शाकाहारी

दही-मिरची (झटपट तोंडीलावणं)

Submitted by योकु on 20 June, 2017 - 12:44
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी थंड्गार आणि जरासं आंबट, साधं दही
७/८ हिरव्या मिरच्या (तिखट वाली व्हेरायटी घ्यावी)
मीठ
साखर
चमचाभर तेल
अगदी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

एका लहान कढल्यात चमचाभर तेल आणि बारीक चिरलेली मिरची असं घालून अगदी मंद आचेवर तापत ठेवावं. मिरच्या मस्त कुरकुरीत व्हायला हव्या.
तोवर दही चमच्यानीच थोडं फेटून घ्यावं
यात चवीनुसार मीठ, साखर घालून तयार ठेवावं
आता कुरकुरीत केलेल्या मिरच्या यात घालाव्या आणि थोडी कोथिंबीर घालावी
फार घट्ट असेल तर अगदी थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करावी. पळीवाढी टाईप्स.
जरा आंबट, गोड्सर, खारट आणि तिखट अशी दही मिरची तयार आहे. पोळी-भाजी सोबत तोंडीलावणं म्हणून मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसं.
अधिक टिपा: 

दही गार असेल तर मस्त लागतं
मिरच्या जरी जास्त वाटल्या तरी तिखट होत नाहीत. सॉर्ट ऑफ तिखटपणा जातो कुरकुरीत तळल्यामुळे.

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
बायडी

खमंग खरपुस पापड पराठा !

Submitted by गिरिश देशमुख on 18 June, 2017 - 09:49
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भिजवलेली कणिक, भाजलेले पापड (कोणतेही, शक्यतो मीरे युक्त), तेल, तिखट, ओवा, जिरेपूड, धणेपूड, मीठ

क्रमवार पाककृती: 

कणकेचा मध्यम आकाराचा उंडा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घ्या .
पोळीवर तेल लावून घ्या, त्यावर थोडे ( चवी आणि आवडीनुसार) तिखट, ओवा, जिरेपूड, धणेपूड, मीठ पसरवून घ्या,
आता या पोळीचे सुरीने चौकोनी काप पाडा आणि त्यावर पापडाचा चुरा पसरवून घ्या !
पोळीचे तुकडे एकावर एक रचून घ्या, चळत रचताना शेवटचे 2- 3 तुकडे पालथे घाला.
चळत हाताने थोडी दाबून पराठा लाटण्यासाठी उंडा बनवून हलक्या हाताने जरा जाड पराठा लाटून घ्या.
पराठा फ्राय पॅन/ तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस फ्राय करून घ्या (पुरी सारखे तळले तरी छान).
पापुद्रे दार, कुरकुरीत, खरपूस पराठा तयार !

तयार पराठ्याचे तुकडे करून, टोमॅटो सॉस / दही / लोणचे इ. बरोबर सर्व्ह करा !

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

तोंडल्यांची परतून भाजी

Submitted by योकु on 25 May, 2017 - 04:50
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- अर्धा किलो फार जून नाही आणि फार कोवळीही नाही अशी तोंडली
- दीड टेबलस्पून धणा-जीरा पावडर
- अर्धा टीस्पून आमचूर पावडर
- पाव टीस्पून हळद
- पाऊण टीस्पून लाल तिखट
- मोठ्या दोन चिमटीभरून कसूरी मेथी
- २-३ टेबलस्पून तेल
- चवीपुरतं मीठ
- चिमूटभर मोहोरी आणि चिमूटभर जिरं, हिंग
- आवडत असेल तर चव म्हणून चिमूटभर साखर

क्रमवार पाककृती: 

- तोंडली स्वच्छ धूवून, शेंडा बुडखा काढून; एकाच्या ४ लांब फोडी किंवा चकत्या कराव्या
- तेल तापवून त्यात मोहोरी, जिरं आणि हिंग घालून खमंग फोडणी करावी
- यात हळद आणि बाकी सगळे मसाले (कसूरी मेथी आणि मीठ सोडून) घालून मसाले थोडे तेलात परतले की तोंडली घालावी
- झाकण देऊन एक वाफ आणावी
- भाजीमध्ये आता मीठ आणि कसूरी मेथी घालावी आणि झाकण न ठेवता भाजी छान खरपूस होईपर्यंत परतून शिजवावी
- तेल, मसाल्यामध्ये मस्त फ्राय झालेली चटपटीत तोंडली तयार आहे
- गरम गरम भाजी आणि फुलके किंवा साधं वरण भात फार टेस्टी लागतं

वाढणी/प्रमाण: 
थोडी मसालेदार आहे ही भाजी त्यामुळे जरा प्रमाणातच
अधिक टिपा: 

- या भाजीला काही जास्तीचं व्यंजन न घातल्यानी ही शिजून कमी होते
- मसाले तेलात घातल्यावर कोरडे दिसायला नको. पाणी अजिबात वापरायचं नाहीये
- आमचूर + चाट मसाला असं किंवा फक्त चाट मसाला घालूनही ही भाजी चवदार होते. चाट मसाला वापरणार असलात तर त्या प्रमाणात तिखट आणि मीठ कमी करावं
- बाकी कुठलेही लाड करायचे नाहीत कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, ओलं/सुकं खोबरं काहीही नाही. गरम मसालाही नाही.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
बायडी

ऱ्हुबार्बचे आंबटगोडतिखट तोंडीलावणे आणि सरबत

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 May, 2017 - 17:00
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ऱ्हुबार्बची देठं*
साखर
आल्याचा रस
मीठ
लाल तिखट
जिऱ्याची पूड

क्रमवार पाककृती: 

ऱ्हुबार्बची देठं धुवून, पुसून, चिरून घ्या. साधारण अर्ध्या इंचाच्या फोडी चालतील. फार बारीक चिरायची आवश्यकता नाही.
सहसा ऱ्हुबार्बच्या चार कप फोडींना एक कप साखर आणि अर्धा कप पाणी किंवा रेड वाइन व्हिनिगर लागतं. मी पाणीच घातलं यावेळी.
तसंच चार कप फोडींना एक टीस्पून आल्याचा रस घाला.
हे सगळे जिन्नस मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात एकत्र करून मध्यम आचेवर शिजवा. अधून मधून परतत रहा.
ऱ्हुबार्ब शिजायला फार वेळ लागत नाही. पाचेक मिनिटांत फोडी मऊ व्हायला लागतील. त्या मॅशरने मॅश करत जा.
पाणी आळून मिश्रण छान मिळून आलं की गॅस बंद करा.
आता त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि जिऱ्याची पूड घाला.
पूर्ण गार झालं की बाटलीत भरा.
चवसुद्धा बघण्याआधी फोटो काढून फेसबुकवर टाका.
'फीलिंग ऱ्हुबार्बी' किंवा तत्सम क्याप्शन द्या.
मग चव बघून तिखटमीठ ॲडजस्ट करा.

rhubarb stems.JPGcut rhubarb.JPGchutney.JPG

आणि हे र्‍हुबार्बेड :
rhubarbade.jpg

चार कप र्‍हुबार्बच्या फोडींना प्रत्येकी एक कप साखर आणि पाणी घालून शिजवा आणि मग मिश्रण बारीक गाळणीने गाळून घ्या. आयत्या वेळी पाणी किंवा सोडा (आणि/किंवा वोडका किंवा टकीला) घालून प्या.
गाळून उरलेले फायबर्स दह्यात, आइस्क्रीमवर, पॅनकेक्सवर घालून खायला सुंदर लागतात आणि दिसतात - वाया जात नाहीत.

वाढणी/प्रमाण: 
आठ वाट्या फोडींची साधारण १२औंसाची बाटली भरून चटणी झाली.
अधिक टिपा: 

*ऱ्हुबार्बची पानं विषारी असतात, ती काढून टाकावीत!
मी शॉपराइटमधून आधीच स्वच्छ केलेले देठच आणले होते.
हे देठ लालभडक सेलरी स्टिक्स असाव्यात तसे दिसतात आणि तसंच फायब्रस टेक्स्चर असतं.
आल्याच्या रसाऐवजी आल्याचा कीस किंवा बारीक चिरलेलं आलं चालेल.
नेटवर बऱ्याच रेसिपीज आहेत. त्यात लवंग, वेलची, दालचिनी असे स्वाद वापरलेले दिसतील. तसंच पातीचे किंवा साधे कांदे, बेदाणे असंही घालतात. लेमन झेस्टही.
मी प्रथमच केली म्हणून अगदी बेसिक कृती करून पाहिली, आता हळूहळू बाकी व्हेरिएशन्सही ट्राय करेन.
चटणी पूर्ण मॅश (गरगट!) न करता साल्सासारख्या मऊसर फोडीही ठेवू शकता.
सगळ्या घटकपदार्थांची प्रमाणंदेखील आवडी/चवीनुसार ॲडजस्ट करा.
ही रेसिपी वाचतांना किंवा खाताना क्रॅनबेरी सॉसची आठवण झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
इन्टरनेट आणि माझे प्रयोग

मेथी मसाला (भाजी)

Submitted by योकु on 10 April, 2017 - 13:38
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दोन जुड्या मेथी
- दोन मध्यम कांदे
- दोन मध्यम आकाराचे, पिकलेले पण फर्म टोमॅटो
- ७/८ पाकळ्या लसूण
- तिखट
- हळद
- धणा-जिरा पावडर (दोन्ही मिळून अर्धा ते पाऊण चमचा)
- मीठ
- तेल
- थोडं मोहोरी + जिरं
- आवडत असतील तर दोन सुक्या लाल मिरच्या
- चिमूटभर हिंग

क्रमवार पाककृती: 

- मेथी नीट निवडून, जाड देठं काढून टाकावीत. नंतर धूवून सुकवून बारीक चिरावी. (निवडणे, धुणे आणि सुकवण्याचा वेळ कृतीत धरलेला नाही).
- कांदे चौकोनी मध्यम चिरावे
- टोमॅटो धूवून बारीक चिरून घ्यावे
- लसणी सोलून घ्यावी
- लसणीच्या पाकळ्या + हवं तितकं तिखट + चिमटीभर जिरं + चिमटीभर मीठ हे बारीक वाटून घ्यावं
- जाड बुडाच्या भांड्यात तेल तापत ठेवावं
- तेल तापलं की त्यात मोहोरी + जिरे, हिंग, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून खमंग फोडणी करावी. यात कांदा घालावा.
- कांदा गुलबट सोनेरी रंगावर आला की टोमॅटो घालावा
- या मसाल्याला तेल सुटलं की कोरडे मसाले घालावे - लसणीचं तिखट, हळद, धणा-जिरा पावडर
- हे सगळं नीट परतून घ्याव म्हणजे हळद, तिखटाचा कच्चेपणा जाईल
- यात आता मेथी घालावी आणि परतावं
- मीठ घालावं, चव घातलेली आवडत असेल तर चिमटीभर साखर घालता येते
- मीठ घातल्यावर मेथीला पाणी सुटतं त्यात ती शिजते. झाकण घालून एक वाफ काढावी. पाणी असेल तर आटवून भाजी सुकी करावी.
- गरम भाजी ताजे फुलके, वरण-भात, भाकरी यांसोबत मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसं
अधिक टिपा: 

ही भाजी शिजून कमी होते
अगदी हिरवी अशी शिजल्यावर राहात नाही पण चवीला मस्त लागते
सेम अश्याच पद्धतीनी चवळीच्या पानांची, तांदूळजाची भाजी होते
लसणीचं तिखट उरलंच तर वरण, उसळींमध्ये वापरता येते
लसणीच्या तिखटानी एक वेगळी मस्त चव येते त्यामुळे ते करावंच
मसाला भाजीच्या प्रमाणात असेल तर लय भारी भाजी होते Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
बायडी

कॅरमलाइझ्ड मखाणे

Submitted by अल्पना on 9 April, 2017 - 07:00
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मखाणे - ३-४ ग्लास
तुप - १ चमचा

कॅरमल करण्यासाठी :
बटर एक- दिड चमचा
साखर ५ चमचे
पाव चमचा दालचीनी पुड (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

१. जड बुडाच्या भांड्यात / कढईमध्ये तुप गरम करा.
२. तुप गरम झाल्यावर त्यात मखाणे घाला. मी अंदाजे ३-४ ग्लास मखाणे घेतले होते.
३. मंद आचेवर तुपावर मखाणे भाजा.
४. ३-४ मिनीटात मखाणे छान क्रिस्पी होतिल. त्यांचा रंगही थोडा बदलेल.
५. मखाणे भाजल्यावर एका परातीत/ ताटात काढून घ्या.
६. कढईमध्ये कॅरमल करण्यासाठी बटर घाला.
७. बटर विरघळल्यावर त्यात साखर घालून मंद आचेवर हलवत रहा.
८. ५-६ मिनीटात सगळी साखर विरघळून कॅरमलचा कॉफी सारखा रंग येतो. या स्टेजला हवे असल्यास यात दालचीनीची पुड घाला.
९. कॅरमल झाल्याबरोबर गॅस बंद करून त्यात मखाणे मिक्स करा.
१०. सगळ्या मखाण्यांना कॅरमल व्यवस्थित लागल्यावर आणि कॅरमल थोडे थंड झाल्यावर मखाणे बटर पेपर लावलेल्या ताटात काढून घ्या. कढईतच राहिले तर कॅरमलसकट बुडाला चिकटतिल आणि काढायला थोडा त्रास होईल.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके. आमच्या घरी २-३ जणांनी एवढे मखाणे मॅच बघत बघत अर्ध्या तासात फस्त केले होते.
अधिक टिपा: 

दालचिनी पुड घालायच्या ऐवजी आवडीचा इसेन्स पण घालता येईल.

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
मैत्रिण

हिरवी मिरची - शेंगदाणा चटणी

Submitted by नलिनी on 4 April, 2017 - 04:38
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेले व सोललेले शेंगदाणे
लसूण : आवडीप्रमाणे हवा तेवढा
हिरवी मिरची : १०-१२ ( आवडीनुसार कमी अधिक)
मिठ : चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

मिठ, मिरची, लसूण मिक्सरला वाटून घ्यायचे.
ह्यात दाणे घालुन दाणे अर्धेच मोडतील ह्या बेताने मिक्सर चालवायचे.
कढईत २-३ चमचे तेलावर हि चटणी खमंग परतून घ्यायची.

ShengadanaChutney

वाढणी/प्रमाण: 
हे खाणार्‍याच्या तिखट खाण्याच्या क्षमतेवर ठरेल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
आजी, आई, काकू

ओल्या हरभऱ्याची भाजी

Submitted by विद्या भुतकर on 3 April, 2017 - 22:59
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओले हरभऱ्याचे दाणे साधारण २ वाट्या ,

जिरे, मोहरी, तेल, हळद, हिंग

लसूण पाकळ्या ३-४,

एक कांदा,

कांदा-लसूण मसाला २-३ चमचे( मसाला नसेल तर लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला)

शेंगदाण्याचा भरडलेला कूट(एकदम बारीक पेस्ट नको)

मीठ, साखर चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

हरभऱ्याचे दाणे एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घेतले. त्यात थोडा जास्त वेळ गेलामाझ्या इंडक्शन स्टोव्हमुळे. सहसा १०-१५ मिनिट भाजावे. दाण्यांवर काळपट डाग दिसू लागतात. माझे फ्रोजन दाणे मुळातच काळे होते त्यामुळे ते अजून काळपट दिसू लागले. दोन्ही दाण्यांचे फोटो दिले आहेत खाली.

भाजलेले हरभरे थोडे थंड करून खलबत्त्यात ठेचून घ्यावेत. माझ्याकडे खलबत्ता वापरात नसल्याने मी मिक्सरमध्येच २-३ पल्समध्ये फिरवून बंद केले.

गसवर पॅनमध्ये तेल तापल्यावर जिरे, मोहरी हिंग घातले. त्यात लसूण खरपूस भाजून घ्यायचा.

मग कांदा परतून तो भाजल्यावर त्यात हळद, धनेजिरे पूड, तिखट किंवा कांदा-लसूण मसाला घालायचा.

तिखट परतल्यावर लगेच त्यात भरडलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. आमच्याकडे कूट जरा सढळ हातानेच पडतो.

कूट परतताना तो जळू नये याची काळजी घ्यावी.

त्यात ४ काप पाणी घालून उकळावे. पाणी उकळत असतानाच त्यात मीठ साखर घालून हलवावे.

भाजीतले पाणी उकळले की शेवटी भरडलेले हरभऱ्याचे दाणे घालावे.

भाजी झाकण बंद करून थोडा वेळ आणि पाणी जास्त झाले असल्यास उघडून शिजू द्यावी.

मी भाकरी, पीठ-कूट घातलेली मेथीची भाजी आणि भाकरी केली होती. एकदम मस्त झाली. Happy तुम्हीही करून बघा. क्रमवार फोटो काढले आहेत. तशी भाजी बनवायला सोपी तरीही चवीष्ट आहे.

IMG_0095(1).JPGIMG_0094(1).JPG

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

दाणे हिरवे असल्यावर शिवाय आधी भाजून घेतल्याने भाजी लवकर शिजते. फोडणी ते भाजी साधारण २०-२५ मिनिटात होते.
भाजीत थोडे पाणी राहू द्यावे, एकदम पातळही नको. रसरशीत भाजी चांगली लागते.
थोडे तेल जास्त असेल तर अजून छान कट येतो. पण तो नसला तरी चवीत फरक पडत नाही.

विद्या भुतकर.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
मेरी मां :)

फ्लॉवरचे पराठे

Submitted by टवणे सर on 30 March, 2017 - 16:42
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारण
१ माध्यम आकाराचा बारीक किसलेला फ्लॉवर
फोडणी साठी तेल (मी मोहरीचे तेल वापरते )
२ चमचे जिरे
चिमूट हिंग
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ छोटा चमचा हळद
१ १/२ चमचा ओवा
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवी पुरते मीठ
२-३ अमूल चीज क्युब्ज किसलेले

कव्हर
२ कप कणीक
चवीपुरते मीठ
छोटा चमचा हळद
२-३ चमचे तीळ
२-३ चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

सारण कृती
१. तेल गरम झाल्यावर जिरे, हिंग , हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी
२. किसलेला फ्लॉवर घालून झाकण न ठेवता परतून शिजवावा. साधारण ६-७ मिनटे लागतात. फ्लॉवर मधले पाणी परतून कोरडे व्हायला हवे (उडून जायला पाहिजे). सारण बऱ्यापैकी कोरडे झाले पाहिजे.
३. ओवा हातावर चुरडून घालावा. चवीपुरते मीठ , धने पूड , जिरे पूड घालून २ मिनिटे वाफ द्यावी .
४. एका डिश मध्ये काढून चीज व कोथिंबीर घालून सारण मिक्स करावे.

कव्हर
कणिक , मीठ , हळद , तेल व तीळ घालून पोळीची कणीक भिजवतो तसा गोळा करावा

पराठा
इतर जसे स्टफ्ड पराठे करतो तसे करावे. तेल किंवा बटर सोडून भाजावे .

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
बायको

ग्रीन ग्रेवीतली वडी

Submitted by मंजूताई on 15 March, 2017 - 05:44
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वडी : अर्धी वाटी सालासकट उडदाची डाळ तीन तास पाण्यात भिजवून वाटलेली व चवीपुरते मीठ
ग्रेव्ही : एक पाव पालक ब्लांच करुन एका हिरव्या मिरचीसह वाटलेला, एक वाटी दही,
मसाला: चार हिरवे वेल्दोडे, एक मोठी विलायची, पाव जायफळाचा तुकडा, पेरभर दालचिनी तुकडा, चार लवंगा व दोन मिरी, चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

मसाले कोरडे भाजून पूड करुन घ्यावी. वाटलेली डाळ एका तेल लावलेल्या ताटली ओतून वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर कापून तेलात तळून घ्याव्या. त्याच कढईत पळीभर तेलात मसाला (अर्धा) टाकून वाटीभर दही टाकून मोठ्या आचेवर सतत ढवळावे जेणेकरुन दही फाटणार नाही. त्यात पालकाची पेस्ट टाकावी. चवीपुरते मीठ व अर्धी वाटी पाणी टाकून उकळी काढावी. खाण्यापूर्वी तळलेल्या वड्या टाकून एक उकळी काढावी. भाकरी पराठ्यांबरोबर छान लागते ही भाजी.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांकरिता
अधिक टिपा: 

वड्या टाकून खूप उकळू नये. कांदा, आलं,लसूण, टोमॅटोच्या ग्रेव्हीपेक्षा वेगळ्या चवीची भाजी.
क्रीम टाकल्यास अजून उत्तम लागते.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
खाद्य पदार्थाला वाहिलेलं च्यनेल.

Pages

Subscribe to RSS - शाकाहारी