मॅरेज Mystique ! ( भाग १२ )

Submitted by र. दि. रा. on 14 May, 2019 - 23:01

मागील भागांचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879
भाग ६ :- https://www.maayboli.com/node/69897
भाग ७ :- https://www.maayboli.com/node/69912
भाग ८ :- https://www.maayboli.com/node/69917
भाग ९ :- https://www.maayboli.com/node/69926
भाग १० :- https://www.maayboli.com/node/69940
भाग ११ :- https://www.maayboli.com/node/69949

भाग १२ :

केदारने देशमुख वकिलांच्या ऑफिसात प्रवेश करताच वकील म्हणाले...

“या.काल तारिख होती ना ? काय काय झाले.”

“ माझ्यावर अचानक दडपण आले .सगळेजण माझ्या विरोधात आहेत असे मला वाटायला लागले.माझा संयम संपला आणि मी एकदम म्हणालो मी दोन लग्न केली हा माझा गुन्हा झाला. काय असेल ती शिक्षा मला आजच फ़र्मवा.त्यामुळे न्यायमूर्ती चिडले.”

“कोर्टात असे कधीच वागायचे नसते. त्यामुळे कोर्टाचे मत खराब होते.”

“पण न्यायाधीश म्हणाले तुम्हाला शिक्षा करायचा कुठे प्रश्न येतो ?. तसा काही विषय नाही”

“बरोबर आहे कारण केळकर वकिलांनी अजून सगळी कार्ड्स ओपन केलेली नाहीत.एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्ही विवाहित असल्याने कर्णिकांचा प्लॅन फसला. त्यामुळे तर त्यांनी कोर्ट केस केली आहे.आता पुढच्या तारखेला केळकर त्यांचे हुकुमाचे पान खेळतील तेंव्हा सगळे चित्र स्पष्ट होईल .कदाचित दुसरी शक्यता आहे ती म्हणजे तुम्हाला कचाट्यात पकडून काहीतरी काम करायला सांगतील .बघू आता या तारखेला काय होतंय.”

“रेवती म्हणे मीनाक्षीला साक्षीला बोलावणार आहे. मिनाक्षी काय साक्ष देणार.?”

“मी पहिला तो इंटरव्ह्यू. पण मीनाक्षीची काय साक्षअसणार ते माझ्याही लक्षात येत नाही.केळकर साहेबांची काहीतरी गुगली असणार”.

“मिनाक्षीवर दडपण आणून आमच्या लग्नाला तिची मान्यता घ्यायची असा तर डाव नसेल?”

“नाही.अशी मान्यता देता येत नाही.तुमचे लग्न टिकवायचेच असेल तर मीनाक्षीने तुम्हाला घटस्पोट दिला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही दुसरे लग्न करू शकता.पण आजच्या तारखेला तुमचे दुसरे लग्न बेकायदेशीर आहे आणि तुम्ही शिक्षेस पात्र आहात”.

“म्हणजे येणाऱ्या तारखेची वाट पहावी लागणार”

“इतके गाफील राहू नका.आधी तुम्हाला डब्ल्यूएस द्यायचा आहे . म्हणजे तुम्हाला तुमचा बचाव काय असणार त्याची रूपरेखा ठरवावी लागेल . तुम्ही तुमचा वकील निश्चित करा. केस स्व:त लढण्याचा विचार करू नका .केस कॉम्प्लिकेटेड आहे . थोडीही चूक झाली तर शिक्षा होऊ शकेल.”

“तुमच्या माहितीतले कोणी वकील आहेत का ?”
देशमुखांनी एक कार्ड काढून त्याला दिले

“हे चांगले वकील आहेत.ते तुम्हाला योग्य गाईडन्स देतील.”

“यांची फी किती असते”

“सुरुवातीला एक लाख रुपये द्यायचे .नंतर वर्षभर काही नाही. एक वर्षानंतर प्रत्येक तारखेला पाच हजार "

“बर.येतो. thank you sir .”

---------------------------------------------------------------------------------

पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखी केदारची अवस्था झाली. आपण संकटात सापडलो आहोत हे समजत होत.पण संकट काय आहे ते कळत नव्हते.सुटकेचा तर मार्ग दिसतच नव्हता.तो असाच चिंताग्रस्त बसला असतना मिनाक्षी म्हणाली...

“असे नुसते बसून सुटका होणार आहे का ? मुंबईच्या वकिलांना भेटा.कसले स्टेटमेन्ट द्यायचे आहे ते देऊन टाका.नोकरीचे प्रयत्न बंदच पडलेत तो फालोअप सुरु ठेवा.स्व:तला कामात गुंतवा, नाहीतर विचार करुन करून वेड लागेल”.

आज्ञाधारकपणे केदारने त्याच्या मित्राला फोन लावला.

”अरे निकुंभ,मी कांदिवलीला जाऊन तुझ्या मेहुण्याना भेटून आलो. आमची बोलणी समाधानकारक झाली होती .त्यांना जरा विचार ना.म्हणावे केंव्हा जॉईन होऊ देत.”

“ओके,मी लगेच दाजीना फोन करून तुला काय ते कळवतो.”

अर्ध्या तासाने निकुम्भ्चा फोन आला...
“हॅलो ,रानडे मी आत्ताच दाजीशी बोललो ,त्यांचे म्हणणे आहे की,तुझी ती कोर्ट मॅटर चालू आहे ना? ती एकदा संपू दे .मगच जॉईन होऊ देत म्हणाले.मी पण काही जास्त बोलू शकलो नाही.”

आणखी कुणाला फोन करायचा त्याला धीर झाला नाही. अर्थात हा अनुभव त्याला नवीन नव्हता .बरेचजण त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे झाले होते. सांयकाळी रमाकांत आणि मधुरा आले. रमाकांतने विचारले...

“काय दिलजमाई झाली की नाही?”

केदार म्हणाला...
“दिमाग जमाई झाली ,पण दिलजमाई होईलसे वाटत नाही.”

“मुद्दा लक्षात आला नाही”

“म्हणजे असे की हा सगळा खेळ कर्णिकमंडळी करत आहेत हे तिला पटले आहे. माझा काही दोष नाही उलट मी या षड्यंत्राचा बळी आहे हेही तिला मान्य आहे.पण माझ्या विषयी तिच्या मनात जी आढी बसली आहे ती जात नाही.”

“केदार अरे,वेळ लागेल ,पण हळूहळू सगळ सुरळीत होईल.तू केसची काय तयारी केली आहेस.?”

“काय तयारी करणार ? देशमुख म्हणतात तुम्ही स्व:तच्या डोक्याने उत्तर देऊ नका.वकील द्यायचा झाला तर प्रत्येक तारखेला ५००० रुपये फी द्यावी लागणार.म्हणजे जी तुटपुंजी शिल्लक आहे ती अशीच संपून जाईल”

“पण करणार काय ? वकील तर द्यावा लागणारच ना.”

“नाही .वकील द्यायचा नाही.”

“आणि काय करणार .केस कोण चालवणार ?”

“मागच्या तारखेला जे म्हणालो तेच पुन्हा म्हणणार.मी गुन्हा केला आहे .मला शिक्षा करा.फक्त जे काही म्हणायचे ते शांतपणे म्हणणार .मेलोड्रामा करणार नाही.”

मिनाक्षी म्हणाली...
“एवढ करण्यापेक्षा जे काय खर घडले ते सांगून टाका .रेवतीचे कारनामे सगळ्या जगाला कळूदेत ना.”

“माझ्याकडे पुरावा कुठे आहे ?जग्गुने माझ्या पुढे जे प्रपोझल ठेवले,त्याला साक्षीदार कोण आहे.? जग्गुची साक्ष निघाली तर तो साफ इन्कार करणार.”

मिनाक्षी म्हणाली...
“ सगळ अवघड होऊन बसलय.ते लोक हे सगळ कशाकरता करतायत तेच कळत नाही”.

“देशमुख वकील म्हणाले मला कचाट्यात पकडून ते माझ्याकडून काहीतरी काम करून घेणार असतील.”

रमाकांत म्हणाला...
“असाच काहीतरी प्रकार असणार ?माझ्या डोक्यात आणखी कल्पना आलीय.समजा तू म्हणालास की केंव्हाही माझ्या घरी ये .मी नांदवायला तयार आहे.तर त्यांची बोलतीच बंद होइल.’”

जणू काही रेवती खरच घरी राहायला येणार आहे अशा कल्पनेने घाबरून मिनाक्षी म्हणाली “अहो नको भाओजी,हे दोघे मिळून माझी मोलकरीण करून टाकतील.”

केदार म्हणाला...
“या विषयावर वाकीलाबरोबर चर्चा झाली.वकील म्हणाले हा केळकर वकिलांनी लावलेला ट्रॅप आहे.हे विधान मी केले तर आयताच केळकरांच्या तावडीत सापडेन.”

रमाकांत म्हणाला...
“का?या वर केळकर वकिलांच्या कडे काय उत्तर आहे.”

मीनाक्षीला वाइट वाटेल म्हणून केदारने उत्तर सांगितले नाही.तो म्हणाला...
“जाऊ दे .ती चर्चा नको ”

मधुरा म्हणाली...
“भावजी,तुमच्यावर एकामागून एक संकटे कोसळतायत . ब्रम्ह्पुरीत वझे गुरुजी म्हणून आहेत त्यांना पत्रिका तरी दाखवून या.काहीतरी जपजाप्य सांगतील.बघा तुम्हाला फरक पडेल”

मिनाक्षी म्हणाली...

“हे अनिस वाले आहेत.त्यांची कुठे श्रद्धा या पत्रिका वगैरे वर.”

मधुरा म्हणाली...
“वझे गुरुजी जादूटोणावाले बुवा नाहीत .ते आत्मबळ वाढवतात.आता हेच बघ.केदारभावजी आपण काहीतरी चूक केली आहे या भावनेने खचून गेलेत .ते जरा जास्तच guilt conscious झालेत. पण जर ते ‘मी रेवतीला फक्त मदत केली आहे काही पाप केले नाही’ अशी भूमिका घेऊन जज्जासमोर गेले तर, ते स्व:तचा बचाव करू शकतात.”

केदार म्हणाला...
“वा ,वहिनी छान बोललात.मी भेटणार वझे गुरुजीना.”

रमाकांत म्हणाला...
“तुझे आत्मबळ प्रमाणातच वाढू दे.डोस जास्त झाला तर जज्जना विचाशील रेवतीने तुम्हाला मागणी घातली तर तुम्ही काय केले असते.”

मधुरा त्याच्या दंडावर चापटी मारत म्हणाली...
“गप्प बसा .सगळ्याची नुसती चेष्टा.”

----------------------------------------------------------------------------------

केदारने वझे गुरुजीना नमस्कार करून त्याची जन्म पत्रिका त्यांच्या हातात दिली.गुरुजीं पत्रिका पाहायला लागले.गुरुजींचा चेहेरा चिंताग्रस्त झाला.ते म्हणाले...

“तुम्हाला तब्बेतीचा त्रास आहे का ?”

“नाही माझी प्रकृती छान आहे .मला काही त्रास नाही”

“बर | तुमचा प्रश्न विचारा.”

“माझ्या दोन नम्बरच्या बायकोने माझ्यावर दावा लावलाय.वकिलना वाटते मला शिक्षा होईल”.

वझे गुरुजी पुन्हा पत्रिकेचा अभ्यास करण्यात गुंतले,मग म्हणाले...

“नाही.तुम्हाला शिक्षाबिक्षा काही होणार नाही”

केदारला एकदम हायसे वाटले.तो म्हणाला “काही उपाय योजना करावी लागेल का ?”

“तुमचा तुम्हाला मार्ग सापडेल.तुम्ही तुमच्या मनाचा कौल घ्या.तुमचे मन सांगेल तेच करा”.

केदारला खूप हलके वाटायला लागले तो म्हणाला “गुरुजी दक्षणा किती द्यायची ?”.

”मी कधी मागत नाही पण लोक खुशीने देतात , ते मी घेतो.”

केदारने १०१ रुपये ठेऊन नमस्कार केला.
“येतो “म्हणून त्याने निरोप घेतला.पण गुरुजीही त्याच्या बरोबर निघाले.अंगणात आल्यावर ते म्हणाले...

“तब्येतीची काळजी घ्या.थोडेही अजारपण आले तरी औषध घ्यायचे अंगावर काढायचे नाही “

“बर”

केदारने स्कूटर स्टार्ट केली.गुरुजी म्हणाले...

“हेल्मेट घाला की”.

“इथे जवळच जायचे आहे”.

“तरी सुद्धा घालायचे.आणि सावकाश जायचे.गाडी वेगात चालवायची नाही.”

“हो” म्हणून केदारने गाडी चालू केली.

तो दिसेनासा होईपर्यंत गुरुजी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले.
नंतर “श्री हरी.श्री हरी”म्हणत ते घराकडे वळले.

-----------------------------------------------------------------------------------------

अश्विनला रिक्षात बसवून शाळेला पाठविताना आज मिनाक्षी बरोबर केदारही आला होता. अश्विन गेल्यावर केदारने स्कूटर काढली आणि मीनाक्षीला म्हणाला...

“बैस “

“कुठे जायचे आहे ?”

“चल तरी”

केदारने स्कूटर गावाबाहेर कमी वर्दळीच्या रस्त्यावर आणली. आणि तिला म्हणाला...

“आता तू चालव”

मिनाक्षी म्हणाली...

“काहीतरीच काय ? दहा वर्षे झाली,मला स्कूटरचा सराव राहीला नाही” .
“पोहायला आणि वाहन चालवायला एकदा शिकल्यावर कधी विसरत नाही.स्टार्ट कर”
तिने चारपाच राउंड मारले.दोनदा कडमडली पण लगेच सावरली. स्कूटरची प्रॅक्टिस झाल्यावर तो तिला एटीएममध्ये घेऊन गेला. प्रत्येक स्टेप समजून सांगत त्याने हजार रुपये काढले.मग तिला पैसे काढायला लावले”.

ती म्हणाली...

“मला हे का शिकवताय?”
“सगळे आले पाहिजे” केदारने मोघम उत्तर दिले.

एके दिवशी केदार बँकेच्या एफडी काढून त्यांची दोन भागात विभागणी करत होता.त्याने शिल्लक रकमेचा आढावा घेतला.दोघांनी काटकसर करून चांगली पुंजी साठवली होती ,निदान तूर्त तरी पैशाची अडचण नव्हती. मीनाक्षीने विचारले...

“कसला हिशेब करताय ? हे पैसे तिला पोटगी द्यायला लागणार आहेत का ?”

त्याही परिस्थितीत त्याला हसू आले.

”अग नाही.तिने पोटगी वगैरे काही मागितलेली नाही.”

“मग दोन गटात विभागणी का केली आहे.”

“जी सर्टीफिकेट तुझ्या नावावर आहेत त्याचा काही प्रॉब्लेम नाही.पण जी माझ्या नावावर आहेत ती तुझ्या नावावर करून देणार आहे.”

“ही निरवा निरव तुम्ही का चालविली आहे ?तुम्हाला शिक्षा होईल असे वाटते का?”

“नाही.अजीबात नाही “

“वझे गुरुजींनी काय सांगितले हो.मी पण विचारायचे विसरून गेले.”

“वझे गुरुजी म्हणाले मला शिक्षा वगैरे काहीही होणार नाही.पण मी स्व:त मार्ग शोधून काढला पाहिजे.”

“म्हणून तुम्ही पळून जाणार आहात ?”

“नाही मी पळून जाणार नाही.”

“मग ही कुठे जायची तयारी चालली आहे?”

“मी रेवतीच्या घरी जाऊन राहणार आहे. म्हणजे तिला नांदवल्या सारखे होतंय की.”

“अहो,काहीतरी काय बोलताय.? ते तर तुम्हाला चहाही विचारात नाहीत, मग ते तुम्हाला का ठेऊन घेतील?

“रेवती म्हणाली नव्हती का तुम्ही या ,अण्णांना भेटा,.ते काहीतरी मार्ग काढतील.बघू या काय मार्ग काढतात.?” .

”उगीच घाई गडबडीने निर्णय घेऊ नका.आधी त्यांना फोन करा.आणि ते या म्हणाले तरच जा.तेही अगदी थोड्या दिवसासाठी जावा.”

“चालेल. त्यांचे काय म्हणणे आहे ते फोनवरच कळेल”.

फोन करण्यासाठी त्याने मोबाईल उचलला आणि लगेचच “छे” म्हणून फोन गादीवर टाकला.

”काय झाले ? “

“माझ्याकडे त्यांचा कुणाचाच फोन नंबर नाही.”

केदारला चक्रव्युहात सापडल्या सारखे वाटायला लागले. जिथून सुरुवात केली तिथेच तो पुन्हा पुन्हा येत होता.

-------------------------------------------------------------------------

( क्रमशः )

पुढील भागाचा धागा...
https://www.maayboli.com/node/69963

Group content visibility: 
Use group defaults

केदार शी बोलताना जग्गूने जरी सावधगिरी बाळगली तरी त्या हॉटेलात कोणीतरी माणूस मिळू शकेल केदारला मदत होईल असा.
आवडला हाही भाग. मीनाक्षी चं व्यक्तित्व चांगलं रेखाटलं आहे.

छान वाटला हा भाग सुद्धा, उत्सुकता वाढतेय.

“तरी सुद्धा घालायचे.आणि सावकाश जायचे.गाडी वेगात चालवायची नाही.”>>>>
इथे काहीतरी रहस्य लपलय, केदारच्या जीवाला धोका आहे असं सुचवायचं आहे का?
पुभाप्र!

छान वाटला हा भाग सुद्धा, उत्सुकता वाढतेय.

“तरी सुद्धा घालायचे.आणि सावकाश जायचे.गाडी वेगात चालवायची नाही.”>>>>
इथे काहीतरी रहस्य लपलय, केदारच्या जीवाला धोका आहे असं सुचवायचं आहे का?
पुभाप्र! >>>+१

कथा खुप छान फुलवलीय आणि
प्रत्येक भागागणिक उत्सुकता वाढत चाललीय
------
प्रत्येक भागाच्या सुरुवतीस असे सर्व भागांची लिंक देण्यापेक्षा फक्त त्याच्या आधीच्या एक भागाची लिंक दिली तरी पुरे आणि प्रत्येक लिखाणाच्या शेवटीसुद्धा पुढील भागाची लिंक देता येईल असे पहा

वीक्ष्य :
>>>> प्रत्येक भागाच्या सुरुवतीस असे सर्व भागांची लिंक देण्यापेक्षा फक्त त्याच्या आधीच्या एक भागाची लिंक दिली तरी पुरे आणि प्रत्येक लिखाणाच्या शेवटीसुद्धा पुढील भागाची लिंक देता येईल असे पहा <<<<
तुमची सूचना फारच छान आहे, ती आता अंमलात आणली आहे आज पासून. मागील भागात सुद्धा तसेच शेवटी 'धागे' देतो , म्हणजे वाचकांना सोईचे होईल. पण त्यामुळे सर्व भाग वरती येण्याची शक्यता आहे. त्या बद्दल दिलगिरी.

तुरू >>> आज चा भाग?? <<< भाग १३ आज प्रसारित केलेला आहे.

'कथा वाचत असल्याच्या आणि ती आवडत असल्याच्या अभिप्राया बद्दल सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार !