मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश
भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.