१. सुक्या खोबर्याचा कीस
२. लसूण पाकळ्या सोलून
३. लाल तिखट
४. मीठ
५. जिरेपूड (ही आयत्या वेळी जिरं भाजून ताजी दळलेली असली तर उत्तमच. नाहीतर तयार चालेल.)
सुक्या खोबर्याचा कीस मंदाग्नीवर भाजून घ्या. जे काय कौशल्य आहे ते इथेच आहे. आच जास्त झाली किंवा लक्ष राहिलं नाही तर खोबरं एकदम करपायला लागतं. सगळं छान एकसारखं गुलबट भाजून घ्या.
खोबरं ताटात पसरून गार करायला ठेवा.
जिर्याची पूड करणार असाल तर जिरं मंद आचेवर थोडं भाजून घ्या.
हे दोन्ही गार होतंय तोवर लसूण सोलून चिरून घ्या. मिक्सर असेल तर मोठे तुकडेही वाटले जातात. नसेल तर बारीक चिरलेली बरी.
आता आधी जिरं बारीक दळून घ्या. मग त्यात खोबर्याचा कीस, तिखट, मीठ आणि लसणीचे तुकडे घालून वाटा.
१. अगदी सोपी आणि पारंपारिक कृती आहे. लोलाच्या बटाटेवड्यांवर विचारलेली दिसली म्हणून देत आहे, यात माझं स्पेशल काही नाही. 
२. सगळे घटक पदार्थ मी अंदाजाने घालते.
३. खोबर्याच्या जोडीला किंवा ऐवजीही दाण्याचं कूट, तिळाचं कूट वापरता येतं.
४. बटाटेवड्यांबरोबर करायची तर आधी पिठाची 'बाळं' कुरकुरीत तळून घेते आणि खोबर्याऐवजी ती घालून करते चटणी. झक्कास लागते. बाळांऐवजी विकतची बुंदी ट्राय करायला हरकत नाही.


