भोपळा

पेन्सिल भाजी (तांबड्या भोपळ्याची भाजी)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो लाल भोपळा, २ टे. स्पून भाजलेले तीळ, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टे स्पून मेथी दाणे, ४-५ कडीपत्त्याची पानं, फोडणीसाठी तेल-हिंग-हळद-जिरं. कोथिंबीर आणि नारळ सजावटीसाठी.

क्रमवार पाककृती: 

भोपळ्याची पाठ काढुन घ्यावी. त्याच्या साधारण पाटीवरची पेन्सिल असते त्या जाडीच्या आणि दोन पेर लांबीच्या फोडी कराव्यात. कडीपत्त्याची पानं बारीक चिरुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि खोबरे एकत्र वाटुन घ्यावे. हिंग-हळद-जिर्‍याची फोडणी करुन त्यात मेथी दाणे घालावेत. मेथी लालसर झाली की कडीपत्त्याची पानं घालावीत आणि मग भोपळ्याच्या फोडी घालाव्यात. घाकण घालुन एक वाफ येऊ द्यावी. मग त्यात हिरवी मिरची/खोबर्‍याचे वाटण आणि तीळ घालावेत. आपल्या अंदाजाने मीठ घालावे. झाकण घालुन भाजी शिजवावी. पाणी घालु नये तसेच खूप सपक शिजवु नये. कोथिंबीर आणि नारळ घालुन सजवावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार (पानात इतर भाज्या/कोशिंबीरी/चटण्या/आमट्या असल्यास)
अधिक टिपा: 

_आम्ही लहानपणी भोपळ्याची भाजी खावी म्हणुन आई त्याला गमतीने पेन्सिलीची भाजी म्हणत असे म्हणुन पेन्सिल भाजी नाव.
_कडिपत्ता बारीक चिरुन फोडणीत घातल्याने वेगळीच चव येते आणि कडिपत्ता खाल्ला जातो.
_रुचिरामधे हे वाटण घालुन करायची कृती दिली आहे. पण त्यात पाणी घालुन शिजवायचे दिले आहे आणि चारोळ्या वगैरे अनेक जिन्नस आहेत जे मी घालत नाही.
_उपासासाठी करायची असेल तर फक्त उपवासास चालणारे जिन्नस घालुन करावी.

माहितीचा स्रोत: 
आई आणि रुचिरा