रोज संध्याकाळी

Submitted by मुग्धमानसी on 10 January, 2023 - 11:14

रोज संध्याकाळी
तुझा निरोप घेऊन
मी परतत असते पुन्हा एकदा... इथेच.

कडी कोयंडा लाऊन घेते,
घट्ट घट्ट मिटून घेते....
अंधार लावते. मौन नेसते.
सोबत आणलेले ताजे ओरखडे
नीट खोचून ठेवते कोपऱ्यातल्या फुलदाणीत.

त्या ओरखडयांशी नातं सांगणाऱ्या काही जुन्या जखमा
ओळख पटून निःशब्द विव्हळतात....
आणि पत्र्यावर कुणीतरी नखांनी उमटवावे चरे...
तशा त्या नव्या-जुन्या ओरखड्या च्या खरखरीत संगीताच्या तालावर मी अल्लाद सोडून देते स्वतःला!

शहारे मला फार पूर्वीच सोडून गेलेले.
शरीराचे सर्व नितीबंध इथे परतताना बाहेरच खोळंबलेले.

हा माझा कोष आहे.
इथं फक्त माझ्या एकटी पुरतीच जागा आहे.
आणि तरीही मला आजवर थांग लागलेला नाही याच्या लांबी रुंदी उंची आणि खोलीचा....

हा कोष कधीतरी गिळून टाकील मला.
उभ्या आडव्या ओरखड्यानी विणलेल्या या अनाकार जाळ्यात
अडकून गुदमरून बुडून जाईन....
तेंव्हा शेवटचं... अगदी शेवटचं...
माझं मौनाचं पातळ फेडून मी तुला हाक मारीन. उगाचच.

तू येऊ नकोस.
तिथं कुणी नसेल.

रोज संध्याकाळी तुझा निरोप घेऊन मी परतत असते पुन्हा एकदा.... इथेच!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान
तुमच्या कविता मनाच्या आत भीडत जातात.

खुप जबरदस्त आहे कविता.
एखाद्या रोमँटिक ट्रॅजेडी ड्रामा वेबसीरिजचा सुरुवातीचा मोनोलोग चपखल शोभेल. सुरुवातीलाच जबरदस्त इम्पॅक्टफुल.

टाळत होते तुझी कविता वाचायला..
पण खेचलेच तिने मला..
आता आत आत छळत राहिल ही.
कसे चपखल शब्द मिळतात तुला हे व्यक्त करण्यासाठी ??

धन्यवाद सगळ्या प्रतिसादकांचे!
@अज्ञातवासी - तसंच काहीतरी लिहिलं गेलंय खरं. स्वतःशी म्हटलेला मोनोलोग.
@धनवन्ती - फार छान वाटलं माझं लिखाण इतकं कुणाला भिडल्याचं वाचून. मलाही माहीत नाही कुठून आलेत हे शब्द! लिहून झाल्यावर खूप काळाने वाचली तेंव्हा मीही अचंभित झालेले तुझ्यासारखीच. बरीच जुनी कविता आहे ही.

Wow निशब्द!
धनवन्तीच्या पूर्ण पोस्टला मम

जबरी!