एक लेश विठ्ठलाचा
गाथा अभ्यासिता जरी
हाता न ये ती विरक्ती
तरी समजून घ्यावे
प्रेम प्रपंचाचे प्रति
अभंगाने हेलावून
नाही जात भारावून
तरी चरणी तुक्याच्या
दिले नाहीच झोकून
एक लेश विठ्ठलाचा
जरी नये ह्रदयात
तरी व्यर्थ सारे होई
कथा किर्तनी रमत
तुका आकाशाएवढा
नको आपुली प्रशस्ती
पाया लागोनीया मागू
भाव दृढ तुक्या (हरी) प्रती
मायबाप देहूमाजी
मायबाप देहूमाजी
राहतसे निश्चळसा
ढुशा तान्हेल्याच्या साहे
सोडी पान्हा अमृतसा
गाथेमाजी फावतसे
निर्मळसा कवडसा
अंतरात अवचित
प्रेमकोंब लसलसा
इंद्रायणी डोहामधे
संथपाणी काळेशार
येई अविरत कानी
गोड वीणेचा झंकार
गगनात निळ्याशार
बिंब उमटे का त्याचे
अनंतशा अवकाशा
पिसे लागले तुक्याचे
पिसे....वेड
......शशांक
श्री तुकोबारायांचे देवदर्शन
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥५८१
हा अभंग म्हणजे श्री तुकोबारायांचे पूर्णोद्गार आहेत. साधकावस्था पार करुन बुवा आता सिद्ध झाले आहेत. या सिद्धावस्थेचे काहीबाही वर्णन या अभंगातून बुवा करीत आहेत. काही बाही अशा करता कि आपण सर्वसामान्य जिथे समुद्रपातळीवर उभे आहोत तिथून हे गौरीशंकराचे शिखर सगळेच्या सगळे कसे काय दिसणार आपल्याला !!
विनवणी
क्षणाक्षणाला पडतो खाली
उठुनी पुन्हा उचलतो पाऊली
नसे साथीला दिसे कुणीही
रणरण अवघी नसे सावली
बघुनी सारे राजमार्ग ते
वाटबिकटशी हीच निवडली
तुम्हासारखे दिग्गज कोणी
कधी चालले याच दिशेनी
केशर-बुक्का खुणा पाहुनी
दिशा हीच ती नाही चुकली
गाथेमधल्या शब्दांना मी
कधी मस्तकी उरी सांभाळी
त्या बोलाच्या साथीने तर
चालतोच ही वाट निराळी
आळी पुरवा एक एवढी
करी विनवणी माथा लवुनी
नसेल उत्कट भाव तरीही
घ्या ओढूनी घ्या हो जवळी
-------------------------------
अवघे सावळ
उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||
चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||
अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||
कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||
मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||
तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||
विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||
तुकोबांची कीर्तनभक्ति - सत्संगती - भाग १
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥९६||
(वेव्हार=व्यवहार., वनांतर=वनात जाऊन रहाणे., वाव=व्यर्थ)
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ||
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास .......
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥९८१||
संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.
देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥ अभंगगाथा क्र. ४०५९||
(तिळी-तीळामधे, तिळाच्यारुपाने., धाला-आनंदला. , साधला-प्राप्त केला., पर्वकाळ-पर्वणी, पुण्य मिळवण्याची सुसंधी., अंतरींचा-मनातला, चित्तातला., मळ-दोष., खुंटले-संपले)
तुकोबांची अभंगगाथा - परम अर्थ एक वाक्यता अर्थात तुकोबा वन लायनर - भाग ४
"आपुला तो गळा घेई उगवोनी...." अशा अर्थाचे बुवांचे एक वचन आहे. यात ते म्हणतात जगरहाटी ही अनंतकाळापासून जशी चालायची तशी चाललीच आहे, पुढेही अशीच चालणार आहे. ज्याला ज्याची आवड आहे ते तो करीत असतो. ज्याला गायनाची आवड तो बरोबर त्यातील दर्दी, दिग्गज व्यक्तिकडे जाईल, गाणे शिकून घेईल. तसेच इतरांच्या बाबतीतही होय. पण असे मात्र होऊ शकणार नाही की आपली आवड जोपासताना तो इतरही अनेक कलागुणांमधे पारंगत होईल.
ज्याला परमात्माच हवा आहे त्याने बाकी कशाच्या मागे न लागता परमात्मा कसा आपला होईल ते मुख्य पाहावे.
संपादित - नेट गंडल्याने चुकून तीनदा प्रकाशित झाले आहे हे ........ ... ....... .
..............