"नक्षत्र"

Submitted by poojas on 4 February, 2014 - 02:17

संपलेच केव्हा सारे निघताना कळले होते
मी तुझ्याच शब्दाखातर माघारी वळले होते..

तू म्हणता 'थांब जराशी', चुकला ह्रदयाचा ठोका
जे उरी गोठले अश्रू, तत्क्षणी वितळले होते..

अक्षम्य चुकांचा तेव्हा, मी हिशोब मागू म्हटले
जे गैर समजले गेले, थोडके निवळले होते..

होती जगण्याची बाकी, टळलेल्या काही वेळा
जे विझले होते स्वप्नी, ते दिवे उजळले होते..

वळण्याची टळली वेळ, कळली जगण्याची भाषा
वेगळे न होऊं शकले, ते रंग मिसळले होते..

तू म्हटले विसरू सारे, सुरुवात करु सार्‍याची
भरगच्च नभातून तेव्हा, नक्षत्र निखळले होते ।।

poojaS..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वळण्याची टळली वेळ

आणि

भरगच्च नभातून तेव्हा<<< ह्या दोन ओळीत वृत्त बदलत आहे.

बाकी गझलेतील वितळले, उजळले आणि निखळले हे शेर आवडले. गझलेची भाषा शैली सुरेख व गझलेस साजेशी अशी आहे. (गझल सहसा दोन दोन ओळींत लिहिण्याचा प्रघात पाळला जातो व तसे वाचायला सुलभही पडते).

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

छानच आहे गझल पण गझलेचा एक शेर दोनच ओळीत मांडला जातो ह्यावर विचार करावात

बाकी ..थोडके निवळले होते..ह्या भागात पोचल्यावर समजले की मला हा शेर समजत नाही आहे तो ह्या भागामुळे म्हणून तो भाग जरा बदलून हवा होता अशी स्वतःपुरती अपेक्षा मी केली

पण असो गझल छान आहे विशेष म्हणजे ही मला मुसल्सल जाणवली मला मुसल्सल गझल मध्ये फार मजा येते
असो खूप खूप शुभेच्छा
अजून गझल येवूद्यात Happy

मार्गदर्शना बद्दल धन्यवाद !

पण मला गझलेच्या टेक्निकल गोष्टी नाही समजत. अग्दीच अज्ञानी म्हटल्यास हरकत नाही.
ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा वाचताना गझले सारखी वाटली म्हणून या विभागात पोस्टली.

मला वाटतं माझी जागा चुकली !! बाकी रचनेत सुधारणा करत आहे सुचवल्या प्रमाणे.

वाचताना गझले सारखी वाटली म्हणून या विभागात पोस्टली.

मला वाटतं माझी जागा चुकली !!<<<

दोन ठिकाणच्या मात्रांमधील चुका व दोन दोन ओळी असे न लिहिणे हे सोडल्यास ही टेक्निकली गझलच ठरेल. त्यापैकी मात्रादुरुस्ती आवश्यक आहे, दोन दोन ओळी न लिहिणे ही बाब प्रेझेंटेशनशी संबंधीत ठरावी.

(मार्गदर्शन वगैरे नाही, फक्त मैत्रीखात्यात सुचवले)

मात्रादुरुस्ती बद्दल काही सुचवाल का??

मात्रादुरुस्ती म्हणजे नक्की काय या बाबत कृपया सांगावे ही विनंती.
आणि खरच मार्गदर्शना बद्दल आभारी ! अगदी मनापासून Happy

मात्रा दुरुस्ती म्हणजे काय हे आपणास माहीत नसावे ह्यावर माझा विश्वास बसला आहे म्हणून लिंक देतो ती वाचावीत प्रतिसादही वाचावेत (रग्गड आहेत सावकाशीने वाचावेत )

http://www.maayboli.com/node/21889