मॅरेज Mystique ! ( भाग ६ )

Submitted by र. दि. रा. on 9 May, 2019 - 12:58

मागील भागाचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879

भाग ६ :

मुंबईतले कोर्टाचे काम उरकून केदार भद्रावतीला परत आला.दुसरे दिवशी सकाळी केदार पेपर वाचत बसला होता.जवळच मिनाक्षी त्याची सुटकेस रिकामी करत होती . सर्वात वर फाइल्स होत्या तिने विचारले

“या फाइल्स कुठे ठेवू.?”

“टेबलावर ठेव ऑफिसला जाताना घेऊन जाईन”
तिने धुवायचे कपडे बादलीत टाकले.नंतर तिच्या हाताला सूट लागला ती म्हणाला

“अहो हा सूट कोणाचा?”

“कोणाचा कसा असेल ? माझाच आहे”

“तुम्ही नवीन सूट घेतला? का ?”.

“चेअरमन म्हणाले फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रहायचे,हायकोर्टात वावरायचे
म्हणजे सूट पाहिजे”

मीनाक्षीने सुटावरून अपूर्वाईने हात फिरवला.तो स्पर्श तिला सुखद वाटला .
ती म्हणाली “काय भारी आहे हो. किती पडले”

“काय माहित. जग्गूने आणला”

“कोण जग्गू ?”

“जग्गू म्हणून सॉलीसिटर फर्ममध्ये एक क्लार्क आहे.त्याने आणला.” मीनाक्षीने सूट कपाटात व्यवस्थित ठेवला.तो ठेवत असताना तिला सेंटचा भपका आला.

ती म्हणाली - “किती सेंट मारलाय ?कोर्टात तुम्ही सेंट मारून गेला होता?”

“अग,त्या सुटाला सगळा डांबर गोळ्याचा वास येत होता.तो घालवायसाठी सेंट मारावा लागला”

मिनाक्षी सुटकेस मधून बाकीचे कपडे काढू लागली.सर्वात शेवटी तिच्या हाताला मुकटा लागला.ती म्हणाली
“हा मुकटा कोणी दिला ?”

“कोणीही दिला नाही.मी विकत आणला.”

“अग बाई, नवलच आहे”

केदार काही बोलला नाही.तिला वाटले तो रागावला . म्हणून स्पष्टीकरण द्यावे अश्या पद्धतीने ती म्हणाली “.म्हणजे तुम्ही मुकटा आणला हे चांगलेच झाले.आणि मुकटा छानच आहे.पण तुम्ही आणला म्हणून आश्चर्य वाटले .

"केवढयाचा आहे ?”

“आम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशान साठी कपडे पहायला भुलेश्वर मार्केटला
गेलो होतो.तिथे मला मुकटा दिसला.घरातला बराच जुना झालाय म्हणून मी घेऊन
टाकला.’’

हा सदगृहस्थ कधी हातरुमाल आणत नाही आणि आता सूट काय, मुकटा काय,तिला फार आश्चर्य वाटले पण आणखी काही विचारले तर संशय घेतल्यासारखे वाटेल म्हणून

ती गप्प राहिली.
-----------------------------------------------------------------

केदार मुंबईहून आल्यानंतरचे दोन महिने खूप गडबडीचे गेले.कारण मार्च एप्रिल म्हणजे परीक्षेचे दिवस.त्यामुळे केदारला भरपूर व्याप होता.नंतर
व्हेकेशन आली,पण नव्या अॅडमिशन ,शिक्षकांच्या बदल्याचे घोळ यामुळे त्याला रोज ऑफिसला उशिरा पर्यंत थांबावे लागे. मात्र या दारोळातही त्याला रेवतीची तीव्रतेने आठवण येई.तो रोज रेवतीच्या फोनची वाट पाहत असे. पण या चार महिन्यात त्याला रेवतीचा फोन नाही किंवा जग्गुनेही काही सम्पर्क ठेवला नाही . अर्थात हे सगळे ठरल्या प्रमाणेच होत होते.पण केदारला वाटे की आपण त्यांना इतकी मदत केली आहे तर निदान मित्रत्वाचे संबध ठेवायला काय हरकत आहे.आणि जग्गु तसे म्हणाला होता.संबंध ठेवायची रेवतीची इच्छा नव्हती हे स्पष्ट दिसत होते तरीही केदार तिच्या फोनची वाट पाहत राही.

नंतर तर प्रॉब्लेम असा झाला की केदारला रेवतीचे भास व्हायला लागले. एकदा मिनाक्षी कडून केदारचा डबा वेळेवर तयार झाला नाही.बायकी स्वभावानुसार ती बडबडायला लागली
“मी एकटी काय काय करू.तुमची ऑफिसची वेळ, अश्विनची शाळेची तयारी सगळ एकदम येते.”

अनवधानाने केदार म्हणाला “तिला पोळ्या करायला लाव ना “

मिनाक्षी म्हणाली “तिला कोणाला?आपल्या घरात दुसरी कोणी आहे का?’”

सावरून घेत केदार म्हणाला “पोळ्या करायला बाई लाव असे म्हणत होतो “

‘एकदा त्याने फाइलवर शेरा मारला की अण्णांचा खुलासा मागवा’ . क्लार्क विचारायला आला की ‘”अण्णांचा म्हणजे कोणाचा? अण्णा केंद्रे तर
व्हाईस चेअरमन आहेत. त्यांचा खुलासा आपण कसा मागणार ?”

केदारला काहीतरी सारवासारवी करावी लागली. असेच एकदा तो डबा न घेताच कामावर आला होता . लंच अवरमध्ये त्याला भास झाला की रेवती डबा घेऊन आली आहे .

तो म्हणाला “ तू कशाला डबा घेऊन आलीस? ”

रेवती म्हणाली “मग काय तुम्ही दिवसभर उपाशी राहणार का ?”

तो म्हणाला “उपाशी कशाला राहीन?मी कॅन्टीनमध्ये जेवलो असतो ना ?”

रेवती म्हणाली “वा!!घरात आम्ही दोघी असताना तुम्ही कॅन्टीन मध्ये का जेवायचे ? ”

केबिन बाहेर रंगा शिपाई बसला होता.त्याला काहीतरी अर्धवट ऐकायला आले , तो

आत येऊन म्हणाला “कॅन्टीन मधून तुमचा डबा आणायचं आहे का?”

केदारने सावरून घेतले “अरे नको.मी तिथेच जाऊन जेवतो ना ?”’
रेवतीचे रहस्य मनात कोंडून ठेवणे केदारला अशक्य झाले .तो एकदा सवड काढून रमाकांतच्या घरी गेला.त्याच्या घरी गेल्यावर हॉलमध्ये न बसता तो बेडरूममध्ये गेला. रमाकांत म्हणाला

“कायरे एकदम बेडरूम मध्ये आलास . काही विशेष ?”

“मी तुला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे”.

केदारची कहाणी ऐकून रमाकांत म्हणाला “ केदार तू कसा या दुष्टचक्रात अडकलास? हा प्रकार ऐकून रेवतीचे कुटुंब पूर्णपणे अंधश्रद्धेच्या आहारी
गेले आहे असे स्पष्ट दिसते . पण तू अंधश्रद्धेला बळी पडावेस हे शोभत नाही?’”

“नाही.अंध श्रद्धा म्हणून नाही .मी फक्त रेवतीला मदत करायची म्हणून हे केले”.

“बर ठीक आहे.झाले ते झाले .आता सगळे विसरून जा . माझ्याकडे बोललास , हरकत नाही .पण इतर कुणाकडे बोलू नकोस .
तुझे हसे होइल !”

“नाही .कुठे बोलायचा प्रश्नच नाही.कारण हे गोपनीय ठेवायचे असेच ठरले आहे”

“मग आता काय प्रॉब्लेम आहे.?”

“मी रेवतीला विसरू शकत नाही . मला रेवतीचे भास होतात.त्यामुळे मी रेवतीशी कल्पनेत बोलतो.पण मीनाक्षीला किंवा जो कोणी शेजारी असेल त्याला ते विचित्र वाटते “

“केदार तू भानावर ये.कर्णिकांच्या भ्रामक समजुती पायी त्यांनी तुझे आणि रेवतीचे लग्न करून दिले .पण तो विषय तिथेच संपला.रेवतीच्या दृष्टीकोनातून तू एक उल्लू माणूस आहेस.तू त्यांच्या घरात चार तास बसून होतास पण सौजन्य म्हणून सुध्दा कोणी तुझी विचारपूस केली नाही. तेंव्हा तू वास्तवाचे भान ठेव आणि नॉर्मलला ये“.

“मला नाही तसे वाटत.तिने सर्व लग्न विधी छान करून घेतले.ती माझ्या हातात हात देत होती.जोडीने सप्तपदी चालत होती.त्यात काहीसुध्दा खोटेपणा नव्हता.”

“लग्न विधी होत असताना तिने तुला सहकार्य दिले.कारण हे विधी व्यवस्थित व्हायला पाहिजेत ही तिची श्रद्धा होती. पण एकदा लग्न झाल्यावर ती तुला चुकवून पसार झाली हे वास्तव आहे .“

“पण मला हे पचवणे शक्य होत नाही. मी सतत रेवतीचा विचार करत असतो.”

“आपण एखाद्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊ या का ?”

“बाप रे ! म्हणजे मला वेड लागेल असे वाटते तुला ?”

“असच काही नाही.पण आत्ता जी परिस्थिती आहे ती फारशी बरी नाही.”

स्व:तशी बोलावे तश्या पद्धतीने तो म्हणाला “नाही .मला सुधारण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे”.

थोड्या वेळाने तो म्हणाला “मी हे मीनाक्षीला सांगून टाकू का?म्हणजे माझ्या मनावरचे ओझे कमी होईल.”

रमाकांत म्हणाला - “तू मुंबईवरून आल्यानंतर लगेचच बोलला असतास तर बरे झाले असते. आता बोललास तर तिचा गैरसमज होईल"

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults

आधिच्या भागात खूप वर्णने होती.. हा खुपच छोटा भाग.. लवकर लवकर पुढचे भाग पोस्टा.. ग्लोबल लैवल वरुन प्रकरण एकदम लोकल लेवल ला येउन पोचलय..

आधिच्या भागात खूप वर्णने होती.. हा खुपच छोटा भाग.. लवकर लवकर पुढचे भाग पोस्टा.. ग्लोबल लैवल वरुन प्रकरण एकदम लोकल लेवल ला येउन पोचलय..

तुम्ही दूरदर्शन मालिकांकरता लिखाण करता का? करत नसाल तर जरूर विचार करा. नक्की यशस्वी व्हाल.
कथाभाग अगदी तंतोतंत वळणे घेत चाललाय

शुभकार्याला पुरुष नेसतात त्या सोवळ्याला मुकटा असेही म्हणतात.

>>> तुम्ही दूरदर्शन मालिकांकरता लिखाण करता का? <<< अजून तरी नाही .

(#सात्विकसंताप)
काय या केदार ला सेल्फ रिस्पेक्ट वगैरे नाहीच का.असं भिकाऱ्या सारखं वागंवणं सहन करून लग्न करून बसला.वर खरं लग्न रिस्क मध्ये आणतोय.वर हे सगळं फुकट.भोग मेल्या पुढच्या 2-3 भागांनंतर कर्माची फळं!!
(#सात्विकसंतापएण्ड्स)