भाजी

पहाडी आलू

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उकडलेले बटाटे - मध्यम आकाराचे २ ते ३
भाजलेले पांढरे तीळ - १ टेबलस्पून
चवीप्रमाणे मीठ, तिखट, लिंबाचा रस

फोडणीसाठी

तेल - एक ते दीड टीस्पून
हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, मेथीदाणे

सजावटीसाठी

धुवून चिरलेली कोथिंबीर (थाईम हर्ब असल्यास कोथिंबिरीऐवजी वापरू शकता)

क्रमवार पाककृती: 

उकडलेल्या बटाट्यांच्या साली काढून त्यांचे चौकोनी काप करावेत व एका मोठ्या भांड्यात ते काढून घ्यावेत. तीळ भरडून त्यावर घालावेत. चवीप्रमाणे मीठ, तिखट, लिंबाचा रस घालून ते मिश्रण बटाट्यांना एकसारखे लागेल असे मिसळावे.

फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर हिंग, मेथीदाणे (जास्त नकोत), हळद, मिरचीचे तुकडे घालावेत व लगेच गॅस बंद करून कढीपत्ता घालावा. ही फोडणी बटाट्यांवर ओतावी व हलक्या हाताने नीट मिसळावी. वरून कोथिंबीर पेरावी. पहाडी आलू तयार!

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांसाठी
अधिक टिपा: 

* ही रेसिपी कुमाऊं प्रांतातील आहे, म्हणून नाव 'पहाडी आलू'. स्मित

* मूळ पाककृतीत फोडणीत फक्त मेथीदाणे, हळद व मिरची एवढेच पदार्थ होते. मी त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता यांची भर घातली आहे. तसेच मी मोहरीच्या तेलाऐवजी शेंगदाणा तेल वापरले आहे.

* लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचा कोळ चालेल असेही मूळ पाककृतीत सांगितले आहे.

* नुसते स्नॅक म्हणून किंवा पोळी-भातासोबत तोंडीलावणे म्हणून हा पदार्थ खाता येतो. किंवा ब्रेड / पराठ्यात स्टफिंगप्रमाणे वापरता येतो.

* नेहमीच्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी दिसते, म्हणून वेगळा फोटो दिलेला नाही. मात्र भाजलेले तीळ, मेथीदाणे व वरून घालायच्या फोडणीमुळे वेगळी, खमंग चव येते या भाजीला.

माहितीचा स्रोत: 
आनंदवे संकेतस्थळ व माझे प्रयोग

दोडक्याची सोप्पी भाजी.

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोडकी - २ (छोटी) / १ (मोठे)
हिरव्या मिरच्या - ३
दाण्याचा कुट - २ चमचे (जाडसर)
तिळ - १ चमचा
तेल - १ डाव
साखर,मिठ चविप्रमाणे
फोडणीचे साहित्य - हळद, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता.

क्रमवार पाककृती: 

दोडक्याच्या शिरा काढुन, स्वच्छ धुवुन घ्यावे, दोडके किसुन घ्यावे, नेहमीपेक्षा थोडी जाड किसणी मिळाली तर उत्तम. हळद, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता सगळे घालुन फोडणी करुन घ्यावी. किसलेले दोडके घालावे. व्यवस्थीत हलवुन, फोडणी सगळ्या दोडक्याला लागेल असे बघावे. थोडी वाफ आली की दाण्याचा कुट, तिळ, मिठ, साखर घालुन हलवावे. एक वाफ आली की गॅस बंद करावा. दोडक्याचा रस राहिला असेल तर, अटेपर्यंत मंद आचेवर ठेवावे.

मस्त पिस्ता कलरची भाजी तयार होते.
DSC03494.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरते.
अधिक टिपा: 

१. भाजी झाकण घालुन शिजवु नये.
२. दाण्याचा कुट जाडसरच असावा.

माहितीचा स्रोत: 
आई

केळफुलाची भाजी

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

एक केळफुल, शिजायला कठीण असं कोणतंही कडधान्य- काळे वाटाणे, हरभरे इत्यादी- केळफुलाच्या प्रमाणात घेतलं तरी चालेल, फोडणीकरता हिंग, हळद, मोहरी, भाजीत घालायला गूळ, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर, वरुन सुक्या मिरच्यांची फोडणी. रात्रभर भाजी भिजत घालायला थोडं ताक.

क्रमवार पाककृती: 

केळफुल निवडण्यापूर्वी हा व्हिडिओ बघा.

http://www.youtube.com/watch?v=lhCYK5U52VA

१.ह्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केळफुल निवडून बारीक चिरुन घ्यावे. चिरल्यावर पाण्यात थोडं ताक घालून त्यात भाजी रात्रभर भिजवावी. असं केल्याने केळफुल खाजरं असल्यास खाज निघून जाते.

२.सकाळी भाजी चांगली निथळून घ्यावी. काळे वाटाणे, हरभरे वगैरे शिजायला कठीण कडधान्य असल्यास कुकरमध्ये एकाच भांड्यात घेऊन ३ शिट्ट्या पुरतील. (मूग, मटकी असल्यास वेगवेगळं शिजवून घ्यावं. कडधान्याला एकच शिट्टी पुरेल पण केळफुलाला ३ लागतील)

३.भाजी शिजल्यावर पातेल्यात हिंग, हळद, मोहरीची फोडणी करुन त्यावर शिजलेली भाजी घालावी. त्यात गोडा मसाला, लाल तिखट, गूळ, मीठ घालून चांगली वाफ काढावी. वाढताना वरुन लाल सुक्या मिरच्यांची फोडणी, ओलं खोबरं, कोथिंबीर घालून वाढावी.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक २,३ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१. केळफुल निवडायला भरपूर वेळ लागतो. तेव्हा हातात वेळ असतानाच ह्या भाजीचा घाट घालावा.
२. मूग, मटकी वगैरे घालायची असल्यास केळफुलाबरोबर न शिजवता वेगळं शिजवावं. आणि एखादी शिट्टीच पुरे. नाहीतर भाजीचा गचका होईल.

माहितीचा स्रोत: 
आई

वाटण लावून फ्लॉवरची भाजी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ह्या भाजीची पूर्वतयारी आधीच करून ठेवली तर ती फक्त ५ मिनिटांत होऊ शकते. परंतु जर मुळातून सुरूवात करायची असेल तर किमान अर्धा तास लागतो.

फ्लॉवर - पाव किलो
लोणी - १ चमचा
मीठ, मिरपूड, किसलेले आले - चवीनुसार

वाटणासाठी :

कांदा बारीक चिरून - अर्धी वाटी
दोन मध्यम आकारांच्या टोमॅटोंची उकडून केलेली प्यूरी
सुके खोबरे - किसून - १ वाटी (कांद्याच्या दुप्पट)
लाल तिखट - चवीनुसार

वरून पेरायला :

बारीक चिरलेली कोथिंबीर (हवी असल्यास)

क्रमवार पाककृती: 

कांदा व खोबरे वेगवेगळे परंतु कोरडेच भाजून घ्यावे. व्यवस्थित भाजले गेल्यावर गार करावे. टोमॅटोची प्यूरी काढून घ्यावी. मिक्सरमध्ये भाजलेला कांदा, खोबरे, टोमॅटो प्यूरी व चवीनुसार तिखट घालून मऊ वाटून घ्यावे. हे झाले वाटण तयार.

फ्लॉवरचे तुरे काढून तो किसलेल्या आल्यासोबत प्रेशर कुकरमध्ये उकडावा. दोन शिट्ट्या पुरतात. उकडलेला फ्लॉवर मीठ, मिरपूड चोळून ठेवावा.

पॅनमध्ये लोणी गरम करावे. त्यात तयार वाटण घालून झटझट परतावे. फार परतू नये. त्यात फ्लॉवरचे मीठ-मिरपूड चोळलेले तुरे घालून ते व्यवस्थित मिसळावेत. तुर्‍यांना वाटण व्यवस्थित लागले आहे असे दिसले की गॅस बंद करावा. हवी असल्यास वरून चिरलेली कोथिंबीर पेरावी.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी
अधिक टिपा: 

ही भाजी अंगासरशी, कोरडीच होते व चवीला सौम्य लागते.

** वाटणाचे घटक बदलून, परंतु ह्याच पध्दतीने वेगळ्या रंगाची/ चवीची भाजी करता येईल. फ्लॉवर ऐवजी बटाटाही वापरू शकता. फक्त तो उकडताना किसलेल्या आल्यासोबत उकडायची गरज नाही.

*** हिरवे वाटण करायचे झाल्यास त्यात कोथिंबीर, मिरच्या, आले, कढीपत्ता (हवा असल्यास) भाजलेल्या खोबर्‍यासह बारीक करता येईल. लाल वाटणात टोमॅटो प्यूरी, भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे व लाल तिखट घालता येईल. दोन्ही वाटणे वेगवेगळी लोण्यावर परतून त्यात मीठ-मिरपूड चोळलेले फ्लॉवरचे उकडलेले तुरे / बटाट्याचे तुकडे घालता येतील. पानात वाढताना दोन्ही रंगांच्या भाज्या एकत्रित करता येतील.
तसेच कांदा न घालता देखील फक्त टोमॅटो प्यूरी, भाजलेले सुके खोबरे व तिखट घालून हे लाल वाटण बनविता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई व किचनमधील प्रयोग

भाजीबाजार

भाजीबाजार

भाजीबाजारात जाणे हे माझ्यासाठी एक आनंदनिधान असते. भाज्यांचा मी शौकीन आहे
असे म्हणालात तरी चालेल. मुंबईच्या बाजारात जितक्या भाज्या मिळतात, मग त्या
हंगामी का असेनात आमच्या घरी आणल्या जातातच.
अफ़िम कि सब्जी (खसखशीच्या पानाची भाजी ) सारखी एखादीच भाजी असेल, जी मी
अजून एकदाही खाल्लेली नाही. अगदी लहानपणापासून आईने मला भाजीबाजारात पाठवायला
सुरवात केली. त्यामूळे भाज्या कश्या निवडाव्यात, याचे तंत्र चांगलेच जमले. भाव मात्र मी
सहसा करत नाही, पण माझ्याकडे बघून अनेक भाजीवाले मला आपणहून चांगला भाव
देतात हे मात्र नक्की.

खमंग भेंडी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली
२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका
३. शेंगदाणेकूट पाव वाटी
४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)
५. २ आमसुले.
६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)
७. फोडणीचे सामान, तेल.
८. लाल तिखट १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टीस्पून, गोडा मसाला १ टीस्पून. मीठ, साखर चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२. फोडणीतच आमसूल, लसूण तुकडे, कांदा घाला.
३. कांदा परतून गुलाबी होत आला की त्यात दाण्याचंकूट घाला. चमचाभर कूट बाजूला ठेवा.
४. कूट नीट परतून घ्या. बाजूने थोडं तेल सुटायला लागलं की भेंडी घाला.
५. मोठ्या आंचेवर भेंडी हळूहळू परता, आणि उरलेलं कूट घाला.
६. भेंडी थोडी परतून झाली की मग तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला आणि साखर घाला. चाट मसाला/ आमचूर पावडर घाला.
७. सर्वांत शेवटी मीठ घालून, झाकण न ठेवता भाजी खरपूस परतून शिजवून घ्या.

आणि सोबत फेटलेलं दही आणि लिंबू लोणच्याचा खार! स्मित

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी.
अधिक टिपा: 

खरं तर भेंडीच्या भाजीची पाकृ ती काय द्यायची असा विचार करत होते. पण भारतात जशी छान भेंडी मिळते तशी इथे प्रत्येकच वेळी मिळेल असं नाही. पूर्वी ३-४ वेळा मी केली ती फारच गोळा भाजी झाली होती. अरेरे
एकदा पटेलमधून भाजी घेताना इंटरनॅशनल हॉटेलमधे असलेला एक देसी शेफ भेटला आणि त्याने मला एक रेसिपी सांगितली भेंडीची. त्यात मी माझी भर घालून हा प्रयोग केला. इतर वेळी भेंडी खमंग व्हायला फोडाणीत तेल जरा जास्त घालावं लागतं, पण या भाजीत नेहेमीसारखं तेल पुरतं. दाण्याचं कूट फोडणीत घातल्यामुळे कमी तेल + खमंगपणा हे दोन्ही होऊन जातं. हा माझा शोध. स्मित

यात तिखटाच्या आवडीनुसार धने-जिरे/ तिखट कमी-जास्त करता येईल.

माहितीचा स्रोत: 
पटेलमधे भेटलेले शेफ महाशय, स्वतःचे प्रयोग.

ओरिसा: छुईं आळू पोटळं भजा (फोटोसहित)

0

मागची आळूपोटळं तरकारी अजुनतरी कोणी करुन बघितलेली दिसत नाही. ते बहुधा भयापोटी असावे. पण ते तोंडली परवर कन्फ्युजन मुळे असावे असे मानायला मला वाव आहे. म्हणुनच आज दुसरी रेसिपी टाकते आहे. अर्थातच हि रेसिपीही माझी नाहीच. मात्र नवर्‍याच्या शिकवण्याबर हुकुम हि रेसिपी मी करते. (म्हणजे भलतीच सोपी असणार बघा!)

छुईं आळू पोटळं भजा (फोटो नंतर देईन)

छुईं - शेवग्याची शेंग
आळू - बटाटा
पोटळं - परवर

मज्जिगे हुळी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोहळ्याचे चौकोनी तुकडे दोन कप
अर्धा कप ओले खोबरे
४-५ हिरव्या मिरच्या
१ चमचा च डाळ, १ चमचा तीळ, १/२ चमचा जिरे
.अर्धी वाटी घट्ट दही - जरासे आंबट असावे.
फोडणी साठी मोहरी, हिंग , सुक्या मिरच्या कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

कोहळ्याचे तुकडे, हळद मीठ घालून थोड्या पाण्यात शिजत लावावेत.

चमचाभर खोबरेल तेलात मिर्च्यांचे तुकडे परतून घ्यावेत. मिर्च्या बाजूला काढून च डाळ, तीळ व जिरे परतून घ्यावे.

मिरच्या व खोबरे बारीक वाटावे. शेवटी च डाळ, जिरे व तीळ घालून ३० सेकंद वाटावे.
कोहळा शिजला की वाटण व दही घालावे. लागेल तसे मीठ घालावे. एखादी उकळी येऊ द्यावी, दही घातल्यावर फार उकळू नये.
आवडत असल्यास खोबरेल, नाहीतर साध्या तेलावर मोहरी , हिंग हळद , सुक्या मिरच्या, कढीपत्ता यांची फोडणी करून भाजीत ओतावी.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

कोहळा, तवशे, मोठी काकडी इत्यादी ( कोकणीत उदुकुळी - पाणीदार ) भाज्यांचा हा टिपिकल प्रकार. दुधी, झुकिनी, स्क्वाश वगैरे घालून पण करता येईल.

मज्जिगे म्हणजे ताक, पण या भाजीत दहीच घालतात, तरी मज्जिगे हुळी का म्हणतात कोण जाणे !

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

मिर्चीवाले पनीर

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर : २०० ग्रॅम
हिरव्या मिरच्या पेस्ट करून : ८-१० (कमी घेतल्या तरी चालतील)
लाल सुक्या मिरच्या भिजवून पेस्ट करून : २-३
कांदे : २ बारीक चिरून
टोमॅटो : २ बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट : १ ते २ टीस्पून
गरम मसाला : १ टीस्पून
जिरे : १ टीस्पून
तेल : २ टेबल स्पून
हळद : अर्धा टीस्पून
मीठ : चवीप्रमाणे
कोथिंबीर, लिंबाच्या फोडी वरून सजवायला.

क्रमवार पाककृती: 

पनीरचा झणझणीत काहीतरी प्रकार करावा असे बर्‍याच दिवसांपासून डोक्यात होते. काल रात्री माझ्या रेसिपीज उतरवून घेतलेल्या वहीत सात-आठ महिन्यांपूर्वी आंतरजालावरून उतरवून घेतलेली एक तिखट झणझणीत पनीर रेसिपी सापडली. आज तीच करून पाहिली. मस्त झाली होती. अगदी नाकाडोळ्यांतून पाणी काढण्याइतपत! फिदीफिदी

कृती :

तेलावर जिरे तडतडवा. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या व सुक्या मिरच्यांची पेस्ट घालून परता. नंतर कांदा घालून तो गुलाबीसर होईपर्यंत परतत रहा. टोमॅटो घालून पुन्हा परता. तेल सुटू लागेल. पनीरचे तुकडे, हळद, गरम मसाला, मीठ घालून परता. आवश्यक वाटले तर थोडे पाणी घाला. मंद आंचेवर आठ-दहा मिनिटे शिजू द्या. वाढताना वरून कोथिंबीर पेरा, लिंबाच्या चकत्या/ फोडी सोबत ठेवा. ही भाजी अंगासरशी होते. पोळी/फुलका/पराठा/पुलावाबरोबर छान तोंडीलावणे.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चारजणांसाठी
अधिक टिपा: 

- मिरच्यांचे प्रमाण कमी करता येईल. किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट न करता त्या उभा छेद देऊन वापरता येतील.
- फार तिखट वाटले तर थोडे पाणी/ दही घालून चव अ‍ॅडजस्ट करता येते.
- मूळ कृतीत व्हेरिएशन करायचे तर ह्या भाजीत सिमला मिरचीही वापरता येईल.
- सोबत पाण्याचा ग्लास ठेवायला विसरू नका. डोळा मारा

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल

केळे वांगे भाजी - फोटोसहित

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो बारिक लांबट वांगी,
३/४ छोटी अर्धवट पिकलेली केळी,
४ मोठे कांदे,
१ टेबलस्पून तयार दाबेली मसाला (किंवा कुठलाही आवडता मसाला किंवा लाल तिखट + थोडा गरम मसाला )
अर्धा कप काजू किंवा तेवढेच दाण्याचे जाडसर कूट,
बारिक चिरलेली कोथिंबीर, मूठभर.
१ ते २ टेबलस्पून गूळ किंवा साखर,
३ टेबलस्पून तेल,
मीठ, थोडा खडा गरम मसाला (अख्ख्या वेलच्या ३/४, मिरिदाणे २/३, दालचिनीचा छोटा तूकडा )

क्रमवार पाककृती: 

१) वांगी भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घ्या आणि मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. वांगी फार लांब असतील, तर त्याचे आडवे दोन तूकडे करा.
२) कांदा किसून घ्या. त्यात मसाला, सर्व घटकांना लागेल तेवढे मीठ, गूळ वा साखर, कोथिंबीर आणि अर्धे तेल मिसळून घ्या. वापरत असाल तर दाण्याचे कूटही यात मिसळा.
३) वांगी निथळून घ्या.
४) आचेवर ठेवण्याआधीच, एका पॅनमधे उरलेले तेल घ्या. त्यात खडा मसाला (वेलच्या जरा ठेचून ) पसरून घाला. आता मसाल्याला पाणी सुटले असेल तो थोडा थोडा वांग्यात भरा व वांगी पॅनमधे रचा.
५) त्यावर केळ्याच्या चकत्या टाका. वेळ असेल तर केळ्याचेही तूकडे करून, त्यात मसाला भरा.
६) उरलेला मसाला व त्याला सूटलेले पाणी त्यावर ओता.
७) पॅनला घट्ट झाकण लावून मंद आचेवर ठेवा.
८) वीस मिनिटांनी हलक्या हाताने भाजी ढवळा, रस आटला असेल तर थोडे पाणी घाला.
९) काजू वापरत असाल तर आता टाका.
१०) झाकण न ठेवता थोडा वेळ शिजवा.
११) खमंग वास सूटला आणि वांगी शिजली कि आचेवरुन उतरा.
१२) चपाती वा वरण भाताबरोबर हि भाजी चांगली लागते.

हा फोटो आहे, भाजी शिजायला ठेवण्यापूर्वीचा

आणि हा आहे, भाजी शिजत असतानाचा (यानंतरपण थोडा वेळ भाजी शिजचली )

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

दावेली मसाल्याला छान स्वाद असतो पण त्यातल्या लवंगांमूळे तो जरा उग्र वाटतो. केळी वापरल्याने त्याचा उग्रपणा जातो.
आमच्या नाताळ पार्टीसाठी केली होती. आवडली सगळ्यांना.