दिला आधार फ़ासाने

Submitted by संतोष वाटपाडे on 13 March, 2016 - 03:42

चिता पेटून गेल्यावर सभा भरणार असते
जिचे सौभाग्य गेले तीच बस रडणार असते...

जुन्या जखमेस गोंजारु नको दररोज इतके
पुन्हा केव्हातरी खपली जखम धरणार असते...

दिव्याचे नाव होते अन उजेडाची प्रशंसा
खरेतर वात तेथे एकटी जळणार असते...

तिला आढ्याकडे बघणे जिवावर येत असते
धन्याची आठवण कारण तिला छळणार असते...

दिला आधार फ़ासाने..किती उपकार झाले!
खरी माणूसकी कोठे अशी मिळणार असते?

किती हे प्रेम निस्वार्थी नदीचे पाहिले का !!
समुद्राला मिठी मारुन नदी मरणार असते..!!

तुझ्या आत्म्यास निर्मळ ठेव बाकी सॊड मित्रा
सभोतीचे कवचतर नेहमी मळणार असते..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या आत्म्यास निर्मळ ठेव बाकी सॊड मित्रा
सभोतीचे कवचतर नेहमी मळणार असते.>>>>> जबरी! खरे तर पूर्ण गझल छान आहे, पण ही ओळ विशेष आवडली.

>>>जुन्या जखमेस गोंजारु नको दररोज इतके
पुन्हा केव्हातरी खपली जखम धरणार असते...>>>क्या बात!

>>>दिव्याचे नाव होते अन उजेडाची प्रशंसा
खरेतर वात तेथे एकटी जळणार असते...>>>बढिया!

>>>तिला आढ्याकडे बघणे जिवावर येत असते
धन्याची आठवण कारण तिला छळणार असते...>>>अहाहा...अप्रतिम सहज,सखोल आर्त!

ईतर शेरही छान! मतला अजून अधिक दमदार मांडता येईल कदाचित तुम्हाला,असे वाटून गेले!
अभिनंदन,शुभेच्छा!