ऑस्ट्रेलियातील आमचे पक्षीजगत
लग्न होऊन पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ला गेले तेव्हा सगळच नवीन होते. नवीन संसार, नवीन देश, भाषा नवीन नसली तरी उच्चारण ऐकले की "आपल्याला नक्की इंग्रजी येत ना?" अशी शंका यायची. तिथे गेल्या गेल्या जाणवलेली आणि आवडलेली गोष्ट म्हणजे आमच्या घराच्या आसपास कायम विविध प्रकारचे पक्षी यायचे!!! घराला छान गच्ची असल्यामुळे पक्षीनिरीक्षण करण्यात तासन तास अगदी मजेत वेळ जात होता. जेव्हा नोकरी करत नव्हते तेव्हा घरात कधी एकटेपणा जाणवला नाही, तो ह्याच पक्ष्यांमुळे. मला खरतरं पक्षीनिरीक्षणाचा विशेष अनुभव नाही. भारतात असताना एक-दोनदा मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर अग्निपंख (flemingos) बघायला भिगवण जवळ जाऊन आले होते.