भाताचे प्रकार

वडाभात

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१.मोकळा शिजवून घेतलेला भात,
२.भरपूर मोहरी, हिंग आणि लाल मिरच्या घालून कढवलेल्या फोडणीचं तेल,
३.प्रत्येकी १ माप चणाडाळ, उडीदडाळ, मटकी (अख्खी), मूगडाळ आणि तूरडाळ.

क्रमवार पाककृती: 

१. प्रत्येकी १ माप चणाडाळ, उडीदडाळ, मटकी (अख्खी), आणि मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी उपसून ठेवावी.

२. तासभर निथळली की प्रत्येक डाळ आणि मटकी 'वेगवेगळी' शक्य तितक्या कमी पाण्यात जमेल तितकी बारीक वाटावी. (वेगवेगळी वाटणं महत्त्वाचं.)

३. सगळी वाटणं एकत्र करून यात एक माप 'न भिजवलेली' तूरडाळ फक्त धुवून मिसळावी.

४. यात आता हिरव्या मिरच्या, आलं लसूण यांचं वाटण, धणेजिरे पावडर, हळद, तिखट, मीठ घालावं.

५. भरपूर कोथिंबीर आणि कढीलिंबाची पानं चिरून घालावी.

६. आता कडकडीत गरम तेलात भरपूर हिंग घालून, अगदी गॅसवर उतरवल्या उतरवल्या पिठात घालावं.

७. सगळे मसाले, मोहन, कोथिंबीर, आलं-लसणाचे वाटण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं.

हे झालं वड्यांचं पीठ तयार!
-------------------------------------
८. कढईत तेल धूर येईपर्यंत गरम करून या मिश्रणाचे छोटे, चपटे, मध्यभागी मेदुवड्यासारखं भोक पाडलेले
वडे तळायला सोडावे.

९. एका घाण्याचे वडे तेलात सोडल्यावर आच मध्यम करून खरपूस तळावे.

१०. पहिल्या घाण्याच्या वड्याची चव घेऊन; तिखट, मीठ कमी-जास्त होतंय का ते बघून घ्यावं. (जास्त झालं असल्यास तांदळाचं पीठ घालता येतं.)
----------------------------------------------------------
वडा-भात तयार करायला:-

११. ताटात भात वाढून घेऊन त्यात वडे कुस्करून घालावे. मीठ फक्त वड्यांपुरतं असल्यामुळे भातात जरासं मीठ वरून घालावं लागतं.

१२. कडकडीत तेलाची फोडणी वरून ओतावी. (हवं तर जेवणानंतर / आधी ५ मैल पळून यावं, पण तेलात कंजूषी करू नये.)

१३. वडा-भात कालवून पोटभर हाणावा. निवांत झोपायला पुढले २-३ तरी मोकळे असावे. हा भात चढतो! स्मित

१४. सगळ्यात महत्त्वाचं! भात अगदी वाटीभर घ्यावा आणि त्यात फारतर १-२ वडे कुस्करावे. लागल्यास आणखी वडे घालता येतात. पण आधीच भात खूप घेतला आणि त्यात भक्कम वडे घातले तर अनावर ढीग तयार होतो.

१५. जोडीला गरम कढी किंवा मठ्ठा मस्त!!
--------------------------------------------------------
वडाभात:

फक्त वडे आणि फोडणी:

वाढणी/प्रमाण: 
पोटभर
अधिक टिपा: 

प्रस्तुत पाकृ मृण्मयीने जशी मला लिहून पाठवली तशीच इथे पेस्ट केली आहे. मी फक्त रेसिपीप्रमाणे प्रयोग करून फोटो पोस्टले आहेत इतकच! पारंपारीक आणि सुप्रसिद्ध ’वडाभात’ पाकृ शेअर केल्याबद्दल मृण्मयीचे मन:पूर्वक आभार!

[मी पहिल्यांदाच वडे, तळण वगैरे उपद्व्याप स्वहस्ते केले आहेत. वड्यांचे रंग-रूप, आकार ... कृपया सांभाळून घेणे! स्मित चवीला अफलातून झाला होता वडाभात!]

धन्यवाद!

माहितीचा स्रोत: 
मृण्मयी (मायबोली आयडी)

कोथिंबीर भात

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ - २ वाट्या
कोथिंबीर - आवडेल तेव्हढी बारीक चिरून (मी एक वाटी घेतली होती)
कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
हिरव्या मिरच्या - ४ चिरून (आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता)

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावा.
२. कांदा, मिरची, कोथिंबीर mixer मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
३. कढईत फोडणी करून घेऊन वरील पेस्ट चांगली परतून घ्यावी.
४. तांदूळ घालून पुन्हा परतावे.
५. पाणी घालून एक उकळी आल्यावर मीठ घालावे व शिजू द्यावे.
६. लसणाच्या चटणीबरोबर/दह्याबरोबर/तुपाबरोबर गरमागरम गट्टम करावे स्मित

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी भरपूर होतो...
अधिक टिपा: 

भात थोडा मऊ शिजू द्यावा, म्हणजे कोथिंबीरीचा मस्त वास त्यात उतरतो.

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेले प्रयोग...

शाकाहारी पाएआ (फोटोसह)

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

हा स्पॅनिश भाताचा प्रकार शाकाहारी पद्धतीने पण करता येतो. याची चव आपल्या मसालेभात, बिरयाणी,
पुलाव पेक्षा बरीच वेगळी आणि सौम्य असते. तसेच हा प्रकार जरा सवडीनेच करावा लागतो.

१) दोन कप तांदुळ (शक्यतो बासमती नको. जाडा बुटका तांदूळ चांगला. आपल्याकडचे धणेसाळ तांदुळ
चांगले, उकडा तांदूळही चालेल. थाई जास्मिन चालेल. मी Arborio वापरलाय.)
२) दोन लाल टोमॅटो, बारिक कापून + दोन टेबलस्पून केचप (मूळ प्रकारात शक्यतो टिनमधले पील्ड
टोमॅटो वापरतात, पण ती चव टोमॅटो व केचप वापरुन मिळवता येते.)
३) एक मध्यम आकाराचे वांगे.साले काढून तूकडे करुन.
४) एक मोठा कांदा, बारिक कापून.
५) तीन चार लसूण पाकळ्या, बारिक कापून.
६) दोन ते तीन टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल (रिफ़ाईंड तेल चालेल)
७) एक टेबलस्पून पाप्रिका (काश्मिरी लाल तिखट चालेल)
८) चिमूटभर केशर, पाण्यात खलून.
९) आवडीची एखादीच हर्ब, अर्धा टिस्पून (बेसिल,सेज,रोझमेरी..किंवा एखादी लवंग)
१०) मीठ

आवडीनुसार भाज्या

यात बेबी कॉर्न, छोटी गाजरे, मटार, ओले शिंगाडे, शिजवलेला राजमा वगैरे (मी सेलरी, शुगर स्नॅप्स, पनीर
मका व फ्लॉवर वापरलाय.)

क्रमवार पाककृती: 

१) आधी आपल्याला स्टॉक करावा लागेल. त्यासाठी भाज्यांचे टाकाऊ तरीही खाण्याजोगे भाग घ्या.
(फ्लॉवरचा मधला भाग, मटाराची साले, पालेभाज्यांची देठे, कोथिंबीरीचे देठ, थोडासा कांदा, गाजराचा
तूकडा, बटाट्याचा तूकडा असे) हे भाग जरासे ठेचून घ्या आणि कूकरमधे टाका. अर्धा लिटर पाणी टाका.
त्यात दोन मिरीदाणे
ठेचून टाका. प्रेशर आल्यावर पाच ते सात मिनिटे शिजवा. मग कूकर उघडून डावेने भाज्या ठेचून, फक्त
पाणी गाळून घ्या. हा झाला स्टॉक. आपल्याला भात या पाण्यातच शिजवायचा आहे. हा स्टॉक आधी
करुन ठेवता येतो. पण भातात घालतेवेळी गरम करुन घ्या. स्टॉक क्यूब्ज वापरता येतील. ते कोमट
पाण्यात विरघळून घ्या. त्यात भरपूर मीठ असते, ते लक्षात ठेवा.
२) एका मोठ्या पॅनमधे तेल तापवून त्यात लसूण व कांदा परता. फार लाल करायचा नाही.
३) त्यात टोमॅटोचे तूकडे + केचप टाका व जरा परतून वांग्याचे तूकडे टाका.
४) जरा परतून त्यात पाप्रिका टाका व मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्या.
५) तांदूळ धुवून निथळून घ्या.
६) कांदा, टोमॅटो, वांगी शिजून एकजीव झाले कि त्यात तांदूळ टाका. केशर व हर्ब टाका.
७) थोडे परतून त्यात तांदूळ बुडतील एवढाच स्टॉक टाका, मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्या.
८) बाकीच्या भाज्या नीट करुन घ्या. दुस-या पॅनमधे त्या जेमतेम बुडतील एवढेच पाणी व चमचाभर
तेल घालून पाणी आटेपर्यंत प्रखर आचेवर शिजवा.
९) भात अधूनमधून ढवळत रहा. मीठ टाका. शिजवलेल्या भाज्यांपैकी काही भाज्या भातात मिसळून
घ्या. (काही सजावटीसाठी वापरायच्या आहेत.) परत झाकण ठेवून भात शिजू द्या.जसजसा भातात स्टॉक जिरेल, तसतसा टाकत रहा.
१०) भात जवळजवळ शिजला कि, मग ढवळू नका. भातावर भाज्यांनी सजावट करा आणि मंद
आचेवरच पण झाकण न ठेवता शिजवा.
११) पाएआ हा थोडासा (थोडासाच) खालून लागला पाहिजे.
१२) ज्या पॅनमधे शिजवला, त्याच पॅनमधे टेबलावर घ्या.

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

मी वर लिहिल्याप्रमाणे आपल्या चवीला हा भात खूपच सौम्य लागेल. म्हणून सोबत एखादा तिखट
सॉस, गार्लिक ब्रेड वगैरे घेता येईल.

एक खवचट शेरा.. शाकाहारी व्हर्जनमधले सगळेच घटक खाता येतात.

मामाजी हम आपके साथ है.

मोंगलाई दम बिर्याणी

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदूळ १ किलो
मटण किंवा चिकन १/२ किलो
दही ४०० ग्रॅम
अननस १ (गोल चकत्या करुन)
सुके आलू बुखार (७-८)
४-५ कांदे (उभे चिरुन)
बटाटे (उभे कापुन)
लवंग - १६
दालचिनी ८ तुकडे
तमालपत्र ८
वेलची १०
काळीमिरी १६
जिर १ चमचा
मिरची पावडर १ चमचा
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे
हिंग
हळद
मिठ
३-४ चमचे तेल
तुप
गव्हाचे पिठ (मळून)

क्रमवार पाककृती: 

१) बिरयाणी करायला घ्यायच्या १ तास आधी तांदुळ धुवुन निथळत ठेवा.

२) चिकन किंवा मटण साफ करुन त्याला दही व वाटण चोळून १ तास मुरवा.

३) एका मोठा पातेल्यात तांदळाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उकळत ठेवा. त्यात मिठ, जिर, ४ वेलची, ४ मिरी, ४ लवंग, २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्र घाला. पाणी उकळले की त्यात तांदूळ टाका. ५-६ मिनीटांनी तांदूळ जरा अर्धवट शिजले की त्यातील अर्धे तांदूळ चाळणीत निथळवत ठेवावेत. नंतर अजुन ३-४ मिनीटांनी उरलेले शिजत आलेले तांदुळ दुसर्‍या चाळणीत निथळवत ठेवावेत.

४) एका भांड्यात तेल टाकून त्यात ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची, २ दालचीनीचे तुकडे, २ तमालपत्र घालून त्यावर कांदा बदामी रंगावर कुरकुरीत शिजवा. असा कांदा शिजवण्यासाठी तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त वापरावे.

५) मुरवलेल्या मटण्/चिकनला हिंग, हळद, मिरची पुड, ८ मिरी, ८ लवंगा, ४ वेलची, ४ दालचीनीचे तुकडे, ४ तमालपत्र, आलुबुखार, उभे चिरलेले बटाटे व २ चमचे तुप घालुन एकत्र करा.

६) बिरयाणी करण्यासाठी एक मोठे टोप घ्या. त्या टोपाला आतून तुप लावा. टोपात चिकनचे मिक्स केलेले मिश्रण पसरून घ्या. पसरलेल्या चिकन्/मटणवर तळलेला अर्धा कांदा टाका. त्यावर अननसाच्या चकत्या लावा.

७) चकत्यांच्या वर कच्चट तांदळांचा थर लावा व त्यावर थोडे तुप पसरवा.

८) राहिलेला अर्धा कांदा ह्या तांदळांवर पसरवा व शिजत आलेला भात ह्या थरावर लावा. परत थोडे तुप पसरवा.

९) टोपावर अगदी व्यवस्थित बसणारे झाकण लावा (हवा बाहेर गेली नाही पाहीजे असे). झाकण वसवून झाकण व टोप जोडणारी कडा गव्हाच्या मळलेल्या पिठाने गोलाकार घट्ट पॅक करा.

१०) टोप पातळ असल्यास पहीली १५ मिनीटे मोठ्या गॅसवर बिरीयाणीचे टोप ठेवा किंवा मिडियम गॅस वर टोप ठेवा मग अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर हे टोप ठेउन अर्धा ते पाऊण तास ही बिरयाणी शिजू द्या. जर निखारे असतील तर तेही झाकणावर ठेवल्यास बिरयाणी अजुन चांगली दम होते.

११) बिरयाणी तयार झाली की टोप गॅसवरुन उतरवून १० मिनिटे ठेवा. मग चमच्याने किंवा कालथ्याने गव्हाच्या पिठाचे आवरण काढा आणि झाकण उघडा. बिरयाणीचा वाफाळणारा दणदणीत वास घरभर पसरुन सगळ्यांना भुक लागेल. मग लगेच वाढायला घ्या. वाढताना मोठा कालथा थेट काली रोवून थरासकट बिरयाणी वाढा.

अर्धी झाली की.

१२) थोडी टेस्ट करा.

वाढणी/प्रमाण: 
दुसरे काही खाऊ नका आधी नाहीतर पश्चाताप होईल. खातच रहावी वाटते त्यामुळे प्रमाण सांगणे कठीण.
अधिक टिपा: 

ही बिरयाणी रायत्यासोबत खावी.

ह्या बिरयाणीतील आलूबुखार लहान मुलांना विशेश आवडतात. माझ्या पुतण्याची व श्रावणीची त्या आलूबुखारांवर झुंबड असते.

अननस गोड लागतो थोडा पण भातात त्याची चव किंवा स्वाद मिक्स होत नाही. पण भाताबरोबर खायला चांगला लागतो.

माहितीचा स्रोत: 
माझी वहीनी.

मसालेभात

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त भात तेवढा मोजून घेते. बाकीचे सगळेच पदार्थ अंदाजे.
बासमती तांदुळ- एक वाटी तांदळाला साधारण दोन, सव्वा दोन वाट्या पाणी,
तोंडली- उभी चिरुन, मावेत, कुकरला वाफवून,
काजू- मूठभर तरी हवेतच,
गरम मसाला- २,३ लवंगा, २,४ मिरीचे दाणे, १ दालचिनी, १,२ तमालपत्र,
फोडणीतः जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन, कढिपत्ता.
गोडा मसाला- १,२ टीस्पून,
मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.
वरुन घालायला- भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, आणि सढळ हाताने साजून तूप.

क्रमवार पाककृती: 

बासमती तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.
मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन त्यावर फोडणीचे जिन्नस घालून, काजू, गरम मसालाही परतून घ्यावा. त्यावर वाफवून घेतलेली तोंडली टाकून झाकण घालून वाफ येऊ द्यावी.
त्यावर निथळून घेतलेले तांदुळ परतावेत. मोजून पाणी घालावं. भात शिजत असताना मसालेभाताकरता केलेला मसाला, गोडा मसाला, मीठ घालावं.
वाढताना साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी तांदुळाचा एकाला भरपूर, दोघांना जेमतेम होईल बहुतेक.
अधिक टिपा: 

ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांना बटाटे उभे चिरुन घालता येतील. तोंडली नसतील तर मी तसाही करते.
ह्याबरोबर टोमॅटोचं सार मस्त लागतं.

माहितीचा स्रोत: 
मसालेभाताच्या मसाल्याची कृती मुंबईमसाला.डॉट.कॉमवर मिळाली.

बिसबीली भात

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी साहीत्य-

तेल ४ टी स्पून
सुक्या लाल मिर्च्या १५
हरबरा डाळ २ टेबल स्पून
उडीद डाळ २ टेबल स्पून
धने: १ टेबल स्पून
जिरे २ टी स्पून
मेथी ८ दाणे
मिरे १८ दाणे
दालचिनी ४ छोटे तुकडे
लवंग ६
सुके किसलेले खोबरे १/२ (अर्धी) वाटी

शिजवण्यासाठी साहित्य-

चिंचेचा लिंबा एवढा गोळा
तुर डाळ १ वाटी
तांदुळ १ १/२ (दिड) वाटी
३ कांदे मध्यन आकारत चिरून
शेंगदाणे १/२ वाटी (ऐच्छीक)
हळद १ टी स्पून
हिंग १/२ टी स्पून
मीठ चवीनुसार
गुळ चवीनुसार
साजुक तुप ४ टेबल स्पून
मोहरी जिरे हिंग कढीपत्ता फोडणी साठी
काजू १० ते १२

सजावटीसाठी-

ओल्या नारळाचा चव
चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

मसाल्याची कृती

१) मसाल्यासाठी सर्व प्रथम एका कढईत तेल घेऊन लाल मिर्च्या थोड्या परतून डीश मधे काढून घ्याव्या, त्याच तेलात हरबरा डाळ थोडा वेळ परतून, त्यातच उडीद डाळ टाकुन परतावे. दोन्ही डाळी लाल झाल्या की त्यातच धने टाकून थोडे परतावे, त्यानंतर जिरे टाकून परतावे, नंतर मेथी दाणे, मिरे, दालचिनी, लवंग टाकून अजून थोडेसे परतावे. सर्वात शेवटी किसलेले सुके खोबरे घालुन मिश्रण चांगले परतून घ्यावे..
हा मसाला थंड झाल्यावर मिक्सर मधुन बारिक पावडर करून घेणे.
२) १ वाटी पाण्यात चिंच अर्धा तास भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा.

३)कढईत अथवा जाड बुडाच्या पातेल्यात (मी कुकरच वापरला) तुरीची डाळ धुवून ६ वाटी घेऊन त्यात हळद हिंग घालून शिजत ठेवावी, डाळ अर्धी शिजल्यावर त्या धुतलेले तांदुळ, कांदा, चवीनुसार मीठ व गुळ घालावा.. तयार केलेला मसाल्यातील अर्धा मसाला पाण्यात कालवून घालावा. (मसाल्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून पाण्यात कालवून घालतात.) मिश्रण शिजू द्यावे.
भांड्याच्या बुडाला लागू नये म्हणून मधे मधे मिश्रण पळीने ढवळावे.
डाळ तांदुळ शिजल्यावर त्यात चिंचेचा कोळ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे..
गरजेनुसार गरम पाणी टाकत जावे.
४)साजुक तुप गरम करून त्यात शेंगदाने काजू थोडे परतून त्यातच मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून ती फोडणी भाताला द्यावी..
मिश्रण चांगले ढवळावे.
ताटात वाढुन वरून ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर टाकून वाढावे..
याच्यासोबत बटाट्याचे चिप्स छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांकरीता
अधिक टिपा: 

१) हा मसाला साधारण पणे दोन वेळच्या भातासाठी पुरतो.
उरलेला मसाला काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमधे ठेवावा.
२) हा भात जास्ती शिजलेला मऊसर आसट करतात..
३) याच्यासोबत बटाट्याचे चिप्स छान लागतात.
४)ही रेसीपी जागूच्या आग्रहास्तव लिहीली आहे.. धन्यवाद जागू..
५) यातील सजावट दिनेशदांच्या रेसीपींच्या सजावटीवरून प्रेरीत
(दिनेशदा, यासाठी तुम्हाला रॉयल्टी देणार नाही हं..!)

photo(2).JPG

माहितीचा स्रोत: 
सासुबाई

कश्मिरी पुलाव : साधा पण झटपट

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 कप बासमती तांदुळ,
2 कप दूध,
1 चमचा साखर,
1/2 चमचा जीरे,
3 लवंग,
1 तेज पान,
3 वेलची
दालचीनी,
2 चमचा तुप,

मीठ

ड्राय फ्रुट्स
आणी छोट्या आकारात कापलेली फळ [सफरचंद, द्राक्ष, पपई, अननस,डाळींब]

क्रमवार पाककृती: 

पुलाव करायच्या अगोदर तांदुळ अर्धा तास भिजत ठेवावे.दुध साखर एकत्र करुन ठेवा.
कढईत जीरे , लवंग, तेज पान, वेलची,दालचीनी तुपावर गलाबी परतुन घ्या.
त्यावर भिजत ठेवलेले तांदुळ ३-४ मिनीटे परता. मग दुध-साखर , मिठ आणी अर्धा कप पाणी वाढवुन शिजवा. गॅस बंद केल्यावर ड्राय फ्रुट्स आणी छोट्या आकारात कापलेली फळांनी सजवा..

[पुलाव केल्यावर फोटो टाकेन .. ]

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

- यात भाज्या पण घालु शकतो [शक्यतो वाटाणे, फरस्बी, गाजर ]
- जर भाज्या घालायच्या असतिल तर वरील प्रमाण ६ जणासाठी होईल.
- वेलची आवडत नसल्यास २ दालचीनी घ्यावी.

माहितीचा स्रोत: 
आई

स्पॅनिश राईस फ़ॉर ब्रेकफ़ास्ट

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) १ कप तांदूळ, धुवून निथळलेला.
२) १ टिन स्वीट कॉर्न किंवा ताजे दाणे एक कप (पर्यायासाठी टिप पहा)
३) अर्धा कप रोल्ड ऒट्स
४) एक टेबलस्पून लोणी किंवा तूप
५) ८/१० मिरीदाणे जरासे ठेचून
६) अर्धा टिस्पून जिरे किंवा एक इंच दालचिनी
७) एखादी वेलची
८) २ कप दूध
९) १ टेबलस्पून केचप
१०) लागलेच तर मीठ
११) एक मोठा कांदा उभा चिरलेला

क्रमवार पाककृती: 

१) प्रेशर कूकरमधे तूप तापवून त्यात मिरी, वेलची आणि जिरे (किंवा दालचिनी) टाका.
२) मग त्यावर कांदा टाकून परता. कांदा बिरयानी साठी लाल करतो तेवढा तळायचा नाही, फ़क्त गुलाबी करायचा
आहे.
३) मग त्यावर तांदूळ टाकून थोडे परता.
४) मग त्यावर मक्याचे दाणे टाका. (टिनमधले वापरत असाल तर टिनमधले पाणीही वापरा, नाहीतर अर्धाकप साधे
पाणी टाका. ओट्स टाका व ढवळा.
५) पाण्याला उकळी आली कि दूध टाका, दुधाला उकळी आली कि केचप टाका.
६) टिनमधल्या दाण्यात आणि केचपमधे मीठ असते ते लक्षात ठेवून आवश्यक वाटले तरच मीठ टाका.
७) नीट ढवळून झाकण लावा, प्रेशर आले कि तीन मिनिटानी बंद करा.
८) सोबत एखादे सलाद घ्या.

मी कोचवलेली काकडी आणि योगहर्ट घेतले आहे.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

१) मकाच हवा असे नाही. त्याजागी किंवा त्यासोबत गाजर, फरसबी, गवार, सिमला मिर्ची, अशी कुठलीही भाजी घ्या. बटाटाही चालेल.
२) केचप आपल्या आवडीचा घ्या. आपल्याकडे भोपळ्याचा, केळ्याचा पण सॉस मिळतो. तो वापरला तरी चालेल.
३) एखाद्या थंडीतल्या सकाळी, किंवा आदल्या रात्री मसालेदार जेवण झाले असेल तर हा ब्रेकफास्ट जादूचे काम करतो.
४) यातले ऒट्स कुणाच्या लक्षातही येत नाहीत.
५) योग्य तो परिणाम हवा असेल तर यात मिरच्या वापरु नका. (आगे आपकी मर्जी.)
६) दूध नको असेल तर एखादे क्रिमी सूपचे पाकिट वापरा. ते वेगळे शिजवायची गरज नाही.
७) तूमच्या आवडीप्रमाणे पाणी वा दूध वाढवून तो पळीवाढा करु शकता.

माहितीचा स्रोत: 
मंगला बर्वे यांच्या अन्नपुर्णा पुस्तकात स्पॅनिश राईस आहे, त्यात थोडे बदल करुन.

पोटॅटो राईस/ बटाटा भात

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदूळ
चवी प्रमाणे मिठ
केशर
तूप/ लोणी दोन चमचे
१ मध्यम आकाराचा बटाटा

क्रमवार पाककृती: 

एक कप तांदूळ धुवून भिजत अर्धा तास भिजत ठेवायचा. मग त्यात मिठ घालून जरासा कच्चाच शिजवून घ्यायचा. मग गाळणीत गाळून थंड पाण्याखाली जरावेळ धरायचा.
भात शिजेपर्यंत केशर पाण्यात भिजत ठेवायचे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप कींवा लोणी टाकून त्यावर बटाट्याच्या चकत्या पसरवून त्यावर अर्धा भात पसरवायचा. केशराचे अर्धे पाणी त्यावर टाकायचे. त्यावर राहिलेला सर्व भात पसरवायचा. राहिलेले केशर पाणी टाकायचे. जरासे लोणी वर टाकायचे. पातेल्यावर स्वच्छ रुमाल टाकून घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर १०-१५ मि. भात ठेवायचा.
जेवणापुर्वी ५ मि. आधी ताटात किंवा ताटलीवर पालथा मारायचा.

bhat.jpg

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात भाताच्या मधे आवडीचे काही संपुर्ण मसाले घालता येतील जसे की दालचिनी, लवंग, चक्रीफुल. मी जेव्हा जेव्हा हा भात खाल्ला तेव्हा त्यात एक ईराणी स्पाईस असायचे. जराशी आंबट चव असायची त्याला.
नीरजाच्या लिंबू भाताच्या पानावर मी बटाटा लिंबू भाताची कृती टाकलीय. असेही आणखी काही बदल ह्यात करता येतील.

माहितीचा स्रोत: 
होमा.

लेमन राईस (लिंबू भात)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी

फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.

अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.

फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.

फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.

शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.

आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.

वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात नुसताच भात असेल तर लाइट लंच म्हणून तीन माणसांना पुरावा.
अधिक टिपा: 

यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.

माहितीचा स्रोत: 
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले मॉम्ज किचन नावाचे पुस्तक आणि माझे इम्प्रॉव्ह