आम्ही सार्‍या चंद्रसख्या

Submitted by सामो on 25 January, 2022 - 04:55

अनुराधाकडे आज संध्याकाळी, सगळ्याजणी जमणार होत्या. अनुची गडबड सकाळपासूनच सुरु झाली. स्वत:च्या रेशमी केसांना शिकेकाई लावून मस्त आंघोळ करुन, आख्खा दिवस घर आवरण्यात गेल्यानंतर साधारण उत्तरदुपारी, सुंदरसा प्रसन्न पेहराव तिने केला. आणि सख्यांची वाट पहात ती सौधावर जरा वारा खात ऊभी राहीली न राहीली तोच तिला अश्विनी लगबगीने येताना दिसली. काय डौल होता तिच्या चालण्यातही. नखशिखान्त चैतन्य शक्तीने ओतप्रोत अशी, उत्साही अश्विनी नेहमीच सर्वांच्या आधी येत असे. उमदं सौंदर्य ल्यालेल्या तिने , अनुला खालूनच हात करुन अभिवादन केले व झपाझप, पायऱ्या चढत ती येती झाली. "ये गं आशु. बरं झालं वेळेवर आलीस. किती वाट पहात होते मी." असे स्वागत करुन, अनुने तिला बसण्याची विनंती केली. दोघींच्या गप्पा सुरु होणार न होणार इतक्यात, ...........
पुष्य आली ते हातात लाडवा-चकल्यांची थाळी घेउनच. "अगं हे काय ! दर वेळेस खायला प्यायला आणलच पाहीजेस का" अशी प्रेमळ दटावणी, अनु करताच, पुष्य तिला म्हणाली "अगं पण गेल्या वेळेस मी फक्त शंकरपाळेच आणू शकले होते. तुम्हाला या वेळेस लाडू व चकल्या आणल्यात पहा. हीच संधी मिळते गं तुम्हाला सख्यांना खाऊ घालण्याची" असे पुष्य म्हणते न म्हणते तोच, ...........
उघड्या दारातूनच पूर्वाफाल्गुनी आणि मघा हसत खिदळत येताना दिसल्या.मघाचे उंची, निळे (रॉयल ब्लु) वस्त्रप्रावरण अक्षरक्ष: नजरबंदी करणारे होते. आल्यावरती मघा मस्तपैकी "होस्ट चेअर" वरती जाऊन विराजमान झाली. यावर पूर्वा तिला टोकणार तोच मघाच नेत्रपल्लवी जाणुन, बोलती झाली "गपा ग! मी इथेच बसणार. सिंहासनावर हक्क माझाच" यावरती सगळ्याजणी हसल्या व मूड एकदम हलका होउन गेला. रॉयल टेस्टमध्ये मघाला टक्कर देउ शकेल अशी एकच होती धनिष्ठा जिच्या नावातच धनाची धन-धन आहे बघा. पण खरं सांगायचं तर हे धन आहे अंतरंगातील धन, मनाची श्रीमंती. अर्थात त्यामुळे बाहेरची श्रीमंती उणावते असेही काही नाही परंतु, मकर ही पृथ्वी रास जेव्हा कुंभसारख्या इंटेलेक्च्युअल वायु राशीत स्थित्यंतर होते तिथे आपली धनिष्ठा जाणवते.
खरं तर अनुने आता, सर्वांना कॉफी, सरबत, कोक विचारुन झाले होते व अन्यही बऱ्याच खरं तर सगळ्याच जणी आतापावेतो जमल्या होत्या. ..........
हां रोहीणीची कमतरता मात्र जाणवेल इतकी ठळक होती. परंतु त्या सगळ्याजणींना मान्यच होते की आज काही रोहीणी येणार नाही, चंद्राने पुढील दीड दिवस , रात्र तिच्याकडे व्यतीत करायची तिची पाळी होती.
खरे पहाता विशाखाकडेही चंद्र तिच्या पाळीनुसार दीड दिवस जातच असे की. सर्व २७ जणींना त्याने समसमान वेळ वाटून दिलाच होता, पण स्वत:च्या ईर्षालु अर्थात सवतीमत्सरी स्वभावातून विशाखा चकलीचा तुकडा तीव्रतेने तोडीत नाक उडवती झाली. तिच्या मते "रोहीणी, यांची सर्वात लाडकी. तिच्याकडुन काही यांचा पाय निघत नाही." हे तिचे नेहमीचेच मत होते. ज्येष्ठनेही विशाखाची बाजू घेत भांडखोर पवित्रा घेतला न घेतला, ..........
तोच मृग समजूतदारपणे बोलती झाली "कशाला भांडता गं. यांना कमी का व्यवधानं आहेत, देतात ना समान वेळ आपल्याला." रोहीणीकडुन तडक माझ्याकडे येतात ते. मी जाणते ना, आख्खं जग जरी रोहीणीला त्यांची लाडकी मानत असलं तरी त्यांच्या मनात तसं काही नाही." हरीणीच्या डोळ्यांची मृग तशी भोळीच होती. सगळ्याजणी तिला, लहान बहीणीसारख्याच मानत असत . आपलं मन स्वच्छ तर जग चांगलं..................................
स्वाती , शततारका आणि चित्राचं या सगळ्या संभाषणाकडे लक्षच नव्हते आणि त्यांना ना या गॉसिप्समध्ये रस होता. त्यांची वेगळीच लेव्हलवरती, बौद्धिक गुफ्तगु चाललेली होती. चित्रा आणि स्वाती दोघी सुंदर. स्वाती बोलकी, आणि बोलणंही कसं, व्यवस्थित, मोजकं, प्रसन्न. चित्रा एखाद्या चमचमणाऱ्या खड्यासारखी तेजस्वी. चित्राचं आणि स्वातीचं मेतकूट होतं. विद्वान, शततारका कोणतातरी थिसिस लिहीत होती आणि त्या थिसिसबद्दल काहीतरी बोलत होती. त्यामुळे त्या तीघी लाडू व सरबताचा आस्वाद घेण्यात व तारकेच्या सबमिशनबद्दल बोलण्यात अगदी गुंगून गेल्या होत्या. त्यांच्या शेजारीच उत्तम ऐकण्याची क्षमता असलेली श्रवण बसली होती. श्रवण बोले कमी पण कानावर पडलेली प्रत्येक गोष्ट, संभाषण टिपुन ठेवत असे. अ रियली गुड लिसनर. तीसुद्धा या तिघींचे बौद्धिक ऐकत सरबताचे घुटके घेत एन्जॉय करत होती. हे नेहमीचे होते - जर कोणाचे काही गैरसमज झाले, कोणी मुद्दा नीट समजून घेण्यात कमी पडली, तर श्रवण, ती बाब अधिक उत्तम रीतीने, समजावुन देउ शकत असे...........................
उत्तराफाल्गुनी कामं पटापट वाटण्यात अगदी निष्णात. तिने ग्लासवरती, चमच्याने किणकिणाट करुन, सगळ्यांना ऐकू जाइल अशा आवाजात घोषणा केली. "बाहेर सौधावरती, थंड वारा सुटला असेल आपण तिकडेच जायचं का. मस्त गार वाराही एन्जॉय करता येइल." कृत्तिका, आर्द्रा, भरणी सगळ्याच जणींनी दुजोरा दिला. व जवळजवळ सगळ्याजणी मोठ्ठ्या प्रशस्त गच्चीवरती गेल्या. काय मस्त गार वारा सुटला होता. .................
आश्लेषा, पुनर्वसु, आणि पुष्य तिघी प्रेमळ त्यात पुष्य तर सर्वाधिक म्हणजे महाप्रेमळ. तीघी, अनुराधेला मदत करण्याकरता मागे राहील्या. कोणी खोली नीटनेटकी केली तर कोणी पटापट ताटे-चमचे-पेले उचलले. त्यामुळे अनुचे काम हलके झाले ना. बराच वेळ झाला होता. रात्र होउ लागली होती. ............
तारामंडलामध्ये रेवती सर्वात शेवटची आणि म्हणुन ती शांत, स्थिरचित्त, सगळ्या गोष्टी धीराने व संथपणे घेणारी. zesty, उमद्या अश्विनीपासून सुरु झालेले तारामंडल येउन थांबते ते रेवतीपाशी. बोलण्यात , गप्पांत मध्यरात्र केव्हा उलटून गेली सख्यांना कळलेच नाही. सूर्योदयाची वेळ होउ लागली, तशी रेवतीच खरं तर जराजरा पेंगळू लागली. तिला घरचे वेध लागले होते. व तिने हळूच काढता पाय घेतला. मग धनिष्ठा, कृत्तिका, भरणी, हळूहळू सर्वच सख्या पांगल्या व घर कसे शांत शांत झाले. सूर्य बराच वर आला होता,अनुराधासुद्धा श्रांत, क्लांत अशी निद्रेच्या आधिन झाली. तेव्हा सर्व सख्यांची पार्टी तर मस्त झाली होती तेही उत्तररात्री त्यांच्या सख्याच्या चंद्राच्या साक्षीने.
-----------------------------------------------------------------------------------------
कोणाला रस असल्यास - वाचनाकरता - http://vedicartandscience.com/category/vedic-astrology/nakshatras-vedic-...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा वाटली. सध्या लेकीला घेऊन रोज रात्री stars watching चा कार्यक्रम असतो. आणि मग त्या त्या stars ची गोष्ट हवी असते.
काही काही तारे ओळखायला येतात आता तिला. खेल खेल मे astronomy. Happy

सर्वांचे आभार.
>>>>>>>>>मजा वाटली. सध्या लेकीला घेऊन रोज रात्री stars watching चा कार्यक्रम असतो. आणि मग त्या त्या stars ची गोष्ट हवी असते.
काही काही तारे ओळखायला येतात आता तिला. खेल खेल मे astronomy.
अरे मस्त.

ज्योतिषात ज्यांना रस असेल त्यांना नक्षत्रांचे स्वभाव माहीत असू शकतात.
ज्येष्ठ भांडकुदळ, मूळ प्रँक्स्टर, विशाखा मत्सरी, पुष्य अतिप्रेमळ, पोषण करणारे, आश्लेषा इतकं मायाळू की स्वतःच एखाद्या वेलीसारखं गुंतुन गेलेलं. पुनर्वसु म्हणजे वादळानंतरचा सूर्य(वसु)किरण तर कुठे अनुराधा जगन्मित्र , राधेस अनुसरणारी म्हणुन फार समर्पित वृत्तीची.

बावनखणी. >>> ??? बावन काहीतरी कॉप्लीमेंटार्थ हवेच असेल तर बावनकशी जास्त बरं राहिल .... Wink (नाय पटलं तर माझं नक्षत्र धनिष्ठा दि प्रँकस्टर म्हणून द्या सोडून... पण बाया बावनखणीचा नाद करायला लागल्या तर कसं हो व्हायचं..... )

बावनकशी!!

अगं मूळ (धनु रास) असतं प्रँकस्टर. मी चुकून लिहीलेलं धनिष्ठा.
तुम्ही शुद्धलेखनावरुन, कुणाच्या मूळावर ऊठू नका बाई. Wink
---------------
वावे धन्यवाद.

मस्तच !
मनिम्याऊ Lol

छान लिहिलेय..
नक्षत्रांची शांती तसे नक्षत्रांची पार्टी Happy

अमुपरी २७.
अस्मिता, अमुपरी - धन्यवाद.

>>>>>नक्षत्रांची शांती तसे नक्षत्रांची पार्टी Happy
अरे खरच की. थीम झालीये की माबोवरती. 'झिम्मा थीम' & 'नक्षत्र थीम'

पुर्वाभाद्रपदा पण राहिलीच.

आमची आजी, “लागल्या मघा, चुलीमागे जावून हगा“ म्हणायची.
मघाचा पाउस जोरदार असतो.

Pages