कालगंगा

साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे

Submitted by शेळी on 16 August, 2012 - 12:40

साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे
धुमसत्या देशास पाहुन गोठले स्वातंत्र्य हे

कैद होता प्राणपक्षी नश्वरी पिंजर्‍यामध्ये
बद्ध जीवा काळरूपी लाभले स्वातंत्र्य हे

बैलबाजारात बसला लोकशाहीचा वळू
'पांढरे' गेले तरी ना भेटले स्वातंत्र्य हे

पिक्चर अभी बाकी है.... Proud

तोवर तरही घ्या.

काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो --- तरही

Submitted by शेळी on 6 August, 2012 - 12:26

काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत अश्रू ढाळतो

वाट पाहूनी तुझी सुकली फुले ही येथली
पानगळतीचा ऋतू निर्लज्ज होउन लांबतो

पिंपळाची पानगळती बघुन मी आक्रंदतो
माणसाच्या जीवनी ना बहर फिरुनी जागतो

रोज नूतन नित्य मुखडा जीवनाने बसवला
आरशातिल मी मला दुसराच कोणी भासतो

कालचे आयुष्य सरले आजचेही चालले
काळ होतो व्याध मी शेळीप्रमाणे चालतो

दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते (तरही)

Submitted by शेळी on 1 August, 2012 - 13:51

दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते
हास्य क्षणभंगूर असते दु:ख कायम साचते

दूर तू गेलीस हे मी आजही ना मानतो
माझिया श्वासात तूझे रोज पैंजण वाजते

फल धरावे याजसाठी भ्रमर तो बोलावला
पण फुलांची पाकळी मग का उगाचच लाजते

भाग्य सार्‍या मानवांचे मनगटातच साठले
माणसांची व्यर्थ दृष्टी पत्रिकेला वाचते

रेशमाचा गोड धागा प्रेमबंधी बांधला
दु:ख त्याचे त्यास ठावे ते जयाला काचते

प्रेरणा

जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

Submitted by जागो मोहन प्यारे on 10 May, 2012 - 05:57

धावत्याला जोश येई आणि रस्ता सापडे
पण दुतर्फा बोचकरण्या का उभी ही माकडे

दाबिता कळ काम होई अंगवळणी हे पडे
दहनही माझे विजेवर ना चिता ना लाकडे

काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे

जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

वासनांचा खेळ सारा या इथे अन त्या तिथे
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे

गुलमोहर: 

माझिया गझलेस लाभो शारदेची सावली

Submitted by जागो मोहन प्यारे on 8 May, 2012 - 14:47

गालिबाच्या संगतीने कालगंगा धावली
माझिया गझलेस लाभो शारदेची सावली

राबतो दिनरात पण उपवास ना हा संपतो
आमुच्या कांद्या मुळ्याना भाव चवली पावली

दाटला अंधार संगे पश्चिमा काळोखली
सांजवातींची दिवाळी काजव्याने लावली

चालताना ठेचकाळुन कैक वेळा वाकलो
पण सुखांचा मार्ग आला आज माझ्या पावली

यौवनामागून आली शुभ्रकेशी ही जरा
पाहते परकेपणे मज अडगळीतुन भावली

गुलमोहर: 

प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे

Submitted by जागो मोहन प्यारे on 8 May, 2012 - 05:02

प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे
जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे

रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका
पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे तुझे

अमृताचा कुंभ तव अधरांवरी का सांडला
अन तयाला रक्षण्या नजरेतुनी डसणे तुझे

सांज येता क्षीण होई हा मनाचा पारवा
ये उभारी त्यास जेंव्हा बरसते हसणे तुझे

मंदिरी आणी मशीदी रोज जागर चालला
जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे

गुलमोहर: 

सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

Submitted by जागो मोहन प्यारे on 6 May, 2012 - 04:11

अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी

विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी

भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी

पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली
फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी

पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली
धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी

गुलमोहर: 

बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये

Submitted by जागो मोहन प्यारे on 5 May, 2012 - 16:53

बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये
जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये

जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी
सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये

जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे
बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये

कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया
बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये

बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता
आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये

गुलमोहर: 

जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 14:42

मार्ग सत्याचा खुला आहे समोरी जोवरी
जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
शोधते ती राधिकेला होउनीया बावरी

ती रसोई जानकीची येइ वर धरणीतुनी
नारिच्या नशिबात चूलच सत्य सांगे 'बाबरी'

देउनी किरणे जगाला तो रवी दमला असा
सांज होता तो रथाच्या सप्त वाद्या आवरी

जीर्ण साडी फाडुनी केली तयाची गोधडी
रंग त्याचा उजळला तो बाळ बसता त्यावरी

गुलमोहर: 

आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कालगंगा