आम्ही सार्या चंद्रसख्या
अनुराधाकडे आज संध्याकाळी, सगळ्याजणी जमणार होत्या. अनुची गडबड सकाळपासूनच सुरु झाली. स्वत:च्या रेशमी केसांना शिकेकाई लावून मस्त आंघोळ करुन, आख्खा दिवस घर आवरण्यात गेल्यानंतर साधारण उत्तरदुपारी, सुंदरसा प्रसन्न पेहराव तिने केला. आणि सख्यांची वाट पहात ती सौधावर जरा वारा खात ऊभी राहीली न राहीली तोच तिला अश्विनी लगबगीने येताना दिसली. काय डौल होता तिच्या चालण्यातही. नखशिखान्त चैतन्य शक्तीने ओतप्रोत अशी, उत्साही अश्विनी नेहमीच सर्वांच्या आधी येत असे. उमदं सौंदर्य ल्यालेल्या तिने , अनुला खालूनच हात करुन अभिवादन केले व झपाझप, पायऱ्या चढत ती येती झाली. "ये गं आशु. बरं झालं वेळेवर आलीस.