माझिया गझलेस लाभो शारदेची सावली

Submitted by जागो मोहन प्यारे on 8 May, 2012 - 14:47

गालिबाच्या संगतीने कालगंगा धावली
माझिया गझलेस लाभो शारदेची सावली

राबतो दिनरात पण उपवास ना हा संपतो
आमुच्या कांद्या मुळ्याना भाव चवली पावली

दाटला अंधार संगे पश्चिमा काळोखली
सांजवातींची दिवाळी काजव्याने लावली

चालताना ठेचकाळुन कैक वेळा वाकलो
पण सुखांचा मार्ग आला आज माझ्या पावली

यौवनामागून आली शुभ्रकेशी ही जरा
पाहते परकेपणे मज अडगळीतुन भावली

गुलमोहर: 

खयाल आवडले, भारी आहेत.

भाव साधा असे सच्चा भक्तिचा फुलला मळा - वृत्त गडबडलेय.

शुभेच्छा!

गझल ठीक ठाक आहे

मला खयाल नीटसे जाणवले नाहीत

कैक वेळा वाकलो ही ओळ अतिशय सुंदर

शुभेच्छा

भाव साधा असे सच्चा भक्तिचा फुलला मळा
नामयाची अन तुक्याची ओवि मजला भावली
.
दाटला अंधार संगे पश्चिमा काळोखली
सांजवातींची दिवाळी काजव्याने लावली
.
चालताना ठेचकाळुन कैक वेळा वाकलो
पण सुखांचा मार्ग आला आज माझ्या पावली

हे विशेष आवडले मात्र वृत्त गडबल्याने दुरुस्ती आवश्यक.

भाव चवली पावली याचा अर्थ न कळल्याने शेर समजला नाही. Happy

चवली पावली ही पूर्वीची नाणी. चार आणे, आठ आणे वगैर. पावली म्हणजे चार आणे. चवलीबद्दल कल्पना नाही.

जिथे वृत्तात गडबड वाटते, तिथे दुरुस्त करेन.

वाह मस्त .........सुन्दर

यौवनाकडून जरेकडे जाताना अडगळीतून पाहणारी बाहुली आणि तिचा गोड अपभ्रंश (भावली) एकदम बालपणात घेवून जातात .......... वाह !!
मस्त खयाल आणि जबरदस्त धक्कातंत्र

एक निरिक्षण : नामयाने , तुकयाने अभंग रचले ..........ओवी ज्ञानेश्वरांनी आणि बहिणाबाईंनी रचली अशी माझी माहिती आहे

तो ओवीचा शेर काढूनच टाकतो. वृत्तही चुकले, मॅटरही चुकला. दुरुस्त करुन मग कधीतरी वापरेन.

( भाव साधा असे सच्चा भक्तिचा फुलला मळा
नामयाची अन तुक्याची ओवि मजला भावली )