पर्यावरणाची अवांतरे

Submitted by जिज्ञासा on 8 June, 2021 - 22:40

जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा: कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..? (https://www.maayboli.com/node/78983?page=6)

अमितव: माणूस नष्ट झाल्यावर करायचं काय पण त्या उत्तम पर्यावरणाचं? माणूस आहे म्हणून पर्यावरण आहे. तोच नसेल तर पृथ्वी असली काय आणि नसली काय! माणूसपण सोडण्याने सर्वायवल ऑफ फिटेस्ट होणार असेल तर अशी माणूसपण सोडलेलीच माणसं च टिकतील आणि माणूसपण जतन करणारी जातील लयाला.
>> Survival of the fittest म्हणताना मुळात माणसाच्या survival साठी अजूनही निसर्गच लागतो हे आपण विसरतो आहोत. त्यामुळे माणूस असायचा असेल तर मुळात त्याआधी निसर्ग माणसाच्या असण्याला अनुकूल असायला हवा. साडेचार कोटी वर्षं झाली पृथ्वीचा जन्म होऊन. पृथ्वीवर २५ लाख वर्षांपूर्वी माणूस अस्तित्वातही नव्हता. आपण म्हणजे माणसाची होमो सेपियन ही जात तर केवळ दोन लाख वर्षांपूर्वीच उत्क्रांत झाली आहे. इतक्या कोटी वर्षांत माणूस पृथ्वीवर का नव्हता? किंवा आपल्याला माहिती असलेल्या विश्वाच्या पसाऱ्यात आजही कुठेही माणूस सदृश्य काही का सापडत नाही? कारण कुठंही आज जशी पृथ्वी आहे तशी सर्वार्थाने माणसाच्या जगण्याला अनुकूल परिस्थिती नाही. शिवाय आहे त्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो आहोत म्हणून आपण टिकून आहोत. हा जो बॅलन्स आहे तो टिकवणे महत्त्वाचे आहे. उत्क्रांतीमध्ये फिट कोण तर जो बदलत्या परिस्थितीशी सर्वाधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो तो. आता जर परिस्थिती अनुकूल आहे तर ती अनुकूलच कशी राहील याचा प्रयत्न करणारा देखील फिट म्हणता येईल. पण आत्ता आपण याच्या अगदी विरुद्ध वागतो आहोत.
माणूसपण ही मानवी संकल्पना आहे. जर ती निसर्गपूरक असेल तर आपण टिकू. मग त्यात समूहाने राहण्याचे फायदे कसे आणि किती घ्यायचे हे तपशील येतील.

अमा: नेस्ले कोक पेप्सी इत्यादि कंपन्यांनी केलेले डॅमेज गूगल केले की सहज सापडेल. जो शाश्वत विकास तिला अपेक्षित आहे तो व्हावा पण नाही होणा र र्‍हा सच होतो आहे अति वेगाने ह्या मुळे तिला अतीव निराशा येउ शकते भविष्यात. हे मला दिसते आहे.
>> बरोबर आहे. मोठ्या कंपन्या जे प्रदूषण करतात ते थांबले तर खूप मोठा फायदा होईल. पण मोठ्या कंपन्या मोठ्या का आहेत कारण त्यांची उत्पादने खरेदी करणारे लाखो ग्राहक आहेत. हे ग्राहक म्हणजे तुम्ही, मी आपण सर्व. आता जर या मोठ्या कंपन्यांनी पर्यावरणस्नेही बदल करावेत असं आपल्याला वाटत असेल तर त्यांना याची जाणीव व्हायला हवी की आपण जर जे बदल केले नाहीत तर ग्राहक दुसरीकडे जातील.
कल्पना करा - सर्व ऍपल ग्राहकांनी ठरवलं की जोवर ऍपल “right to repair” मान्य करत नाही तोवर आम्ही ऍपलची उत्पादनं वापरणार नाही. काय होईल ऍपलच्या स्टॉकचं शेअर बाजारात?
पण असं घडायचं असेल तर दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. एक म्हणजे ग्राहक जागरूक व्हायला हवेत. ते कसे होईल तर मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाण घेवाण केल्याने. मायबोली सारख्या संस्थळांवर चर्चा झाल्याने.
आणि दुसरे म्हणजे लोकांचे आयुष्य या गोष्टींमुळे अडायला नको. आज आपण इतके अवलंबून आहोत या मोठ्या कंपन्यांवर की आपण अशा बॅनची कल्पना करू शकत नाही. आपल्याला आधी हे परावलंबित्व संपवावं लागेल. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. मुख्य म्हणजे आपल्या गरजा कमी करणे आणि दुसरा जीवनावश्यक गोष्टींसाठी पर्यावरणस्नेही पर्याय शोधणे.

"जीवनावश्यक गोष्टींसाठी पर्यावरणस्नेही पर्याय शोधणे"
हे पूर्ण पणे पटलं.
दुसरं म्हणजे आपण घरात करत असलेली नासाडी त्या मानाने कमी, पण कॉर्पोरेट कंपनीज मध्येही खूप नासाडी होते.वीजेची,अन्नाची, टिश्यूज ची, पाण्याची, प्लास्टिक ची.
एरवी अनेक वेगवेगळे स्पर्धक आणि कल्पक इनिशिएटिव्ह ठेवणारे एच आर याबाबत 'कचरा' किंवा नॉन ग्लॅमरस गोष्ट म्हणून स्वारस्य घेत नाहीत.
आयटी किंवा मोठ्या मोठ्या इतर कंपनीज ना प्रॉक्झिमिटी सेन्सर लाईटस सोलर एनर्जी वापर, वॉटर रियुज (फ्लश साठी),कंपोस्टिंग हे बंधनकारक ठेवले पाहिजे.

कप आणि क्लॉथ पॅड वापरण्याची तयारी/मानसिकता/अनुकूल परिस्थिती प्रत्येक स्त्री ची असतेच असं नाही.
१८ रुपयाला एक नॅपकीन, २० रुपयाला एक डायपर, ९० रुपयाला एक अ‍ॅडल्ट डायपर विकणार्‍या कंपनीज वर चांगली इन्सिनरेटर आणि कलेक्शन चेन तयार करणे बंधनकारक केले पाहिजे.

जागरूक व्यक्तीला ऑक्सिजनचे कारखाने प्रदूषण होतंय या कारणाने बंद करायला लावणार का असे विचारणे हे बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. >> तुम्हाला हा विचार असंवेदनाशील वाटतोय ना म्हणजेच मनाच्या कोपर्‍यात तुम्हाला माणसांने केलेली ही सगळी तांत्रिक प्रगती (Industrialization) हवे आहे.
तसचं माझा प्रतिसाद वाचून तुम्हाला त्रास झाला आणि deeply hurt वगैरे वाटलं, हे तुम्ही माझ्यापुढे आणि सगळ्या जगापुढे मांडू शकता ते सुद्धा मोठ मोठ्या corporate companies नी बनवलेल्या technology ची मदत घेऊनच.
तेव्हा Industrialization, Tech Companies यांना काळ्या रंगात रंगवायच असेल तर साधारण 10000 वर्षांपुर्वी माणूस जसा जगत होता तशी जगायची आपली तयारी आहे का हे तपासून बघा.
माझी तसं जगायची तयारी नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाचं जीवन कितीतरी सोपं झालं आहे त्यामुळे त्याचा सर्वस्वी त्याग करणे आता कठीण/ अशक्य आहे. एवढाच मुद्दा मला अधोरेखित करायाचा होता. तो जर तुम्हाला समजून घ्यायचा नसेल तर ignore करा माझा प्रतिसाद.

आयटी किंवा मोठ्या मोठ्या इतर कंपनीज ना प्रॉक्झिमिटी सेन्सर लाईटस सोलर एनर्जी वापर, वॉटर रियुज (फ्लश साठी),कंपोस्टिंग हे बंधनकारक ठेवले पाहिजे. >> पटलं. प्रत्येकाने आपल्या सोसायटीत/ कंपनीत हे घडावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. समविचारी लोकांचे दबावगट बनवले पाहिजेत.

सोहा, आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यावे लागणारे निर्णय आणि रोजच्या नॉर्मल आयुष्यात घेतले जाणारे निर्णय या दोन्हीमध्ये जर तुम्ही फरक करू शकत नसाल तर कठीण आहे. सर्व चर्चा ही नॉर्मल आयुष्यात आपण काय बदल घडवू शकू यावर चाललेली असताना तुम्ही येऊन म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत पण तुम्ही असेच वागणार का हे विचारणं सर्वार्थाने अनुचित आहे. असो, तुम्हाला तुमच्या कमेंटमधली असंवेदनशीलता लक्षात येत नसेल तर त्यावर पुढे बोलण्यात काही अर्थ नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाचं जीवन कितीतरी सोपं झालं आहे त्यामुळे त्याचा सर्वस्वी त्याग करणे आता कठीण/ अशक्य आहे. >> सर्वस्वी त्याग करणं अपेक्षितही नाही. तुम्हाला ऑल ऑर नन असेच पर्याय आहेत असे का वाटते ते मला माहिती नाही. पण इथे कोणीच तशा स्वरूपाचे काहीही विधान केल्याचे मला आठवत नाही.

(मला इथल्या किंवा इतर सुजाण लोकांबद्दल बोलायचं नाहीये.वेगवेगळ्या व्हॉट्सप्,फेसबुक पर्यावरण ग्रुप्स वरचे अनुभव सांगतेय. हे अवांतर आहे.ऑल ऑर नन मुद्दा निघाला त्यावरुन आठवले.)

काहीवेळा 'ज्याला तसे जमेल तसे पर्यावरण, किमान जाण ठेवून सुरुवात तरी करा' हे पर्यावरणवादी ग्रुप्स ना पटतच नाही. मग 'नॅपकिन ची विल्हेवाट लावायला इन्सिनरेटर स्वस्त कुठे मिळतील किंवा रेड डॉट बॅग स्वस्त कुठे मिळतील' असं विचारलं की त्यावर हजार लोकांचे 'कपच वापरा, कप वापराच, कप वापरत कसे नाही तुम्हि, ऑ' अश्या सुरात प्रतिसाद येतात. किंवा मायक्रोवेव्ह मी कपाट म्हणून वापरते/वॉशिंग मशिन मध्ये शिकेकाई रिठाच वापरते, डिओ च्या रिकाम्या बाटल्या जमा करायला यंत्रणा आहे का, भंगार वाला त्या नकली डिओ बनवणार्‍यांना विकू शकतो म्हणून विचारलं की दिवसभर डिओ वापरुच नका, काखेत लिंबू चोळा असे पर्यावरणासाठी चांगले पण रोजच्या ऑफिस वापराला प्रॅक्टिकल नसलेले सल्ले येतात. 'प्लास्टिक शून्य करा'. ठीक आहे. मलाही पटतं.पण करोनात बाहेर जाऊ नये म्हणून घरात मागवलेल्या सामानाच्या हजार प्लास्टिक पिशव्या येतात.सामान मॉल मध्ये विकत घेतल्यास त्यांच्या हजार पिशव्या येतात. त्यांचे माझ्या शक्ती नुसार वर्गीकरण, इको ब्रिक्स वगैरे करते.

मुद्दा हा की सामान्य माणसावर १००% (ऑल ऑर नन) पर्यावरणवादी बनण्याचा नैतिक भार टाकण्यापेक्षा(ती अपेक्षा करण्यापेक्षा) काही शक्तीशाली व्यक्ती/ यंत्रणा वापरुन कंपनीज वरच चांगली मायक्रो प्लास्टीक नसलेली डिटर्जंट,डिलिव्हरी सारखेच आठवडा एक दिवस अमेझॉन ची जमलेली खोकी आणि प्लास्टिक परत घेऊन त्याबद्दल थोडे क्रेडीट जमा करायची यंत्रणा हे सर्व चांगल्या परवडणार्‍या किंमतीत उपलब्ध व्हायला हवे असे बंधन हवे.
अतिशय सोप्या प्लंबिंग च्या जुगाड करुन भांड्याच्या बेसिन/ सिंक मध्ये जाणारे सर्व पाणी झाडांना/फ्लश ला वापरता येईल, त्यातून उंदीर साप झुरळे घरात येणार नाहीत अशी फिल्टर असलेल्या यंत्रणा नवी घरे बांधताना बिल्डर्स कडूनच प्रमोट व्हाव्यात.

इथे मला माणूस म्हणून 'मी' या गोष्टींचे काय करावे ही सोल्युशन अपेक्षित नाहीत. ती गुगल वर आहेतच. पण गिल्ट न देता कमीत कमी कष्ट, जास्तीत जास्त मोटिव्हेशन किंवा लालूच वापरुन माणसाला रोजच्या रुटिन मध्ये जास्तीत जास्त पर्यावरण वादी किंवा इको फ्रेंडली जगायला कसे लावता येईल यावर विचार अपेक्षित आहेत.

हा लेख वेगळा विचार देणारा आणि इंटरेस्टिंग वाटला.
कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा समुद्राची पातळी, पाऊस, वादळे इ. परिणाम यावर वाचलं होतं. पण झाडे हवेतून कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात, तर त्याचं हवेतील तुलनात्मक प्रमाण वाढलं तर झाडे त्याच्याशी कशी जुळवुन घेतात/ घेतील? तर झाडांची पाने जाड बनतील आणि त्याचे दुष्परिणाम आणखी वाईट असतील. हवा थंड ठेवणे, वाफ बाहेर सोडणे, कार्बन साठवून ठेवणे, साखर तयार करणे इ. झाडांमुळे होणार्‍या गोष्टींचा वेग मंदावेल आणि म्हणून सध्याची कार्बन मॉडेल ट्युन करावी लावतील असा रोख आहे अभ्यासाचा.
वाढत्या कार्बन डायॉक्साईडचा सगळ्याच निसर्गावर काय परिणाम होईल, निसर्ग तो परिणाम कसा ट्युन करेल हा विचार रोचक वाटला.

मी_अनु, हे अगदी मान्य आहे. कुठल्याही बाबतीत टोकाची भूमिका घेतली की बदलाला वाव राहत नाही. अशा लोकांना मी ठणकावून सांगते की इतके drastic बदल एका दिवसात होऊ शकत नाहीत. In fact, प्रत्यक्ष सवयी किंवा वागण्यातले बदल हे नंतर होतात. सगळ्यात आधी मन बदलावं लागतं. मारून मुटकून केलेले बदल कधीही शाश्वत ठरत नाहीत. You need to get into the groove. एकदा का हा शाश्वत विकासाचा मुद्दा डोक्यात बसला की मग आपल्याला शेकडो शक्यता दिसायला लागतात. तुम्हाला काहीतरी अप्रिय पण पथ्यकर करावं लागतंय अशी भावना न उरता तो एक नवीन आनंददायी प्रवास होतो!

पण गिल्ट न देता कमीत कमी कष्ट, जास्तीत जास्त मोटिव्हेशन किंवा लालूच वापरुन माणसाला रोजच्या रुटिन मध्ये जास्तीत जास्त पर्यावरण वादी किंवा इको फ्रेंडली जगायला कसे लावता येईल यावर विचार अपेक्षित आहेत. >> गिल्ट नाही बाळगायचा. अपराधीपणातून कधीही काही चांगलं, प्रेरणादायी बाहेर पडत नाही. आपण त्या त्या परिस्थितीतले best possible solution काढतो पण ते बरेचदा इतके पर्यावरणस्नेही नसते. आपला फोकस काय जमले नाही यावर ठेवण्यापेक्षा काय जमले आणि यापेक्षा अधिक अजून काय जमू शकते यावर ठेवायचा.

हे आपलं असंच इन जनरल!
एक म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम करायला जाऊ नका. सोप्या गोष्टी आधी बदला. ती सवय लागली की मग अजून काय करता येईल हे बघता येईल. आणि स्वतःला भरपूर वेळ द्या! कारण आपला उत्साह मावळण्याची शक्यता असते बरेचदा. काही दिवसांनी पुन्हा सुरु करायचं.
यासाठी कधीही एकट्याने काही सुरु करू नका. समविचारी कुटुंबीय, मित्र मैत्रिणी, सहकारी असतील तर त्यांच्याशी बोलत एकत्र मिळून काहीतरी ठरवलं की सोपं जातं. एखादा निसर्गसंवर्धन विषयात काम करणारा ग्रुप, संस्था असं काही असेल तर त्याला जोडून घ्या. सुरुवातीला भरपूर inertia असतो. ग्रुपमध्ये असलो की त्यावर मात करणे सोपे जाते.
शेवटी आपण सगळ्याच गोष्टी एकदम बदलू शकत नाही. त्यामुळे एक बेसिक जाणीव तयार झाली की आपल्याला कोणत्या प्रश्नात जास्त रस आहे त्यावर फोकस करायचं. आपल्याला कचरा व्यवस्थापन या विषयात रस आहे का झाडं लावण्यात का सेंद्रिय उत्पादनात, का zero waste shopping. अनंत विषय आहेत. मग आपल्याला जो सगळ्यात interesting विषय वाटतोय त्या प्रश्नावर कोणत्यातरी ग्रुपबरोबर काही काम करणे हे करता येईल. जेव्हा आपण अनेक समविचारी लोकांबरोबर काम करायला लागतो तेव्हा मग policy level solutions वर काम करता येते. ज्यांचा इम्पॅक्ट मोठा असतो.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक सवयी बदलाव्या लागल्या आपल्या सगळ्यांनाच - त्यातल्या निसर्गासाठी काही चांगल्या होत्या आणि काही वाईट. पण आपल्याला पर्याय नव्हता. आता जेव्हा आपण यातून बाहेर पडून नॉर्मल आयुष्य जगायला लागू तेव्हा ते पूर्वीचं नॉर्मल नसावं. नाहीतर मग आपण या संकटातून काहीच शिकलो नाही असं होईल.

अमितव, excellent article! Thank you for sharing! This just underscores the importance of reduction in consumption. We must prioritize reduction in overall consumption. Net carbon neutrality is not going to be enough.
आधी प्रदूषण करतो आणि मग झाडं लावून ते भरून काढतो असं चालणार नाहीये!

अरे वा. आला का धागा? छान.
वरचा लेख चांगला आहे अमितव.
सुरुवातीला माणसाने हे तांत्रिक शोध लावले तेव्हा चालुन गेले, वापर वाढेपर्यंत. सुखसोयी वाढेपर्यंत. मानवाने पण ‘चला मस्तपैकी पृथ्वीचा विनाश करुया‘ असे वाटुन शोध नक्कीच लावले गेले नसतील. पण अती होऊ लागले व आता उशीर व्हायची वेळ आली.
आम्ही पाऊस न पडणार्‍या भागात रहातो. बॅकयार्डमधे लॉनला फार पाणी लागायचे म्हणुन लॉन काढले. आता त्या जागी नक्की काय करावे, भाज्यांचा मळा करावा का हा विचार करत आहे. ८ ते ५ सारखे ऊन असणार. जरा गहनच प्रश्न आहे. फरशा घालणे हा शेवटचा उपाय. कोणी असे काही केले असल्यास वाचायला नक्की आवडेल.

स्टोन पॅटिओ. बाजुला फुटभराची फुलझाडं आणि भाज्या, परत शेवटी भाज्या. पॅटिओवर सन शेल्टर/ गझिबो असा समर प्रोजेक्ट करुन टाका. दिसतं ही छान आणि मेंटेन करायला ही सुटसुटीत. आपलं आपल्याला करता येण्यासारखा प्रोजेक्ट आहे.
याचा पर्यावरणाशी संबंध नाही. बादरायण जोडायचा असेल तर गवताला पाणी फुकट जाणारं वाचवलं टाईप जोडू शकतो. Wink Happy
हा धागा बघितला की सारखं ' मौनांची भाषांतरे ' आठवताहेत.

हो. गवताच्या पाण्यात भाज्या खायला मिळतील. गवताचा पण उपयोग नाही असं नाही. लॉनमुळे एकुण घराचं तापमान कमी रहायला मदत होते उन्हाळ्यात. पण मग उन्हाळी गवत बदला, थंडीतले गवत बदला, त्याचे खाद्य टाकत रहा हे चक्र येते. उन्हाने सारखी भेगा पडणारी ड्रीप सिस्टीम (मराठी?) व त्या गळतीमुळे वाया जाणारे पाणी व त्यामुळे भयंकर येणारे पाण्याचे बिल या वाईट चक्रात सापडल्याने बिचार्‍या गवताचा बळी द्यावा लागला. थँक्स. स्वस्त सनशेड बद्दल पहाते.

ड्रीप सिस्टीम (मराठी?) - ठिबक सिंचन म्हणतात.
__________________
खासगी मालमत्ताधारक पाण्याच्या वापराचे महत्त्व जाणतात. कमी अधिक वापराचे बिल त्यांनाच येते आणि उपाय केले जातात. सहकारी गृह संस्थांत पाणी वापर सामायिक, बिल सामायिक असते. कोण भसाभस ओततो आणि कोण जपून वापरतो कळत नाही. विरार भागात काही सोसायट्यांंत प्रत्येक ब्लॉकला मीटर लावला आहे.

_________________________
सगळीकडेच पर्यावरणाचा खून पडत असतो. उदाहरणार्थ शहर वाढतांना तलावांचे सुशोभिकरण.

छान धागा आहे. वाचतो आहे.

<< फरशा घालणे हा शेवटचा उपाय. कोणी असे काही केले असल्यास वाचायला नक्की आवडेल. >>
------ नेहेमीच्या वापरातली पायवाट असेल तर सुरक्षेसाठी फरशा लावणे ठिक आहे... गवताला खूप पाणी द्यावे लागते. Sad
देखभालीचा खर्च आहेच... त्यापेक्षा छान गोल गोटे टाका... पाणी मुरेल, weed येणार नाही आणि घराची शोभा वाढेल.

चर्चा पर्यावरणाची होते आहे म्हणून.... माझा पाण्याचा मुद्दा. पावसाचे पाणी जमिनीत मुरणे पण महत्वाचे आहे. concreteची जंगल, इमारती, रस्ते, पक्के बांधकामे यामुळे पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरायला कमी वाव मिळतो. पाणी जमिनीत मुरण्यापेक्षा... सरळ नदीला मिळते.

महाराष्ट्रातली परिस्थिती बिकट बनत आहे. जमिनीतून पाणी उपसण्याचे प्रमाण, आणि त्याच काळात जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण यांचा मेळ साधला नाही तर water table खाली सरकणार.

https://timesofindia.indiatimes.com/city/pune/water-table-plunges-in-400...

पर्यावरण हा अत्यंत गांभिर्यतेने घेण्याचा विषय आहे असे मी मानतो... पृथ्वीवर मानवजातीच्या अस्तित्वासाठीची लढाई आहे. औद्योगिक क्रांतीला जेम्स वॅट (१७६०) यांच्या वाफेवर चालणार्‍या इंजिन पासून सुरवात झाली... कळत / नकळत २५० वर्षात आपण निसर्गाला अपरिमीत हानी पोहोचवली आहे. अशी लढाई लढण्यासाठी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगणे महत्वाचे ठरणार आहे आणि त्याच्याच मदतीने आपण यावर मात करु याबद्दल मला विश्वास आहे.

मला अनेक प्रश्न आहेत. दैनंदिन वापरातला प्लॅस्टिकचा वापर कमी कसा करावा? (अत्यंत पातळ पिशव्या आहेत, कटलरी आहे, खेळणी आणि उपकरणे)... हे शेवटी समुद्रात जात आहे आणि तिथल्या जिवसृष्टीला धोका निर्माण होतो. माशाने / गाईने खाले ल्लेले प्लॅस्टिक यांचे फोटो बघितल्यावर अगदी वाईट वाटते.
सहज गतीने करता येणारे उपाय हवेत.

काहीवेळा 'ज्याला तसे जमेल तसे पर्यावरण, किमान जाण ठेवून सुरुवात तरी करा' हे पर्यावरणवादी ग्रुप्स ना पटतच नाही.>> +१२३४५६७८९
मी_अनु यांची अख्खी पोस्ट पटली.
असे अनेक अनुभव आमच्य सोसायटीच्या ग्रुपवर, मुलीच्या शाळेत येत असतात. शाळा मुलांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार करतात, त्याबद्दल मुलांचे ज्ञान वाढवतात, हे चांगलेच आहे. पण त्या सर्व गोष्टी अमलात आणायची मुलांना सक्ती करणे. एखाद्या मुलाच्या पालकांनी काही पर्यावरणस्नेही पर्याय स्वीकारणे जमत नसेल, तर त्याबद्दल त्या मुलाला रागावणे. इत्यादी प्रकार शाळेत पाहिले आहेत.

उदय थँक्स. दुर्दैवाने पाऊस पडत नाही म्हणून दगडं टाकली तरी पाणी मुरवले जाणार नाही. गोट्यांनी बराच भाग व्यापेल व वापरण्याजोगा रहाणार नाही. काही विशेष केलं तर लिहीन इथे.
प्लास्टिक रिसायकल चे नारे लावायला हवेत म्हणजे अजुन जास्त लोक करतील. काही दुकानं आपापल्या बॅग वापरल्या तर पैसे परत देतात.

रिड्युस, रीयुज, रिपर्पज आणि काँपोस्ट वरच माझा विश्वास आहे.
रिसायकल मारे वेगळं काढतो, पण ते कितपत खरोखर होतं? यावर माझा फार विश्वास नाही.

@ सुनिधी,
मला बागकाम येत नाही, अमेरिकेतील रहाणे आणि USDA Zones वगैरे बद्दल माहिती नाही. त्यामुळे हे प्रत्यक्षात किती उपयोगी पडेल कल्पना नाही. पण शोधताना हे सापडले ---

१. तुमच्या शकुनाच्या वगैरे काही कल्पना नसतील तर cactus / succulents लावता येतील.
https://en.wikipedia.org/wiki/Xerophyte

२. इथे कमी पाण्यात तगणारे लॉन्स प्रकार आहेत
https://www.greenvalleyirrigation.com/5-types-drought-tolerant-lawn-gras...

३. इथे कमी पाण्यात जगणारी झाडे / फुलझाडे आहेत. USDA Zone ९-१२ मध्ये चालणारी आहेत बरीचशी असे दिले आहे
https://balconygardenweb.com/24-best-drought-tolerant-plants/

जे तुम्हाला वाढवायला जमेल / आवडेल; तिकडे परवानगी असेल, weed category म्हणून बदनाम नसेल --- असे काहीतरी मिळेल बहुतेक वरच्या लिंकमध्ये. एकदा बघणार का?
अंगण आहे सुदैवाने, इच्छाही आहे तर झाडे मिळतीलच.

फरशी घालून जितके मुरतेय पाणी कमी पावसाचे तेही नाही जिरणार. आणि फरशी तापून घरात पुन्हा झळा येऊ शकतील. उदय म्हणतात ते बरोबर आहे.

कारवी, मनापासुन धन्यवाद. तिसर्‍या लिंकमधील खूप झाडे नर्सरीत होती. फारच सुंदर दिसतात. दुसर्‍या लिंकमधे कमी पाण्याची लॉन्स माहिती नव्हती. पाहीन शोधून. आता उन्हाळा तापू लागला म्हणून लांबणीवर टाकावे लागणार.
एसआरडी, मराठी शब्द दिल्याबद्दल थँक्स. (सॉरी माझं बागकाम मधेच काढलं या धाग्यावर)… अवांतराचे अवांतर असा धागा मी मुळ्ळीच काढणार नाही. Lol

फरशी (यापेक्षा स्टोन छान दिसतात) सगळीकडे घालायची गरज नाही, जिकडे नाही तिकडे वहात जाऊन पाणी मुरेल. आणि अमेरिकेत त्यांच्या भागात पाऊस (जर) पडलाच तर मोकळी जमीन चिक्कार आहे. पाणी मुरायला जमिन नाही अशी अवस्था अमेरिकेत काही मोठ्या शहरांचे मुख्ख्यभाग सोडले तर कुठे असेल असं वाटत नाही.
साधारण दहा बाय दहाचा पॅटिओ केला आणि त्यावर गझिबोचं छप्पर टाकलं तर ते सिटी कोड मध्ये बसतं आणि सिटीची बांधायला परवानगी घ्यावी लागत नाही. त्याहुन मोठा गझिबो केला तर आमच्याकडे परवानगी, त्यांच्या मर्जीतल्या कामगारांकडून काम अशी झेंगटं मागे लागतात. छप्पर टाकल्याने स्टोन तापुन गरम नाही होणार. छप्पर तापलं तर ती हवा १० फूट वर असल्याने काय होईल माहित नाही. पण ग्रास काढून सगळ्याच्या सगळ्या भागात भाज्या लावणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही. इतकी उस्तवार होत नाही. मग त्या वैराण जमिनीत जावं ही वाटत नाही. त्यात वीड्सचं रान माजतं. मग शेजारी बायलॉच्या तक्रारी करतात. आणि फुकट मनस्ताप होतो.
१०० स्केअर फूटात वर्षातून चार दिवस पडणार्‍या सरी मुरवून शून्य फायदा होणार आहे. ते पडणारं पाणी वहात बाजुला जाऊन काय मुरायचं ते मुरेल. काही नेत्रसुखद आणि आवडणारं केलं तर तिकडे जास्त वेळ घालवावासा वाटेल आणि त्यातुन कदाचित जास्त भाज्या/ फुले घ्याविशी वाटतील. बाकी कॅक्टस मस्तच दिसतील. अ‍ॅरिझोना मध्ये असल्याने त्याचं नाविन्य राहिलं नसेल कदाचित. Proud

सुनिधी, तुमच्या काउंटीमधे मास्टर गार्डनरची हॉटलाइन असेल तर त्यांना फोन करुन लॉन ऐवजी काय लावता येइल ते विचारा . गूगल ने ही लिंक दिली https://extension.arizona.edu/maricopamg - इथे पण बरीच माहिती आहे. तुमच्या इथली नेटिव्ह झाडं तुमच्या हवामाना करता सुटेबल / सस्टेनेबल असणार. अशा झाडांची फारशी उस्तवार करावी लागणार नाही बहुतेक.

उदय, सध्या एक ग्राहक म्हणून फार मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. पण तरीही इथे नोंदवून ठेवते. यात एक disclaimer असा की आजही अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून यातले काही पर्याय निवडता येत नसतील. ज्यांच्याकडे disposable income आहे त्यांना एक ग्राहक म्हणून आपले पैसे अधिक शाश्वत पद्धतीने कसे खर्च करता येतील यासाठी हे पर्याय वापरता येतील.
मुळात प्लास्टिकच्या वस्तू न वापरणे. उदाहरणार्थ तुमचा पुढचा टूथब्रश लाकडी घ्या. पण आत्ताचा टूथब्रश लगेच टाकून देऊ नका. तो बाद झाल्यावरच पुढचा घ्या. अर्थात अनेक घरांत असे बाद झालेले टूथब्रश कंगवा साफ करणे, काही इतर साफसफाई यात पुन्हा वापरले जातात. तसेही करता येईलच. मी टोमॅटो सॉसची काचेची बाटली घेते. सॅशे घेणं आजिबात बंद केलं. बिस्किटाचे देखील शक्य तितके मोठे पुडे घेतो. ज्या टिकावू गोष्टी आहेत त्या शक्य तितक्या मोठया बाटलीत, शक्य असेल तर काचेच्या अशा घेता येतील. सध्या online खरेदी शिवाय पर्याय नव्हता म्हणून काही गोष्टी मागवल्या. नाहीतर शक्यतो बाजारातून वस्तू विकत आणणे हे निवडता येईल. काहीही पार्सल आणायचे असेल तर शक्य तेव्हा स्वतःचे डबे घेऊन जायचे. पुण्यात घरात असलेला प्लास्टिक कचरा नेणाऱ्या काही संस्था आहेत ज्या सोसायटी मधून असा कचरा घेऊन जातात. अजून एक बेस्ट सोल्युशन म्हणजे zero waste stores. पुण्यात काही ठिकाणी आहेत ही दुकानं. अर्थात त्यांनी हे ऑरगॅनिक पण केले आहे त्यामुळे थोडे महाग असते. मला तर वाटते की यात खूप स्कोप आहे आपल्या साध्या किराणामालाचे दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्यांना. त्यांनी थोडे पैसे deposit घेऊन जर कापडी पिशवीतून माल द्यायला सुरुवात केली तर खूप कमी प्लास्टिक वापरले जाईल. किंवा BYOB - bring your own bottle/container (instead of booze)! माझ्या मनात आहे तसे करून पाहायचे! या सर्व उपायांनी मोठा फरक पडतो असे सध्यातरी नाही. पण जर खूप लोकांनी असं करायला सुरुवात केली तर नक्की फरक पडेल.

थँक्स मेधा. पहाते.
अमितव, खरंय. म्हणूनच घाईघाई करत नाहीये. बरंच जर-तर आहे.

सोहा, तुमचे अनुभव वाचून वाईट वाटले. एखादे उदाहरण देऊ शकाल का? अशासाठी विचारते आहे की इतर वाचणाऱ्या पालकांना देखील जर असे अनुभव आले असतील तर त्यांनाही मदत होईल.
मुलांना पर्यावरणाविषयी शिकणे हे खरंतर किती आनंददायी असले पाहिजे! तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतः काही छान उपक्रम घेऊ शकाल. मी चौकशी करते काही educational material मिळेल का याची.

सुनिधी, सगळ्यांनी छानच उपाय सुचवले आहेत. त्या प्रदेशाची इकॉलॉजी अबाधित राहील आणि आपल्याला देखील वापरायला सुटसुटीत असेल असे काहीतरी उत्तर तुला लवकर सापडो!

रिड्युस, रीयुज, रिपर्पज आणि काँपोस्ट वरच माझा विश्वास आहे.
रिसायकल मारे वेगळं काढतो, पण ते कितपत खरोखर होतं? यावर माझा फार विश्वास नाही.>> पटलं. रिड्युस, रीयुज, रिपर्पज आणि काँपोस्ट हे घरी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो.

पुढचा टूथब्रश लाकडी घ्या.>> लाकडी टूथब्रशवर पावसाळ्यात बुरशी येते. यावर काही उपाय आहे का?

पुण्यात घरात असलेला प्लास्टिक कचरा नेणाऱ्या काही संस्था आहेत ज्या सोसायटी मधून असा कचरा घेऊन जातात.>> लॉकडाउन मधे अश्या संस्थांचे अनुभव फारसे चांगले नव्हते. आमच्या सोसायटीत अश्या एका संस्थेचे लोक यायचे प्लास्टिक कचरा न्यायला. ते लॉकडाउन मधे २ महिने फिरकलेच नाहीत. नाईलाजाने प्लास्टिक कचरा नेहमीच्या कचरा गोळा करणार्‍यांना द्यायला लागला.

सोहा, तुमचे अनुभव वाचून वाईट वाटले. एखादे उदाहरण देऊ शकाल का?>> मुलीच्या शाळेत 'घरी toilet cleaner/ floor cleaner बनवा.' अशी assignment होती. शाळेने ते कसे बनवायचे याचा video दाखवला. ती assignment ज्या दिवशी करायची होती त्या दिवशी त्याला लागणारे सामान घरात नव्हते. त्यामुळे मुलीला online शाळेत बोलणी बसली. आता खरं सांगायचं तर मला घरी toilet cleaner/ floor cleaner बनवण्याची फारशी हौस नाही. पण केवळ शाळेत प्रयोग करायला म्हणून ते सामान आणायला माझी हरकत नव्हती. पण lockdown मधे सगळे सामान मिळवायला ही बरेच कष्ट पडत होते. तेव्हा आमच्या भागात big basket च्या deliveries सुद्धा वेळेवर होत नव्हत्या.

BYOB - bring your own bottle/container (instead of booze)! माझ्या मनात आहे तसे करून पाहायचे! या सर्व उपायांनी मोठा फरक पडतो असे सध्यातरी नाही. पण जर खूप लोकांनी असं करायला सुरुवात केली तर नक्की फरक पडेल.>> छान कल्पना. मी ही प्रयत्न करून बघते.

<< पुढचा टूथब्रश लाकडी घ्या.>> लाकडी टूथब्रशवर पावसाळ्यात बुरशी येते. यावर काही उपाय आहे का? >>

-------- ब्रशवर पाणी/ आद्रता नसेल तर बुरशी होणार नाही. काम झाल्यावर ब्रश कोरडा करणे / ठेवणे.

ब्रशचा वापर दिवसातून दोन वेळा होत असेल तर दोन वेगळे ब्रश वापरा जेणेकरुन दोन वापरा दरम्यान ब्रश संपुर्ण पणे कोरडा होण्यास मुबलक वेळ मिळेल. एक ब्रश चार महिने जात असेल तर दोन ब्रशची जोडी आठ महिने आरामात जाईल. Happy काम झाल्यावर सुरक्षित ठेवण्याची जागा कोरडी असावी - म्हणजे बाथरुम मधे आद्रता जास्त असते तिथे संग्रही करायला नको.

Pages