श्री तुकोबारायांचे देवदर्शन

Submitted by पुरंदरे शशांक on 14 July, 2016 - 00:29

श्री तुकोबारायांचे देवदर्शन

गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥५८१

हा अभंग म्हणजे श्री तुकोबारायांचे पूर्णोद्गार आहेत. साधकावस्था पार करुन बुवा आता सिद्ध झाले आहेत. या सिद्धावस्थेचे काहीबाही वर्णन या अभंगातून बुवा करीत आहेत. काही बाही अशा करता कि आपण सर्वसामान्य जिथे समुद्रपातळीवर उभे आहोत तिथून हे गौरीशंकराचे शिखर सगळेच्या सगळे कसे काय दिसणार आपल्याला !!

बुवा त्यांच्या अभंगात जी उदाहरणे देतात ती अगदी रोजच्या वापरातील असतात, त्यामुळे ती आपल्याला अगदी जवळची वाटतात. गुळाचे उदाहरण देताना बुवा म्हणताहेत - गोडी ही गुळाला आत-बाहेर व्यापूनच असते. गोडीविरहित गुळाची कल्पनाही करता येणार नाही इतके एकरुपत्व त्या गूळ आणि गोडीमध्ये आहे. तेच उदाहरण घेऊन बुवा आपल्याला सांगताहेत कि या देवाने मला आतबाहेर व्यापून टाकले आहे. बुवांना देव कसा पावला, कसे देवदर्शन झाले तर या देवाने त्यांना अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. जो देव सर्वसामान्यांना अतिशय दुष्प्राप्य आहे त्या देवाने बुवांना मात्र अगदी आपलेसे केले आहे.

आपल्याला जे देवदर्शन वाटते आणि बुवांचा जो अनुभव आहे त्यातील जो मोठा फरक आहे तो आधी ध्यानात घ्यावा लागेल. आपली देवदर्शनाची कल्पना कशी आहे तर- आपल्या समोर कोणी मुगुटधारी, चार हातांची, पीतांबरधारी व्यक्ति येऊन उभी रहाणार... सिनेमा, टी व्ही सिरीयलमधून जे देवदर्शन आपल्या समोर येते ते असेच असते आणि आपणही असाच विचार करण्यात पटाईत - त्यामुळे देवदर्शन म्हटले कि हेच डोळ्यासमोर येते आपल्या.

संतांच्या नजरेतून देवदर्शन करायला आपण कधी शिकलोच नाही तर त्यात दोष नक्की कुणाचा ?? संतांनी तर हे सारे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे - ते सोडून जर आपण परमार्थ करु म्हटले तर आपली फसगतच होणार हे नक्की..

या अभंगात देवदर्शन म्हणजे काय हे बुवांनी इतक्या स्पष्टपणे मांडले आहे कि अशा अभंगांच्या अभ्यासाने आपल्या मनातील, बुद्धीतील सारे गैरसमज पूर्ण दूर व्हावेत. कुठल्याही अद्वैत ग्रंथाची पारायणे करायची नसतात तर अतिशय डोळसपणे त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि पुढे तसे आचरण्याचा प्रयत्न करणे त्याहून महत्वाचे आहे. तरी हे असो.

इथे बुवा म्हणताहेत -
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ||
माझे चित्तच जर भगवंतमय झालेले आहे तर आता भजन करणार तरी कोण अणि कसे ?? कसा गोड अनुभव आहे हा... बुवांचे मन, चित्त, बुद्धी सगळे इतके शुद्ध / पवित्र झालेले आहेत की ते सारे त्या देवाने व्यापलेले आहेत, बुवा ब्रह्मरुप झालेले आहेत. तो भगवंत जसा सच्चिदानंद तसे बुवा झालेले आहेत. आणि मग जीवभावावर येऊन देवाला विचारताहेत - अरे, हे सारे जर ब्रह्मरुप झालंय तर भजन कसा करु रे ??

पुढे अजून दोन दृष्टांत बुवांनी दिलेत -
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥

१] सागरातील पाणी आणि त्यावर उठणारे तरंग हे जसे अभिन्न असतात तसे बुवा भगवंताशी एकरुपत्व पावलेले आहेत.
२] सुवर्णाचा गोळा आणि त्याच सुवर्णाचे अलंकार (काहीही हीण न मिसळता केलेले) हे जसे अभिन्न तसे बुवा आणि तो सच्चिदानंद परमात्मा एकरुप झालेले आहेत.

'शिवो भूत्वा शिवं यजेत' अशी अद्वैत भक्तिची परिपूर्ण अवस्था बुवांच्या ठिकाणी निर्माण झाली होती. शिव (आत्मरुप) होऊनच शिवाची (आत्मराजाची) भक्ति अशी जी सर्व संतांच्या ठिकाणी आढळून येणारी विलक्षण अद्वैत भक्ति आहे त्याचे असे मनोज्ञ वर्णन बुवाच करु जाणोत.

कबीरजी देखील अशी आत्मस्थित अवस्था प्राप्त झाल्यावर म्हणतात - राम हमारा जप करे हम बैठे आराम...

नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय - स्वामी स्वरूपानंद (पावस)

अन्तरांतुनी सहज ध्वनि तो निघतो सोsहं सोsहम
विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्माराम ।। स्वामी स्वरूपानंद (पावस)

लाली मेरी शाम की जहाँ देखे वहा शाम, मै धुंडन गयी शामको मै खुदही बन गयी शाम - मीराबाई

जीवु परमात्मा दोन्ही | बैसऊनि ऐक्यासनीं | जयाचिया हृदयभुवनीं | विराजती ||ज्ञाने. अ. १२, १५३||

भक्त म्हणिजे विभक्त नव्हे | आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे |
विचारेंविण कांहींच नव्हे | समाधान || दासबोध, द. ४, स. ९, ओवी ६|| श्रीसमर्थांनी तर भगवंताशी जो कधीही विभक्त नसतो तोच भक्त असे किती ठामपणे सांगितले आहे पहा.

परमार्थाचे गंतव्य (डेस्टिनेशन) या सार्‍या संतांनी आपल्यासमोर अतिशय स्पष्टपणे ठेवले आहे. यात कुठलीही बुवाबाजी नाही, कुठलेही नवससायास नाहीत वा कुठल्याही व्रतवैकल्यांचे अवडंबर नाही. भगवंत सच्चिदानंदरुप आहे आणि आत्म्याचे (म्हणजे आपले मूळ स्वरूप) तेच आहे हे जाणून घेणे म्हणजे देवदर्शन असे साधे सोपे संतांचे सांगणे आहे.
अशा या ह्रदयस्थ परमात्म्याला जाणायचे कसे तर त्या परमात्म्याचा आपल्या पूर्ण इच्छाशक्तिने परमेश्वरभेटीचा ध्यास घ्यायचा - जसा या सार्‍या संतांनी घेतला. जळावेगळी मासोळी | तैसा तुका तळमळी|| - इतक्या पराकोटीचा ध्यास. इथे ध्यान महत्वाचे का नामस्मरण का पूजाअर्चा या सर्वांपेक्षा ध्यास महत्वाचा आहे. अंतःकरणात जर हा निर्गुण देव भेटावा अशी तळमळ लागली तर साधक जी नित्य कर्मे करीत असतो तीदेखील त्याला या भगवत्प्राप्तीकडेच घेऊन जातील.
संसारत्याग न करीता | प्रपंचउपाधी न सोडिता | जनामध्ये सार्थकता | विचारेचि होये| असे जे समर्थ म्हणतात त्याचे मर्म हेच आहे.
तस्मात विचार करावा | देव कोण तो ओळखावा | आपला आपण शोध घ्यावा | अंतर्यामी || दासबोध ||

परमार्थात खरेतर कसलेही कष्ट करण्याचे कारण नाही, कोणावरही उगाचच विसंबून रहाण्याचे कारण नाही. मात्र जर त्या परमात्म्याचा ध्यास लागत नसेल तर बुवा ज्या तळमळीने भगवंताला हाक मारत होते ते त्यांच्या अभंगगाथेतूनच नीट समजून घ्यावे लागेल... तशा तळमळीने भगवंताला हाक मारता आली नाही तर कितीही मान मिळवला, कितीही पैसे मिळवले तरी बुवांच्यालेखी अशा जीवनाची किंमत केवळ शून्य होय.

आता आपले आपण ठरवायचे आहे - जीवनाचे सार्थक करायचे का ते उधळून टाकायचे !!

अशा अभंगातून आम्हाला वेळोवेळी जागे करण्याचे बहुमूल्य कार्य करणार्‍या बुवांचरणी सादर दंडवत ...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥<< किती विलक्षण! मोक्ष ही मेल्यानन्तर प्राप्त करण्याची गोष्ट नसुन जीवन्तपणी 'आपुले मरण, पाहिले म्या डोळा' अशी स्थिती आहे. बुवांना 'सरूपता ' प्राप्त झाली होती हे यावरुन समजतय.

<<अंतःकरणात जर हा निर्गुण देव भेटावा अशी तळमळ लागली तर साधक जी नित्य कर्मे करीत असतो तीदेखील त्याला या भगवत्प्राप्तीकडेच घेऊन जातील.<<
आहा... अमृतमयी!

अफाट सुंदर!

दर्शन हा शब्दच खूप फसवणूक करतो. व्यवहारातले दर्शन म्हणजे डोळ्याला दिसणे. तोच अर्थ मनात वर्षानुवर्षे साचत आला असतो. आणि अगदी तोच अर्थ घेऊन आपण देवदर्शन शब्दाचा अर्थ लाऊ पाहतो. पण खरे तर ती फसवणूकच आपल्याला 'मार्गा'वर आणून सोडते. आजपर्यंत चालू असलेला 'मला हे मिळूदे मग तुला हे वाहीन' हा रोडग्यांचा व्यवहार बाजूला सरून आपण काहीतरी वेगळे इच्छीतो. इच्छा असते 'त्या'च्या दर्शनाची, चर्मचक्षूंना होणार्‍या दर्शनाची. तुम्ही ज्यांची वचने दिली आहेत त्या प्रत्येकानी 'त्या'च्या सगुण स्वरुपाची इतकी लोभसवाणी वर्णने करून ठेवली आहेत की 'त्या'ला पहावेसे वाटणे अगदी स्वाभाविकच आहे. काश्मीर, स्वित्झर्लंड नाही का पहावेसे वाटत? तसेच 'त्या'लाही पहावेसे वाटते.

पुढचा प्रवास मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कोणी स्वित्झर्लंड पहावेसे वाटल्यावर लगेचच जायला निघतो तर काहींना जायला अनेक वर्षे लागतात. काहींचे जाणे जन्मभरात घडत नाही. कुणी केसरी बरोबर जातो, तर कुणी थॉमस कुक बरोबर तर आणखी कुणी आपले आपण प्लॅनींग करून जातो. पण हे सगळे तेंव्हाच घडते जेंव्हा स्वित्झर्लंड पहावेसे वाटते. त्यामुळे पहायची - दर्शनाची - इच्छा होणे महत्वाचे!

आणखी एक मेख आहे - तो काळा आहे हे सगळ्यांनी सांगितले आहे. पण त्याच्या वर्णनाचे गारुड इतके जबरदस्त असते की सुरुवातीला त्याच्या वर्णाकडे फारसे मह्त्वाने पाहिलेच जात नाही. आणि मार्गावर चालणे सुरू होते. चालता चालता अंधार पडू लागतो. बाजूने वाहणारी यमुना अंधारात दिसेनाशी होते. अंधार आणखी गडद होतो अन हातातली घागरही दिसत नाही. घागरच काय, सोन्याचे लखलखणारे दागिनेही दिसत नाहीत. समोर मार्ग दाखवत तो चालला असतो अन त्याच्या मागून आपण. एक क्षण असा येतो की अंधार इतका गडद होतो की तो 'कृष्ण'ही त्यात नाहीसा होतो - आणि मग लख्ख प्रकाश पडतो.

सर्व तुकोबाप्रेमींना सादर प्रणाम...

माधव -
एक क्षण असा येतो की अंधार इतका गडद होतो की तो 'कृष्ण'ही त्यात नाहीसा होतो - आणि मग लख्ख प्रकाश पडतो.

___________/\__________ शिरसाष्टांग दंडवत ....