लाभते सौख्य मित्रा

Submitted by संतोष वाटपाडे on 28 April, 2016 - 01:45

हीच शिक्षा खरोखर मला पाहिजे
की तुझी आठवण यायला पाहिजे...

जीव जाणार नाही गळा कापुनी
घाव पाठीमधे घातला पाहिजे...

आसवांना नशा जर कधी पाहिजे
एकदा दुःखही प्यायला पाहिजे ...

प्रेम आहे तुझे तर दुरुन बोल ना
हात अंगास का लावला पाहिजे?

प्रेत म्हसणात नेले गड्या जाळण्या
ते म्हणे जातिचा दाखला पाहिजे..

लाभते सौख्य मित्रा निखार्‍यात पण
वेदनेचा लळा लागला पाहिजे..

धुंद स्वप्ने नको जडजवाहिर नको
मी भुकेला.. मला खायला पाहिजे...

-- संतोष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा

जातीचा दाखला,वेदनेचा लळा...मस्त!

शेवटचा खयाल चांगला,पण शेर विधानात्मक वाटला!(वै.म.)