द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग ३

Submitted by जिज्ञासा on 10 January, 2022 - 06:32

पहिल्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
दुसऱ्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २

आपली उत्तरं शोधायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की आपला अर्थव्यवस्थेचा मॉडेल सुधारलं तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील. वाढीवर आधारित अर्थव्यवस्थेऐवजी विकासावर आधारित अर्थव्यवस्था अधिक शाश्वत असेल त्यासाठी अनेक जण काम करत आहेतच. पण एक उल्लेखनीय alternate विकासाचे प्रारूप जे मला पटले ते Kate Raworth यांनी मांडलेले Doughnut economics चे मॉडेल आहे.
Doughnut_(economic_model).jpg
यात चित्रात दाखवलेला डोनट बघा - याच्या आतल्या कडेला social foundation आहे. ज्यात बरेचसे UN ने ठरवलेले sustainable development goals आहेत - यात मग पाणी, अन्न, निवारा, आरोग्य या मूलभूत गरजांपासून ते सामाजिक समतेसाठी आवश्यक अशी ध्येयं उदाहरणार्थ राजकीय हक्क (political voice), लिंगाधारित समता, सामाजिक समता हे सर्व येते. ही या डोनटची आतली कड/boundary आहे. जगातील सर्वजण या कडेच्या आतल्या बाजूला असले पाहिजेत - मधल्या भोकातून कोणी खाली पडता कामा नये. डोनटची बाहेरची कड/boundary म्हणजे ecological ceiling किंवा planetary boundary अर्थात आपल्या पृथ्वीची सर्वांचा भार पोसण्याची क्षमता. ही प्लॅनेटरी बाउंड्रीजची संकल्पना Stockholm Resilience Centre च्या संशोधकांनी Johan Rockström यांच्या नेतृत्वाखाली नेचर मासिकात (https://www.nature.com/articles/461472a ) मांडली जी आपण या आधीच्या भागात पाहिलेली आहे. आपल्या लक्षात येईल की या मॉडेलमध्ये कुठेही GDP किंवा growth मोजली जात नाही. सर्व विकास हा या दोन मर्यादांचा विचार करून केला जातो. याविषयीचा Kate Hayworth यांचा साधारण १६ मिनिटांचा टेड टॉक जरूर ऐका असे म्हणेन.
या डोनट मॉडेलच्या जोडीला सध्या बऱ्यापैकी चर्चेत असलेली चक्रीय अर्थव्यवस्थेची (circular economy) संकल्पना ही तितकीच महत्त्वाची. सध्याची आपली नैसर्गिक स्रोत वापरण्याची क्रिया ही एकरेषीय आहे. आपण जी वस्तू वापरतो तिच्या वापराच्या शेवटी त्या वस्तूचा कचरा होतो आणि असा कचरा होतो ज्याचं अनेकदा विघटन किंवा रिसायकलिंग शक्य नसतं. म्हणजे आपण समजा लिथियम खाणीतून बाहेर काढतो आहोत पण ते आपण अशा स्वरूपात वापरतो आहोत की त्याचा पुनर्वापर जवळपास अशक्य आहे तर आपण लिथियमचा एकरेषीय वापर करतो आहोत. निसर्ग मात्र चक्राकार पद्धतीने चालतो - त्यात कचरा ही संकल्पनाच नाही. मग या पद्धतीने आपल्या व्यवस्था चालवता आल्या तर? एका उद्योगाचा कचरा हा दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असला तर? यावर जगात अनेक प्रकारचे उत्तम संशोधन सुरु आहे. यालाच Cradle-to-cradle design असेही म्हटले जाते.
भांडवलवाद हा नैसर्गिक गोष्टींचे मूल्य हे कृत्रिम चलनात ठरवतो. पण ते ठरवताना केवळ त्या वेळेस त्या नैसर्गिक स्रोताची मानवी दृष्टिकोनातली किंमत आपण मोजतो. त्यामुळे मुंबईमधली १ गुंठा जमीन आणि बीडमधली एक गुंठा जमीन दोन्हीची किंमत वेगळी असते. जर यात आपण दीर्घकालीन, आंतरपिढी, इकॉलॉजिकली शाश्वत असा हिशोब केला तर आपल्या नैसर्गिक स्रोतांची “योग्य” चलनी किंमत काय असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधणारी मॉडेल्स आता अर्थतज्ज्ञ मांडू लागले आहेत. याला natural resource accounting असे म्हणतात. म्हणजे एखादे जंगल तोडून होणारा तात्कालिक चलनी फायदा आणि ते पुढची १००/२०० वर्षे राखल्याने होणारा चलनी फायदा यांचा अंदाज तज्ज्ञ मांडत आहेत. त्यातून अर्थात फार डोळे उघडवणारे निष्कर्ष समोर येत आहेत.

आता हे अर्थव्यवस्थेचे मॉडेल वगैरे धोरणात्मक विचार झाले. हे जरी महत्त्वाचे असले तरी एक सामान्य माणूस म्हणून आपण काय वेगळा विचार करू शकतो? तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं काय करू शकतात? जॉर्ज म्हणतो की केन्सने मांडलेली सरकार केंद्रित समाजवादी व्यवस्था आणि सध्याचे लोकप्रिय नवउदारमतवादावर आणि बाजारव्यवस्थेवर आधारित भांडवलशाहीचे मॉडेल या दोन्हींमध्ये आपण केवळ सरकार आणि बाजारव्यवस्था या अर्थव्यवस्थेच्या दोनच खांबांना महत्त्व दिले आहे पण शाश्वत अर्थव्यवस्था ही चार खांबांवर उभी असते. जॉर्जच्या मते जेव्हा अर्थव्यवस्थेच्या दोन दुर्लक्षित खांबांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन आणि त्यांची पुन्हा उभारणी करू तेव्हाच आपला विकास हा शाश्वत असेल. अर्थव्यवस्थेचे ते दोन दुर्लक्षित खांब म्हणजे गृहव्यवस्था (households) आणि सामुदायिक मालमत्ता (commons). हे दोन खांब मजबूत करण्यात आपण सामान्य माणसे नक्कीच योगदान देऊ शकतो. या दोन घटकांबद्दल जॉर्जेने मांडलेले विचार आपण थोडक्यात बघू.
गृहव्यवस्था (households): हा सध्याच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य तरीही अत्यंत दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. ॲडम स्मिथ, ज्याला आधुनिक अर्थशास्त्राचा जनक असे म्हटले जाते, जेव्हा आपले वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक लिहीत होता तेव्हा तो आपल्या वडिलोपार्जित घरात राहत होता आणि अविवाहित होता. तेव्हा त्याची आई त्याचे खाणेपिणे, कपडे, घरातील इतर कामे बघत असे. दुर्दैवाने ॲडम स्मिथला अर्थव्यवस्थेमधला “अदृश्य हात” दिसला पण आपले पोषण करणारा आपल्या आईचा हात काही दिसला नाही. त्याने मांडलेल्या आधुनिक अर्थशास्त्रात घरकामाचे मोल कुठेच दाखवलेले नाही. मग ते घरकाम करणाऱ्या स्त्रियांना अर्थात “आई कुठे काय करते?” या प्रकारचे प्रश्न वर्षानुवर्षे विचारले गेले. आजही विचारले जातात. आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्था ही एका प्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीचाच भाग आहे आणि त्यामुळेच तिने स्त्रियांचे योगदान हे कधीच लक्षात घेतले नाही यात काय नवल ते काय! याविषयी चर्चा करणारे “Who cooked Adam Smith’s dinner?” या नावाचे पुस्तक आहे त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आहे.
भांडवलशाहीमध्ये केवळ पैसा अथवा पैसा निर्माण करू शकणारी स्थावर मालमत्ता हेच भांडवल आहे असे मानले जाते. ज्या कृतीतून पैसा मिळतो ते सगळे अर्थपूर्ण ज्यातून पैसा मिळत नाही त्याला काही उपयुक्तता नाही. उदाहरणार्थ, घरातल्या व्यक्तीने जर घरच्यांसाठी स्वयंपाक केला तर त्याने GDP वाढत नाही. पण जर तोच स्वयंपाक करून डबे विकले तर त्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळते. याच कारणाने स्त्रियांना नोकरी किंवा करिअर करणे इतके अवघड जाते. कारण जिथे केवळ पैसा बोलतो अशा अर्थव्यवस्थेत कोणताही पुरुष आपले अर्थाजन सोडून संपूर्णपणे घरकाम करणाऱ्या गृहस्थाची भूमिका घ्यायला सहसा तयार होत नाही. त्यातल्या त्यात स्त्रिया शिकल्याने आणि अर्थार्जन करू लागल्याने घरकामाची जबाबदारी ही पुरुषांची देखील असते हे मुश्किलीने का होईना पण मान्य होऊ लागले आहे. जरी घरकामाचं, घराच्या स्वयंपाकाचे आणि त्या वास्तूत असलेल्या आपुलकीचे, सुरक्षेचे मोल चलनात मोजले जात नसले तरी एक चांगले स्थिरता देणारे घर हे प्रत्येकाला गरजेचे असते. ती आपली सगळ्यांची मूलभूत गरज आहे. इथे मला पारंपरिक कुटुंबसंस्था म्हणजे घर असं मुळीच अपेक्षित नाही कारण आपली पारंपरीक कुटुंबं आता एकाच वेळी विस्तारली आहेत आणि संकुचितही झाली आहेत. त्यामुळे आई-वडील आणि लहान मूल, नोकरी करणारं जोडपं, एकटी राहणारी प्रौढ व्यक्ती (स्त्री/पुरुष), एखादी आजी आणि तिची मांजरं, किंवा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घर शेअर करून राहणारी तरुण मुलं मुली ही सगळी एका प्रकारची कुटुंबच आहेत आणि ती ज्या घरात राहतात ती घरं कशी आहेत हे एका शाश्वत समाजात महत्त्वाचे आहे. एका घराचा पर्यावरण रक्षणात काय आणि किती महत्त्वाचा वाटा असू शकतो हे आपण आत्ता पाहणार नाहीयोत. कदाचित त्यासाठी एक वेगळा भाग/मालिका करता येईल.
जशी घराची, आपल्या कुटुंबियांची देखभाल करणे ही गोष्ट सध्याच्या भांडवलवादाच्या परिघाबाहेर असली तरी शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे तशीच या घरांची अजून एक जपली पाहिजे अशी संस्कृती म्हणजे शेजारधर्म (neighborhood) आणि त्यातून निर्माण होणारे समुदाय (community). आपली मायबोली ही एक आभासी कम्युनिटी आहे त्यामुळे इथे जोडले जाणे तुलनेने सोपे आहे. पण आपल्या सध्याच्या समाजव्यवस्थेत आपल्या आजूबाजूच्या कम्युनिटीशी जोडलेले राहणे कमी होत चालले आहे. करोना काळात मात्र या शेजारधर्माने आणि सामुदायिक भावनेनं अनेकांना जवळ आणलं, मदतीचा हात दिला. माझे बाबा म्हणायचे की आपले शेजारी हे आपले प्रथम नातेवाईक असतात. घर काय किंवा समुदाय काय या दोन्ही गोष्टी तेव्हाच मजबूत होतात जेव्हा त्यात सहभागी लोक थोडेबहुत नि:स्वार्थी असतात. शाश्वत विकासात या अशा निःस्वार्थी लोकांच्या समुदायांचे मोठे योगदान असेल. ते कसे? तर जॉर्ज म्हणतो आपल्या पृथ्वीवर प्रत्येकाला ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगता येईल इतके रिसोर्सेस नाहीत पण आपण जर का उत्तम स्थानिक कम्युनिटी तयार करू शकलो तर आपण सगळे मिळून ऐश्वर्यसंपन्न आयुष्य नक्की जगू शकतो. त्यासाठी जॉर्ज public luxury and private sufficiency ची संकल्पना मांडतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाकडे मोठी गाडी असू शकणार नाही पण आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वोत्कृष्ट असू शकेल. आपली शासकीय रुग्णालये सर्वोत्तम सेवांनी उपयुक्त असू शकतील. प्रत्येकाच्या घराभोवती खाजगी बाग असू शकणार नाही पण आपल्या सार्वजनिक बागा, मैदाने, तरणतलाव हे सर्व उत्कृष्ट असू शकेल. भारतासारख्या लोकांची प्रचंड घनता असलेल्या देशात हे शाश्वत विकासाचे मोडेल फारच उपयोगी पडेल. यात मोठा प्रश्‍न हा असतो या सार्‍या सोयीसुविधा सांभाळणार कोण? यांची मालकी सरकारची असेल की खाजगी? इथे जॉर्ज आपल्याला अर्थव्यवस्थेच्या चौथ्या स्तंभाची आठवण करून देतो जो जवळपास विस्मृती मध्ये गेला आहे. तो स्तंभ म्हणजे कॉमन्स अर्थात सामायिक किंवा गावकीची मालमत्ता!

सामायिक किंवा गावकीची मालमत्ता: भांडवलवाद किंवा साम्यवादात नैसर्गिक संसाधने अनुक्रमे खाजगी किंवा सरकारी मालकीची असतात. खरे पाहिले तर या नैसर्गिक संसाधनांची मालकी ही त्या त्या स्थानिक समाजाकडे असली पाहिजे आणि जगभरात या दोन्ही विचारसरणींचा उदयापूर्वी या प्रकारची मालकी अस्तित्वात होती. गावाच्या सामायिक मालकीच्या विहिरी, तळी, गुरांसाठी कुरणे, कोणत्यातरी स्थानिक देवाच्या नावे राखलेल्या देवराया हे सारं काही प्रमाणात आजही अस्तित्वात आहे. जे लोक त्या नैसर्गिक साधनांच्या जवळ राहतात त्यांना त्याचे महत्त्व अधिक चांगले ठाऊक असते आणि त्यामुळे ते त्याची काळजी घेत असतात. जर दृष्टीआड सृष्टी असेल तर मग तिच्याविषयी तितकेसे महत्त्व राहात नाही. अशा सामायिक जागा परत आणणे हा शाश्वत विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. यात नैसर्गिक स्रोतांच्या जोडीला सार्वजनिक सभागृहे, मैदाने, आणि आधुनिक काळात तंत्रज्ञान देखील सामुदायिक मालकीचे असू शकेल. सामुदायिक मालकीच्या तंत्रज्ञानाची उदाहरणे आपल्याला माहिती आहेतच उदाहरणार्थ लिनक्स, विकीपेडिया . सामायिक हक्काच्या जागा या समुदायाच्या मालकीच्या असल्याने, अहस्तांतरणीय, तुकडे न करता येणाऱ्या अशा असतात आणि त्यातून होणार आर्थिक फायदा समुदायात वाटला जातो.
शहरांमधील बागा, मैदाने, तलाव हे अशा प्रकारे वॉर्डनिहाय पद्धतीने राखता येतील. यात स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे म्हणून याआधीच्या परिच्छेदात कम्युनिटीचे महत्त्व मांडले आहे. याचाच एक भाग म्हणजे सहभागी लोकशाही (participatory democracy). अर्थात जसे सध्या खेड्यात ग्रामपंचायतीचे सर्व ठराव हे ग्रामसभेच्या मार्गाने जे सर्व गावकऱ्यांच्या सहभागाने मंजूर होतात तसेच शहरात वॉर्डनिहाय बजेट ही कसे खर्च करावे याविषयी वॉर्ड सभा घेता घेऊन चर्चा, मतदान घेता येईल आणि त्यातून आपला कराचा पैसा कसा खर्च करायचा याचा किमान स्थानिक पातळीवरचा निर्णय हा इथे राहणाऱ्या नागरिकांना घेता येईल. पाच वर्षातून एकदा बजावल्या जाणाऱ्या मतदानाच्या हक्काच्या जोडीने ही अशी हक्क आणि कर्तव्य दोन्ही निभावण्याची संधी ह्या सहभागी लोकशाहीत नागरिकांना मिळेल. जगभरात या प्रकारचे प्रयोग होत आहेत. ब्राझीलमधल्या काही शहरांनी हे सहभागी लोकशाहीचे मॉडेल यशस्वीपणे राबवले आहे. येणाऱ्या काळातल्या पर्यावरण संकटांना तोंड देण्यासाठी केवळ व्यक्तिगत पातळीवरचे बदल पुरेसे नाहीत तर त्याबरोबरीने स्थानिक पातळीवर समविचारी लोकांनी येऊन केलेली कृती देखील आवश्यक आहे. जॉर्जने त्याच्या भाषणात उल्लेख केलेले अर्थव्यवस्थेचे दोन दुर्लक्षित खांब अर्थात गृहव्यवस्था आणि सामुदायिक मालमत्ता या दोन्हीचे महत्त्व वाढवणे आणि टिकवणे हे शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे आणि यात सामान्य माणूस पण बरंच काही करू शकतो.
भारतात सुदैवाने समाज म्हणून एकत्र येण्याच्या अनेक संधी येत असतात. त्यातील सामाजिक भेदभाव कमी करून या संधींचा स्थानिक पातळीवर अधिक समान आणि निसर्गकेंद्रित व्यवस्था उभारण्यासाठी नक्कीच उपयोग करता येईल.
जरी जॉर्जने सुचवलेल्या उपायांवर बरंच काही लिहिता येण्यासारखं असलं तरी ही लेखमालिका इथे संपवत आहे कारण या मालिकेचा मुख्य उद्देश जॉर्जच्या भाषणातील विचारांची ओळख करून देणे हा आहे. भाषणाचा थेट अनुवाद वाचायला संदर्भहीन आणि तितकासा रंजक वाटला नसता. म्हणून जिथे शक्य झाले तिथे अधिकचे संदर्भ आणि काही ठिकाणी माझे काही स्वतंत्र विचार मांडले आहेत. तेव्हा यात काही न्यून असेल तर ते माझे आहे आणि काही सकस असेल तर ते जॉर्जच्या विचारांची देन आहे असं म्हणेन. शिवाय मी सर्वांना वेळ काढून जॉर्जचे भाषण ऐकावे असे जरूर सुचवेन. कारण माझ्यामते तुम्हाला पटोत अथवा न पटोत जगात सध्या जी वैचारिक घुसळण चालू आहे तिच्यात जॉर्जने मांडलेले विचार स्वतःचा एक प्रवाह बनवू पाहत आहेत आणि म्हणून तुम्हाला त्यांची ओळख असली पाहिजे.

संदर्भ: मूळ भाषणाची लिंक
द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, हे सगळं मराठीत आणते आहेस हे खूप मेहनतीचं, चिकाटीचं काम आहे. शाश्वत विकासाच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार करून तू याचं अख्खं पुस्तक कर असं सुचवेन.

धन्यवाद गौरी! तुझा प्रतिसाद खूप मोलाचा आहे. ही मालिका लिहिणं बऱ्यापैकी कठीण होतं. किमान ६ महिने तरी मी याच्यावर काम केलं आहे. कारण मुळात मलाच सगळे विचार समजून घ्यायला, माझ्या विचारांत ते मुरायला भरपूर वेळ लागला. मला आंधळेपणाने केवळ जॉर्ज जसे म्हणतो तसे सर्व उतरवून काढायचे नव्हते. ते फारच नीरस आणि दुर्बोध झालं असतं. शिवाय विषयाची व्याप्ती एवढी आहे की थोडे सुबोध करताना नेमके कुठे थांबायचे हे ठरवणं पण कठीणच होतं. पण या साऱ्यात मला खूप शिकायला मिळाले आणि आवडीच्या विषयावर मनन, चिंतन करायला मिळाले. आणि मुख्य म्हणजे मी जे काही जीवनशैलीत बदल करायचा प्रयत्न करतेय त्यांना चांगला वैचारिक बेस मिळाला.

जि,
आज तिन्ही भाग वाचले, मुरवून परत परत वाचावे लागेल असे लिहित आहेस. खूप मोलाचे काम करत आहेस हे सर्व मराठीत लिहून.

शाश्वत विकासाच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार करून तू याचं अख्खं पुस्तक कर असं सुचवेन. ह्याला मम

जि, मी मूळ भाषण आणि तुझे लेख दोन्ही वाचले. कधी पटलं कधी विचारात पडले. गौरीला +१.
मी हे सुचवते आहे याचे मलाच आश्चर्य वाटते आहे पण - व्हॉट्सअ‍ॅपवर वाचता येतील असे लहान-लहान भाग करून लोकांपर्यंत पोहोचवणे जमेल का? पुस्तक वाचणारा वर्ग वेगळा असतो नि व्हॉट्सअ‍ॅप इतकीच झेप असणारे लोक ही बरेच आहेत.

धन्यवाद हर्पेन, सी, आणि स्वाती ताई!
सी, जॉर्जचे भाषण ऐकलेस त्याबद्दल विशेष आभार! व्हाट्सऍप पोस्ट्स ची कल्पना enticing आहे. अर्थात ते जास्ती अवघड काम असेल. एक तर एका पोस्टची लांबी किती असावी आणि या साऱ्याचे किती भाग होतील याचा हिशोब मांडला पाहिजे. किंवा छोट्या pdf करता येतील का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप भाग झाले तर या साऱ्या आयडियॉलॉजीजचा एकत्रित विचार केल्याने जो परिणाम होतो तो हरवायला नको. म्हणूनच मी तिन्ही भाग एकाच दिवशी प्रकाशित केले. ते जितके सलग वाचले जातील तितके connecting the dots सोपे जाईल. पण मी नक्की प्रयत्न करेन कारण जितक्या लोकांपर्यंत ही जाणीव पोहोचेल तितकं चांगलंच आहे!

काही पटलं काही पटलं नाही. मूळ भाषण अजुन ऐकलं नाहीये क्यू मध्ये ठेवलंय.

लोकल बागा, तरणतलाव, अरिना, वाचनालये, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था इ. गावकीचे हे मॉडेल कॅनडात आणि मला वाटतं बर्‍याच ठिकाणी असतं ना? लोकल सिटीला जो कर देतो त्यातुनच हे सगळं लोकल सहभागातून चालतं. प्रातिनिधिक लोकशाहीद्वारे अर्थात, पण लहानसहान गोष्टींसाठी नेबरहुड मिटिंग होतात, तुमच्या तक्रारींची दखल त्वरीत घेतली जाते. हे प्रतिनिधी अपक्ष असतात, स्थानिक सुद्धा कुठली पार्टी ( जनरली) नसते.
भारतात हे मॉडेल पूर्वी राबवलं जायचं पण अगेल लोकसंख्येला अपुरे पडणे, खाजगी लागेबांधे, प्रत्यक्ष समान्य लोकांचा काणाडोळा/ प्रतिनिधीवर काहीच वचक नसणे इ. मुळे खाजगी वाढत गेलं मला वाटतं.
अगेन मालकी बदलल्याने नक्की काय होईल ते विसरुन गेलो. फॉर प्रॉफिटचं नॉट फॉर प्रॉफिट केल्याने जे होईल तेच होईल ना? का आणखी काही वेगळं होईल?
जीडीपी मोजणी बद्दल : मग रिसोर्स वापर/ पुनर्वापर मोजणी केली तर कार्बन क्रेडिट्स सारखी? जीडीपी सोडा तर प्रगतीचा काहीतरी ठोस मापक नको का? नुसतं यथाशक्ती कमी रिसोर्सवापरुन जगणे असं भोंगळ पातळीवर केलं तर काही होईल का? बॉटम अपने ही काही होईल का? असे (नेहेमीचेच) प्रश्न पडले.
लेखमाले बद्द्ल आणि नव्या ओळखी बद्दल धन्यावाद. त्याचं भाषण ऐकलं की कसं वाटलं लिहितो.

अमितव, या मालिकेचा किंवा जॉर्जच्या भाषणाचाच उद्देश असे अनेक प्रश्न आणि शंका मनात उभे करणे हा आहे. त्यामुळे तुला प्रश्न पडले हे मस्तच आहे! मात्र या प्रश्नांची कोणतीही रेडिमेड one size fits all उत्तरं नसणार आहेत. आणि तशी नसली पाहिजेत कारण पृथ्वीवर जी विविधता आहे ती आपल्या जीवनशैलीत reflect होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून bottom up approach हा जास्त गरजेचा आहे. शिवाय जे या सिस्टीमच्या टॉपला आहेत ते आपल्या हातांनी ही सिस्टीम बदलतील आणि स्वतःला मिळणाऱ्या फायद्यांवर पाणी सोडतील अशी अपेक्षा ठेवणं तितकं वास्तविक वाटत नाही.

I don’t think ownership of Commons means strictly non-profit. It can sometimes be a non-profit. पण आर्थिक फायदा हे Commons चं byproduct असू शकतं. मूळ उद्देश हा सर्व stakeholders (नैसर्गिक आणि मानवी दोन्ही) चे शोषण होऊ न देणे हा असला पाहिजे. उदाहरणार्थ, एक तळे आहे ज्यातून एका मानवी वस्तीला पाणी पुरवठा होतो. जर या तळ्याचे शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन करायचे असेल तर मानवी उद्देशांमध्ये सर्वांना समान हक्क, पाणी उपशावर समान बंधने इत्यादी असू शकतील. नैसर्गिकदृष्ट्या तळ्यातील जीवसृष्टीला संरक्षण, इतर प्राणी पक्षांना पाणी मिळण्याची सोय, त्या तळ्याच्या पाणलोट क्षेत्रातील जंगल राखणे इत्यादी गोष्टी असतील. जर त्या तळ्यातून किंवा जंगलातून काही उत्पन्न हाती येत असेल तर ते सहकारी पद्धतीने वाटून घेणे असे होऊ शकेल. पण हे करताना त्या जंगलाच्या किंवा तळ्याच्या मूळ परिसंस्थेचा समतोल राखणे हे आर्थिक फायद्यापेक्षा अधिक महत्त्वाचे. सध्याचे कॉमन्स आणि सहभागी लोकशाहीचे मॉडेल खूप लिमिटेड आहे. सध्या विकासकामे व्हाया दिल्ली किंवा मुंबई अशी मंजूर होतात. कारण मूळ व्यवस्था केंद्रित आहे. उद्या जर पुण्यात मेट्रो हवी की नको याचे संपूर्ण (end to end) व्यवस्थापन पुणे महानगर पालिका आणि पुणेकर यांनी करायचे ठरवले तर त्यातून कदाचित वेगळे मॉडेल समोर येईल. कॉमन्स मध्ये अधिक distributed विकासाचे मॉडेल राबवता येईल. Decentralized या शब्दाला उगीच एक नकारात्मक छटा आहे. त्यापेक्षा distributed हा शब्द मला जास्त योग्य वाटतो पण त्याला पर्यायी मराठी शब्द मला माहिती नाही.

विकास किंवा प्रगती कशाला म्हणायचं आणि तो कोणत्या फूटपट्टीवर मोजायचा यासाठी UN ने ठरवलेली sustainable development goals (SDGs) हा एक चांगला starting point असू शकतो. ही उद्दिष्ट्ये जरी परिपूर्ण नसली तरी किमान त्यांची दिशा योग्य आहे. कोणाला कशाची गरज आहे हे ठरवताना global south आणि global north च्या गरजांमध्ये मूलभूत फरक आहेत. जर आपण डोनट मॉडेलचा आधार घेऊन पाहिलं तर Global North च्या काही देशांनी (उदाहणार्थ, कॅनडा, नॉर्डिक देश) डोनटची आतली कड (UN SDGs) बहुतांशी राखली आहे. पण त्यांचा इकॉलॉजिकल फूटप्रिंट मर्यादेबाहेर वाढलेला आहे. या उलट परिस्थिती global south (आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आणि आशिया खंडातले बरेचसे देश) ची आहे. त्यांचा इकॉलॉजिकल फूटप्रिंट कमी आहे पण त्याचवेळी SDGs पूर्ण करण्यात अनेक देश खूप मागे आहेत. त्यामुळे विकासाची एकच व्याख्या न ठेवता ती प्रदेश/देश सापेक्ष असू शकेल आणि त्यासाठी डोनट मॉडेल एक चांगलं फ्रेमवर्क असू शकेल.
जेसन हीकेलचा नॉर्डिक देशांच्या फूटप्रिंट विषयीचा व्हिडीओ आणि केट रेवर्थ यांचा टेड टॉक जरूर बघ असं सुचवेन.

वाचतोय लेखमाला. अजून पूण समजले नाही पण पुन्हा वाचणार आहे.

उद्या जर पुण्यात मेट्रो हवी की नको याचे संपूर्ण (end to end) व्यवस्थापन पुणे महानगर पालिका आणि पुणेकर यांनी करायचे ठरवले >>> अशा काही निर्णयांच्या बाबतीत नागरिकांना उपस्थित राहण्याकरता महापालिकेच्या सभा सध्याही होतात. याबद्दल वाचले आहे. पण त्यात येणारे व्हेस्टेड इण्टरेस्ट, नागरिकांचे अफाट सल्ले ई मुळे हे फारसे उपयोगी नसते असाच माझा समज आहे. दुसरे म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात "नागरिकांनी" याचा अर्थ "नागरिकांच्या प्रतिनिधींनी" असाच व्हायची शक्यता आहे - तसे झाले तर आताच्या परिस्थितीत फार फरक पडणार नाही.

अगदी लोकप्रतिनिधी यात सचोटीने वागत आहेत असे धरले तरी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला (मनपा, नगरपालिका ई) अनेक उपक्रमांतून मिळणारा कर वगैरे गोष्टी नागरिकांच्या मतापुढे वरचढ ठरतात असा अमेरिकेतील टाउन हॉल्स मधे होणार्‍या निर्णयांबद्दलचा अनुभव आहे. यात आणखी एक खोच आहे - गावाचे/शहराचे कामकाज चालवायला निधी कसा मिळवावा लागतो, तो खर्च करण्याचे प्राधान्य कसे असावे लागते याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. त्याकरताच प्रतिनिधी निवडलेले असतात. उद्या जर हे निर्णय थेट नागरिकांनी घ्यायचे ठरवले तर ते सर्वांच्या दीर्घकालीन हिताचे असतील का याबद्दल शंका आहे.

याबद्दल वेस्ट विंग सिरीज मधे एक फेमस डॉयलॉग आहे - अशा गोष्टी सर्वसामान्य लोकांना माहीत असणे अवघड आहे अशा अर्थाचा. सापडला की लिन्क देतो.

बाय द वे - इथे डोनटचा उल्लेख आहे त्यामुळे मला या पानावर डंकिन् डोनटची जाहिरात दिसत आहे. हे थोर आहे. टोटल आयरनी Happy

जिज्ञासा, नेहमीप्रमाणे या विषयावर अभ्यासु व विचार करायला लावणारे तुझे हे लिखाण आहे.

प्रत्येक वेळेला तुझे या विषयावरचे तुझे लिखाण वाचले की एकच विचार मनात येतो. हा तुला अभिप्रेत असलेला “पॅराडाइम शिफ्ट“ होणार कसा? आपण ज्या मार्गावरुन चाललो आहोत तो पुर्णपणे चुकीचा होता/आहे हे मान्य करायला बहुतांशी लोकांच्या पचनी पडणे कठिण जाइल. शिवाय पर्यायी अर्थव्यवस्था/ जिवनशैली/ आयडिऑलॉजी जी तुला/ जॉर्ज मॉनबियोंला अभिप्रेत आहे ती अस्तित्वात यायला जगातल्या बहुतांशी देशात राज्यक्रांतीच घडली तरच शक्य आहे असे मला वाटत. त्यासाठी जरुरी असलेला “ पॅराडाइम शिफ्ट“ जगातल्या कमीत कमी किती लोकांत झाला पाहीजे असा तुझा अंदाज आहे? व तो शिफ्ट होण्यासाठी किती काळ लागेल असे तुला वाटते? आणी तसा शिफ्ट होइसपर्यंत खुप उशीर झाला असेल का?

मला माहीत आहे या प्रश्नांची उत्तरे सोप्पी व तयार नाहीत. तरीही तुझे लेख वाचल्यावर मला हे प्रश्न निश्चितच भेडसावतात.

मुकुंद, तुम्ही विचारलेले सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. माझे कच्चेपक्के विचार मांडते आहे.
सध्याचे विकासाचे मॉडेल एकदम बदलणे अशक्य आहे. त्यामुळे एकाच क्रांतीद्वारे बदल याऐवजी अनेक ठिकाणी अनेक छोट्या स्वरूपातील क्रांती घडून येणे/येत राहणे हे जास्ती शक्य वाटते. आणि विकेंद्रीकरण हा हेतू असताना असेच tailormade बदल घडले तर ते अधिक सुसंगत आणि शाश्वत असतील. किती लोक बदलले म्हणजे paradigm shift घडेल हे पुन्हा प्रत्येक ठिकाणी वेगळे असेल. धोरणात्मक बदलांची नक्कीच गरज असते पण जोपर्यंत आपली वागणूक बदलत नाही तोपर्यंत ते बदल तितके प्रभावी ठरत नाहीत. शिवाय प्रबोधनामुळे जनजागृती होऊन जर धोरणे बदलली तर तसे बदल अधिक शाश्वत असतील. अर्थात ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण माझ्यामते Malcolm Gladwell यांचा tipping point चा सिद्धांत लागू पडावा - if enough people do it then paradigm shifts and we have a new norm. एका वेगळ्या संदर्भात मी ऐकलं होतं की जर सातत्याने प्रयत्न केले तर tipping point ७ वर्षांत येऊ शकतो. आता हा प्रश्न बहुआयामी असल्याने प्रत्येक गोष्टीचा tipping point थोडा वेगळा असेल पण प्रयत्नात सातत्य असेल तर तो येईलच. या बाबतीत मला जॉर्ज मॉनबियोंचा दृष्टिकोन आवडतो. तो एके ठिकाणी म्हणतो की समोरची भिंत कितीही मजबूत आणि अभेद्य वाटली तरी जर तुम्ही बारकाईने पाहिलंत तर तिच्यात तुम्हाला कुठेतरी भेगा दिसतीलच! If you stare at the wall long and hard enough, the cracks will start to appear. आज जरी हा प्रश्न खूप मोठा आणि अशक्यप्राय वाटत असला तरी आपल्यापैकी जितके जण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास सुरुवात करतील तितका तो प्रश्न सुटायला सोपा होत जाईल.

खूप उशीर होईल का? Is there a timeline? - The answer is yes, there is a predicted timeline. २०३० पर्यंत ठोस बदलांना सुरुवात होणे अपेक्षित आहे. खरंतर peak emissions by 2030 and then go to net zero by 2050 अशी कल्पना आहे. पण माझ्यामते जो नवीन डेटा आहे त्यातून हवामानबदलाविषयीचे आपले आधीचे अंदाज बरेच conservative (not on the side of caution) होते आणि आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने हवामानबदल घडतो आहे असे लक्षात येते आहे. त्यामुळे आत्तापासूनच आपल्या साऱ्याच कारभारात पृथ्वीवरचा भार कमी करणे (reduce emissions and human footprint rather than aiming for net zero emissions and footprint) हा मुख्य प्राधान्यक्रम असायला हवा असे अनेक तज्ज्ञांचे (आणि माझेही) मत आहे. Let us not wait until 2030 to realize that we should have acted sooner. Also, we must remember that what we are playing is a mitigation game - 1.5 degree celsius raise is the minimum we are looking at. या दीड अंशाच्या तपमानवाढीचे दुष्परिणाम आपण भोगणार आहोतच. पण आपण काही ठोस कृती केली नाही तर अधिक तपमानवाढ ही अधिक विनाशकारी असेल यात शंका नाही.

“आज जरी हा प्रश्न खूप मोठा आणि अशक्यप्राय वाटत असला तरी आपल्यापैकी जितके जण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास सुरुवात करतील तितका तो प्रश्न सुटायला सोपा होत जाईल.”

जिज्ञासा, हे जे तु म्हणतेस तोच तर कळीचा मुद्दा आहे!

या प्रश्नाचे उत्तर कोण शोधणार?अमेरिकेतली माणसे? अशक्य! सध्या इथे जे राजकिय वातावरण आहे, जिथे क्लायमेटॉलॉजीला शास्त्रच समजत नाहीत, जिथे टेड क्रुझ, रॉन पॉलसारखे लोक क्लायमेट चेंज/ग्लोबल वॉर्मींग या कॉन्सेप्ट्सना लाथाडुन टाकुन डोक्यावर घोंगड टाकुन अंधार करुन बसुन अजुन उजाडायचे आहे असे मानत आहेत, जिथे सायंस व सायंटीस्ट्स्ना वेशीवर टांगण्यात येते, तश्या सायंसविरोधी जनतेच्या भिंतीकडे कोणी कितीही वेळ बारकाइने पाहात राहीले तरी काहीही फरक पडणार नाही! त्यांच एकच पालुपद, पृथ्विने असे बरेच क्लायमेट चेंजेस , तापमानातले चढउतार पचवले आहेत!पण त्यांना हे कळत नाही की ज्या वेगात हे सध्याचे वॉर्मींग होत आहे ते नॅचरल सायकलच्या वेगापेक्षा आठपटीने जास्त आहे! पण हे सांगणार्‍या शास्त्रज्ञांना व शास्त्रालाच इथे जर वेड्यात काढण्यात येते तिथे तु किती वेळ भिंतीकडे बघुन तिला भेगा पडायची वाट बघणार?

बर मग बाकी जगात तुला वाटत चायनामधली लोक या प्रश्नाचे उत्तर शोधणार? तेही मला अशक्य वाटत. तिकडे ते व त्यांचा लिडर क्षी जिन पिंग जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था व म्हणुन सुपर पॉवर बनायच्या/ अमेरिकेला काटशह देण्याच्या नादात आहेत. बिजिंग मधे एवढे भयानक पोल्युशन असुनही त्यांना काहीही फरक पडत नाही!

आणी भारत म्हणेल फक्त आम्हीच का कमी उर्जा/ फॉसिल फ्युएल्स वापरुन आमच्या आर्थिक उन्नतीला बाधा आणायची?

म्हणजे झाल! लोकसंख्येत टॉप ३ असलेले देशच कुठल्या ना कुठल्या कारणाने हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची वागणुक बदलणार नाहीत व त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार नाहीत, मग हा प्रश्न कोण व कसा सोडवणार?

म्हणुन मी त्याला कळीचा मुद्दा म्हणालो.

(अवांतरः माझा आतेभाउ डॉ. सतिश बागल याने गेल्या वर्षी “ चिनी महासत्तेचा उदय“ म्हणुन मराठीत एक सुंदर व स्कॉलरली पुस्तक लिहीले आहे. ते अ‍ॅमॅझॉनवर उपलब्ध आहे. त्या पुस्तकात त्याने ३४ वा चॅप्टर “ अस्वस्थ शहरे आणी पर्यावरण” यात चायनामधल्या पर्यावरण प्रदुषणाचा छान उहापोह व आढावा घेतला आहे. तुझ्याकडे जर किंडल अनलिमिटेड असेल तर कदाचित तुला त्याचे ते पुस्तक किंडल वर वाचायला मिळेल अस मला वाटत. जमल तर जरुर वाच) .

मुकुंद, सॉरी, प्रतिसाद द्यायला उशीर झाला थोडा! या प्रश्नाचे उत्तर कोण शोधणार? तर सोपे उत्तर - तुम्ही आणि आम्ही - थोडक्यात सामान्य माणसे! आणि मला वाटते त्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. चीनबद्दल कल्पना नाही पण बाकी जगात सर्वत्र पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या लोकांची संख्या वाढते आहे. सगळीकडे स्थानिक अन्नधान्य, व्यापार, आणि ऊर्जा स्रोत यांच्याकडे लोक वळत आहेत.मुख्य म्हणजे नवीन पिढी पर्यावरणाविषयी अधिक जागरूक आहे. अभेद्य भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत! चुकत माकत का होईना आपण योग्य दिशेला लागू असे मला वाटते. जसे हवामानबदलाचे दुष्परिणाम सामोरे येऊ लागतील तसे देशांच्या सरकारी धोरणांमध्ये ही बदल घडू लागतील. स्त्रोतांचे विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक सार्वभौमित्व याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. अजस्त्र आणि लांबलचक अशा सप्लाय चेन्सवरचे अवलंबित्व कमी करण्यात शहाणपणा आहे हे सर्वांना हळूहळू लक्षात येत आहे. अन्न, पाणी आणि ऊर्जा किमान या तीन गोष्टी प्रत्येक भौगोलिक भागात स्थानिकरीत्या उपलब्ध असल्या पाहिजेत. त्याआधी या गरजा मुळात कमी केल्या पाहिजेत.
अर्थात हे कागदावर लिहिण्याइतके सोपे नाही. पण हजारो मैलांचा प्रवास एका पावलानेच सुरु होतो तसे आपण प्रयत्नात सातत्य राखिले की आपोआप बदलांना बळ मिळेल. Think globally, act locally हा मंत्र होईल. मी फार आशावादी व्यक्ती आहे त्यामुळे सगळे चांगलेच घडेल असे मला वाटते!
तुम्ही सुचवलेले “चिनी महासत्तेचा उदय” हे पुस्तक डाउनलोड केले आहे. वाचून झाले की तुम्हाला नक्की कळवेन.