पारंपारीक मराठी

मका कणसाच्या दाण्यांची भजी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : दोन वाट्या कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे दाणे , अर्धी वाटी बारूक रवा, तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे बेसनपीठ , तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे भाजणी ,चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट , एक चमचा जिरेपूड ,एक छोटा बारीक चिरलेला कांदा मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ व भजी तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती : मिक्सरवर मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे) , भरडलेल्या दाण्यांत बारीक रवा,भाजणी, चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपूड, बेसनपीठ,बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसारमीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

विशेष सूचना :
१) जर मक्याचे दाणे जून आहेत असे वाटले तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२बेसन पीठा बरोबर आपण इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) जर भजी तेलात फुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

माहितीचा स्रोत: 
माझी पत्नी

भगरीचे पाव

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भगरीचे पाव

साहित्य: 2 वाट्या भगर, 1/4 वाटी दही, 4/5 हीराव्या मिरच्या, 1 चमचा जीरे, 1/2 वाटी शेंगदाणे कूट, मीठ, साखर चवीनुसार, 1/4 चमचा खाण्याचा सोडा, पाणी, तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती:
1. भगर धुवून, 4-5 वाट्या पाण्यामाधे 4 तास भीजत घालावी.
2. नंतर मिक्सर मधे दोश्यासारखी चांगली वाटावी.
3. जीरे, मिरची वाटून पीठामधे मिक्स करावी.
4. चवीपुरती साखर मिक्स करावी.
5. दही घालून पीठ मिक्स करावे आणि झकून 2 तास ठेवून द्यावे.
6. पाव करायच्या आद्धे 1/2 चमचा खाण्याचा सोडा पीठामद्धे मिक्स करावा.
7. नॉन-स्टिक तव्यावर तापला की तेल टाकून पळीने पीठ टाकावे.
8. दोन्ही बाजूने पाव चांगला भाजला की काढून घ्यावा. हा पाव चांगला फुगतो आणि जळी पडते. (अगदी आपल्या पाव-भाजी च्या पावसारखा नाही स्मित)

सोबत उपवासाची बटाटा भाजी, शेंगडाण्याची आमटी (उपासाची) , एखादी चटणी सर्व करावी.

एकदम मस्त बेत होतो आणि पुन्हा पुन्हा उपास करावा वाटतो स्मित

वाढणी/प्रमाण: 
साधारण 7/8 पाव होतात 2 वाट्या भगरी चे.
अधिक टिपा: 

दही घातळयानंतर 2-3 तास पीठ भीजले की पाव चांगले होतात.
नॉन-उपास डे ला कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई. आषाढी एकादशी, महा शिवरात्र अश्या ग्लोबल उपासंचे पुण्य हे भागरीचे पाव केल्याशिवाय / खल्य्याशीवय मिळत नाही :)

गोळा पाणी (खट्टे गुलाब जामुन)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरबर्‍या च्या डाळीचे पीठ(बेसन) : २ वाटया
तेल : अर्धी वाटी
हळद : १/२ चमचा
तीखट : १ चमचा
गोडा मसाला : १ चमचा
हिंग , मीठ : अंदाजे
चिंचेच कोळ : अर्धी वाटी
गुळ : अंदाजे (एक छोटी वाटी)

क्रमवार पाककृती: 

प्रथम दोन वाटया बेसन पीठ एका पसरट भांडयात किंवा परातीत घ्यावे.
त्यात १/२ चमचा हळद, मीठ, हींग, तिखट आणि दोन/तीन चमचे कच्च तेल घालुन घट्ट भिजवुन
घ्यायचे.(पुरी सारख) आता या पिठाचे लिंबा पेक्षा थोडे छोटे गोळे करुन तळुन घ्यावे. साधारण १५-२० गोळे होतात.
आता कढई गरम करुन त्यात दोन चमचे तेल घालुन मोहरी घाला, १/२ चमचा तिखट, एक चमचा गोडा मसाला घातला की लगेचच चिंचेच कोळ घाला, पाणी अंदाजे (दिड फुलपात्र) घाला, गुळ आणि मीठ घालुन उकळे येउ द्या. मग त्यात तळलेले गोळे सोडा. आणि झाकण ठेवुन दहा मीनीट मंद आचेवर शीजु दया.

थंड झाल्यावर सर्व्ह करा. वन मील म्हणुन पण होऊ शकते.. किंवा भाता वर गोळा कुसकरुन त्यावर कच्च तेल
आणि चिंचेचा सार असा पण एक प्रकार होऊ शकतो.

रात्री पोळ्या नसतील, खिचडी खाउन कंटाळा आला असेल, तर हे ओप्शन चांगले आहे.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

चिंच गुळाचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी जास्त करता येते. फोडणी चे पाणी, केचप पेक्षा जरा पातळ हवे.

माहितीचा स्रोत: 
सासु बाई

ओल्या हळदीचे कैरी घालुन लोणचे [फोटोसहित]

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओल्या हळदीचे काप १ वाटी, कैरीच्या फोडी १ वाटी,आल्याचे [कोवळ असल्यास चांगल ]काप अर्धी वाटी, मिरचिचे तुकडे अर्धी वाटी, मिठ, लोणच्याचा मसाला, तेल, मोहरी, हिंग.

क्रमवार पाककृती: 

प्रथम कैरी, आले, ओली हळद व मिरचीचे तुकडे एका पसरट भांड्यात घेउन त्यात मीठ व लोणच्याचा तयार मसाला घालुन मिक्स करुन घ्यावे. हिंग व मोहरीची फोडणी करावी. २ मिनिटांनी ती लोणच्यात घालुन मिसळावी. थोडे थंड झाल्यावर बरणीत भरावे. दुसरे दिवशी चांगले पाणी सुटते. मुरल्यावर खुपच छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

मध्यंतरी दिनेशदांची या लोणच्याची रेसिपी वाचण्यात आली. ती किसुन लिंबाचा रस घालुन केलेली होती. तिची चव पण छान लागते. मी अस बनवते.

माहितीचा स्रोत: 
आई, काकु

रताळ्याचे शाही गुलाबजाम [फोटो सहित]

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रताळे उकडुन किसुन तयार पल्प १ कप, मिल्क पावडर २ चमचे, काजु-बदाम पावडर २-३ चमचे,खडीसाखर किंवा चिरंजीचे दाणे ,चिमुटभर बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर. पाव कप मैदा. विलायची. पाकासाठी साखर दीड कप. ड्राय हवे असतील तर अर्धा कप पिठी साखर व पाव कप डेसिकेटेड कोकोनट , तळण्यासाठी तेल किंवा तुप.

क्रमवार पाककृती: 

१ वाटी रताळ्याचा पल्प घ्यावा. त्यात २ चमचे मिल्क पावडर,२-३ चमचे ड्राय-फ्रूट पावडर, पाव कप मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालावा. २चमचे तुप घालुन गोळा मळुन घ्यावा. काही वेळाने त्याचे गोळे बनवुन घ्यावेत. गोळे बनवितांनाच त्यात [आतमधे] खडीसाखर किंवा चि. चे दाणे व विलायची घालावी. तुप किंवा तेल चांगले तापवुन घ्यावे. व मंद आचेवर गुलाबजाम तळुन टिशु पेपर वर ठेवावे.
साखरेचा एकतारी पाक करुन त्यात सर्व गु.जा टाकावेत ड्राय हवे असतील तर अर्धा कप पिठी साखर+ डेसिकेटेड कोकोनट मधे घोळवुन घ्यावेत.
स्वादिष्ट शाही गुलाबजाम तयार.. आतमधे खडीसाखर घातल्यामुळे तिचा पाक बनतो. त्यामुळे अतिशय हलके होतात. रताळ्याला स्वतःची एक चव असते. छानच होतात. ड्रायही छान लागतात. विलायचीची चव पण लागते अगदी जरुर करा. तुम्हाला नक्कीच वेगळा पण छान प्रकार वाटेल.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

फोटो १-२ दिवसात टाकते.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोगातुन

सांडगे (भेंडी + गवार)

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार शेंगा : एक कीलो
भेंडी : १/२ कीलो
हिरव्या मिरच्या : ५ -६
जिरे : २ चमचे (चहाचा)
धणे पुड : ४ चमचे (चहाचा)
मिठ : अंदाजे

क्रमवार पाककृती: 

गवार, भेंडी स्वच्छ धुवुन, पुसुन घ्या... गवारी च्या शेंगाचे देठ खुडुन एका शेंगेचे दोन तुकडे असे प्रतेकी करुन (वीळीने चिरल्या तरी चालतील) मिक्सर मधुन भगराळ गिरवुन घ्या... प्रत्येक घाण्यात थोडया शेंगा दिसल्या पाहिजेत...
आता भेंडी जशी भाजीला चिरतो तशीच चिरायची.. पहीला घाणा गिरवतांनाच ५, ६ मिरच्या घालुन भेडी
बारिक गिरवुन घ्या. चांगला लगदा तयार झाला पाहिजे.. उरलेली भेंडी मात्र जाडसर गिरवायची...

सगळे गिरवलेले जिन्नस परातीत काढुन घ्या... त्यात जीरं, धणे पुड, मिठ घालुन व्यवस्थीत कालवुन घ्या.
ताटाला तेल लावुन त्यावर मोठे वडे टाकावेत, ताटावरच त्याला आकार दयावा,(पातळ/ चपटे नको, मोठे फुगीर हवेत+ हातावर सांडगा घालु नये)३,४ तासानी सराटयानी उलथवुन दुसर्‍या बाजुने उन दाखवावे... दुसर्‍या दिवशी सांडगे बर्‍यापैकी वाळ्लेले असतात ते परातीत काढुन दिवस भर उन दाखवावे... चांगले वाळले की बंद डब्यात ठेवावे..

तळतांना मात्र तेल चांगले गरम झाले की गॅस बंद करुन द्यावा आणि मग एक एक सांडगा तळुन काढावा... (सांडगा नाजुक असतो म्हणुन लवकर जळायची भीती असते)

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु
अधिक टिपा: 

या सांडग्यांसाठी शेंगा/ भेंडी कोवळीच पाहिजे असे नाही... जरड किंवा आठवडी बाजारातुन भाजी आणली आणि
करायला झाली नाही... तर विल्हेवाट लावायची एक उत्तम तर्‍हा आहे... नेहमीच्या गाजर, पानकोबी, पपई,टोमाटो
पेक्षा हा प्रकार कमी कष्टाचा आणि रुचकर आहे....

माहितीचा स्रोत: 
ऑफीस मधली मैत्रिण सौ.माधुरी गेडाम

मुळ्याची कोशिंबीर

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मुळा, दीड टे स्पून मोहरी, मीठ, साखर, १ टे स्पून लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

मुळा किसून त्यात मोहरीखेरीज इतर साहित्य नीट मिसळून घ्यावे. मोहरीची खलबत्यात अथवा मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी. खलबत्ता वापरल्यास पूड वाटीत घेऊन चमच्याने भरपूर घोटून घ्यावी. मिक्सर वापरल्यास मिक्सरमध्येच थोडी जास्त वेळ फिरवावी. घोटलेली मोहरीची पूड मुळ्याच्या मिश्रणात घालून नीट हलवून घ्यावे. कोशिंबीर तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
एक घास खाऊन धारातिर्थी न पडलेले सर्व नग आणखी एक-एक घास खाऊ शकतात
अधिक टिपा: 

बचेंगे तो और भी लडेंगे |

माहितीचा स्रोत: 
मुळे

कुरडयांसाठी इन्स्टंट चीक

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी बारीक रवा
_पाणी

क्रमवार पाककृती: 

रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशेबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी वरचं पाणी काढून टाकावं. एक वाटी पाणी आधणास ठेवावं. त्यात अंदाजाने मीठ घालावं. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा. मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजानं गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी. लगेचच चीक तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
एक-दीड वाटी चीक होतो.
अधिक टिपा: 

_नुसता खाण्यासाठी तसा झटपट आणि वासविरहीत वातावरणात चीक तयार होतो
_या चिकाच्या कुरडया पण होतात
_चिकास आंबटपणा येत नाही पण आपल्या त्या ह्या गावी कुरडयांसाठी असा आंबट नसलेलाच चीक करतात

माहितीचा स्रोत: 
मावशी

मुलांसाठी नाश्ता - रोडगे

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रोडग्याच्या पीठासाठी - तांदूळ - १/४ किलो (कोणत्याही जातीचा)
चणा डाळ - १/४ किलो
तूर डाळ - १/४ किलो
मुग डाळ - १/४ किलो
सालाची मुग डाळ - १/४ किलो (ऑप्शनल)
जीरे - १ मोठा चमचा
धणे - १ मोठा चमचा
वरील सर्व जिन्नस कच्चेच दळून आणणे.

ऱोडग्यासाठी - वर सांगितलेले पीठ -४ मोठे चमचे
हळद - १ लहान चमचा
तिखट - २ लहान चमचे किंवा चवीनुसार कमी-जास्त
जीरे पावडर व धणे पावडर- प्रत्येकी एक लहान चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी
तेल - तळण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

पीठ दळून तयार असल्यास पा. कृ.स १५ मिनिटे लागतात.

पीठात वरील सर्व जिन्नस एकत्र करून पुरीच्या पीठासारखे भिजवणे. तेलाचे किंवा तुपाचे मोहन घालण्याची गरज नाही. घातले तरी काही बिघडत नाही. लहान्-लहान गोळे करून घेणे. वरील प्रमाण घेतल्यास साधारण १५ गोळे होतात. प्लास्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावून वडे थापणे. फार पातळ किंवा फार जाड थापू नयेत. कढईत तेल तापत ठेवून तेल तापले की वडे तळून घ्यावेत. दोन्ही बाजूनी लालसर होवून फुगतात.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. ही पा.कृ. करताना कुठलाही घटक कमी-जास्त झाला तरी काय बिशाद लागलेय पा. कृ. बिघडेल, इतकी गुणी पा.कृ. आहे.
२. पारंपारिक रेसिपी असूनही यात वैविध्य साधता येते कारण यात काहीही ढकलू शकता आणि तरीही बिघडण्याचे प्रमाण नगण्य. ऱोडगे खुसखुशीत होतातच.
३. मी यात बीट, गाजर, पालक वाफवून व नंतर मिक्सरमधून फिरवून पीठात मिसळून वेगवेगळ्या रंगांचे रोडगे करून पाहिले आहेत आणि त्यानुसार मुलांसाठी नाश्ता या प्रकारात समाविष्ट केले आहे. त्याचप्रमाणे पीठात सालाची मुगडाळही मनानेच (पौष्टिक म्हणून) घातली आहे.
४. महत्वाचे- भाज्या, सेलेड न खाणार्या द्वाड मुलांस गुलाबी, हिरव्या रंगाचे खरे कारण कळणार नाही याची दक्षता घ्यावी.
५. सर्व साहित्य न भाजता कच्चेच दळल्यामुळे हा प्रकार भा़जणीच्या वड्यासारखा तेलकट होत नाही.
६. सॉस, चटणी बारोबर किंवा नुसतेही खाऊ शकतात.
७. या पा.कृ.स माझ्या मुलाने ठेवलेले नाव - फुगलेले रंगीत वडे

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक + स्वतः करून पाहिलेल्या प्रयोगांचे फलित

रताळ्याची पुरणपोळी [फोटो सहीत]

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ रताळे, साखर, कणिक, तेल, जायफळ, विलायची, तुप.

क्रमवार पाककृती: 

रताळे उकडुन साल काढुन किसुन घ्यावेत. कढईत २ चमचे तुप टाकुन त्यात रताळ्याचा किस घालुन गॅसवर परतवुन घ्यावा. नंतर त्यात किसापेक्षा थोडी कमी साखर घालुन परतावे. साखरेचा पाक बनल्यावर पुरणाप्रमाणे गोळा तयार होइल.

त्यात आवडीप्रमाणे जायफळ, विलायची, केशर घालुन पोळीत भरण्यासाठी योग्य आकाराचे गोळे तयार करुन घ्यावेत.

आता आपण पुरणाच्या पोळीसाठी भिजवतो तशी कणिक भिजवुन तेल घालुन मळुन घ्यावी. व आपण पुरणाच्या पोळ्या करतो त्याप्रमाणे रताळ्याच पुरण भरुन पोळी लाटावी व तव्यावर भाजुन थोडे तुप सोडुन खरपुस भाजुन घ्यावी.
याप्रमाणे बटाट्याच्या पुरणाच्याहि पोळ्या करता येतात. किंवा रताळ्यातहि एखाद-दुसरा बटाटा घालुन
पोळ्या करु शकतो

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक