गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.
मायबोलीवर गेल्या काही दिवसांत पर्यावरण ह्या विषयाशी संबंधीत दोन धागे निघाले आणि त्या दोन्ही धाग्यांवरील चर्चेतून बरेच चांगले आणि महत्वपूर्ण मुद्दे समोर आले. मात्र ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या धाग्यावर प्रामुख्याने पर्यावरणस्नेही उपाय आणि त्यांची अंमलबजावणी असा उद्देश होता. मात्र त्यावर काही पोस्ट्स ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे/झालेले प्रश्न ह्यावर होत्या. त्या वाचून वाटलं की ह्या प्रश्नांना मांडण्यासाठी/त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा हवा.