मॅरेज Mystique ! ( भाग १० )

Submitted by र. दि. रा. on 13 May, 2019 - 12:06

मागील भागांचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879
भाग ६ :- https://www.maayboli.com/node/69897
भाग ७ :- https://www.maayboli.com/node/69912
भाग ८ :- https://www.maayboli.com/node/69917
भाग ९ :- https://www.maayboli.com/node/69926

भाग १०

रमाकांत आणि मधुरा केदारच्या घरी आले.त्यांचे स्वागत करीत केदार म्हणाला...
“किती दिवसांनी आलात.”

रमाकांत म्हणाला...
“मुद्दामच उशिरा आलो.म्हटल थोडे शांत झाल्यावर जावे.सुरुवातीला कोणी काही ऐकण्याच्या मूड मध्ये नसणार मग बोलून तरी काय उपयोग.?”

केदारने ओळखले की तो मीनाक्षीची समजूत घालायला आला आहे. रमाकांत किंचित मोठ्या आवजात म्हणाला...
“वाहिनी आम्ही आलो आहोत.”

मिनाक्षी म्हणाली “आले.आले.”

मिनाक्षी लगेच आली आणि एक स्टूल घेऊन वेगळी बसली. रमाकांत म्हणाला...
“वाहिनीचा राग अजून मावळलेला दिसत नाही.अर्थात इतक्या लवकर सगळ मूळ पदावर येणे शक्य नाही.”

मिनाक्षी म्हणाली...
“लवकर किंवा नंतरही , काही फरक पडेल असे नाही.घाव माझ्या जिव्हारी लागलाय. तो बरा होइल असे वाटत नाही “

केदार म्हणाला...
“मीना ,खरोखर इतके काही झाले नाही.”

“फार काही झाले नाही असेच तुम्हाला वाटणार. पण मला काय यातना झाल्या ते तुम्हाला कसे समजणार.”

त्यांना थांबवत रमाकांत म्हणाला...
“वाहिनी ,नक्की काय प्रकार आहे ते तुम्हाला माहित आहे का ?”

“हे बऱ्याच वेळा काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात .पण ते बोलायला लागले की माझा मेंदू बधीर होतो.मला काही कळायचे बंद होते.”

“वाहिनी असे नका करू. केदार छचोर किवा वाह्यात प्रवृतीचा माणूस नाही.तो लग्नाला तयार झाला त्या अर्थी तसेच काहीतरी भक्कम कारण असणार .आपण त्याची बाजू ऐकून तरी घेऊ .सांग केदार,नक्की काय घडले”.

“मला जेव्हा जग्गुने लग्नासाठी विचारले तेंव्हा मी अगदी स्पष्ट नकार दिला.पण तो मला पुन्हा पुन्हा विनवत राहिला.तो म्हणाला रेवतीला काही पिडा आहे आणि लग्न विधी केल्यावर ती पिडामुक्त होणार आहे.नॉमिनल विधी करायचे आहेत . असे त्याने सांगितले.त्यांना सहकार्य करायचे या भावनेने मी लग्नाला तयार झालो.”

रमाकांत म्हणाला...
“केदार हे कारण संयुक्तिक वाटत नाही.कर्णिक मंडळी इतकी अंधश्रद्धाळू असतील ? आणि समजा आहेत तर त्यासाठी त्यांनी तिच्या आत्ते भावाला किंवा मामे भावाला लग्नाला उभे केले असते . एवढे तुला हॉटेलातून शोधून विनवण्या करण्याचे काय कारण.?”

मधुरा म्हणाली...
“रुईच्या झाडाशी लग्न लावले तरी चालते”

केदार म्हणाला...
“रेवती किंवा अण्णासाहेबांशी माझे समक्ष बोलणे झाले नाही . माझे जे काही बोलणे झाले ते जग्गु मार्फत . जग्गुने मला हे खोटे कारण सांगितले असेल ”

रमाकांत म्हणाला “ओके .कोणत्या तरी कारणासाठी तुमचे नाममात्र लग्न लावण्यात आले .ठरल्याप्रमाणे तुम्ही दोघांनी गुप्तता पाळली.मग आता सहा महिन्या नंतर ती स्व:त येवून म्हणते की आपण एकत्र राहिले पाहिजे.आणि ते सांगायला ती डायरेक्ट मिटींगमध्ये जाते ? याची टोटल कशी लावायची.”

मिनाक्षी म्हणाली...
“मिटिंगमध्ये जाण्यापूर्वी बहुतेक ती घरी येऊन गेली.कारण तीनच्या सुमारास पांढरा शुभ्र युनिफॉर्म घातलेला एक ड्रायव्हर घरी आला होता .हे मिटींगला गेलेत असे मी सांगितल्यावर तो म्हणाला ‘बोंबला, आता दिदी वैतागणार’ .आणि तो झटकन निघून गेला .“

केदार म्हणाला...
“सगळे गूढ आहे”

“आता तिसरा मुद्दा .त्यांनी तुला शोधण्यासाठी गुप्तहेर नेमला.तो गुप्तहेर तुझा फोटो दाखवत ‘यांना पाहिलेत का?’ असे विचारत गावभर फिरतो.इतका ड्रामा करायची काय गरज आहे.हॉटेलच्या रजिस्टरमध्ये तुझे नाव पत्ता फोन नंबर सगळे असणार ना? संस्थेची सुद्धा सगळी माहिती असणार.एक फोन केला असता तरी तुझा ट्रेस लागला असता.पण गुप्तहेर नेमून तू परगंदा झालायस असा कांगावा करतात. याचा अर्थ काय?”

केदार म्हणाला...
“मला वाटते हा काहीतरी वेगळाच कट आहे.”

मधुरा म्हणाली...
“लोक म्हणतात की ती प्रेग्नंट आहे”

केदार म्हणाला...
“तसे वाटत नाही.तिथे तसे कोणीही बोलले नाही किंवा सूचित केले नाही”

मिनाक्षी म्हणाली...
“असुदे बाई गरोदर.मी तिचे बाळंतपण करते.पोर सांभाळते.निदान माझ्या संसाराला लागलेले ग्रहण तरी सुटेल”

मिनाक्षीला एकदम हुंदका आला.मधुराने तिचे सांत्वन केले.मिनाक्षी शांत झाल्यावर रमाकांत म्हणाला...
“वाहिनी,मला काय म्हणायचे आहे, केदारने रेवतीशी लग्न केले ही चूक आहेच.पण रेवतीला मदत करायच्या हेतूने केदारने हे सगळे केले. कर्णिक मंडळींचा हेतू मात्र साफ नव्हता. त्यामुळे केदार उघडा पडला . पण तुम्ही तरी मन मोठे करा .केदारला माफ करा आणि अश्विन साठी तरी तुम्ही दोघांनी एकत्र या “

“अश्विनमुळेच मी इथे राहिले आहे. नाहीतर केंव्हाच निघून गेले असते. एरवी हे प्रत्येक गोष्ट मला सांगतात.यांचा हेतू शुद्ध होता तर यांनी हे स्व:तहून का नाही सांगितले.”

“मीना ,मी तुला सगळे सांगायचे असेच ठरवले होते.पण लग्नाचा कार्यक्रम झाल्यावर त्या लोकांनी मला अपमानास्पद वागणूक दिली.त्यामुळे मला हे कुणाला सांगावेसे वाटले नाही.जग्गू म्हणाला होता आपण त्यांचे फॅमिली फ्रेंड होऊ.उलट त्यांची गरज संपल्यावर मी निघून जायची वाट पाहत होते ?”

मिनाक्षी म्हणाली...
“हेही मला मान्य आहे.पण तुम्ही हे सगळे मिटिंग मध्ये बोलून तिचा पर्दाफाश करायला हवा होता. तिला घरी का घेऊन आलात ?.माझ्या कडून तुम्हाला कसल्या तडजोडीची अपेक्षा आहे ? पत्रकारांना खरे काय ते सांगून मोकळ व्हायचे सोडून स्व:तची बदनामी का करून घेतली?.भावजी,मी तुम्हाला सांगायला पाहिजे असे नाही. पण ‘आश्विन आणि हे’ एवढेच माझे विश्व आहे .आणि त्यालाच तडा गेला म्हटल्यावर माझा जगण्यातला आनंद हिरावला”

“वाहिनी तुमच दु:ख,तुमचा राग सगळ स्वाभाविक आहे.फक्त सगळ्याला मुरड घालून पूर्वपदावर या एवढेच. चला.चहा करा,निघतो आम्ही”.

मिनाक्षी खजील झाली...
.“अग,बाई आपण तासभर बोलत बसलोय आणि मला चहा करायचे सुचले नाही.”

मधुरा म्हणाली “तू बैस,मी चहा करते.”

रमाकांतची शिष्ठाई फेल गेली.केदार आणखीनच निराश झाला.

------------------------------------------------------------------------

मल्हारपेठला मीनाक्षीच्या माहेरघराजवळ गाडी थांबताच “मामा मामा” अशा हाका मारत अश्विन घरात घुसला .पाठोपाठ मिनाक्षी घरात गेली. केदार हॉलमध्ये बसला.वडिलांना पाहताच मिनाक्षीला रडू आले.ती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली.ते म्हणाले

“अग,काय झाले ,तुमचे भांडण झाले का?”

“नाही हो”

“मग काय झाल, त्यांनी तुला घरातून हाकलून दिले का”

“नाही हो”

“अग तू रडतेस का ?”

“आता खूप दिवसांनी भेट झाल्यावर रडू येत नाही का”

“केदारने दुसर लग्न केलंय हे खरे ना”

“हो.”

“का.तुझ्या संसारात काय कमी पडल त्यांना?”

“ त्यांनाच विचारा”

“म्हणजे ते आलेत इथे ?”

अप्पा तरातरा बाहेरच्या खोलीत आले.
“अहो,काय करून बसलात हे .विनाश काले विपरीत बुद्धी. इतकी छान बायको आहे.चांगला मुलगा आहे.छान संसार चालला आहे आणि ही काय अवदसा आठवली तुम्हाला”.

केदार म्हणाला...
“अप्पा तुम्ही शांत व्हा.माझे रेवती बरोबरचे लग्न हे काही खरे लग्न नाही.तो त्या लोकांचा कट आहे.आणि मी त्या कटात फसलो आहे.”

“तुम्ही खोटे बोलताय .तो राऊतांचा पाहुणा सांगत होता,तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळी कथा सांगता.तुम्ही पत्रकाराची बोलती बंद केली .आमचे तर काय हात दगडाखाली अडकलेत.”

“प्रसंगानुरूप मी खरे खोटे बोललो असेलही.पण तुमच्याशी मी खोटेपणा करणार नाही”.

“अहो मला मीनाक्षीची काळजी वाटायला लागली आहे .तुम्ही काही वेडेवाकडे पाउल उचलले तर ती कुठे जाणार.आमचीही परिस्थती जेमतेम आहे.”

“मी मीनाक्षीला अंतर देण्याचा प्रश्नच नाही.उलट माझेच तिच्याविना पदोपदी नडते”.

मीनाक्षीचा भाऊ म्हणाला...
“अजून तिचा काही फोन वगैरे येतो का”

“नाही.आत्ता पर्यंत तिने मला कधीही फोन केलेला नाही.”

“आता तिचे काय म्हणणे आहे ?”

“ती परवा आली होती तेंव्हा म्हणाली ‘आपले लग्न झालय ,आता आपण एकत्र राहायला पाहिजे’

मला ते शक्य नाही असे मी तिला सांगितलय .माझे आधी लग्न झालय, मला मुलगा आहे.हे सगळ मी तिला क्लीअर केलंय .”

“तरीही ती आलीच तर ? ”.

“दादा,ती कशी येइल ? माझ्या अख्ख्या फ्लॅट एवढा तिच्या बंगल्यातला हॉल आहे.ती एवढ्या टीचभर घरात कशी राहू शकेल? तिची दोनतीन फिल्मची शुटींग चालू आहेत.ते सोडून ती कशाला इथे येइल.तुम्ही काल्पनिक संकटे तयार करू नका.आणि नसती काळजी करू नका.” मीनाक्षीची वाहिनी म्हणाली “अप्पा,केदाररावच्या मनात खोट असती तर ते आपल्याकडे आले असते का? चला आता सगळ विसरा आणि जेवायला चला.”

--------------------------------------------------------------------

दुपारी तीनचा सुमार होता.हल्ली केदारला ऑफिसात फारसे काम नसेच.तो जुन्या फाईली चाळत बसला होता.त्यावेळी चेअरमनसाहेबांचा ड्रायव्हर आला आणि म्हणाला “तुम्हाला खासदारांनी डाक बंगल्यावर बोलावलंय. केदारने विचारले...
“चेअरमनसाहेब कुठे आहेत ?”

“खासदारांच्या बरोबर आहेत “

“कुठली फाईल मागवली आहे का ?”

“नाही.तसे काही म्हणाले नाहीत”.

केदार डाक बंगल्यावर पोहोचला.केदार येताच खासदारांनी बाकी मंडळीना निरोप दिला केदार नमस्कार करून सोफ्याच्या काठावर बसला. खासदार त्रासिक स्वरात म्हणाले...
“तुमची ती सिनेमा नटी बरोबरची काय भानगड आहे.”

“साहेब भानगड म्हणावे असे काहीही नाही”

“अरे, हो. तुम्ही तिच्याशी विधीपूर्वक लग्न केले आहे नाही का ? पण तुम्ही विवाहित असताना असे लग्न करणे हा गुन्हा आहे एवढे तरी तुम्हाला माहित आहे का ?”

“साहेब ते लग्न म्हणजे फक्त नॉमिनल- - - - -

“हे बघा रानडे ,ती शापमुक्तीची कथा बायाबापड्यांना सांगायला ठीक आहे.माझ्या पुढे असल्या भाकड कथा चालणार नाहीत.दोन लग्न करणे हा गुन्हा आहे,आणि आजच्या जमान्यात ते अनैतिक सुध्दा आहे.”

“नाही,हो साहेब इतके सिरिअस काहीच नाही.उलट त्यांनी मला वारंवार विनंती करून लग्नाला तयार केले.आणि निव्वळ रेवतीला सहकार्य करायचे म्हणून मी तयार झालो.”

“सगळे इतके सरळ होते तर तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी कहाणी का सांगत होता.मिटिंग मधून रेवतीला घेऊन पळ का काढला ? पत्रकाराशी खोटे का बोलला?”

“मला पेपर पब्लीसिटीची भीती वाटली म्हणून मी त्यांची दिशाभूल केली.”

“तेच म्हणतोय मी .तुमची भूमिका जर खरी होती तर तुम्हाला कोणाला भ्यायचे कारणच काय.जे सत्य आहे सांगून मोकळे व्हायचे. आम्ही तुम्हाला फार सभ्य समजत होतो पण तुम्ही एकदम बनेल निघालात”.

“नाही हो साहेब, तुम्ही अण्णासाहेबाना फोन करून विचारा.सगळ स्पष्ट होईल”

“हे बघा ,ते अण्णासाहेब तुम्हाला तुरुंगात टाकोत ,का दिवाळसणाला बोलावून आहेर करोत.माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा संबंध आपल्या शिक्षण संस्थेशी आहे.”

केदारकडे स्व:तच्या बचावासाठी कोणताच मुद्दा नव्हता.चेअरमन काही पाठराखण करतील या आशेने त्याने त्यांच्याकडे पहिले,पण ते मख्ख बसून होते.थोडा पॉज घेऊन खासदार म्हणाले...
“तुमच्या या गैरवर्तना बद्दल खूप तक्रारी आहेत.संस्कृती रक्षक मंडळाचे लोक आले होते.ते म्हणाले ‘तुम्ही एक शैक्षणिक संस्था चालवताय आणि मुलाच्यावर काय संस्कार करताय ?’ तुमच्यावर अॅक्शन घ्यावी म्हणून ते दडपण आणत आहेत.मुलींचे पालक आले होते ते म्हणतात तुम्ही शाळेत आहात तोपर्यंत ते मुलीना शाळेत पाठवणार नाहीत.”

“मी सगळ्या पालकासमोर माफी मागायला तयार आहे”

“ माफी मागायला तुम्ही असे कोण लागून गेलात.तुम्ही काय मंत्री वगैरे आहात का ? तुम्हाला नोकरीतून कमी करावे अशी त्यांची मागणी आहे.”

“साहेब माझी नोकरी गेली तर मला जगण्याचे काही साधनच नाही.आणि नोकरीवरून काढण्यासारखे मी काही केलेले नाही”

“ठीक आहे मग चौकशी समिती नेमू या .तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायची संधी मिळेल. चौकशी समिती जो निर्णय देइल त्याप्रमाणे कारवाई करू.”

“साहेब,माझी बदली करा.नाहीतर मी दीर्घ मुदतीच्या रजेवर जातो .पण इतकी कडक भूमिका घेऊ नका” “असल्या थातूर मातुर उपायांनी त्यांचे समाधान होणार नाही .तुमच्या बडतर्फीवर ते ठाम आहेत”

“साहेब काहीतरी पर्याय काढा.नोकरी गेली तर मी कशाच्या आधारे जगणार ?”

“तुमच्या चेअरमनना विचारा . शेवटी कारवाई त्यांनी करायची आहे”

केदारने चेअरमनसाहेबाना हात जोडले तो म्हणाला “साहेब निदान आपल्या इतर संस्थेत तरी मला सामावून घ्या.”

चेअरमन म्हणाले...
“रानडे तुम्ही सीच्यूएशन समजून घ्या.चौकशी समिती नेमून तुमच्यावर कारवाई झाली तर तुमचे रेकॉर्ड खराब होणार.मग तुम्हाला इतर कुठेच नोकरी मिळणार नाही.त्यापेक्षा तुम्ही स्व:तहून राजीनामा देऊन मोकळे व्हा.हा धुरळा खाली बसला की मग तुमचा इतर संस्थेत विचार करू.”

यापेक्षा काही ठोस आश्वासन मिळते का या अपेक्षेने केदार तसाच उभा राहिला.

बऱ्याच वेळा नंतर खासदार म्हणाले...
“तुमच्या चेअरमननी तुम्हाला सोयीस्कर पर्याय दिला आहे.बघा तुम्हाला पटला तर.मी तुम्हाला चार दिवसांची मुदत देतो.तुम्ही राजीनामा देणार नसलात तर मी चौकशी समिती नेमतो.या तुम्ही.”

-----------------------------------------------------------------------------

केदार कसा बसा घरी पोहोचला.डाक बंगला ते घर हे सहा किलोमीटरचे अंतर रिक्षातून पार करताना त्याला असे वाटत होते की चक्कर येऊन आपण खाली कोसळू.दीर्घ श्वास घेत तर कधी रामनाम घेत त्याने स्व:तला सावरले.मीनाक्षीने दार उघडताच तो कडमडत सोफ्यावर बसला.त्याने डोळे मिटून घेतले . मान सोफ्याच्या पाठीवर टाकली . मीनाक्षीने विचारले...

“अहो,काय झाले. तुम्हाला बरे नाही का ?काय होतंय तुम्हाला”

“माझी नोकरी गेली.”

“म्हणजे तुम्हाला नोकरीवरून काढले.? पण का ?”

“रेवतीशी लग्न केले म्हणून”

“अरे,देवा .पण तुम्ही त्यांना सांगा ना ! म्हणावं तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे”

“दोन लग्न करणे हा गुन्हा आहे.त्यामुळे ती आता व्यक्तिगत बाब राहिली नाही”

मिनाक्षीही खचून गेली..ती म्हणाली...
“आता काय करायचे हो”

मिनाक्षी घाबरून जाऊ नये म्हणून त्याने सगळे अवसान गोळा केले . तो सावरून बसला आणि म्हणाला
“मी जर स्व:तहून राजीनामा दिला तर माझे सर्व्हिस रेकॉर्ड खराब होणार नाही.त्यामुळे मला दुसरी नोकरी मिळेल.माझ्या बऱ्याच ओळखी आहेत.शिवाय आमच्या गृपच्या इतर संस्था आहेत .काही ना काही मार्ग निघेल”

संकट फारसे गंभीर नाही असे भासवण्यासाठी त्याने कपडे इस्त्री करायला घेतले.

----------------------------------------------------------------------------

सकाळ झाली तरी केदारने उठायची फारशी गडबड दाखवली नाही.आपले टेन्शन मीनाक्षीला जाणवू नये म्हणून त्याने आरामशीर आवरले.चहा पीत पीत पेपर वाचण्याचा रीवाजही पार पडला.रोजची देवपूजा मीनाक्षीच्या खात्यावर असे, पण आज तो मान केदारने स्व:तकडे घेतला .त्याचे आवरत आल्यावर तिने विचारले...
“आज डबा द्यायचा का नाही”.

“डबा लागणारच ना.”

“मला वाटलं राजीनामा देऊन लगेच घरी येणार”

“राजीनामा म्हणजे मी आज वन मन्थ नोटीस देणार.नियमाप्रमाणे मला एक महिना ड्युटी करावी लागेल.”

“ बर “

अगदी शांतपणे तो त्याच्या केबिनमध्ये गेला.एक कोरा कागद घेऊन त्याने राजीनाम्याची नोटीस लिहायला घेतली.वैयक्तिक कारणासाठी नोकरी सोडत आहे.सेवेच्या कालावधीत चेअरमन ,संचालक व स्टाफने सहकार्य केले हे आवर्जून नमूद केले . आज पासून एक महिन्याने कार्यमुक्त करावे अशी विनंती करून त्याने नोटीस पाठवून दिली.आपल्या टेबलावर फाइल का येत नव्हत्या ते कोडे उलगडले .आज तर त्याला भेटायलाही कोणी आले नाही.जणू काही त्याने मोठा फ्रॉड केला होता.फक्त रंगा शिपायाने हळहळ व्यक्त केली.आता महिनाभर पेपर वाचत,चहा पीत वेळ काढावा लागणार होता.मनात एक अंधुक आशा होती की चेअरमन बोलावतील आणि काहीतरी मार्ग दाखवतील,पण तसे काही झाले नाही .दोन वाजता चेअरमन गेले.आणि . थोड्या वेळाने ओ एस देशमाने आले,त्यांनी हातातला कागद केदार समोर ठेवला.केदारने विचारले “हे काय” देशमाने म्हणाले...
“तुमच्या राजीनामा पत्रावर चेअरमननी नोटिंग केलंय,ते तुम्हाला दाखवायला आणलय.”

केदारने नोटिंग वाचले.चेअरमननी अगदि व्यवस्थित नोटिंग केले होते. राजीनामा मंजूर . एक महिन्याचा नोटीस पे देऊन आजच कार्यमुक्त करावे.तूर्त देशमाने यांचेकडे चार्ज द्यावा.संचित रजेचा पगार,ग्रच्युईटी,पीएफ वगैरे यथावकाश देय राहील. नोटिंग वाचून केदारला बराच रिलीफ मिळाला तो म्हणाला...
“ठीक आहे”.

देशमानेनी एक महिन्याच्या पगाराचा चेक दिला .चार्ज रिपोर्टवर सही घेतली. शेकहँड करून केदार बाहेर पडला.देशमाने प्रसन्न चित्ताने आणि सुहास्य मुद्रेने चिटणीस पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.

---------------------------------------------------------------

( क्रमशः )

पुढील भाग ११ चा धागा...
https://www.maayboli.com/node/69949

Group content visibility: 
Use group defaults

VB हो बरोबर, 'केदार' नव्हे , 'रमाकांत' च हवे होते , आता मुद्रित शोधन केले आहे ! हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद !!