सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

Submitted by जागो मोहन प्यारे on 6 May, 2012 - 04:11

अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी

विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी

भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी

पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली
फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी

पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली
धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी

गुलमोहर: 

इथे अलामत काय आहे? अढळ, रोज या शब्दातील शेवटचा अ की तारा मारा चारा यातील पहिल्या शब्दातील आ? काफियामध्येच अलामत असतो की त्याच्या आधीच्या शब्दातही असू शकतो?

जामोप्या..... आपला काफिया रदीफ काय असेल हे मतल्यातच.. म्हणजे पहिल्या शेरात स्थापित होतं.तुमचा पहिला शेर आहे..

अंतराळी कालगंगी अढळतारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

शेवटी येणारा जो समान अक्षर समूह आहे त्याला रदीफ म्हणतात... यास्तव तारा बापूजी ही रदीफ झाली.

गझल निर्दोष होण्याकरिता व ''आ'' या अलामतीसह ,तारा,मारा,चारा, हे कफिये होण्याकरिता..,आपण मतल्यातच तारा आणि अजून एक काफिया घ्या.

उदा.,

अंतराळी कालगंगी अढळतारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी द्यावा सहारा बापुजी......... अश्या प्रकारचं काहीतरी. Happy

अढळतारा/ अढळ तारा आणि तारा( इथला "तारा" चा अर्थ वेगळा आहे) हे काफिये ......... बापुजी हा रदीफ सिद्ध होत असल्याने जमीन पक्की आहे असे म्हणायला हरकत नाही असे वाटते

अलामत "आ" अशी कायम राहिली आहे....."अ" ही अलामत अढळतारा या एकाच कफियावर आहे इतर ठिकाणी ती काफियाच्या आधीच्या शब्दावर येते (अर्थात तो प्रत्येक शब्दही स्वरकाफिया म्हणून धरला तर ही जुल्काफिया गझल होते पण अपवाद फक्त "कालगंगी" चाच उरतो! आढळ_तारा अशी फोड केलीत तर जुल्काफिया होवू शकते ही गझल ....)

गझल एकूणच छान आहे ........

डॉ. गायकवाड यांनी सुचवलेला पर्यायही उत्तम आहे ............

फारच उत्तम शेर असेल आणि शब्द बदलता येतच नसेल्,किंवा बदलायचाच नसेल्,तर अपवादात्मकरित्या चालून जाईल.शेवटी आशय आणि आस्वाद महत्वाचा. Happy

अश्या काहीशा स्वरुपाची चर्चा आणि सदानंद डबीर यांचे विचार आपण इथे वाचू शकता.

http://www.sureshbhat.in/node/1322

मी फक्त बापुजी हा रदीफ आणि आधीचे तारा चारा बारा हे काफिये मानून रचना केली.

मतल्यामध्ये तारा हा शब्द दोन्ही ओळीत दोन वेगळ्या अर्थाने आला आहे. त्यामुळे मी तारा हे दोन वेगळे काफिये मानले, रदीफ फक्त बापुजी आहे. हे दोन तारा दोन शेरात देखील वेगळे वेगळे बसवता आले असते. पण रंगत यावी म्हणून मुद्दामच ते मतल्यात टाकले. शिवाय तारा शब्दाने दोन शेर लिहिले असते तर एकात बापुजी हा अढळ तारा आणि दुसर्‍यात बापुजी आम्हाला तारा असा दोन्ही शेरांचा खयाल जवळपास सारखाच झाला असता.

क्ष यांच्या सांगण्यानुसार अढळतारा शब्द फोडून लिहिला.

जागो मोहन प्यारे जी माझ्या म्हणण्याला मान दिलात त्याबद्दल आभारी
आता त्या शेरातली रंगत नक्कीच वाढलीय, तसेच गझलेत द्वियमक असल्याचेही स्पष्ट होतेय
(एक स्वर काफिया + एक "आ' या अलामतीचा = अढळ + तारा ....आम्हास + तारा ...नित्य + मारा ..इत्यादी)

पेटलेल्या हिमाद्रीची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी........... जामोप्या.,पहिली ओळ वृत्तात नाही.

पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा .. / काय सांगावी व्यथा हिमसागराची पेटत्या

असं काहीसं केल्यास वृत्तात येईल.

बदलले

जामोप्याजी : आपला माझ्या "मिसरा असा..........." या रचनेवरचा प्रतिसाद वाचला

क्ष.य.ज्ञ. यांचे म्हणणे पटले

डॉक. साहेबांनी इस्लाह द्यावा हे भाग्याचं लक्षण आहे ...........त्यांनी सुचवलेले बदल आमलात आणा /निदान पुढच्यावेळी लक्षात ठेवाच

जुल्काफियाबद्दल माबोवरची निशिकांतजींची एक जुनी गझल आताच सर्चली त्यात बेफींची एक (प्रतिसादात) आणि इलाही जमादारांची अजून एक(प्रतिसादात) अशा अप्रतिम रचना आहेत त्याही जरूर वाचा (जमादारांच्या गझलेत दोन काफियांमध्ये 'की' असा रदीफ़ासारखा शब्द आहे तोही पाहा :दोन काफियांमध्ये रदीफ कल्पना जरा ऑड वाटेल पण गमतीदार आहे नै !!:))

http://www.maayboli.com/node/25467

राजकुमार व मिल्याने दिलेली माहितीही वाचा .

(बास आजपुरता गृहपाठ जास्त झाला....... बाकी असाच क्लास........ घेउच आम्ही माबोकर!!......... तेंव्हा तयार राहा!!:G Biggrin :खोखो:)

आता त्या शेरातली रंगत नक्कीच वाढलीय, तसेच गझलेत द्वियमक असल्याचेही स्पष्ट होतेय

यमक दोन आलेत. पण जुल्काफिया असेल तर अलामत कुठे असनार? दोन्ही काफियात अलामत हवी का? पहिल्या काफियांमध्ये अलामत मेन्टेन झाली नाहे.

आम्हास , नित्य , कुठुन ... वगैरे... अलामत कुठेच मॅच होत नाही. आणि फक्त शेवटच्या अक्षरातला , त्यातही पूर्ण अक्षर नव्हे, नुस्ता स्वर अ, जुळला तर त्याला काफिया म्हणता येईल का?

वामोप्या ! म्हणजे वाह जामोप्या, फारच छान, आशय, अर्थ या दृष्टीने चांगले जमले आहे.
बाकी तांत्रिक बाबतीत आमचे "काला अक्षर भैंस बराबर" आहे. वर जाणकारांनी काय काय उपाय सांगितले आहेतच.
काही ठिकाणी "हीमालय", "वाजवीती", इ. ठिकाणी शुद्धलेखनाचे योग्य बदल करता येतील.

छान

छान