प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे

Submitted by जागो मोहन प्यारे on 8 May, 2012 - 05:02

प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे
जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे

रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका
पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे तुझे

अमृताचा कुंभ तव अधरांवरी का सांडला
अन तयाला रक्षण्या नजरेतुनी डसणे तुझे

सांज येता क्षीण होई हा मनाचा पारवा
ये उभारी त्यास जेंव्हा बरसते हसणे तुझे

मंदिरी आणी मशीदी रोज जागर चालला
जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे

गुलमोहर: 

खूप छान! आधीपेक्षा सफाईदार ! उत्तरोत्तर प्रगतीच दिसून येते आहे .

पण कुणा का जाणवेना हॄदयी वसणे तुझे>>> इथे जरा गडबड आहे बहुधा( वैयक्तिक मत!!) [हॄ= किति मात्रा हे नकी माहीत नाही म्हणून मला असे वाट्त असावे कदाचित ]

hRoo ऐवजी hRu असे टाईप करा म्हणजे 'हृ' होईल

Good ! Happy

माझीही तीच शंका होती.. हृ र्‍हस्वच आहे.. पण थोडा दीर्ग उच्चारला तर मात्रा जमतात.. हा दोष टाळायला काही बदल सुचतो का?

hRoo ऐवजी hRu असे टाईप करा म्हणजे 'हृ' होईल

किंवा सरळ "मन्मनी" करा मग काही बघायलाच नको

ओके. Happy

जाणले नाही कसे हृदयामधे वसणे तुझे.... असाही होऊ शकतो

श्वासा, रक्षिण्या, कुणा ...मध्ये शक्यतो शब्दाचे पुर्ण रूप वापरावे...

गझल फुलते आहे.... शुभेच्छा!!!!

मंदिरी मशिदीत नुसता व्यर्थ जागर मांडला
जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे.... हे जास्त योग्य व्हावं (व्याकरण)

बदलले.

बर आता राहुद्या !! नाहीतर बदलता बदलता अख्खी गझल बदलावी लागेल मग मूळ गझल पर्यायी होवून जाईल बिचारी...;)!!

Happy

वैभव, इतका वेळ नाही आहे माझ्याकडे... सहज चर्चा वाचून सुचलेलं लिहलं.
जामोप्या,

मंदिरी मशिदीत नुसता व्यर्थ जागर मांडला
जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे....

आदबीने स्विकारल्या बद्दल आभारीये.. धन्यवाद!!

सांज येता क्षीण होई हा मनाचा पारवा
ये उभारी त्यास जेंव्हा बरसते हसणे तुझे

मंदिरी आणी मशीदी रोज जागर चालला
जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे> >>

आवडले शेर

शुभेच्छा

एका ठिकाणी 'मध्ये' असे झालेले आहे तेथे 'मधे' असे हवे आहे बहुधा

गझल फुलत आहे हे नक्कीच

सगळेच शेर आवडलेत Happy

जामोप्या, नवीन नवीन शिकला आहात असे वाटत नाहीये.
पुलेशु Happy

रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका
पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे तुझे >>> अहाहा!