वैदर्भीय

वांग्यांच कच्चं भरीत

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. २ ते ३ जांभळी, पांढरी भरताची वांगी. (फोटो लवकरच टाकेन)
२. २ पातीचे कांदे, पातीसकट बारीक चिरून
३. १ वा २ हिरवी मिरची, चिरून
४. हवा असल्यास एखादा टमाटो
५. हिरवे मटार
६. कोथिंबीर
७. तेल, मीठ, मोहरी, हवी असल्यास हळद, लाल तिखट

क्रमवार पाककृती: 

१. वांगी स्वच्छ धूवून, कोरडी करावीत. सुरीने टोचे मारून, तेलाचा हात लावून गॅसवर वा असल्यास निखार्‍यांवर भाजावीत. टमाटो घेतला असल्यास तो सुद्धा भाजावा (टोचे मारून).
२. वांगी जरा थंड झाल्यावर, साल काढावे. वांग्याला सुटलेलं पाणी सुद्धा घ्यावे. जाडसर मॅश करावे. टमाटो असेल तर, साल काढून बारीक चिरावा.
३. हे सगळं एका मोठ्या बाऊल मधे घ्यावे
४. पातीसकट बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी.
५. मटार घालावेत. मीठ घालावं. व्यवस्थित एकत्र करावं
६. आता जरा जास्त तेलाची फोडणी करावी. मोहरी, मिरच्या घालाव्यात, हवं असेल तर, हळद, लाल तिखट घालावं. ही फोडणी भरतावर ओतावी. छान कालवून घ्यावं. भरीत तयार आहे. गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर वा लोणी + बाजरीच्या भाकरीबरोबर हाणावं!

वाढणी/प्रमाण: 
भरपूर! कारण पातीचा कांदा जनरली कोणी खात नाही तो यानिमित्ताने खाल्ला जातो. थंडीतच या वांग्यांना चव असते, त्यामुळे जरूर करावं.
अधिक टिपा: 

मी कधी मुंबईत असली वांगी पाहीली नाहीत, आता आईला विचारून फोटो मागवीन आणि मग टाकीन! बहुदा पुण्यात मिळावीत... बट आय अ‍ॅम नॉट शुअर! अरेरे

माहितीचा स्रोत: 
आई, आजी.

भोपळ्याचा कोरोडा

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल / तांबडा भोपळा सालासगट, किसून साधारण ५ वाट्या
३ हिरव्या मिरच्या - चिरून
७-८ लसूण पाकळ्या
दोन पेरं आल्याचा तुकडा
भरपूर कोथिंबीर
पळीभर तेल
हिंग
मोहरी
हळद
तिखट
मीठ
धणेपूड -चमचाभर
डाळीचं पीठ - वाटीभर.
भाजलेल्या तीळ-दाण्याचा कूट (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

*तेलाच्या फोडणीत आधी चमचाभर कीस घालून त्यावर आलं लसूण वाटणाची गोळी आणि हिरव्या मिरच्या घालून परतायचं.
* वाटणाचा ऊग्र वास गेल्यावर यात हळद, तिखट, मीठ आणि धणेपूड घालून पुन्हा परतून घ्यायचं.
* (तीळ-शेंगदाणे कूट घालायचा असेल तर तो आता घालायचा.)
* उरलेला कीस घालून पुन्हा एकदा व्यवस्थीत परतून कीस-मसाले मिसळून घ्यायचे.
* झाकण न ठेवता भोपळा शिजून द्यायचा. सुटलेलं पाणी आटू द्यायचं.
* भोपळा शिजला की यात आता डाळीचं पीठ भुरभुरवून एकत्र करायचं.
* पुन्हा एकदा झाकण न ठेवता दणदणीत वाफ येऊ द्यायची.
* कोथिंबीर घालून १-२ मिनिटं परतलं की कोरोडा तयार.

bhopaLyacha-koroDaa-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांपुरता
अधिक टिपा: 

* मीठ घालताना जपून घालायचं. कारण भोपळ्याचा कीस शिजून अर्धा होतो आणि न शिजलेल्या किसाच्या अंदाजानं मीठ घातलं तर खारट होऊ शकतं.

* डाळीचं पीठ आधी खमंग भाजून घेतलं तर चांगली चव येते. पण भाजलं नाही तरी बिघडत नाही.

* भोपळा मुळातच गोड असल्यामुळे यात जराही साखर-गूळ घालायची गरज नाही.

*भोपळा अती गोड असेल तर वरून जरासं लिंबू पिळावं किंवा आमचूर पावडर घालावी

माहितीचा स्रोत: 
आई

भरली ढेमशी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो कोवळी ढेमशी
२. कांदा - एक मोठा
३. लसूण - सहा पाकळ्या
४. आलं - अर्धा इंच
५. सुक्या खोबर्‍याचा कीस - दोन चमचे (भाजलेला)
६. भाजलेले तीळ - दोन चमचे
७. जिरेपूड - एक लहान चमचा
८. धणेपूड - एक लहान चमचा
९. लवंग - ४
१०. वेलदोडा - दोन (सालासकट)
११. कोथिंबीर - अर्धा वाटी
१२. गूळ
१३. आमचूर
१४. तेल
१५. मीठ
१६. तिखट

क्रमवार पाककृती: 

१. ढेमशी धुऊन, त्यांची देठं काढून घ्या. ढेमशी मोठी, आणि जरा जून असतील तर सालंही काढावीत. नंतर चमच्याने आतला गर काढून घ्यावा. थोडा गर ढेमशांमध्ये राहू द्यावा. बिया असतील तर त्या टाकून द्याव्यात. गर मात्र राखून ठेवावा.
२. कांदा बारीक चिरावा. किंचित तेलावर तो गुलाबी परतावा.
३. थोड्या तेलावर आलं, लसूणही परतून घ्यावं.
४. लवंग आणि वेलदोडे भाजून घ्यावेत.
५. परतलेला कांदा, आलंलसूण, खोबर्‍याचा कीस, तीळ, लवंग-वेलदोडे, कोथिंबीर, धणेजिर्‍याची पूड, चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ, आमचूर आणि ढेमशांतला गर एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
६. हे सारण ढेमशांमध्ये भरावे.
७. कढईत नेहमीपेक्षा जरा जास्त तेल गरम करावे. उरलेलं वाटण तेलात परतावे.
८. वाटणाला तेल सुटलं की त्यात ढेमशी घालावून थोडा वेळ परतावीत.
९. नंतर भाजीत पाणी घालून कढईवर ताट ठेवून शिजवावी.
१०. भाजी शिजत आली की त्यात थोडं हिंग आणि हवा असल्यास अर्धा लहान चमचा गरम मसाला घालावा.
११. भाजी शिजली की वरून कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. ढेमशी शक्यतो कोवळी घ्यावीत. जून ढेमशी लवकर शिजत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई

गव्हाच्या पिठाचे गोड आयते -- खास लहान मुलांसाठी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) साखर अर्धा वाटी
२) गव्हाचे पिठ एक वाटी
३) पाणी - ४ वाट्या
४) तूप - २ चमचे
५) वेलची - एक

अन्य - धारदार सराटा, खोलगट पातेले, पळी छोटीवाली

क्रमवार पाककृती: 

१) साखर, पिठ आणि वेलची एकत्र बिगरपाण्यानीच आधी एकजीव करायची.
२) पिठामधे खळ करुन त्यात एक एक वाटी पाणी सोडायचे आणि पिठ फेटायचे.
३) पिठ अर्धा तास तसेच ओले ठेवायचे आणि डोस्याच्या पिठा इतपत पातळ झाले का ते न्याहाळायचे. घट्ट पिठ झाले असेल तर आणखी पाणी ओतायचे.
४) तव्याला समांतर तूप पसरवायचे फक्त आयते चिकटायला नकोत म्हणून.
५) तवा तापला की वाटी अथवा पळीने पातळ पिठ तव्यावर ओतायचे. गोलसर आकार आपोआप येतो. त्याला हात लावायचा नाही. आपोआप जसे पडेल तसेच राहू द्यायचे.
६) आच खूप जास्त नाही ना याची खात्री बाळगून घ्यायची. जेणेकरुन आयते जळणार नाहीत.
७) सराट्याची धारदार बाजू तूपात बुडवायची. आयत्याला छिंद्र पडायला लागले की आयते इकडून तिकडे उलटायचे. लगेच ३० सेकंदानी ताटामधे ठेवायचे.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक १० एक होतील.
अधिक टिपा: 

साखर विरळायला हवी.
तूप जळायला नको.
पाणी फार गार नको.
भरड साखर उत्तम.
वेलची नंतर काढली तरी चालते. फक्त स्वाद उतरायला हवा.

माहितीचा स्रोत: 
आईची खास कृती.

फणसाची रस्सा भाजी

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी-
अ.
१ वाटी सुकं खोबरं
१ इंच दालचिनीचा तुकडा
४-५ लवंगा
५-६ मीरी दाणे
एक चमचा जीरे

ब.
२ वाटी कोथिंबीर
आलं-लसुण पेस्ट १ ते ११/२ चमचा
एक मध्यम कांदा भाजलेला

१/२ वाटी तेल
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
१ चमचा गरम मसाला
तिखट, मीठ आवडीनुसार
तेजपान २-३
२ ते २१/२ वाटी पाणी
अर्धा छोटा फणस चिरुन

क्रमवार पाककृती: 

फणस चिरणे जरा अवघड काम असते. विळी आणि हाताला तेल लावतात, पण मला इथे मिळालेला फणस बिलकुल चिकट नव्हता. बिया असतिल तर त्याचं कव्हर काढुन टाकायचं.
हा चिरलेला फणस


क्रमांक 'अ' मधील गोष्टी भाजुन घ्याव्यात आणि गार झाल्यावर मिक्सरमधुन बारीक करुन घ्याव्यात. आता त्याच भांड्यात 'ब' मधील जिन्नस टाकुन बारीक पेस्ट शक्यतो पाण्याशिवाय करुन घ्यावी.

आता कुकरमधे तेल तापऊन त्यात तेजपान, कांदा परतुन घ्यावा. कांदा ब्राऊन झाला की त्यात पेस्ट परतुन घ्यावी, तिखट, मीठ, हळद घालावी. तेल सुटले पाहिजे.

आता त्यात चिरलेला फणस चांगला परतुन घ्यावा, गरम मसाला घालावा आणि पाणी घालावा.

२ शिट्ट्या करुन घ्याव्या. भाजी तयार.

वाढणी/प्रमाण: 
४-५ माणसे
अधिक टिपा: 

ह्याची ग्रेव्ही ब्राऊन होते. हिरवी पाहिजे असल्यास तिखटाएवजी हि.मिरची घालणे आणि कोथिंबीर अजुन जरा जास्त. ग्रेव्ही लाल भडक पाहिजे असल्यास कोथिंबीर न घालता धने घालणे. शिट्ट्या जास्त झाल्यास जास्त शिजलेली भाजी चांगली लागत नाही. टीनधला फणस पण वापरता येईल पण परत मग कुकरमधे शिजवायची गरज नाही.

माहितीचा स्रोत: 
बेसिक रेसिपी सासुबाई, माझे त्यात बदल.

लसणीचे ति़खट

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी सोललेला लसूण
पाव वाटी तिखट
पाव वाटी तेल
चवीला मीठ

क्रमवार पाककृती: 

सोललेल्या लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करायचे.
तेल तापवायचे त्यात ते तुकडे टाकायचे.
खरपूस लाल तळायचे.
गॅस बंद करायचा. पाच मिनिटांनी अजून तेल गरम असताना त्यात तिखट घालायचे.
चवीप्रमाणे मीठ घालायचे. एकत्र करायचे. मग गरम वरण भात नाहीतर गरम पोळी नाहीतर भाकरी बरोबर खायचे.
हे तिखट १०-१२ दिवस टिकते.

वाढणी/प्रमाण: 
कोण किती तिखट खात त्यावर अवलंबून आहे.
अधिक टिपा: 

खाताना यावर लिंबूरस पिळून घ्यावा.

माहितीचा स्रोत: 
एक खानदेशी मैत्रीण

रावण पिठले

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी नारळाचा चव, १ वाटी लसुण, १ वाटी गोडेतेल, १ वाटी तिखट (होsssय १ वाटीच), २ वाट्या पाणी, १ वाटी कोथींबीर बारीक चिरुन, मीठ चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

लसुण, तेलाशिवाय वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे. तेलात हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्यात लसुण चांगला लाल होईतो परतुन घ्यावा. मग वरील मिश्रण घालावे. नीट हलवुन झाकण घालुन शिजवावे. अगदी वड्या पडण्या सारखे नाही पण जरा घट्टसर पिठले होते.

वाढणी/प्रमाण: 
२ साधारण खाणारी मोठी माणसे (बहुतेक)
अधिक टिपा: 

ही मला माहिती असलेली रावण पिठल्याची कृती. हा कोल्हापुरी प्रकार आहे असे ऐकुन आहे. इथे लय कोल्हापुरी बाया-बापे हायेत. त्यांनी कृपया डोळ्यांखालुन घालावी. मी काही सुगरण नाही. त्यात नवर्‍याने पिठले कायम मेसमधे खाल्लेले. त्यामुळे मी लग्नानंतर पहिल्यांदाच हे पिठले केले तर त्याने स्वतःसाठी चिकन मागवले. चवीसाठी म्हणुन एक घास खाल्ला आणि चिकन बाजुला ठेवुन पिठल्यावरच ताव मारला स्मित

माहितीचा स्रोत: 
माझे बाबा

डाळ वांगे

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांगी , डाळ , मसाला , धने जीरे पूड, कांदा, आले , हळद , लाल मिर्ची , लाल तिखट , लसूण, हिंग

क्रमवार पाककृती: 

डाळ वांगं विदर्भात माझ्या सासरी अजुन वेगळ्या पध्दतीने करताना पहिलय .
कुकर मधे वांगी आणि डाळ एकत्र तेलावर परतून घेतात .
त्यात मसाला , धने जीरे पूड आणि परतलेला कांदा पण घालतात .
मग त्यात पाणी , किसलेले आले आणि हळद घालून कुकर मधे दोन ते तीन शिट्ट्यां पर्यंत शिजवतात आणि नंतर वरून लाल मिर्ची , थोडे नुसते लाल तिखट , लसूण आणि हिंगाची फ़ोडणी देउन serve करतात .
यात वांगी जरा जास्त मऊ होतात पण दाल आणि वांगी एकत्र शिजवल्याने स्वाद छान येतो .
त्यांचा काळ्या मसल्या सारखा वाटणारा मसाला पण बर्‍या पैकी strong असतो , यात इतर मसाल्यां बरोबर star anis, बडी इलायची वगैरेही असते .

छान लागते ही पण डाळ वांग्याची recipe.

वाढणी/प्रमाण: 
माहित नाही
अधिक टिपा: 

मसाला करताना तेलावर नुसता परतत नाहीत तर deep fry करून घेतात सगळे आणि मग mixer मधून काढतात .

माहितीचा स्रोत: 
सासरची पद्धत

मुगाचं बिरडं

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी कडधान्य (मुग, उडिद किंवा चणे), मोड आणून सोलून
हळद चिमुटभर
तिखट अर्धा चमचा
मीठ
१ पळी तेल
हिंग
१ छोटा कांदा
आलं, लसूण, हिरवी मिरची, ओला नाराळ एकत्र वाटून. (नारळ्: वाटून १डाव होईल इतपत आणि आलं लसूण १ TBsp , हिरव्या मिरच्या तिखट जसं हवं त्या प्रमाणे)
कोथिंबीर्-धूउन चिरलेली
गरम मसाला (घरी असेल तो घालावा. वेगळा करून वाटायला नको)
आंबटपणाला टोमॅटो. (नसल्यास कोकम. पण चिंच किंवा कैरी नको)

क्रमवार पाककृती: 

तेल तापवून हिंग घालावा.
चिरलेला कांदा आणि सोललेलं कडधान्य घालावं
कांदा पारदर्शक झाला की हळद तिखट मीठ घालून परतावं.
यावर आलं लसूण मिरची खोबर्‍याची गोळी घालावी.
भरपूर कलसल्यावर आधणाचं पाणी घालावं. (साधारण अडीच वाट्या)

वाढणी/प्रमाण: 
१ माणसापुरती
अधिक टिपा: 

** उकळी आल्यावर टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी.
कडधान्य मऊ शिजेपर्यंत बिरडं ताटली ठेवून उकळू द्यावं.

माहितीचा स्रोत: 
आईची पध्दत