तुकोबांची कीर्तनभक्ति - सत्संगती - भाग १

Submitted by पुरंदरे शशांक on 16 February, 2015 - 06:08

तुकोबांची कीर्तनभक्ति - सत्संगती - भाग १

युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥९६||
(वेव्हार=व्यवहार., वनांतर=वनात जाऊन रहाणे., वाव=व्यर्थ)

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ||

अशा नवविधा भक्तिच्या ज्या सुविख्यात पायर्‍या आहेत यातील "कीर्तन" या प्रकारालाच संतांनी (विशेषतः तुकोबांनी) का उचलून धरले असा विचार करताना जे काहीबाही जाणवले ते इथे मांडत आहे.

वरील अभंगाचा थोडक्यात अर्थ -
युक्ताहार - सर्वच इंद्रियांना युक्त असा जो आहार हेच मुख्य परमार्थ साधन आहे. (याव्यतिरिक्त फार कष्टाची साधने करण्याची काही जरुरी नाही). या साधनाची ओळख मला भगवंतानेच करुन दिली. त्याचबरोबर जी कीर्तनभक्ति मी आचरीत आहे हे कलियुगातील श्रेष्ठ भक्ति-साधन आहे - ज्यायोगे कोणालाही थेट भगवंताचीच भेट घेता येईल. हे असे सोपे साधन आहे की त्यासाठी लौकिक व्यवहार सोडायची गरज नाही. कुठे रानावनात जाऊन अंगाला भस्म फासून बैराग्यासारखे रहाण्याचीही गरज नाही. भगवंताच्या नामाशिवाय इतर सर्व उपाय मला व्यर्थ वाटतात.

खुद्द बुवांनी आचरलेल्या या कीर्तनभक्तितले शक्य होईल तेवढे बारकावे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करुया. कारण ही भक्तिही अथांग आहे. यात जेवढी खोल बुडी देऊ तेवढी वेगवेगळी अनमोल मोत्येच हाती लागणार आहेत. सर्व सामान्यांना आचरता येईल अशी जरी ही सोपी भक्ति वाटली तरी त्यात खोल खोल उतरताना ती कशी सूक्ष्म होत जाते, त्याकरता काय पथ्ये पाळावी लागतात हे ही बुवांच्या अभंगातूनच आपल्याला समजून घ्यावे लागेल.

परमार्थात सगुणभक्तिला अनन्यसाधारण महत्व आहे. देवर्षि नारद हे बहुतेक आद्य कीर्तनकार असावेत. सगुणभक्तिची सुरुवात म्हणजे कीर्तनातून घडलेले परमार्थ-श्रवण असे म्हणता येईल. भगवंताबद्दलचे गुणगान कानावर पडणे ही प्राथमिक पायरी. भगवंताचा महिमा कीर्तनातून अनेक लोकांपर्यंत पोहोचवणे हे कीर्तनकाराचे काम. कीर्तन म्हणजे संगीत - अभिनय - कथन याचा एकत्रित परिणाम. समाजातील अनेक घटकांशी बोलीभाषेत साधलेला परमार्थ - संवाद म्हणजे कीर्तनच.

बुवांच्या आधीपासूनच हा परमार्थ-संवादाचा मार्ग अनेक संतांनी उचलून धरला होता. कारण सहाजिकच आहे - परमार्थाचे बीज समाजात पेरायचे ते प्रमुख साधन होते. मात्र बुवांनी या साधनात अनेक प्रकारे शुचिता आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ते स्वतः या कीर्तनाकडे एक व्रत म्हणून पहात होते. कीर्तनाकरता जमलेल्या सर्व श्रोत्यांना साधे "विठ्ठल विठ्ठल" म्हणायला लावणे इथपासून सुरुवात करणारे बुवा जेव्हा - ब्रह्मभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ असे म्हणतात तेव्हा या भक्तिसाधनेकडे जरा विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.

आधी बुवा स्वतः उत्तम संसार करीतच होते. पुढे दुष्काळामुळे त्यांच्यावर ज्या अनेक विपत्ती आल्या त्याने त्रासून जाऊन ते भामगिरीवर गेले व तिथे त्यांनी प्राणाचेच निर्वाण मांडले. पुढे विठ्ठल साक्षात्कारानंतर जेव्हा परत देहूत आले तेव्हा त्यांचे सारे जीवनच बदलून गेले होते. एका विलक्षण विठ्ठलभक्तित जरी ते दिवस-रात्र डुंबलेले होते तरी सर्वसामान्यांकडून ते उत्तम व्यवहाराचीच अपेक्षा करीत होते. सर्वसामान्यांना ते जो उपदेश करीत होते त्यात संसार न सोडता (प्राप्त कर्मे करता करताच) भगवद्भक्ति करता येते हे ठासून सांगत होते. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे | उदास विचारे वेच करी || असेच प्रबोधन ते करीत होते. आपल्या वाट्याला आलेली विहित कर्मे चोखपणे करायची अशीच त्यांची शिकवण होती. उदरनिर्वाहासाठी त्याकाळात शेती, व्यापार, बलुतेदारी इ. जी कामे केली जात होती ती सर्व झाल्यावर संध्याकाळी-रात्री कीर्तने केली जात. सहाजिकच अनेक लोकांना या कीर्तनाद्वारे परमार्थ विचार सांगितला जात होता.

बुवांसारख्या आत्मसिद्धपुरुषाचे कीर्तन म्हणून या भक्तिसाधनाकडे पहाताना सगळ्यात विशेष गोष्ट जाणवते ती "सत्संगतीची" -
जनसामान्यांना विचार-प्रवृत्त करणे, शुद्ध परमार्थ सांगणे याबरोबरच संतसंगती हा देखील एक मोठा भाग या कीर्तनातून घडत असे. ही संतसंगती कीर्तनातून एकाच वेळेस अनेकांना मिळत असे. संतसंगतीची तुलना इतर कुठल्याही पारमार्थिक साधनेशी होऊ शकत नाही. कारण परमार्थ -साधनेत ज्या व्यक्तिने तो अध्यात्मिक अनुभव घेतलेला आहे त्या व्यक्तिची संगत सगळ्यात महत्वाची असते. परमार्थ हा अनुभवाचा प्रांत आहे - नुसता बोलण्याचा, नुसता ऐकण्याचा नाही.
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र| पैं संसारु जिणतें हें शस्त्र| आत्मा अवतरविते मंत्र| अक्षरें इयें ||ज्ञाने. अ. १५-५७७||
(अर्जुना केवळ | शब्दपांडित्याचे | नव्हे चि हे साचे | गीताशास्त्र ||
जाण हे संसार | जिंकिते हत्यार | काय सांगू फार | तुज आता ||
अक्षरे ही साक्षात् | आत्म्याचे दर्शन | घडविती पूर्ण | मंत्र होती ||)||अभंग ज्ञाने.||

तुकोबांसारख्या महाभागवताचे शब्द जर इतक्या वर्षांनंतरही आपल्यामधे भक्तिभाव जागृत करीत असतील तर त्यावेळेस त्यांच्या आसपासच्या लोकांवर त्याचा किती जबरदस्त परिणाम होत असेल हे काही मुद्दाम सांगायला नको. हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच की प्रत्यक्ष संतसंगती हे परमार्थाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे.

पूजनीय स्वामी स्वरूपानंद हे जेव्हा (श्री देसायांच्या घरात राह्यला आल्यावर) बर्‍यापैकी हिंडत-फिरत होते तेव्हाची गोष्ट. पुण्यात रहाणारे एक जोडपे - जे स्वामीजींचे शिष्य होते ते एकदा पांवसला दर्शनासाठी जाणार होते. त्यांच्या शेजारी रहाणार्‍या एका तरुणाला असे वाटले की चला आपणही यांच्याबरोबर कोकणात जाऊया - निसर्ग पहायला, समुद्र पहायला. पण तो तरुण नास्तिक होता. तो म्हणाला की मी कोकणात निसर्ग-दर्शनाला येणारे - त्या बुवाबाजीत मला काही रस नाही - तुम्हाला चालेल का ? ते जोडपे म्हणाले चालेल - तू निसर्ग-दर्शन कर आम्ही स्वामी दर्शन करतो. तू पांवसला राह्यलास व स्वामी-दर्शनाला नाही आलास तरी आमची काही हरकत नाही व स्वामीजीही तुला आग्रह करणार नाहीत. तो तरुण तयार झाला. पुढे ते तिघे पांवसला गेले. ते नवरा-बायको स्वामीजींचे दर्शन व तेथील इतर कार्यक्रमात भाग घेत होते व तो तरुण तिथे जवळपास भटकणे - जवळ असलेल्या समुद्र किनार्‍यावर जाणे इ. कार्यक्रमात मग्न होता.
एकदा जेव्हा तो तरुण श्री. देसायांच्या 'अनंत-निवास' वास्तू जवळ फिरत होता तेव्हा स्वामीजींच्या एका सेवेकर्‍याने त्याला विचारले की तुमचे नाव अमुक अमुक आहे का, तुम्ही पुण्याहून आलात का ? त्याने होकार दिल्यावर पुढे सांगितले की स्वामीजींनी तुम्हाला त्यांच्या खोलीत बोलावले आहे. त्या तरुणाला मोठे आश्चर्य वाटले की या जोडप्याने तर आधी सर्व कबूल केले होते - की हे स्वामी काही म्हणणार नाहीत व आता तर हे मला दर्शनाला का बोलावताहेत?? त्यावर लगेचच पुढे तो सेवेकरी म्हणाला की स्वामीजींचा निरोप आहे की दर्शनाला नाही बोलावले, साधी विचारपूस करायला बोलावले आहे.
खरे तर इथेच तो तरुण विरघळला होता की हे माझ्या मनातले नेमके कसे ओळखतात ? तो जेव्हा खोलीत गेला तेव्हा स्वामीजी प्रसन्नपणे हसत विचारते झाले - "काय कसे काय वाटले आमचे कोकण, आवडले ना सारे - निसर्ग -माड-पोफळी -समुद्र. जरुर येत जा इथे पुन्हा पुन्हा. पाहुणचारात कुठे कमतरता तर नाही ना ? घ्या खडीसाखर घ्या, तोंड गोड करा."
स्वामीजींची ती प्रेमळ, तरीही जराशी मिश्किल, हसरी मुद्रा बघून तो तरुण केवळ चकित झाला. डोळ्यात पाणी आणून त्याने स्वामीजींना नमस्कार केला व म्हणाला - 'अहो, मी तर हे सगळे एकजात ढोंगी बुवा बघून वैतागलो होतो - पण तुमच्याकडे बघून मला काय होतंय समजत नाही - मी इथे साक्षात भगवंताला पहातोय असे वाटते आहे.'
त्या तरुणाचा भावनावेग कमी झाल्यावर स्वामीजी म्हणाले - "तुम्ही खूप भाविक दिसता. भाव तोच देव म्हणून तुम्हाला असे वाटते आहे. तोच भाव भगवंताच्या चरणी लावा."
तो तरुण फारच खजील झाला - तो म्हणाला - "स्वामीजी मला फार वाईट वाटते आहे की मी तुम्हाला ढोंगी बुवा समजलो, पण मला क्षमा करा व मला कृपया आपला शिष्य करुन घ्या."
पुढे हा तरुण ज्ञानेश्वरी- दासबोध वाचून नित्य साधनेला लागला व नियमित स्वामीजींच्या दर्शनालाही येऊ लागला.
प्रत्यक्ष संतसंगती ही अशी एक विलक्षण गोष्ट आहे. आपल्या अंतःकरणातील सद्भाव (म्हणजेच भगवद्भाव) जागृत करण्याचे फार मोठे कार्य हे संत करीत असतात.

बुवांचा हा जो अतिशय प्रसिद्ध अभंग आहे तो सत्संगतीचीच महती गाणारा आहे -

संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥
कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥२॥
तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥४३४१||
(संतांची सहज संगत लाभली तरी आपल्या अंतरातले नाना वासना-विकारांचे बीज नष्ट होते. अशा निर्मल अंतःकरणात मग भगवन्नामाविषयी प्रेम निर्माण होते व मग सहाजिकच अंतरातले सुख हळुहळु वाढु लागते. हे विलक्षण प्रेम बाहेर प्रगटते कसे तर भगवंताचे नाम घेता घेता कंठ भरुन येतो, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. ह्रदयात रामरुप प्रगट झाल्याचीच ही जणू खूण होय. हे इतके सुलभ, गोमटे साधन आहे खरे पण काही पूर्वपुण्य असेल तरच याचा लाभ होतो.)

श्री गोंदवलेकर महाराज तर म्हणायचे की संतसंगती (सत्संगती) हा सर्व साधनांचा राजा होय.

बुवांच्या कीर्तनभक्तीतील इतर विशेष आपण पुढच्या भागात पाहूयात.

हरि ॐ तत् सत् ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान ! स्वामींनी त्या तरुणाला दिलेली प्रचितीही खूप भावली मनाला.

कीर्तन भक्तीबदल अजुन वाचायला आवडेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत......

खूप छान ! स्वामींनी त्या तरुणाला दिलेली प्रचितीही खूप भावली मनाला.

कीर्तन भक्तीबदल अजुन वाचायला आवडेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....+ १

सुरेख! काही व्यक्ती,जागा ह्यांच्या सहवासात आल्यावर फार शांत वाटते ह्याचा अनुभव घेतला आहे!

शशांक, अगदी वेळेवर वाचला तुमचा लेख. तुम्हीच सुचवलेले पुस्तक वाचतोय. खूप चीडचीड होत होती वाचताना. तुमचा लेख वाचून शांतावलो.

कुठल्यातरी लेखाच्या शेजारी "हे पण पहा" मधून या जुन्या लेखाची लिंक मिळाली. सध्या संत तुकाराम आणि त्यांचे एकंदरीत आयुष्य यावर आधारित "तू माझा सांगाती" पुन्हा पाहायला लागले आहे. त्यात बुवांचा कीर्तनाकडचा प्रवास, त्यांची विठ्ठलावरची भक्ती, लोकांना कीर्तना द्वारे परमार्थाकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न- हेच सगळ फार सुंदर पद्धतीने, विस्ताराने दाखवले आहे. त्यामुळे तुमचा हा लेख जास्त छान वाटला वाचायला.