निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

Submitted by मार्गी on 14 May, 2016 - 02:40

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

आर्थिक विकासातला अनर्थ

आज आपण ज्याला विकास म्हणतो, तो प्रत्यक्षात काय आहे? आज आपण म्हणतो की, अनेक देश विकसित आहेत आणि अनेक विकसनशील आहेत. किंवा अमुक सरकारच्या पाच वर्षांमध्ये राज्याचा काहीच विकास झाला नाही. विकासाचा 'अर्थ' काय आहे? विकासाची प्रचलित संकल्पना पश्चिमेकडून आलेली आहे आणि ती मुख्यत: आर्थिक विकासावर आधारित आहे. विकासाचा अर्थ- आर्थिक विकास; आर्थिक क्षमतेचा विकास व अर्थव्यवस्थेचा विस्तार. शहर, उद्योगधंदे, उत्पादकता आणि कन्झ्युमिंगशी संबंधित विकास. ह्या दिशेने होणा-या परिवर्तनाला विकास म्हंटले जाते. म्हणजे जर पूर्वी एखाद्याला पाच हजार वेतन असेल आणि आता दहा हजारांचा जॉब असेल तर त्या संकल्पनेनुसार त्याला विकास मानला जाईल. पण ह्या संकल्पनेमध्ये सगळ्यात मोठा दोष हा आहे की, त्यामध्ये इतर अनेक गोष्टींना विचारात घेतले जात नाही. अनेक अंडरकरंटस विचारात घेतले जात नाहीत.

सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने विकासाच्या क्षमता पूर्ण होणे ह्याला विकास म्हंटले जाते. म्हणजे जर एखाद्या शेताची अमुक अमुक उत्पादन घेण्याची क्षमता असेल, तर ती क्षमता प्रत्यक्षात आल्यानंतर त्याला विकसित शेत म्हंटले जाईल. किंवा मानसशास्त्रीय भाषेमध्ये शक्यता प्रत्यक्षात येणे ह्याला विकास म्हणतात. उदाहरणार्थ मुलाची क्षमता विकसित होते, हळु हळु त्याची समज वाढत जाते इत्यादी. पण आपण विकासाच्या पर्यायी संकल्पनांना विचारात घेतलं तर वेगळी दिशा दिसते. गांधीजी, मार्टीन ल्युथर अशा काही जणांनी एका वेगळ्या प्रकारच्या विकासाचा मार्ग सांगितला आहे. ह्या विकासाच्या संकल्पनेमध्ये पर्यावरणाची पूर्ण काळजी घेतली जाते. फक्त मानवाचा विकास नाही, तर पर्यावरण आणि सर्व प्राणीमात्रांचा विकास- त्यांच्या क्षमतांचा विकास. आणि आज ह्या संकल्पनेला शाश्वत विकासाचा मार्ग म्हंटले जाते.

जर विकास म्हणजे जर फक्त सगळ्या संसाधनांची ऊर्जा एका जागी एकत्र आणणे असं असेल, तर तो कधीच टिकू शकणार नाही. काही शेतकरी असे असतात जे एकाच वर्षी जमिनीचा पूर्ण कस बाहेर काढतात; सगळी क्षमता वापरतात. ऊसासारखं मोठं कॅश क्रॉप घेतात जे जमिनीतून सर्व शोषून घेतं. जमिनीला बदल्यात काही देत नाही. आणि जर असं सारखं चालू राहिलं तर लवकरच जमीन नापिक होते. त्यातील पोषक तत्त्वे संपतात. आणि मग अशा शेतक-यांना पुढच्या वर्षांमध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते. जमिनीमधून फक्त पोषण घेणारं पीक घेण्याच्या ऐवजी मध्ये मध्ये जमिनीमध्ये पोषकतत्त्वे परत करणारी पिकेही घेतली तर जमिनीची क्षमता टिकून राहते. त्याला अल्टरनेट क्रॉपिंग पॅटर्न म्हणतात. ह्या पद्धतीमध्ये जमिनीचं संतुलन टिकवून पिके घेतली जातात व जमिनीचा कस टिकून राहतो, तिची क्षमता कमी होत नाही. अगदी असंच आपण विकासासंदर्भातही करतो आहोत. विकासाच्या नावाखाली आपण सगळं काही पर्यावरणातून ओढून घेतोय आणो परत काहीही देत नाही आहोत. मग नैसर्गिक संसाधनं संकटात आहेत, ह्यामध्ये काहीच आश्चर्य नाही. आणि तितक्याच प्रमाणात मानवी जीवनातही तणाव वाढतोय.

गांधीजींनी विकासाची जी संकल्पना सांगितली आहे, ती म्हणजे निसर्गात प्रत्येकाच्या आवश्यकतेसाठीच्या गोष्टी‌ आहेत, पण कोणाच्याही लोभाला पुरे पडतील अशा गोष्टी नाहीत. The world has enough for everyone's need, but not enough for anyone's greed. माणूस वगळता अन्य निसर्गामध्ये प्रत्येकाच्या आवश्यक गोष्टींची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे संतुलनही टिकून राहतं. पण माणूसच हे संतुलन अस्थिर करतो. आपणच. आपण ज्याला विकास समजतो, त्या मार्गावर आपण असंतुलन आणि तणावापासून लांब नाही. कदाचित काही काळ आपण भ्रमात राहू शकतो. पण पर्यावरणाचे अभ्यासक हेच म्हणतात की, पर्यावरण प्रत्येक दिवशी संकटाच्या दिशेने जात आहे. नुकतेच भारतामध्ये आणि कॅनडातील डोंगरांवर पेटलेले वणवे हेच सांगतात.

एक उदाहरण घेऊ. आजपासून वीस किंवा पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत आपण पिण्याच्या पाण्यासाठी २४ तास सुरू असलेल्या नळाऐवजी किंवा मोटरऐवजी हापसा वापरत होतो. तो प्रकार खूप कष्टदायी होता. खूप वेळ हापसल्यानंतर तसं कमीच पाणी मिळायचं. ज्या दिवशी आपल्याकडे नळ किंवा मोटर सुरू झाली, त्यादिवशी आपल्याला झालेला आनंद! पण आता वीस- पंचवीस वर्षांनंतर बघितलं तर कळतं की, तो हापसाच जास्त चांगला होता. कारण मेहनतीने पाणी काढावं लागत असल्यामुळे पाण्याची किंमत होती. त्याचा वापर करण्यामध्ये थोडी शिस्त होती. आणि उपसण्यात येणारं पाणीही कमी होतं. त्यामुळे भूमिगत पाण्याचे स्रोत (एक्विफर) पातळी कमी होत नसायची. पण जेव्हा मोटर आली आणि अनेक नळ लागले, तेव्हा पाणी मिळणं खूप सोपं झालं. पाणी वाहतंच झालं. पूर्वी जिथे एखाद्या गल्लीमध्ये एक हापसा असायचा, तिथे प्रत्येक घरामध्ये तीन- चार नळ सुरू झाले. पाणी पाण्यासारखं वाहायला लागलं (आता ही म्हण भविष्यात बदलेल!). पण आज परत वेगळी परिस्थिती आली आहे. आज त्या नळांना दहा दिवसातून एकदा कसंबसं पाणी येतं आहे. तेही फार कमी. ह्यावेळी स्पष्ट जाणवतं की, तो जुनाट हापसा जास्त संतुलित होता. कारण त्यामुळे पाणी जमिनीत टिकून राहायचं. आणि मोठ्या पाईपलाईन्स नसल्यामुळे पाणी परत त्याच जमिनीतही जायचं. ह्याचा अर्थ असा नाही की, आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती चुकीच्या आहेत. चुकीचा आपला वापर आहे. आपली समज परिपक्व नाही. आपण निसर्गाकडून काय घेतोय आणि त्याला काय देतोय, हे आपल्याला माहिती नाहीय.

आपण निसर्गाकडून जितकं घेतो, तितकंच त्याला परत देत राहायला पाहिजे. पण आज काय होतं? जंगल तोडून तिथे शहर बनवली जातात. झाडं तोडून वस्ती उभी राहते. निसर्गात प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. मोठ्या प्रमाणात झाडं कापली गेली, तर संतुलन बिघडणारच. शहरातल्या लोकांना ऑक्सीजन पाहिजे, पाणी पाहिजे पण झाडं नकोत. शहर वसवायला जितके झाड तोडले, तितकेही लावण्याची कोणाला इच्छा नाही. मग पर्यावरण असंतुलित होणं, ह्यामध्ये आश्चर्य काहीच नाही.

आपण जीवनात फक्त चांगलं, फक्त हवं त्याचीच अपेक्षा ठेवतो. सुख हवं, दु:ख नाही. फक्त आनंद हवा, वेदना नाही. फक्त उजेड, अंधार नाही. पण जीवन आणि निसर्ग म्हणजे अशा विपरित दिसणा-या सर्व गोष्टींचा परिपूर्ण संगमच. त्यामुळे फक्त एक टोक पकडून चालणार नाही. एक टोक पकडलं तर पेंडुलमप्रमाणे लवकरच दुस-या टोकाला जावं लागेल. म्हणून जर संतुलन हवं असेल, तर मध्यभागी राहावं लागेल. दोन्ही टोकं सोडून बरोबर सुवर्णमध्य गाठावा लागेल. तेव्हा संतुलन शक्य असेल. अशा संतुलनाची काही उदाहरणे पुढच्या भागांमध्ये बघूया.

पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गांधीजींनी विकासाची जी संकल्पना सांगितली आहे, ती म्हणजे निसर्गात प्रत्येकाच्या आवश्यकतेसाठीच्या गोष्टी‌ आहेत, पण कोणाच्याही लोभाला पुरे पडतील अशा गोष्टी नाहीत. The world has enough for everyone's need, but not enough for anyone's greed. माणूस वगळता अन्य निसर्गामध्ये प्रत्येकाच्या आवश्यक गोष्टींची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे संतुलनही टिकून राहतं. पण माणूसच हे संतुलन अस्थिर करतो. आपणच. आपण ज्याला विकास समजतो, त्या मार्गावर आपण असंतुलन आणि तणावापासून लांब नाही. कदाचित काही काळ आपण भ्रमात राहू शकतो. पण पर्यावरणाचे अभ्यासक हेच म्हणतात की, पर्यावरण प्रत्येक दिवशी संकटाच्या दिशेने जात आहे. >>>>>> अतिशय मूलगामी विचार मांडलेत त्याकरता अनेक धन्यवाद....

हे सगळ्यांनाच पटेल, पण आचरणात आणता येणे कठीण असल्याने नेमक्या उपाययोजनांचा जास्त उहापोह होऊन त्यातील सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्टी लोकांसमोर येणे फार गरजेचे आहे.

उदा. हापश्याचे पाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कितीही महत्वाचे असले तरी पुण्यात राहणारा माझ्यासारखा (टिप्पणी सोडली तर) त्याबाबत काही करु शकत नाही. पण ओला कचरा बागेत वा कुंडीत जिरवून त्याचे रिसायकलींग नक्कीच करु शकतो.