वडे

फणसाचे उंबर

Submitted by देवीका on 28 May, 2015 - 15:52
लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

२ वाटी बरका फणसाचा गर,
दिड वाटी तांदूळाची पीठी,
फणसाचा गर गोड नसेल तर आवडीप्रमाणे गूळ किसून,
१ चमचा साजूक तूप,
मूठभर ओले खोवलेलं खोबरं जरा आणखी वाटून घेवून,
पाव वाटी अति बारीक वाटलेली चाळून घेतलेली काजू पूड,
आवडीप्रमाणे केसर पूड,
आवडीप्रमाणणे वेलची पूड.
चवीला मीठ,
तळायला आवडीप्रमाणे साजूक तूप नाहीतर तेल.

क्रमवार पाककृती: 

१. जुना तांदूळ धूवून सावलीत वाळवून त्याची पीठी करावी.
२. चवीला मीठ घालून त्यात काजू पूड एकत्र करून घ्यावे. हातानेच चांगले एकत्र करावे.
३. गूळ हि घालून तसेच एकत्र करावे. नाहितर एकत्र फूड प्रोसेसर मध्ये घालावे व ब्लेंड करावे.
४. आता गर, वेलची पूड, केसर पूड, जायफळ पूड वगैरे घालून घुसळावे. त्याचा एकत्रित गोळा होइल. पाणी घालू नये.
५. हा गोळा रात्रभर झाकून आंबून ठेवावा. कमीत कमी १०-१२ तास आंबले पाहिजे. तसे आंबले तरच वडे करावे.
६. सकाळी एक चमचा शुद्ध तूपात पीठ जरासे मळून अनारसे करतो तसे वडे करावे पण खाली तीळ लावावे. म्हणजे तीळावर थापावे व तळावे. नाही तीळ लावले तर चालतील. पण ती चव येणार नाही.( भोक न पाडता)
७. बटाटयाच्या सुकी तिखट भाजीबर्बर खावे नाश्त्याला.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

फणस जर नाहीच मिळाला(आता मौसमात मिळेलच) तर केळं, भोपळे आहेतच नेहमीच बंदे. पण ह्याची जी चव आहे ती काही अनुभवता येणार नाही.
अनारसा सुद्धा कमी पडेल ह्याच्या चवीपुढे.
काजू पूड व ओलं खोबरं सुद्धा नाही घातली तरी होइल पण मग पीठीचे प्रमाण जरा वाढवावे.

काजूची वस्त्रगाळ पूडच हवी. जरा जरी दाणे असतील तर पातळ थापले जाणार नाहीत.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
काही निवडक कोंकणी घरातला पारंपारीक नाश्ता. बटाटयाची भाजी हि अलीकडची आवड

सुखियां / मुगाचे गोड वडे

Submitted by आरती on 21 July, 2013 - 01:33
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ वाटी रवा
१ वाटी भिजवलेले मूग
१/२ वाटी खवलेले नारळ
१/२ वाटी चिरलेला गूळ
१/४ चमचा सुंठ पावडर
२ हिरवे वेलदोडे
४ चमचे साजूक तूप
तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

रवा आणि २ चमचे तुप एकत्र करून घ्या. थोडे-थोडे पाणी घालत रवा सैलसर भिजवा [साधारण करंजीसारखा]. रवा १/२ तास भिजत ठेवायचा आहे.

मधल्या वेळात सारण करायला घ्या.
भिजवलेल्या मुगातले सगळे पाणी काढून टाकून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या. भांड्यात २ चमचे तूप घ्या, थोडेसे गरम झाले की त्यात वाफवलेले मूग आणि गुळ घाला. गुळ वितळला की लगेच नारळ, सुंठ पावडर आणि वेलदोड्याचे दाणे घाला. डावाने हलवत रहा. हे मिश्रण मिळून आले की गॅस बंद करून गार करायला ठेवा. गार झाल्यावर त्याचे छोटे-छोटे लाडू वळा.

mb1.jpg

रवा अगदी बारिक नसेल तर भिजलेला रव्याचा गोळा फुडप्रोसेसर मध्ये थोडा फिरवून घ्या. छान मऊ होतो. त्याच्या छोट्या-छोट्या लाट्या करा. पुरी लाटून त्यावर मुगाचा लाडू ठेवा, सगळ्या बाजूने बंद करा. कढईत तेल तापवून मंद आचेवर तळा.

mb2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ प्रत्येकी.
अधिक टिपा: 

१. मूग नुसते वाफवायाचे आहेत, शिजवायचे नाहीत. त्यामुळे २ च शिट्ट्या घ्या.
२. वडे खुसखुशीत हवे असतील तर मंद आचेवरच तळा.
३. वर दिलेल्या प्रमाणात ६ वडे होतात.
४. वेलदोड्याची पावडर पण चालेल, पण दाणे घातले की जास्त चांगला स्वाद उतरतो असा माझा अनुभव आहे.
५. मूळ पाककृतीत वेलदोड्याची पावडर वापरली आहे. रव्या ऐवजी मैदा वापरला आहे. भज्याच्या पिठासारखा मैदा भिजवून त्यात मुगाचे गोळे बुडवून तळले आहे. मला मैदा वापरायचा नव्हता म्हणून मी बदल केला. [एकदा अवन मध्ये बेक करून बघणार आहे. बेक करून, थोडे उकलून मधोमध तुपाची धार सोडून खायला जास्त मजा येईल असे खाताना जाणवले. Happy ]
६. या पदार्थाच्या नावाचा नक्की उच्चार काय आहे हे आठवत नाही / माहिती नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या डब्यात खाल्ले होते. आता करताना प्रमाण आंतरजालावरून घेतले.

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
आंतरजाल + काही बदल.

डाळ वडे

Submitted by जागू on 14 April, 2013 - 14:57
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. Lol
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.

चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा.

५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)

वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.

आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.

वाढणी/प्रमाण: 
कमीत कमी प्रत्येकी २
अधिक टिपा: 

घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.

आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
आई

बिना भाजणीची थालिपीठं/वडे

Submitted by सायो on 2 April, 2013 - 20:40
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाजरीचं पीठ १ वाटी, ज्वारीचं पीठ १ वाटी, कणीक अर्धी किंवा १ वाटी, धणे-जिरं-मेथीचे दाणे- ताजे भाजून, मिक्सरला वाटून, ओवा- एक छोटा चमचा, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ- चवीप्रमाणे, वडे तळायला तेल.

हेच वरचे जिन्न्स वड्यांकरता चालतील. थालिपीठांकरता जाडसर चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

क्रमवार पाककृती: 

सगळे जिन्नस एकत्र करुन मिडीयम (फार घट्ट किंवा सैल नाही) पीठ भिजवावं.
एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर वडे थापावेत. मध्ये एक भोक पाडावं व खरपूस तळून घ्यावेत.
थालिपीठांकरताही हेच. तव्यावर झाकण घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावीत.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात साधारण १३,१४ वडे आणि ७,८ थालिपीठं होतील.
अधिक टिपा: 

पाककृतीत नाविन्य असं काहीच नाही पण भारताबाहेर रहात असताना बर्‍याचदा भाजणी नसते किंवा संपलेली असते तेव्हा वरची पीठं आणि धणे, जिरं, जिरं,ताजं भाजून कुटूनही छान खमंगपणा येतो हे लक्षात आलं. भाजणीची उणीव जाणवेनाशी झाली.
तोंडीलावणं म्हणून मिरच्या भाजून तिखट किंवा उसळी मिरची दह्याबरोबर वगैरे छान लागेल.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
सुचला की लिहीन इथे.

झटपट कोंबडी वडे (शाकाहारी)

Submitted by deepac73 on 11 October, 2012 - 08:25
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी उडीद डाळ
२-३ मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता
२ वाटी तांदूळ पीठ
तिखट, हळद, मीठ चवीनुसार
२ मोठे चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

१. उडदाची डाळ २-३ तास भिजत घाला. कमी वेळ असेल तर १ तास पण चालेल.
२. डाळ, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता मऊ वाटून घ्या.
३. तांदळाच्या पिठात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घाला.
४. तेल कडकडीत गरम करून पिठावर घाला.
५. आता वाटलेली डाळ घालून थालिपीठासारखे पीठ भिजवून घ्या.
६. पुरी प्रेसने किंवा हाताने थापून वडे करून तेलात पुरीसारखे तळा.
७. गरम नुसतेच, चिकन्/मटण रस्सा कसेही छान लागतात.

अधिक टिपा: 

सीकेपी स्पेशल - चिकन्/मटण रस्श्याबरोबर एक्दम क्लासिक

प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
साबा

बटाटा -पोहे वडे

Submitted by शेवगा on 12 August, 2012 - 23:05
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटाटे -४/५ उकडलेले.
पोहे- १ वाटी भिजवलेले
जिरे- १/२ चमचा
मिरची- चवीनुसार( मी ३/४ लहान घेतल्या होत्या.)
आलं-लसूण पेस्ट -१/२ चमचा
मीठ - चवीनुसार
हळद- १/४ चमचा
तेल - तळण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम उकडलेले बटाटे आणि पोहे एकत्र एकजीव मळून घ्या.
२. नतंर त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची बारीक चिरून अणि हळद घालून नीट मिक्स करा. आणि नंतर त्याचे ८-१० छोटे- छोटे बारी़क गोळे बनवून अणि थोडे चपटे करुन घ्या.
३.गरम तेलात डीप फ्राय करावेत. मस्त कुरकुरत लागतात.

वाढणी/प्रमाण: 
८/१० वडे होतात,
अधिक टिपा: 

टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी किंवा कोणत्याही चटणीबरोबर चांगले लागतात.

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
माझी सुगरण स़खी - कल्याणी

उरलेल्या भाताचे वडे

Submitted by प्रज्ञा९ on 27 October, 2010 - 12:25
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उरलेला भात हलक्या हाताने मळून घेऊन-२ वाट्या
धने-जिरे पूड १ १/२ टीस्पून, तिखट पूड १ १/२ टीस्पून, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी, चाट मसाला/ आमचूर पावडर १ टीस्पून, तेल.

क्रमवार पाककृती: 

१. मसाल्याचे पदार्थ घालून भात चांगला मळून घ्यावा. कोथिंबीर घालून सारखा करून घ्यावा.
२. मध्यम आकाराचे वडे थापावेत व डीप फ्राय करावेत.

वाढणी/प्रमाण: 
८ ते १० वडे.
अधिक टिपा: 

तळण्याऐवजी शॅलो फ्राय करून चालतात, पण मी नाही करून पहिलेयत अजून.
टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीबरोबर चांगले लागतात.

उरलेल्या भाताचा नेहेमी फो भा करायचा कंटाळा आला होता, त्या वेळी अचानक आठवलेली पा़क्रु. माबो वर पहिल्यांदाच पाक्रु लिहितेय, तीही अपघाताने जमलेली. सांभाळून घ्या ही विनंती. वडे केल्यावर लगेच खाताना इतके सुंदर लागत होते म्हणून शेअर करायचा मोह आवरला नाही. आणि हे वडे गरम गरम खाल्ले तर जास्त छान लागतात. गार झाल्यावर मऊ होतात.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
सुगरणीचा सल्ला हे पुस्तक

मिर्ची वडे

Submitted by डॅफोडिल्स on 24 November, 2009 - 04:53
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

८-१० मोठ्या पोपटी हिरव्या मिर्च्या
३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून
लाल मिर्ची पावडर,
गरम मसाला पावडर,
आमचूर पावडर,
चाट मसाला,
कोथिंबीर धूउन बारिक चिरून
मीठ
बेसन पीठ
चिमुट्भर खा. सोडा

क्रमवार पाककृती: 

मिर्च्यांचे देठ न काढता मिर्चीला मधे चीर देउन बिया काढून थोड्या मिठाच्या पाण्यात टाकून ठेवाव्यात.
बटाटे सोलून किसून किंवा मॅश करून त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, चिमूट्भर आमचूर पावडर, मिठ, चिरलेली कोथिंबीर, सर्व मसाले एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे.

मिर्च्या पाण्यातून काढुन घेउन निथळून त्यात वरिल प्रमाणे तयार केलेले सारण गच्च भरावे.

एका भांड्यात बेसन, चविपूरते मीठ, चिमूट्भर सोडा घालून भजीसाठी भिजवतो त्या प्रमाणे पण थोडे घट्टसर पिठ भिजवावे.

कढईत तेल चांगले तापवून मग मध्यम आचेवर बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवून मिर्च्यांचे वडे तळावेत.
चिंच खजूराच्या गोडसर चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावेत. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे
अधिक टिपा: 

मिर्च्या घेताना कडक ताज्या मोठ्या घ्याव्यात. मोठ्या मिर्च्या कमी तिखट असतात.
तशीही ह्या मिर्च्यांना खास चव नसते.
म्हणूनच सारणात लाल तिखट आणि गरम मसाला दोन्ही वापरावे.
देठ न काढता मिर्च्या तश्याच ठेवल्याने तळताना सोप्पे जाते.

बेसन पिठात शक्यतो तिखट किंवा हळद घालू नये. तळल्यावर काळपट दिसतात.
चविसाठी ओवा-जिरा पूड वापरू शकता.

हे वडे मध्यम आचेवर तळल्याने एक्दम खमंग होतात.

पार्टीसाठी वेरिएशन म्हणून बेसनाच्या बॅटर मधून बुडवून मग भिजवलेल्या साबुदाण्यात घोळवले की मोतिया भजी सारखे दिसायला सुंदर दिसतात. व वर चिकटलेल्या साबुदाण्यांमुळे छान लागतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Subscribe to RSS - वडे