मॅरेज Mystique ! ( भाग ९ )

Submitted by र. दि. रा. on 12 May, 2019 - 08:58

मागील भागांचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879
भाग ६ :- https://www.maayboli.com/node/69897
भाग ७ :- https://www.maayboli.com/node/69912
भाग ८ :- https://www.maayboli.com/node/69917

भाग ९ :

केदारने रेवती कार्तिक हे काल्पनिक पात्र उभे करून पत्रकाराची दिशाभूल केली.पण ही बनवाबनवी फार काळ टिकू शकली नाही.कारण मिटिंगमध्ये उपस्थित संचालाकानी ती रेवती कर्णिकच होती असे सांगून केदारची गोची केली. बाहेर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन तो परेशान झाला, तर घरी मीनाक्षीने अबोला धरल्यामुळे तो हैराण होऊन गेला.असाच एकदा तो जेवत होता.भाजी पोळी खाऊन झाल्यावर तो म्हणाला...

“मीना मला भात वाढ."

तिने उत्तर दिले नाही. त्याने पुन्हा भात मागितल्यावर ती म्हणाली...

“ भात नाहीय “

तो म्हणाला...
“आज भात केला नाहीस ? का ? मला भात नसला तरी चालेल पण आश्विनसाठी तरी करीत जा“.

ती म्हणाली
“लेकाची एवढी काळजी असेल तर तांदूळ घेऊन या.शिजवून घालते .“

“तांदूळ संपलेत का ?मला माहितच नाही.यादी दे .सगळ समान घेऊन येतो”

“डबे उघडून बघा.काय संपले असेल ते घेऊन या.”

“मीना असे का करतेस?.मी चूक कबूल केली ना ? तुझी क्षमा मागितली.मग आता राग सोड ना.आपण असे तणावाखाली किती दिवस राहणार.?”

“मी मुद्दाम नाही करत.मी स्व:तला समजावण्याचा खूप प्रयत्न करते.पण मी यातून बाहेर पडू शकत नाही.”

एकीकडे मीनाक्षीने असे आडमुठे धोरण स्वीकारलेले तर दुसरीकडे चौकशी बहाद्दरांच्या प्रश्नांची सरबत्ती. सुरुवातीला केदार नमते घेऊन माझे त्यावेळी चुकलेच असे मोघम मोघम बोलत असे .पण नंतर त्याने उद्धट उत्तरे द्यायला सुरुवात केली.एकदा अपार्टमेंटच्या लॉबीत त्याची आणि सी विंगमधले महेश पिटके यांची भेट झाली. पिटकेनी त्याला हटकले...

“ काय रानडे, रेवतीदेवी बऱ्याच दिवसात दिसल्या नाहीत? .केंव्हा येतायत?”.

केदार म्हणाला...

“निदान भाद्रपद वद्य पंचमीला तरी नक्की येइल”

“ भाद्रपद पंचमीला? का.”

“माझ्या वडिलांचे श्राद्ध नाही का.? मग पिंडाला नमस्कार करायला तरी तिला यावेच लागेल “

पिटके गुपचूप निघून गेले.पण एखाद्या शाळकरी मुलाने अशी आगळीक केली तर त्याला काय बोलणार ? सातवीत शिकणारा अजिंक्य मुद्दाम त्याला भेटायला आला. त्यानेही तोच प्रश्न विचारला,पण निष्पाप मनाने.

“ काका,रेवती केंव्हा येणार आहे?मला तिच्या बरोबर फोटो काढायचा आहे. ”

“मला माहित नाही रे.”

“अस कसं. तुम्ही बोलवा ना तिला”

“मी बोलवेन. पण ती येईलच असे नाही.”

“पण सोसायटीमधले लोक तर म्हणतात ती येणार आहे म्हणून”.

“हो,का?. येइल ही कदाचित”

“वॉव्ह, हौ एक्सायटिंग”

“अजिंक्य,मी याच शब्दाला फसलो.हाऊ एक्सायटिंग.? पण प्रत्यक्षात असे काही नसते रे .”

“काका असे नका ना म्हणू ?.तुम्ही फक्त तिला बोलवा,मग बघा आम्ही कशी धमाल करतो ते.”

“बर बाबा,मी बोलावतो तिला.ओके ?” अजिंक्य खूष झाला.

असेच एका सकाळी मिनाक्षी स्वयंपाक करीत होती.दारात इस्त्रीवाला आला .त्याने दार नॉक करूनही मिनाक्षी पुढे आली नाही.ती येत नाही म्हटल्यावर केदार दारात गेला.त्याने कपडे घेतले.

इस्त्रीवाला म्हणाला “साहेब,मागच्या महिन्याचे बिल देता ?”

“हो. बील किती झालय ?”

“वाहिनीच हिशेब ठेवतात.त्यांना विचारून द्या”

केदार किचनमध्ये गेला .”मीना ,लॉड्रीचे बिल किती झालेय ग?”

“कॅलेंडरवर लिहिलेले असते.ते पाहून द्या” केदारने कॅलेंडर वरच्या नोंदी वाचून बिल काढण्याचा प्रयत्न केला.पण त्याला काही सुधरेना.त्याने परत मीनाक्षीला विचारले...

“अग,हे काही लक्षात येत नाहीय.”

“मग तुमचे कपडे घरीच इस्त्री करा.किंवा बिनइस्त्रीचे कपडे वापरा.”

त्याने पुन्हा नोंदी वाचून कसेबसे बिल भागवले .तो म्हणाला “मीना, रेवती येऊन गेली त्याघटनेला आता महिना होत आला.अजून किती दिवस तू राग धरून ठेवणार आहेस.”

“अशी काही मुदत नाही.आणि मी मुद्दाम राग धरून ठेवला आहे असे नाही.मला कशात उत्साहच वाटत नाही. मला अतिशय असुरक्षित वाटतय.”

“तुला असुरक्षित वाटावे इतके काहीही झालेले नाही.ती इथे का आली होती ते मलाही समजत नाही.पण ती मिटिंग मध्ये जी वाक्ये बोलली.तेवढीच वाक्ये ती इथे घरीही बोलली.त्यावरून अस वाटतंय की हा काहीतरी कट आहे.आणि अशा वेळी तू मला साथ दिली नाहीस तर माझी परिस्थिती आणखीनच बिकट होइल.”

नेहमीप्रमाणे मीनाक्षीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

---------------------------------------------------------------------------------

मीनाक्षीचा असहकार .बाहेरच्यांचे टोमणे.यात भर म्हणून ऑफिसात वेगळाच प्रकार सुरु झाला होता.त्याच्या टेबलावर कोणतीच फाइल येत नव्हती.त्याने रंगा शिपायाला विचारले...

“माझ्याकडे कोणतीच फाइल येत नाही.काय प्रकार आहे.”

रंगा म्हणाला...
“ तसे महत्वाचे पेपर्स नसतील हो.! आणि किरकोळ काही असेल ते देशमाने खालच्या खाली निपटत असेल”

रंगाच्या खुलाशाने केदारचे समाधान झाले नाही.पण कळेलच योग्य वेळी म्हणून त्याने तो विचार बाजूला सारला.बरेच दिवसापासून एक फाइल चेअरमनसाहेबांच्या रिमार्कसाठी पेंडिंग होती.ती फाइल घेऊन तो चेअरमनसाहेबांचे केबिनमध्ये गेला...

“साहेब ही फाईल सवडीने आणा असे म्हणाला होतात ,आता वेळ आहे का ?”

चेअरमन फाईल वाचण्यात गढून गेले.पण पाच एक मिनिटांनी त्यांनी फाईल मधून लक्ष काढून अचानक केदारला विचारले...

“ तुमचे ते रेवती प्रकरण मिटले का हो ?”

“साहेब प्रकरण म्हणण्यासारखे त्यात काहीच नाही.”

“प्रकरण नाही तर नक्की आहे काय?”

“साहेब मी तुम्हाला सगळ खर ते सांगतो. रेवतीचा पीए आहे ,त्याचे नाव जग्गू ओसवाल ,त्याने मला हॉटेलात गाठले. तो म्हणाला रेवती आणि तिचे वडील यांच्या पत्रिका एकमेकाशी अनिष्ट योगात आहेत.त्यामुळे रेवतीचे नाममात्र लग्न करायचे आहे.कारण लग्नानंतर कन्या परक्याची होते.म्हणून त्याने मला लग्नासाठी विचारले.मी निक्षून नाही म्हणालो.पण तो पुन्हा पुन्हा मला विचारत राहिला.तो मला पटवून द्यायचा . रेवतीकेसाथ शादी ? क्या थ्रीलिंग एक्सपिरीएंस है. त्या थ्रीलसाठी मी हो म्हणून बसलो.

“हे काय पटण्यासारखे नाही.लोक म्हणतात ती गरोदर आहे .म्हणून तिचे घाई गडबडीने लग्न उरकले.”

“ तिथे तसे कोणी म्हणाले नाहीत”

“ते कशाला कबूल करतील? तुम्हाला त्यांनी काय पैसे दिले का?”

“नाही मी पैशासाठी काही केले नाही.आणि त्यांनीही मला पैसे ऑफर केले नाहीत.”

”तुमचे लग्न केंव्हा झाले ?”

“चोवीस फेब्रुवारीला”

“आणि ते आता सहा महिन्यांनंतर तुम्हाला शोधात आले . हे कसे काय ?”

“मला तर काहीच कळेनासे झालय”

एवढ्यात व्हाईस चेअरमन केंद्रे आले,

“काय चाललय?”

“नेहमीचेच .बोला ,काय नवीन”

“खासदाराचा निरोप आहे .विकासला बॉडीत घ्या म्हणतात”

“आता विकासला घ्यायचे तर कोणाला तरी राजीनामा द्यावा लागणार”

“को ऑप करून घ्या म्हणतात”

“को ऑप करून घ्यायला विशेष पात्रता पाहिजे.हा सोशल सायन्स मध्ये बी ए .कसे को ऑप करणार.?”

”शिक्षण मंत्र्यापेक्षा जास्त शिकलाय ह्या बेसिसवर घ्या म्हणाले” चेअरमन मोठ्याने हसले .

केदार म्हणाला...

“मी चालतो साहेब”

“हो .नंतर नोटिंग करून फाईल पाठवतो”

---------------------------------------------------------------------------------------

मिनाक्षी काहीतरी घरकाम करीत बसली होती.फोनची रिंग वाजली.मीनाक्षीने फोन घेतला.मल्हारपेठहून तिच्या मोठ्या भावाचा फोन होता.

“हा ,बोल दादा.”

“अग, इथे काल राउताकडे भद्रावतीहून पाहुणे आलेत.त्यांनी काही विपरीत बातमी दिली.”

“होय.खर आहे ”

“म्हणजे केदाररावानी खरच दुसरे लग्न केलंय?”

“होय”

“अग, काय सांगतेस ? ते पाहुणे सांगत होते तर माझा विश्वासच बसला नाही”

“मला विश्वास ठेवावाच लागला.कारण ती साक्षात माझ्या समोर उभी होती”

“ती काय म्हणत होती ?”

“एकत्र राहूया म्हणत होती”.

“ती खरच येणार आहे का ?”

“सोसायटीतली सगळी मुल, अगदी अश्विनसुद्धा, तिची वाट पाहत आहेत.”

“आणि केदारराव काय म्हणतायत ?”

“दुसरे लग्न करणारे पुरुष म्हणतात तेच,मी चुकलो, मला माफ कर.”

“हे बघ,मी आणि अप्पा उद्या भद्रावतीला येतोय.”

“नको, नको.तुम्ही नका येऊ.उगीच यांची आणि अप्पाची बोलाचाली होइल.सगळ्या सोसायटीत शोभा नको.”

“अग,अप्पा सैरभैर झालेत.कधी एकदा तुला पाहीन असे झालाय त्यांना”

“मग मीच येते तिकडे”

“केंव्हा येतेस ?”

“यांना विचारून कळवते”

“इतके झाले तरी यांना विचारूनची टॅग लाईन आहेच का ?”

त्याही परिस्थितीत तिला हसू आले...
“बर,बाबा.रविवारी येते.”

“नक्की ये.”

केदार घरी येताच मीनाक्षीने त्याला दादाच्या फोन बद्दल सांगितले.आणि म्हणाली...
“अश्विनला घेऊन जाऊ का राहू दे तुमच्या जवळ.?”

केदारने मिनिटभर विचार केला आणि म्हणाला...
“आपण सगळेच जाऊ.”

मिनाक्षी धास्तावून म्हणाली...

“नको नको .तुम्ही नका येऊ.”

“अग,काही होणार नाही.मी गाडी ठरवतो. आपण सगळे जाऊ.”

--------------------------------------------------------------

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे हा ही भाग☺️
मुख्य म्हणजे रोज एक भाग येतोय म्हणून मजा येतेय वाचायला
पुभाप्र.

स्टोरी कुठच्या कुठे गेली. आणि कळले कि टीव्ही वरील सिरियलच्या स्टोर्या का लांबतात. कुठे मुवि ची शूटिंग चालू होती मग ते राजघराणे आणि अचानक हे वेगळेच ट्रॅक. मूळ ट्रॅक वर स्टोरी कधी येणार?????

Ajanabi जी , - तुमची शंका रास्त आहे , कृपया पुढील भाग वाचत राहावे ही नम्र विनंती.