नक्षत्रगान

Submitted by निखिल मोडक on 10 November, 2020 - 12:15

कधी मावळावा चन्द्र मृगजळात
कधी डहुळावा डोह माझ्या मनात

यावे वर चांदणे त्याच्यात सांडलेले
एक एक रात्रींचे आपण पाहिलेले

पारधीला जो तू तुझ्या नेत्रबाणे
मृग तो कधी एक नयनी दिसावा

ओलावल्या आपुल्या आठवांनी
आर्द्र अभिषिक्त हुंकार यावा

पुनर्वसू जो तो उमलवी नवी आशा
तो एकदा पुन्हा मनी प्रस्फुटावा

पोसावे तुझ्या स्निग्ध अधरामृताने
बरसावे त्या पुष्य आषाढ घनाने

आश्लेषि घे चंदनी तुझ्या मिठीत
येई सत्वर करी विरहाग्नी शांत

होई मघा जी देई दोही करांनी
संतृप्त करी मज तुझ्या चुम्बनांनी

बरसून गेल्या नभानी रिक्तसे आभाळ
आरक्त पूर्वोत्तरे समान नयन माझे नभाळ

हस्ताचा तुझा आता हात हाती करुण
घनघोर पुन्हा बरसू दे प्रेमे वरुण

जाता परत तू राहू दे मागे चित्रा
मोहरवी जी ओलावल्या मम गात्रा

कधीतरी पुन्हा ये होऊन स्वाती
तुझ्या सरींनी डोहात जन्मू दे नवा मोती

तो डोह मनाचा तेव्हा पुन्हा डहुळुदे
त्यातून चंद्रकांत तेव्हा पुन्हा स्त्रवुदे

©निखिल मोडक

Group content visibility: 
Public - accessible to all site users