व्योमगंगा

पाहतो मी

Submitted by vilasrao on 11 May, 2015 - 03:18

गजल :पाहतो मी

आरसा हा रोज आता तोडण्याला पाहतो मी !
साक्ष आताची खरी ही फोडण्याला पाहतो मी !

कोरलेल्या ह्या कपाळा सोसलेल्या मी नशीबा
'रूप माझ्या वेदनेचे ' खोडण्याला पाहतो मी !

हा दिलासाही नकोसा ना कुणाचाही भरोसा !
तोडलेल्या काळजाला जोडण्याला पाहतो मी !

जीव झोके घेत राह्या दोर कोणी बांधली ही
वंचनेचे खेळणे या पाळण्याला पाहतो मी !

काल येथे वेढलेला झाकलेला घोळक्यांनी
का मलाही एकटा मी सांगण्याला पाहतो मी !

साक्षखोटी चांदण्यांची चंद्रमाही डागलेला
चांदण्याचा मांडवाला मोडण्याला पाहतो मी!

ह्या मनाशी आदळे ही लाटमोठी वादळांची
भावना आता अशाही रोखण्याला पाहतो मी!

घे भरारी

Submitted by तुषार जोशी on 20 January, 2012 - 21:57

बंद झाल्या सर्व वाटा डंख काळाचे विषारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी

टाक मागे व्यर्थ भीती टाक मागे जीर्ण नाती
वादळा ये म्हण निघालो आज मी काढून छाती
सोस तू आघात सारे ठेव कष्टांची तयारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी

गाठ तू ध्येयास ऐसे साधका आदर्श व्हावे
व्हायचे ज्याला यशस्वी हेच त्याने आचरावे
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२० जानेवारी २०१२, ०६:००

गुलमोहर: 

भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 April, 2011 - 07:50

भोवताली आज माझ्या दांभिकांचा गाव आहे
कोण नाही चोर? जो तो भासवी "मी साव आहे!"..

देव तो माझाच होता, माणसांची साथ होती
राहिलो ना तोच मी पण सभ्यतेचा आव आहे...

आरशाला सांगतो मी रोज गोष्टी वंचनेच्या
काळजावर आजही माझ्या पुराणा घाव आहे...

जोडली होती न तेव्हाही कधी नाती सुखांशी
आजही "आहे सुखी मी" हाच खोटा भाव आहे...

सोडले आहे कधीचे माणसांना शोधणे मी
ना कुणाची आस आता, ना कशाची हाव आहे!

विशाल...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - व्योमगंगा