळ्या काढाव्यात. वरुन कोथिंबीर घालावी.

भात, पोळी, ज्वारीची भाकरी कशाही बरोबर मस्त लागते भाजी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ मोठे
अधिक टिपा: 

_दोडकी फार शिजवु नयेत, बुळबुळीत होतात.
_वाटण वांग्याच्या भाजीसारखेच आहे साधारण. फक्त ह्यात वहाता रस्सा होइल इतपत पाणी घालायचे आहे, अगदी दाट ग्रेव्ही नको.
_ह्याच प्रकारे भारतात मिळणारी छोटी ढब्बु मिरची पण मस्त लागते. मिरच्यांची नाकं कापून अख्ख्या घातल्या तरी चालते.

माहितीचा स्रोत: 
आई

सोलकढी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ ओला नारळ खरवडून.
१५-२० कोकमे (आमसुल)
४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल)
१ चमचा जिर
तुप
कढीपत्ता
साखर
मिठ
मिरची पुड पाव ते अर्धा चमचा

क्रमवार पाककृती: 

कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा.

खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते.

जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या.

कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला.

आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट.
(कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे)

वाढणी/प्रमाण: 
कमित कमी प्रत्येकी १ ग्लास.
अधिक टिपा: 

सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते.
ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये.
हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान.

मोती-चावल

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

राजमा - दीड कप,
तेल - ३ टेबलस्पून,
तमालपत्रे - २,
कांदे - २ मध्यम,
आले - एक इंचाचा तुकडा,
लसूण - ६-८ पाकळ्या,
लाल तिखट - २ टीस्पून,
धणेपूड - १ टेबलस्पून,
हळद - १/२ टीस्पून,
जिरेपूड - १ टीस्पून,
टोमॅटो - ३ मध्यम,
गरम मसाला पूड - १ टीस्पून,
चिरलेली कोथिंबीर - १ टेबलस्पून,
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

माणूस हा स्वभावत: सौंदर्योपासक! ह्याच सौंदर्योपासक वृत्तीमुळे अलंकारांचा जन्म झाला. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही अलंकार निर्माण केले. त्यातील एक अर्थालंकार म्हणजे "उपमा"! दोन भिन्न वस्तूंमध्ये आकार किंवा गुणधर्मांचं साधर्म्य दाखवायचं असेल तिथे "उपमा’ जन्म घेते. मग कोणी पिठल्याला फोडणीचं श्रीखंड म्हणतो, तर कोणी शेंगदाण्याला गरीबांचा बदाम म्हणतो. मिथुनला नाही का गरीबांचा अमिताभ म्हणत! ..उपमा माहात्म्य! स्मित

भरतवर्षातील उत्तरप्रदेश हा असाच उपमासौंदर्यासाठी मशहूर आहे. तिथली आबोहवाच निराली! ख़ानदानी अदब! साधं मीठ मागायचं असेल तरी अदबीनं झुकून म्हणतील," ज़नाब, जरासा रामरस दीजिये ना!" गरीबातला गरीब असेल तरी मेहमान-नवाझी के क्या कहने! मेहमानाला साधा दाल-चावल खिलवतील, पण जणुकाही राजहंसाच्या रूपाने दारी आलेल्या मेहमानाच्या मुखात मोती-चारा भरवतोय असा अंदाज़! क्या बात है!!

अशीच एक उपमालंकृत उत्तर-भारतीय पाककृती... मोती-चावल! ऊर्फ राजमा-रसमिसा, म्हणजेच‌...राजमा-भात!

मोती-चावल...! बिल्कुल आम रेसिपीचं काय पण शिंचं खंग्री बारसं केलय! ताटात नंतर काही का पडेना, पण आधी डोळ्यासमोर मोती तरळतात की नाही? स्मित दिल खूष तो पेट खूष, पेट खूष तो भेजा खूष, भेजा खूष तो दुनिया खूष! सबही भूमी गोपालकी!!

मुलाहिज़ा फर्माईये....मोती-चावल!!!

-------------------------------------------------------------------
१. पाच कप पाण्यात राजमा रात्रभर भिजत घालावा.
२. राजमा उकळीच्या पाण्यात किंवा प्रेशरकुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावा. आले धुऊन सोलून बारीक चिरावे. लसूण बारीक चिरावा. टोमॅटो धुऊन चिरावेत. कांदे सोलून चिरावेत.
३. पातेल्यात तेल तापवून त्यात तमालपत्रे व चिरलेला कांदा टाकावा. कांदा सोनेरी होईस्तोवर परतावा. चिरलेले आले-लसूण टाकून मिनिटभर परतावे.
४. लाल तिखट, धणेपूड, हळद, जिरेपूड टाकून ढवळावे. चिरलेले टोमॅटो टाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावे.
५. शिजवलेला राजमा व त्याचे उरलेले पाणी आणि मीठ टाकून पंधरा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. गरम मसालापूड टाकून चिरलेली कोथिंबीर वरून घालावी. छान मोकळ्या भाताबरोबर गरम वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

मी धणेपूड १ टीस्पून वापरली.

अश्या प्रकारच्या धान्य/बीन्स वगैरे उकळून शिजवण्याच्या भाज्यांमध्ये मीठ कोणत्या पायरीला घालायचे असते? प्रे.कुकरमध्ये शिजवतानाच की शेवटच्या पायरीला (वरील पायरी नं. ५) ? त्याने काय फरक पडतो? जाणकारांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.

जरा तरी मोतीसदृश दिसावं फिदीफिदी म्हणून मी घरी होता तोच किंचित पांढुरका राजमा वापरला. तुम्ही कोणी प्रयोग केला तर नेहमीचा टपोरा काळा राजमा (काला मोती? स्मित) वापरा. त्याची चव अजून छान असते म्हणे!

उत्तर-भारतात बहुतेक घरांमध्ये मोती-चावल ही रविवार दुपारच्या जेवणासाठी पसन्दीदा फर्माईश असते.

मूळ रेसिपीपेक्षा उपोद्घात मोठा झालाय, त्याबद्दल क्षमस्व!

सर्वांचे आभार!

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर यांच्या भारतीय पाककृतींचा खजाना पुस्तकातून साभार!

दुधी कोफ्ता करी

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोफ्त्यासाठी :- दुधी भोपळा , बेसन २ चमचे, तांदूळाची पिठी १ चमचा, तीळ्, जीरे, ओवा, हिंग, मीठ, तिखट, कोथींबिर.
करीसाठी :- १ मोठा कांदा,१ मोठा टोमॅटो, थोडे सुके खोबरे, कोल्हापुरी तिखट (नसेल तर लाल तिखट + गरम मसाला + आलंलसूण पेस्ट )

क्रमवार पाककृती: 

प्रथम दुधी साल काढून किसून घ्यावा.शक्यतो बियांचा भाग घेउ नये.२ वाटी किसात बेसन २ चमचे, तांदूळाची पिठी १ चमचा, तीळ्, जीरे, ओवा, थोडे तिखट,मीठ, कोथींबिर चिरुन घालवी.बेसन फक्त binding पुरतेच घालवे.सर्व चांगले एकत्र करावे ,पाणी अजिबात वापरु नये. हे मिश्रण भज्याच्या पिठापेक्शा थोडे घट्ट होते.याचे चमच्याने छोटे गोल कोफ्ते तळून घ्यावेत.

करिसाठी :- १ मोठा कांदा,१ मोठा टोमॅटो, थोडे सुके खोबरे थोडे पाणी घालून कुकरमध्ये वाफवुन घ्यावे.त्याची पेस्ट करावी.
पातेल्यात फोडणीसाठी तेल तापवून त्यात वरील पेस्ट घालावी.चांगली परतून घ्यावी.तेल सुटू लागलेकी
त्यात कोल्हापुरी तिखट (नसेल तर लाल तिखट + गरम मसाला + आलंलसूण पेस्ट ) घालावे.पाणी घालून एक उकळी आणावी.चवीपुरते मीठ घालून करीमध्ये कोफ्ते सोडावेत व आणखी एक उकळी आणावी.
गरमागरम कोफ्ता करी पोळी,भाताबरोबर सर्व्ह करावी.

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेल.
अधिक टिपा: 

कोफ्ते थोडे जास्तच करवेत.(करीत जाण्याआधी त्यातील निम्मे पोटात जातात.) स्मित
एरवी दुधीच्या भाजीकडे तिरका डोळा करुनही पाहत नाहित असे लोकही कोफ्ता करी फस्त करतात.(स्वानुभव.) स्मित
तेव्हा करुन बघा आणी अभिप्राय कळवा.

माहितीचा स्रोत: 
पाकसिध्दी व माझे प्रयोग.

तोफू मसाला

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तोफू (माझ्याकडे ४००ग्रॅमचं पॅकेट होतं)
१ मोठा कांदा
२ टोमॅटो (प्युरी करुन)
१ मोठा चमचा आले लसुन पेस्ट
१टिस्पून धना पावडर
१टिस्पून जीरा पावडर
१ चमचा तिखट(आवडीनुसार कमी जास्त करु शकता,मी घरचा काळा मसाला वापरते ति़खटाच्या ऐवजी)
१टिस्पून कसुरी मेथी
१तमालपत्र,२लवंगा,१ वेलची,दालचिनी अर्धा बोटभर,२-३ मिरी दाणे,
८-१० काजु व १ चमचा खसखस (२ तास पाण्यात भिजवून नंतर पेस्ट करुन घेणे)
चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम तोफूचे छोटे तुकडे करुन थोड्या तेलावर परतुन घेणे.
पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात खडा मसाला टाकावा(१तमालपत्र,२लवंगा,१ वेलची,दालचिनी अर्धा बोटभर,२-३ मिरी दाणे).नंतर त्यात कांदा गुलाबी होउस्तोवर परतावा.त्यात मीठ व नंतर आले लसुनची पेस्ट टाकावी.चांगलं परतुन मग गार करुन मिक्सरमधुन (अगदी)बारिक वाटुन घेणे.
मिश्रण पुन्हा गरम पॅनमध्ये टाकुन परतुन त्यात टोमॅटो प्युरी टाकणे. नंतर त्यात धने जिरे पावडर,तिखट टाकुन परतणे,थोडं तेल सुटायला लागल्यावर त्यात काजु व खसखसची पेस्ट टाकावी व परतुन घेणे.(काजुची पेस्ट टाकल्यावर थोडा वेळ परतणे गरजेचं आहे)
नंतर त्यात तोफूचे तुकडे टाकून व कसूरी मेथी हाताने कुस्करुन टाकावी.झाकण लाऊन एक वाफ येउन द्यावी.
तोफू मसाला तय्यार.स्मित चपाती,फुलके,किंवा पराठ्याबरोबर कींवा जीरा राईसबरोबर छान लागतील.
मलातरी पनीर व तोफूमध्ये चवीत फरक जाणवला नाहि.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी अगदी पोटभर होते
अधिक टिपा: 

काजु वगळले तरी चालावेत.
सर्वात शेवटी क्रिम किंवा साय टाकली तर अजुन छान चव येईल.

माहितीचा स्रोत: 
स्वयंपाकघरातले प्रयोग.

व्हेजिटेरिअन चिली

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ सिमला मिरची मोठे तुकडे चिरून
१ मोठा कांदा जाड चिरून
६ मोठे टोमॅटो चिरून / ३ कॅन diced टोमॅटोचे कॅन
३ वाट्या राजमा रात्रभर भिजवून वाफवून / २ कॅन Dark Red Beans
१ छोटा कॅन Bush चिली स्टार्टर बीन / १ पाकिट चिली McCormick मसाला
४ लवंगा
४ तमालपत्रे
२ पॅटी Boca burger / 2 slabs Tofu
दालचिनी तुकडा चवीपुरता
वरून घालायला
किसलेले चीज
सावर क्रीम/लोणी

क्रमवार पाककृती: 

कॅन राजमा वापरणार असल्यास चिली आयत्यावेळेसही करता येते. एका मोठ्या भांड्यात थोडे तेल घालून जरासे तापले की लवंगा, तमालपत्र आणि दालचिनी परतून घ्यावे. कांदा फोडी टाकून परतून मग सिमला मिरचीचे तुकडे टाकावे व २-३ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफवावे.
चिरलेले टोमेटो घालून आच वाढवावी. जरा खदखदायला लागल्यावर बोका बर्गर वा टोफू घालावे व झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. चिली स्टार्टर व राजमाचे दाणे घालून आच कमी करून १०-१५ मिनिटे शिजवावे.
खायला घेताना किसलेले चीज व सावर क्रीम वरून आवडीप्रमाणे पेरावे. चिलीबरोबर टॉर्टिया चिप्स खातात, किंवा नुसते सूपसारखेही खायची पद्धत आहे.

वाढणी/प्रमाण: 
६ लोकांसाठी
अधिक टिपा: 

चिली स्टार्टर मधे Mild/Medium/Hot मसाले मिळतात. आपापल्या कुवतीप्रमाणे तिखट वापरावे. माझी मुले बर्‍यापैकी तिखट खात असल्याने मी Medilum वापरते. मुले डब्यातही चिली न्यायला तयार असतात (थंड झाली तरी). मी नेहमीच वरील प्रमाणात बनवून उरलेली फ्रीज करते. त्याने ती जास्त मुरते. जितकी जास्त मुरते, तितकी अधिक चांगली लागते. Superbowl पार्टीच्या वेळेस ही हमखास लागतेच.
मांसाहारी करायची असल्यास बोका बर्गर वा टोफूच्या ऐवजी बीफ वा तत्सम काही घालतात.

माहितीचा स्रोत: 
मी - ट्रायल अँड एरर

भरली कार्ली

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सात आठ मध्यम आकाराची कोवळी कार्ली
२-३ टेस्पून घट्ट दही
एक मध्यम बटाटा उकडून
धणे, जिरं , बडीशेप १ टे स्पून प्रत्येकी
थोडीशी मेथी
आमचूर, हळद, तिखट, मीठ, तेल

क्रमवार पाककृती: 

कार्ली धुऊन, थोडी साल खरवडून , मधून चिर देऊन आतून साफ करून घ्यावीत.
आतून अन बाहेरून थोडे मीठ व हळद चोळून लावून दहा मिनिटे ठेवा. मग अर्धा कप पाणी घालून दोन दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करून घ्यावे. कार्ली मऊ झाली पाहिजेत. साधारण ४ ते ५ वेळा मायक्रोवेव्ह करावे लागेल. मग पाणी ओतून देउन , स्वच्छ धुऊन, पिळून घ्यावीत.

धणे , जिरं, बडिशेप, मेथी कोरडी जराशी भाजून भरड पूड करावी.
बटाटा, दही, मीठ, आमचूर, तिखट अन वरची पूड एकत्र कालवून कार्ल्यात भरावं.
पसरट जाड बुडाच्या किंवा नॉन स्टिक पातेल्यात तेल घालून कार्ली सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत.
गरम गरम नुस्तीच खायला मस्त लागतात

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

कार्ली फार जाड असू नयेत. गरज वाटल्यास दोर्‍याने बान्धावीत परतायच्या आधी म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही. मंद आचेवर परतावीत.

माहितीचा स्रोत: 
बनारस रेसिपीज चं पुस्तक अन माझे प्रयोग

पनीर माखनी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.