नक्षत्रगान
Submitted by निखिल मोडक on 10 November, 2020 - 12:15
कधी मावळावा चन्द्र मृगजळात
कधी डहुळावा डोह माझ्या मनात
यावे वर चांदणे त्याच्यात सांडलेले
एक एक रात्रींचे आपण पाहिलेले
पारधीला जो तू तुझ्या नेत्रबाणे
मृग तो कधी एक नयनी दिसावा
ओलावल्या आपुल्या आठवांनी
आर्द्र अभिषिक्त हुंकार यावा
पुनर्वसू जो तो उमलवी नवी आशा
तो एकदा पुन्हा मनी प्रस्फुटावा
पोसावे तुझ्या स्निग्ध अधरामृताने
बरसावे त्या पुष्य आषाढ घनाने
आश्लेषि घे चंदनी तुझ्या मिठीत
येई सत्वर करी विरहाग्नी शांत
होई मघा जी देई दोही करांनी
संतृप्त करी मज तुझ्या चुम्बनांनी
विषय: